शिक्षिका ते लेखिका : निवृत्तीनंतरही माधुरीबेन यांचा प्रेरणादायक प्रवास!

शिक्षिका ते लेखिका : निवृत्तीनंतरही माधुरीबेन यांचा प्रेरणादायक प्रवास!

Saturday October 24, 2015,

4 min Read

१९३० आणि ४० च्या दशकांत शिक्षणाची संधी मिळाली, असे लोक मोजकेच. एकतर तेव्हा शिक्षणविषयक तितकीशी जागरूकताही नव्हती, पण अभ्यासक्रम मात्र तोलामोलाचा होता. त्यातही शाळा म्हटले म्हणजे मुलींचा प्रवेश नगण्यच असे. गुजराती लेखिका तसेच शिक्षिका माधुरीबेन देसाई या त्या काळातील मोजक्या शिकलेल्या. उमरेथ नावाच्या लहानशा गावात माधुरीबेन यांचा जन्म झाला. वडील गावातील प्रतिष्ठित शिक्षक होते. विशेष म्हणजे आईही शिक्षिका होत्या.

माधुरीबेन सांगतात, ‘‘माझ्या आईचे शिक्षिका असणे म्हणजे त्या काळातला गहजबच होता. फार मोठी गोष्ट होती. आईला तास घेताना मी पाही तेव्हा मला कोण अप्रूप वाटत असे. आईकडून मला प्रेरणा मिळाली. मुख्य म्हणजे तेव्हा एखाददुसऱ्या महिलेच्या नशिबी शिकणे ही गोष्ट असायची.’’

वडील वारले तेव्हा माधुरीबेन आठ वर्षांच्या होत्या. आईनंतर घरात सगळ्यांत मोठ्या माधुरीबेनच असल्याने घर आणि इतर भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर आली. अडचणीच्या त्या काळातही या माऊलीने लेक म्हणून माधुरीबेन यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. हिंमत आणि निष्ठा या आईतल्या गुणांची छाप माधुरीबेन यांच्यावर आजही आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून हे कुटुंब बडोद्याला आले. माधुरीबेन यांनी भावनगरमधल्या दक्षिणमूर्ती बाल अध्यापन इन्स्टिट्यूटमधून अध्यापन प्रशिक्षणात पदविका प्राप्त केली. १९५१ मध्ये बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ‘एक्सपरिमेंटल स्कूल’मध्ये लागल्या. ही त्यांची पहिलीच नोकरी होती.

image


पुढे १९६१ मध्ये लग्न झाले आणि त्या पतीसह दिल्लीला आल्या. मग इथे सरदार पटेल विद्यालयात नोकरी सुरू केली. इथे ३० वर्षे सेवा बजावली. इथला नर्सरी विभाग माधुरीबेन यांच्याच मार्गदर्शनाखाली विकसित झाला आणि बहरला, हे विशेष!

माधुरीबेन एक कलावंत…

माधुरीबेन मुलांना बुटिक आणि पेपर-फ्लॉवर मेकिंग शिकवत असत. विरंगुळा म्हणून सुरू केलेल्या या त्यांच्या कलासाधनेला हळूहळू प्रतिष्ठा मिळत गेली. माधुरीबेन यांनी साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरले आणि पुढे अशी प्रदर्शने मग भरतच गेली. एका प्रदर्शनादरम्यान डॉ. कपिला वात्सायन, लेडी आयर्विन स्कूलच्या संस्थापिका आर. सेनगुप्ता आणि सुप्रसिद्ध नाटककार बी. व्ही. कारंथ यांच्याशी भेटीचा योगही त्यांच्या वाट्याला आला.

माधुरीबेन सांगतात, ‘‘सरदार पटेल विद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर मी गुजराती महिला मंडळाद्वारे संचलित शिशू मंगल स्कूलमध्ये जवळपास दहा वर्षे सलग सल्लागार म्हणून कार्यरत राहिले.’’ अध्यापन क्षेत्रातील माधुरीबेन यांच्या कर्तृत्वाची अखेर दखल घेण्यात आली. १९८५ मध्ये राजा राममोहन रॉय शिक्षक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.

शिक्षिका म्हणून पाच दशकांच्या अनुभवाचा प्रभाव माधुरीबेन यांच्यावर नव्हता, असे नाही, पण या पुरस्काराने त्यांना खरे प्रोत्साहन दिले. माधुरीबेन म्हणतात, ‘‘प्रबोधनाचे माध्यम म्हणून मी आता अध्यापनाऐवजी लेखन करू लागले. या पुरस्कारानेच मला त्यासाठी प्रेरणा दिली. गुजराती नियतकालिकांसाठी मी कितीतरी लेख लिहिले. बहुतांश छापून येत. वाचकांनाही ते भावत. तशा प्रतिक्रिया येत. काही वाचकांच्या प्रतिक्रियांनी तर मला आणखी लिहिण्याचे बळ दिले. आता मी एका वेगळ्या स्तरावरील लेखन करायला हवे, असे मला यातल्या काही प्रतिक्रियांतून वाटू लागलेले होते. आत्मविश्वास दुणावलेला होता.

image


…आणि पुस्तक ठरले बेस्टसेलर

आणि २०१० मध्ये ‘आर. शेठ अँड कंपनी’तर्फे अहमदाबादेत माधुरीबेन यांचे गुजराती भाषेतले पहिलेवहिले पुस्तक प्रकाशित झाले. ‘बाल विकास नी साची समझ’ हे पुस्तकाचे शीर्षक. पुस्तक बेस्टसेलर ठरले. थोड्याच कालावधीत या पुस्तकाच्या चार आवृत्त्या निघाल्या. मुलांचे पालनपोषण कसे करावे, मुलांवर संस्कारांचा खरा मार्ग काय, या विषयांचा ऊहापोह या पुस्तकात केलेला आहे. आई-वडील, मुले, शिक्षक, शाळा आणि समाज अशा मुलांच्या विकासाशी निगडित सगळ्याच घटकांना कवेत घेणारे हे पुस्तक होते. माधुरीबेन सांगतात, ‘‘माझ्या विद्यार्थ्यांशी निगडित वास्तव मी या पुस्तकांतून मांडलेले आहे. खऱ्या घटना आणि खऱ्या अनुभवांची जोड या प्रबोधनाला आहे. आता हे पुस्तक हिंदीतूनही अनुवादित होऊ घातलेले आहे. हिंदी आवृत्तीदेखिल लवकरच प्रकाशित होणार आहे. माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे, की माझे पहिलेच पुस्तक बेस्ट सेलर ठरले. व्यापक स्तरावर वाचकांच्या पसंतीची पावती त्याला मिळाली.’’

माधुरीबेन... यशाच्या प्रेरणेबद्दल

बडोदा एक्सपरिमेंटल स्कूलचे तत्कालिन मुख्याध्यापक किशोरकांत याज्ञिक आणि दिल्लीतील सरदार पटेल विद्यालयाच्या संस्थापिका तसेच उपमुख्याध्यापिका जशीबेन नायक यांना माधुरीबेन गुरुस्थानी मानतात. ‘‘त्यांचे मार्गदर्शन व प्रेरणा होती म्हणूनच आपण शिक्षिका ते लेखिका हा प्रवास यशस्वीरित्या करू शकले,’’ असे त्या म्हणतात.

माधुरीबेन... पुस्तकाबद्दल

‘‘मी कुणी साहित्यिक नव्हते. तथापि आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याशी घनिष्ट नाते जपणारी आणि जोपासणारी अगदी हाडाची अशी शिक्षिका मी जरूर होते. मुला-मुलींसोबतच्या या जवळिकीतूनच मला त्यांच्या जीवनातली अनेक गुढ अशी रहस्ये कळली. निवृत्तीनंतर अनुभवाचे असे मोठे गाठोडे माझ्या डोक्यावर होते. या गाठोड्याला पुस्तकाचे रूप द्यायलाही माझ्याकडे पुरेसा वेळ होता. मी वेळ दिला. पुस्तक आता तुम्हा सर्वांसमोर आहे…’’

माधुरीबेन...‘गुजराती’बद्दल

‘‘गुजराती माझी मातृभाषा आहे. तीच माझ्या लेखनाचे माध्यम आहे. आपले अनुभव मनमोकळेपणाने मांडण्याच्या संपूर्ण सोयी-सुविधा मला केवळ गुजरातीच उपलब्ध करून देऊ शकते.’’