मेक इन इंडिया : सहा लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले, अठ्ठावीस लाख नोकऱ्या मिळणार – मुख्यमंत्री

मेक इन इंडिया : सहा लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले, अठ्ठावीस लाख नोकऱ्या मिळणार – मुख्यमंत्री

Monday February 15, 2016,

4 min Read

आम्ही सत्तेवर आलो तेंव्हा पाच वर्षात राज्यात पाच लाख कोटी रुपयांचे नवे उद्योग धंदे यावेत आणि त्या योगे किमान वीस लाख नव्या रोजगार संधी मिळाव्यात असे स्वप्न पाहिले होते. मात्र मेक इन इंडिया वीक या कार्यक्रमाच्या तिसऱ्याच दिवशी राज्यात सहा लाख अकरा हजार कोटी रुपये किंमतीचे नवीन उद्योग येण्यासंबंधी सामंजस्य करार झाले असून त्यायोगे तब्बल अठ्ठावीस लाख नवीन नोकऱ्या तयार होतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली तर मुख्यमंत्र्यांनी फार मेहनतीने देशातील पहिलाच मेक इन इंडियाचा उत्सव भरवला यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांचे जाहीर अभिनंदन केले. काल चौपाटीवर लागलेली आग हा दुर्दैवी अपघात होता मात्र सुदैवाने त्यात काही कुणाला इजा झाली नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मेक इंडिया सप्ताह प्रदर्शनामध्ये आज दिवसभर महाराष्ट्र आणि मुंबईतील गुंतवणूक संधी तसेच मुंबईतील सुरक्षा यंत्रणा, मुंबईतील रस्ते वाहतुक सुधारणा आदी विषयावर परिसंवादांची मालिकाच पार पडली. यातील मुंबईवरील तीन परिसंवाद मालिकेची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या मुख्य भाषणाने झाली तर समारोपाचे मुख्य भाषण उद्धव ठाकरेंनी केले. सुभाष देसाईंनी काही काळ इंग्रजीतून तर काही काळ मराठीतून विचार मांडले उद्धव ठाकरेंनी मराठीलाच प्राधान्य दिले तर मुख्यमंत्री राज्य सरकारचे सारे अधिकारी तसेच सारे उद्योजक इंग्रजीतून विचार व्यक्त करत होते. मेक इन मुंबई, मेक इन महाराष्ट्र हे सारे ठीक आहे पण मुंबईतील मुळचा माणूस सुखी होणार असेल तर त्याला अर्थ आहे असा राजकीय सूर उद्धव यांनी लावला तर मुख्यमंत्र्यांनी म्हटले की मेक इन महाराष्ट्र व मेक इन मुंबई उपक्रमांमुळे इथल्या सर्वच रहिवाशांचे जीवन अधिक सुसह्य होईल आणि मराठी माणूसही सुखी होईल.


image


मुंबईसाठी तसेच मुंबई मेट्रोपाॅलिटन विभागासाठी एकात्मिक प्रवास सुविधांची योजना सादर करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाला ( एमएमआरडीए ) दिले. ते म्हणाले की रस्ते पूल, मेट्रो, लोकल बससेवा अशा सर्व साधनामुळे महामुंबईच्या कोणत्याही दोन टोकांचा प्रवास फक्त एका तासात करता यायला हवा. मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी चार ते पाच लाख कोटी रुपये लागतील पण आपण जर सर्व परवानग्यांसह एक सरळ व परिपूर्ण योजना सादर केली तर जगाची आजची आर्थिक स्थिती अशी आहे की कोणताही देश भारतात व महाराष्ट्रात गुंतवणूक कऱण्यास तत्परच आहे. त्यांनी कॅनडामधील पेन्शन फंडाकडून आलेल्या स्वस्त घरबांधणी प्रस्तावाचे उदाहरण दिले. ते म्हणाले की मुंबईतील एसआरए, म्हाडा येथेही लोकांना परवडणारीच घरे बांधली जायला हवीत. तुम्ही मुंबईत किमान एक कोटी रुपयांचे घर द्याल तर ते सामान्य माणसाच्या अवाक्यात असणार नाही असेही त्यांनी बजावले. या पुढील धोरणांचा भर हा स्वस्त घरे बांधणीकडे ठेवा म्हणजे गुंतवणूकही वाढेल कारण मेक इन मुंबईला बिल्ड इन मुंबईची जोड मिळेल. परवडणारी किमान पाच लाख घरे बांधण्यात गुंतवणूकधारकांना खूप रस आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या परिसंवादात एक उद्योजक येस बँक्चे संस्थापक राम कपूर म्हणाले होते की मुंबई प्रादेशिक विभागाला भारताची आर्थिक राजधानी जाहीर केले जावे, त्या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की मुंबई शहर हे सुरुवाती पासूनच उद्योग व्यवसायाचे मुख्यालय आहे. इथे जागतिक वित्तीय सेवा केंद्राची स्थापना याच मेक इन मुंबई केंद्राच्या प्रदर्शनाच्या जागेवर कऱण्यात येणार आहे असे पुन्हा घोषित करून मुख्यमंत्री म्हणाले की सध्या गुंतवणूकदारांचा ओढा आपल्याकडे इतका आहे की अद्याप त्या केंद्राचे आराखडेही तयार झालेले नाहीत पण आज सकाळीच माझ्याकडे या केंद्राचे पंचवीस मजले आम्हाला द्या असे एका उद्याेजकांनी सांगून ठेवले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.


image


उद्घाटनाच्या सत्रात संस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सर्वांचे स्वागत करतो, बाकी सारे मुख्यमंत्री बोलतील असे केवळ एका वाक्याचे भाषण केले. समारोपाचे भाषण करताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना म्हटले की इथे सारे सामंजस्य करार होत आहेत. तुमचे व आमचेही सामंजस्य आहे मी सप्ने पाहायची व तुम्ही त्यांची पूर्तता सरकार म्हणून करायची असे सांगून ठाकरे म्हणाले की मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर रस्ता कऱण्याचे नियोजन आपण करतो आहोत तसेच पूर्व किनाऱ्यावर सुंदर बगीचे, सागरी प्रवासाची साधने व सुशोभिकरण करावे. मेक इन इंडियासाठी मेक इन मुंबईसाठी मोठी गुंतवणूक मग आपोआप येईल असेही ते म्हणाले. ठाकरेंच्या भाषणाआधी कोस्टल रोड तसेच पूर्ण किनारा विकास योजनेचे शिवसेनने तयार केलेले दृकश्राव्य सादरीकरण करण्यात आले. त्या वेळी उपस्थित सैनिकांनी ठाकरेंचा जयघोषही केला. मेक इन महाराष्ट्राची सुरुवात शिक्षणाचा दर्जा वाढवण्यापासून मुलांना टॅब आदी उपलब्ध करून देण्यापासून व्हायला हवी असेही ठाकरे म्हणाले.

मुंबईचे पोलीस आयुक्त पडसलगीकर तसेच राज्याचे गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचीव के पी बक्षी यांनी सुरक्षित मुंबई कशी आहे हे विशद केले. बक्षी म्हणाले की मुंबई, पुणे, ठाणे तसेच राज्यातील २६ मनपांमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रणाली बसवण्यात येत आहे. महिला सुरक्षेचे असे अॅप कऱण्यात येत आहे की ज्यावरून महिलेने संदेश पाठवला तर टॅक्सी वा रिक्षा त्यांना योग्य ठिकाणी नेत आहे किंवा नाही हे पोलीस नियंत्रण कक्षात पाहिले जाईल व तात्काळ मदत पोचवली जाईल. कालच्या चौपाटीवरील आगी प्रसंगी मुंबई पोलिसांनी तसेच अग्निशमन विभागाच्या जवानांनी अप्रतीम कामगिरी बजावली या बद्द्ल अनेक वक्त्यांनी धन्यवादही दिले.