वाणी भाटिया… ‘हुकमाची राणी’, व्यवसायातले यश, धिराची कहाणी

वाणी भाटिया… ‘हुकमाची राणी’,
व्यवसायातले यश, धिराची कहाणी

Wednesday October 14, 2015,

4 min Read

वाणी भाटिया. वडील गेले तेव्हा १७ वर्षांची होती. आईच्या दु:खाला पारावार नव्हता. पाठचा भाऊ १३ वर्षांचा. वाणीला दोघांना सांभाळायचे होते. वडिलांच्या व्यापारातले आईला ‘अबकड’ही कळत नव्हते. बरं... जगणे तर थांबत नाही, ते रेटावेच लागते. हौसमौस करण्याच्या वयात संकटांचा सामना करण्याचा प्रसंग वाणीवर ओढवलेला होता.

वाणीने स्वत:ला सावरले. आईला व्यापारातले कळत नाही म्हटल्यावर तिला उभे राहावेच लागणार होते. वडिलांचा व्यवसाय पूर्ववत सांधण्यात आईने आपल्या परीने मेहनत केली. आईची हिंमत वाढवी म्हणून वाणी आईसोबत राही. तिला धीर देई. परवापरवापर्यंत घर एके घर अशी दिनचर्या असलेली आई. वयाच्या ४२ व्या वर्षी अंगावर आलेला व्यापार तिला साहजिकच नकोसा होई. पण इलाज नव्हता. हळूहळू व्यापारातला व्याप अंगवळणी पडत गेला आणि अखेर आई रुळली. व्यवसायातले बारकावेही आताशा तिला कळू लागले होते.

हा काळ वाणीच्या जीवनातला फार महत्त्वपूर्ण काळ होता. कारण याच दरम्यान लोकांना समजून घेण्याची संधी तिला मिळालेली होती. कुटुंबावर कोसळलेल्या संकटावर लोकांकडून आलेला प्रतिसादही तिने न्याहाळलेला होता. तपासलेला होता.

image


वाणी भाटिया या Gritstones.com या लोकप्रिय ‘फॅशन पोर्टल’च्या संस्थापिका आहेत.

‘‘दिवस चांगले असले म्हणजे आम्ही काहीही शिकू शकत नाही. तुम्हाला जे काही शिकवून जातात ते वाईट दिवसच. वडिलांच्या मृत्यूनंतरचा काळ म्हणजे आमच्या दृष्टीने परीक्षेचाच काळ होता… आणि त्या दिवसांनी मला खूप काही शिकवले.’’

हे सांगताना वाणी यांचा आवाज जरा जडच झालेला असतो... गतकाळात त्या हरखून गेलेल्या असतात...

एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आणि दिल्लीत शिकलेल्या-सवरलेल्या वाणी यांनी वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली. पदवीनंतर त्यांनी ‘इंटरनॅशनल कॉलेज ऑफ फॅशन’ या संस्थेतून ‘फॅशन’ या विषयाचे विशेष प्रशिक्षण घेतले.

फॅशनचा कोर्स करत असतानाच ‘दी मोस्ट क्रिएटिव्ह डिझायनर’ हा खिताब वाणीने पटकावला. पुढे वाणीला आपला स्वतंत्र व्यवसाय करायचा होता. वाणी सांगतात, ‘‘माझ्या आईने मी एमबीए करावे म्हणून काही पैसे खास साठवलेले होते. मला व्यवसायासाठी गुंतवणूक म्हणून हे पैसे आईने द्यावेत, असा हट्ट मी धरला. आई कशीबशी तयार झाली. सुरवातीला तर एमबीए कर असाच सूर तिने आळवलेला होता. पण मी जिंकले. मला पैसे मिळाले.’’

व्यवसायाची सुरवात म्हणून वाणी यांनी काही स्थानिक ब्रँडस्साठी काम केले. पुढे ‘व्हिडिओकॉन’सारख्या मोठ्या कंपन्यांबरोबर काम करण्याच्या संधी मिळत गेल्या. ‘बिबा’, ‘गुड अर्थ’ आणि ‘युनायटेड कलर्स ऑफ बेनेटन’सारख्या बड्या ब्रँडस्चाही यात समावेश होता.

वाणी सांगतात, ‘‘या सगळ्या ओघात एक वेळ अशी आलीच, की मला जाणवले अरे आपण या ब्रँडस्सोबत त्यांच्यासाठी काम करण्यापेक्षा आपलाचा ब्रँड का सुरू करू नये? आणि २०११ मध्ये तो दिवस उजाडला. Gritstones ‘ग्रिटस्टोन्स’ची स्थापना झाली. ई-कॉमर्स बाजारपेठ त्या काळात बाळसे भरून-सरून हुंदडू लागलेली होती. आम्हीही या ऑनलाइन बाजाराचा फायदा घेण्यासाठी आमचा ब्रँड ऑनलाइन केला.’’

वाणी यांचा हा श्रीगणेशा साधारण स्वरूपातला असाच होता. म्हणून सुरवातीला खूप जपून पाउले टाकली गेली. हळूहळू टाकली गेली. योग्य वेळ येताच गुजरातेत अहमदाबादमध्ये ग्रिटस्टोन्सचे पहिले ऑफलाइन स्टोअर सुरू केले गेले. दणकेबाज!

अगदी छोटा व्यवसाय म्हणून कुर्मगतीने सुरवात करून वाणीने ऑफलाइन स्टोअरच्या रूपात एक मोठा पल्ला गाठलेला होता. सध्या वस्त्रप्रावरणांत त्यांचे दोन नावाजलेले ब्रँड ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. Gritstones ‘ग्रिटस्टोन्स’ आणि Vvoguish ‘वोग्युइश’ हे ते ब्रँडस्. ग्रिटस्टोन हा पुरुषांसाठी पेहराव तयार करणारा ब्रँड आहे, तर वोग्युइश हा महिलांसाठी प्रावरणे तयार करणारा ब्रँड आहे. ग्रिटस्टोन्सचे मंत्रा, जबोंग, फ्लिपकार्ट आणि मेजन सर्वच ऑनलाइन पोर्टल्सवर उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे वोग्युइशची प्रावरणे होमशॉप १८ इत्यादी टेलिव्हिजन चॅनल्सवर उपलब्ध आहेत.

अगदी खोल आतून सृजनशील असलेल्या वाणी म्हणतात, ‘‘भविष्यात जर मी स्टायलिश पेहराव साकारणे बंद केलेले असेल तर हे समजून चला, की मी कुठल्या तरी मालिकेसाठी किवा चित्रपटासाठी आपले हात आजमावत असेन.’’

image


वास्तविक पाहाता त्या आज एक यशस्वी व्यावसायिक आहेत, पण नकळत्या वयातली वडिलांच्या विरहाची वेदना त्यांच्या हृदयात आजही तशीच आहे. भारतीय बाजारावर आजही पुरुषप्रधान व्यावसायिकतेचे सावट आहेच, त्याखाली काम करताना महिला असण्याचे अनेक तोटे वाणी यांना सहन करावे लागतात. आपले वेगळे स्थान निर्माण करण्याच्या स्पर्धेत खास अडचणींना तोंड द्यावे लागते.

वाणी म्हणतात, ‘‘ तुमचे काम नेहमी चांगले होत राहावे म्हणून तुमच्यावरताण असतोच. शिवाय प्रत्येक वेळेला तुमचे काम दर्जेदार असते, हे तुम्हाला सतत सिद्ध करत राहावे लागते. लोक अगदी सहज तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवत नाहीत. विसंबून तर अजिबात राहात नाहीत. अशात माझ्यासमोर स्वत:ला, व्यवसायाला उभे करण्याची, सावरण्याची आव्हाने होती. पैसा वगैरे सांभाळून व्यवसायावर देखरेख करणे, हे खरंच मोठे आव्हान होते.’’

व्यावसायिक आघाडीवरही या वर्षाच्या अखेरपर्यंत आपल्या उत्पादन श्रुंखलेचा विस्तार करताना त्यात डेनिम, ब्लेझर्स आणि समर कोटचा समावेश करण्याच्या तयारीत वाणी आहेत. शिवाय फ्रेंचायझी मॉडेलचा वापर करत काही अन्य ऑफलाइन स्टोअर सुरू करून व्यापारवृद्धीचीही योजना आहे. ब्रँडनेमचे वर्तुळही वाढवतच न्यायचे आहे.

वैयक्तिक आघाडीवर थोडे आंसू, थोडे हंसू वाट्याला आहेतच. अश्रूंचे कारण वडिलांच्या विसरता न येणाऱ्या आठवणी. हंसू यासाठी, की आपण आपल्या बळावर एक व्यवसाय उभा केला. सुयोग्य घडी बसवली. वडिल असते तर त्यांना ‘आपली लेक किती गुणाची’ म्हणून कोण आनंद झाला असता. वडिलांसमवेत वाणीचे नाते जरा जास्तच घट्ट होते. अगदी लहानपणीही आईपेक्षा वडिलांशीच तिची गट्टी जास्त जमे. लेकरांच्या रूपात पिता नेहमी हयात असतो, हे सिद्ध करण्यासाठी वाणीने आगळे काही करायचे ठरवले आणि त्या यशस्वी झाल्या. धाकटा भाऊ धीरज भाटिया म्हणजे या कंपनीचे दुसरे संचालक. आणि वाणी म्हणजे तर धीरजची वडिलकीच!

वाणी चित्रपटांच्या शौकीन आहेत. सवड मिळाली म्हणजे आवडीचा चित्रपट पाहणे त्यांना आवडते.

आणखी एक काम वाणी यांना फार आवडणारे असे आहे आणि ते म्हणजे इतरांच्या समस्या सोडवणे. समस्या जाणून घेणे, समस्यांचे विश्लेषण करणे अन्‌ समस्येच्या मुळापर्यंत जाणे. वाणी यांचं विश्लेषणशील डोकं म्हणजे ‘गजब’ आहे. कदाचित म्हणूनच त्या प्रश्नांकडे बघत बसण्यापेक्षा उत्तरे शोधण्यात गर्क होतात आणि यशस्वीही ठरतात...