‘विचारांमधील बदल महत्वाचा,’ कॉर्पोरेट क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या वसुता अगरवाल यांचा महिलांना कानमंत्र  

0

प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणापासून ते पुरस्कार आणि चर्चासत्रांपर्यंत... आजच्या जगातही बहुतेकवेळा पुरुषांचीच मक्तेदारी दिसून येते. पण, या व्यवस्थेतही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या आणि इतरांनाही प्रेरणा देणाऱ्या स्त्रियांची संख्या आता काही प्रमाणात वाढताना दिसत आहे. वसुता अगरवाल, उपाध्यक्ष, बिझनेस डेवलपमेंट, इनमोबी, या त्यापैकीच एक... कॉर्पोरेट क्षेत्रातील आपल्या कामगिरीने, स्वतःचे स्थान मिळविण्यात वसुता यशस्वी झाल्या आहेत.

बिटस् पिलानी मधून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी मिळविल्यानंतर वसुता यांनी आयआयएम-बी मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. “ माझा इनमोबी मध्ये प्रवेश झाला तोच मुळी संस्थापक कर्मचारी टीमची सदस्य म्हणून... खरं म्हणजे ही टीम एक प्रकारची कॉर्पोरेट धोरण आणि ऑपरेशन्स टीम होती, जी विविध उपक्रमांसाठी संस्थांपकांबरोबरच काम करत होती,” वसुता सांगतात. त्यावेळी त्यांना वरीष्ठ नेतृत्वाच्याबरोबर काम करण्याची संधी तर मिळालीच पण त्याचबरोबर कंपनीतील विविध प्रकारची कामंही समजून घेता आली. त्यामुळेच इनमोबी मध्ये केलेल्या या कामानेच आपल्या कारकिर्दीच्या मार्गाची पायाभरणी केल्याचे वसुता आवर्जून सांगतात.

वसुता यांनी सहा महिन्यांसाठी म्हणून उत्पादन टीमबरोबरही काम केले. ठिकाणाशी निगडीत जाहिराती आणि ऑनलाईन विक्री उत्पादनाचे काम त्यांना यानिमित्ताने हाताळायला मिळाले. त्यानंतर त्यांना बिझनेस डेवलपमेंटच्या दिशेने जाण्याची संधी मिळाली. “ हेच ते क्षेत्र होते, ज्याची मला आवडही होती आणि तिच माझी ताकदही होती,” त्या सांगतात.

वसुता यांचे वडील लखनऊ विद्यापीठात प्राध्यापक होते. एकुलती एक असल्यामुळे आपण लाडाकोडात वाढल्याचे त्या मान्य करतात, पण त्याच वेळी शिक्षण आणि इतर उपक्रमांमध्ये – खेळापासून ते अगदी नृत्य, नाटक आणि वक्तृत्व स्पर्धांपर्यंत - योग्य ते संतुलन राखले जाईल, याची काळजी आपल्या पालकांनी पहिल्यापासूनच घेतल्याचेही त्या आवर्जून सांगतात. त्याचबरोबर एक वर्षासाठी त्यांना कॅनडामध्येही शालेय शिक्षण घेण्याची संधी मिळाली, जो त्यांच्या मते खूपच चांगला अनुभव ठरला, कारण यानिमित्ताने त्यांना एक नवीन संस्कृती जाणून घेता आली आणि त्यापासून खूप काही शिकायलाही मिळाले.

गेल्या दशकभराच्या काळात वसुता यांनी विविध भूमिका निभावल्या आहेत. इंटेलमध्ये त्यांनी चीप डिजाईन इंजिनियर म्हणून काम केले तर गोल्डमन सॅक्समध्ये इनव्हेस्टमेंट बॅंकींग इंटर्न म्हणून त्यांना काम करता आले आणि मॅकेंझीमध्ये धोरण सल्लागाराची भूमिकाही त्यांनी निभावली, त्याचबरोबर इनमोबीमध्ये तर विविध प्रकारचे काम करण्याची संधी त्यांना मिळाली. “ या सगळ्या भूमिकांमधील वैविध्य, टीम सदस्य आणि ज्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली असे ग्राहक आणि या सगळ्यांमध्ये मला भेटलेला मार्गदर्शक, यांनीच खऱ्या अर्थाने माझ्या कारकिर्दीला आकार दिला आणि त्यातूनच माझे आजचे व्यक्तिमत्वही आकाराला आले,” वसुता सांगतात.

वसुता यांच्या मते, शिकण्याच्या दृष्टीने गेली तीन वर्षे ही त्यांच्यासाठी सर्वोत्तम होती. व्यवसायाची वाढ करणे आणि त्याचबरोबर अतिशय वेगवान असा हा उद्योग आणि त्याहूनही वेगवान अशा कंपनी पुढील आव्हाने सोडविणे, हे खरोखरच खूप थरारक असल्याचे त्या सांगतात. “ आणि हे अशा ठिकाणी करायला मिळणे, जेथे तुमचे वय किंवा लिंग याचा विचार न करता, केवळ तुमची कामगिरी, दृष्टीकोन आणि प्रेरणा या मुल्यांचीच कदर केली जाते,” त्या पुढे सांगतात. त्यांच्या मते त्यांनी शिकलेला सर्वात मोठा धडा म्हणजे – तुम्हाला ज्यातून आनंद मिळतो ते करा आणि ते चांगल्या प्रकारे करा आणि मग यश आणि वृद्धी मिळणारच.

एका पुरुष प्रधान वातावरणात असूनही लिंगभेदामुळे कधीच अस्वस्थ न वाटल्याबद्दल वसुता स्वतःला नशीबवान मानतात. त्या पुढे असेही सांगतात, की त्यांनी नेहमीच याकडे देखील एक संधी म्हणूनच पाहिले. “ कारण कामाच्या ठिकाणी कमी महिला असल्यामुळे, तुम्ही त्याचा उपयोग एक संधी म्हणूनही करु शकता आणि चमक दाखवू शकता आणि स्वतःचे वेगळेपण सिद्ध करु शकता,” त्या पुढे सांगतात.

मात्र याचा अर्थ लिंगभेदाची त्यांना मुळीच कल्पना नाही, असाही नाही. याबाबतचे एक उदाहरण देताना त्या सांगतात, एखादा बांधकाम व्यावसायिक किंवा बॅंक अधिकारी त्यांच्याशी बोलताना का-कू करतो आणि त्यांच्या नवऱ्याबरोबरच चर्चा करण्याची त्याची इच्छा असते. वसुता त्यांचे प्रश्न समजूच शकणार नाहीत, असे गृहीत धरुनच, या लोकांना आपले सर्व प्रश्न वसुता यांच्या नवऱ्यासमोरच मांडायचे असतात. “ मी बऱ्याचदा अशा घटनांकडे दुर्लक्ष करते, पण माझा नवरा त्यावर नेहमीच एक वाक्य ऐकवत असतो, तो म्हणतो, ‘ मला त्यांच्याबद्दल वाईट वाटते, कारण ते काय चूक करत आहेत, हेच त्यांना कळत नाहीये’,” वसुता सांगतात.

असे असले, तरी वसुता यांच्या मते, काम आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील महिलांच्या कमी संख्येबाबत गेल्या काही वर्षांमध्ये वाढती जागृती दिसत आहे. “ अशी जागृती असणे कायमच गरजेचे आहे,”त्या पुढे सांगतात. त्यांच्या मते स्त्रिया त्यांचा दृष्टीकोन, कामाची शैली, प्रेरणा आणि सहानुभूती या गुणांमुळे, खूप समतोल निर्माण करतात. हे केवळ तंत्रज्ञान क्षेत्रातच घडते असे नाही, तर इतरही सर्व क्षेत्रात हे पहायला मिळते.

“ पाश्चिमात्य देशांत शेरील सॅंडबर्ग आणि मारिसा मायर यांच्यासारखे अनेक आदर्श तंत्रज्ञान क्षेत्रात आहेत आणि मला निश्चितच अशी आशा आहे, की वाढत्या जागृतीमुळे लवकरच आपल्याला भारतातूनही असे आदर्श मिळतील,” वसुता सांगतात.

वसुता पुढे सांगतात की, भारतातील कंपन्यांमध्ये वरीष्ठ नेतृत्वाच्या पातळीवर आणि प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या स्त्रियांची संख्या खूपच कमी आहे आणि त्यामुळेच नेटवर्कींग/बिझनेस इव्हेंटस् हे शेवटी पुरुष प्रधान बनलेले आहेत. त्यांच्या मते, याबाबत अगदी मुलभूत स्तरापासूनच प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण जर पुरेशा महिलांना कॉर्पोरेट क्षेत्रातील शिडी चढण्यासाठी तालीम आणि मार्गदर्शन देऊन हा प्रश्न सोडवू शकलो, तर पुढेही आपल्याला महिलांचे पुरेसे प्रतिनिधित्व नक्कीच दिसू शकेल.

वसुता यांच्या मते कुठल्याही कॉर्पोरेट कारकिर्दीत आव्हाने ही असतातच, पण त्यामुळे गोंधळून न जाता पुढे जात रहाणे, हे महत्वाचे आहे. आयुष्यातील विविध टप्प्यांवर घ्यावे लागलेले महत्वाचे निर्णय, जसे की – अर्थतज्ज्ञ व्हायचे की अभियंता, काम आणि वैयक्तिक आयुष्यातील तोल कसा साधायचा, नावाजलेल्या कंपन्यांची निवड न करता एका तंत्रज्ञान स्टार्टअपची केलेली निवड आणि यासारखे अनेक – हे वसुता यांच्यापुढील सर्वात अवघड आव्हान राहिले आहे.

“ या आव्हानाचा सामना करण्याचा एकमेव मार्ग होता तो म्हणजे निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र आणि त्याचबरोबर माझ्या पालकांचा आणि नवऱ्याचा भक्कम पाठींबा आणि दृढ विश्वास. त्यामुळेच आज मला मागे वळून पहाण्याची गरज नाही आणि कसला पश्चातापही नाही.” त्या सांगतात.

तर त्यांच्यापुढील काही समस्या आणि आव्हाने ही कुठल्याही वेगाने वाढणाऱ्या उद्योगात आणि स्टार्टअप्समध्ये असतात तशीच होती. सातत्याने होणाऱ्याला बदलाला सामोरे जावे लागणे, योग्य त्या गुणवत्तेचा शोध आणि मार्गदर्शन, या उद्योगातील नवे ट्रेंड्स, उत्पादने आणि स्पर्धेबाबत जागरुक असणे आणि ग्राहकांबरोबरचे नाते निर्माण करणे आणि ते सांभाळणे, यांसारख्या आव्हानांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर एक नेता या नात्याने, वसुता यांच्या मते, मोठी टीम आणि त्याचबरोबर विविध प्रकारची कामं आणि प्रादेशिकता यामुळेही व्यवसायात गुंतागुंत ही असतेच.

नेतृत्व करणाऱ्या सर्व महिलांना वसुता यांचा सल्ला आहे, “ तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखा – तुमचे सामर्थ्य, अपयश, आकांक्षा, महत्वाकांक्षा आणि भिती – कारण याच गोष्टी तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करतील. स्वतःचा विचार केवळ एक महिला नेता म्हणून करु नका, तर एक नेता म्हणून करा – इथेच विचारामधील बदलाला सुरुवात होते. आयुष्यात तोल साधणे महत्वाचे आहे – अपयश किंवा पराभवाची तयारी ठेवून, दृष्टीकोन आणि विचारांमध्ये धाडस दाखवा, तुम्ही जे मिळविले आहे त्याचा अभिमान जरुर बाळगा पण त्याचवेळी विनम्रताही ठेवा, तुमच्या कामाबद्दल प्रेरित  रहा पण त्याचवेळी इतरांनाही समजून घ्या.”

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

"मी तुमच्यातलीच एक आहे" इति भारतातली आठवी श्रीमंत महिला अनू आगा

आत्मसंतुष्ट न होता, सतत नव्याचा ध्यास असलेल्या यशस्वी उद्योगिनीची कथा

अमीरा शाहः कथा यशोशिखरावरील तरुण उद्योगिनीची

लेखक – सिंधू कश्यप
अनुवाद – सुप्रिया पटवर्धन