मुसलमान कुटुंबात शिक्षणाची ज्योत पेटवणारी वाराणसीची ‘नौशाबा’ 

0

मुसलमान महिलांसाठी त्या एखाद्या उदाहरणापेक्षा कमी नाही, त्यांनी स्वतःचे तर आयुष्य मार्गी लावलेच त्याचबरोबर इतर स्त्रियांना पण सशक्त बनविण्याचे काम केले आहे. मुस्लीम महिला व मुलींना शिक्षणाची गोडी लावून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याची जबाबदारी सुद्धा त्या अतिशय संयमाने पार पाडत आहेत. नौशाबा या समाजातील अश्या पोट जातीतील आहेत जिथे मुलींना शिक्षण देणे तर दूरच पण त्यांना घराबाहेर पडण्यासाठी देखील बंदी आहे. अश्या वातावरणात सुद्धा नौशाबा यांनी स्वतः तर शिक्षण घेतलेच व आपल्या समाजातील इतर मुलींना सुद्धा आपल्याबरोबर जोडण्याचे काम केले.

वाराणसी येथे रहाणा-या नौशाबा यांनी ग्रंथालयशास्त्रामधून पदवी घेतली आहे. शिक्षणादरम्यान त्यांना जाणवले की त्यांचे कुटुंब हे शिक्षणासाठी खूप आग्रही होते तिथेच इतर मुस्लीम कुटुंबात आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे फारच दुर्लक्ष केले जाते म्हणूनच ते समाजात इतरांपेक्षा मागे होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या एका शाळेत शिकवू लागल्या व याच दरम्यान त्या एका स्वयंसेवी संस्थेच्या संपर्कात आल्या जी संस्था वाराणसीतील मुस्लीम बहुल भागात शिक्षणासंबंधीच्या जागृतीचे काम करीत होती. जेव्हा नौशाबा यांनी त्यांच्या बरोबर काम करण्याची इच्छा दर्शवली तेव्हा संस्थेतील सदस्यांनी सांगितले की त्या चांगल्या शाळेत शिकवण्याचे काम करीत आहे पण गरज पडल्यास त्यांना मागासवर्गीय भागात जावून ऊन- पावसाची तमा न बाळगता तत्पर रहावे लागेल, मुलांना उघड्यावर शिकवावे लागेल पण नौशाबा यांच्यावर या गोष्टीचा काहीच परिणाम झाला नाही. जी मुले कधीही शाळेत गेली नाही अश्या मुलांना शिकवण्याची त्यांनी तयारी दर्शवली.

नौशाबा यांनी युवर स्टोरीला सांगितले की,”मी वाराणसीच्या पुराना पूल या भागात गेले जो मुस्लिमबहुल भाग होता व इथे प्रत्येक घरात हातमागाचे काम चालायचे. छोटी छोटी मुले साड्यांवर व कपड्यांवर काशिद्याचे काम करीत होती. इथे आल्यावर मला कळले की या भागातील ९५% पेक्षा जास्त मुले शाळेत जाणे तर सोडाच पण त्यांनी शाळेचा उंबरा सुद्धा आजपर्यंत ओलांडला नाही. मी त्या लोकांना समजावले की मुलांनी शिक्षण घेणे किती गरजेचे आहे व त्यानंतर त्यांचा प्रतिसाद बघून मी अतिशय दंग झाले. तेथील लोकांनी मला शिकवण्यासाठी एक जागा दिली व पहिल्याच दिवशी १६० मुलांनी त्यांच्याकडे नाव नोंदवले व यानंतर मुलांची संख्या हळूहळू वाढतच गेली.”

नौशाबा यांना वाटले की मोठ्या मुलींना अभ्यासाबरोबरच स्वावलंबनाचे प्रशिक्षण दिले पाहिजे. म्हणूनच त्यासाठी त्यांनी अभ्यासाबरोबरच शिवणकाम, भरतकाम व हस्तकलेचे प्रशिक्षण सुरु केले. या प्रकारे नौशाबा यांनी सलग पाच वर्ष मुलांना शिकवण्याचे काम सुरु ठेवले त्यामुळे येथील स्थानिक लोकांना शिक्षणाचे महत्व कळले. नौशाबा सांगतात की लोकांच्या मदतीने त्यांनी १० वी पर्यंतचे शिक्षण मदरश्यामध्ये सुरु केले ज्याला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आज पण मुले आपल्या काही अडचणी सोडवण्यासाठी नौशाबा यांना भेटतात. त्यांनी आज पर्यंत १२०० पेक्षा जास्त मुला-मुलींना शिकवले आहे.

आज नौशाबा अश्या मुली व स्त्रियांना प्रशिक्षण देत आहे ज्यामुळे त्या वेळेचा सदुपयोग करून आपल्या पायावर उभ्या राहू शकतील. नौशाबा सांगतात की, “आमचा प्रयत्न आहे की कोणत्याही अशिक्षित स्त्रीने कुणासमोर अंगठा लावू नये तसेच बँकेत व इतर सरकारी कामासाठी अंगठ्या ऐवजी सही म्हणून आपले नाव लिहावे.” यासाठी नौशाबा वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जावून तेथील मुली व स्त्रियांना एकत्र करून व शिक्षित करून पायावर उभे रहाण्यासाठी आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. त्यांच्याच प्रयत्नांचा हा परिणाम आहे की आज वाराणसी मध्ये रहाणा-या ६००० मुलींना त्यांनी आत्मनिर्भर केले आहे, यामध्ये मागासलेल्या व गरीब भागातील मुलींचे प्रमाण जास्त आहे. आज त्यांनी शिकवलेल्या अनेक मुली व स्त्रिया सौंदर्य प्रसाधनगृह चालवत आहे तर काही शिवणकाम करीत आहेत तर काहींनी फॅशन डिझाईनिंगच्या क्षेत्रात आपला जम बसवला आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी नौशाबा यांनी अंदाजे ४० सेल्फ हेल्प ग्रुप तयार केले आहेत. प्रत्येक ग्रुप मध्ये १० ते २० स्त्रिया असतात व त्यांची प्रत्येक महिन्याला एक बैठक असते. नौशाबा सांगतात की, “स्त्रियांसाठी बनवलेल्या या ग्रुपमध्ये दर महिन्याला वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करतो ज्यात बालविवाह, बालमजूर, आरोग्य, व पर्यावरण असे प्रमुख मुद्दे असतात.”

शिक्षण व रोजगाराव्यतिरिक्त नौशाबा पर्यावरणासंबंधी पण काम करीत आहे यासाठी त्यांनी एक युथ फोरम बनवला आहे जिथे तरुणांना झाडे वाचवण्यासंबंधित जागरूक केले जाते. पर्यावरण नियंत्रणासाठी झाडांचे महत्व पटवून पाणी वाचवण्याचा पण संदेश दिला जातो तसेच जुन्या प्राकृतिक वस्तू ज्या काळानुसार लुप्त पावत आहे त्यांचे संवर्धन करण्यासाठी जागृतीचे काम करतात. नौशाबा वाराणसी मध्ये मागासलेल्या भागात सुमारे ६० घरांमध्ये बायोगॅस प्लांट तयार करण्यासाठी मदत करीत आहेत.

नौशाबा आता वाराणसीमध्ये कलाकारांसाठी एक खास वेबसाईट बनवत आहेत. त्या सांगतात की, “मी मुस्लीम बहुल भागात बघितले आहे की हस्तकला कारागिरांना बांबू टोपल्या, मातीची भांडी, चांदीची मीनाकारी, लाकडी खेळणी इ. ची योग्य किमंत मिळत नाही. बऱ्याच वेळा त्यांची परिस्थिती इतकी खराब होते की मध्यस्थांमुळे कारागिरांना आपला माल आहे त्या किमंतीपेक्षा पण कमी किंमतीत विकण्यासाठी विवश व्हावे लागते. त्यांची हृदयद्रावक कहाणी ऐकून मी विचार केला की अश्या कारागिरांसाठी एक वेबसाईट बनवली पाहिजे, त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे म्हणजे कारागीर थेट ग्राहकांशी संपर्क साधतील अश्या प्रकारे त्यांच्या मालाला योग्य किंमत मिळू शकेल.”

नौशाबा सांगतात की सध्यातरी www.muknaus.com नामक एका वेबसाईटवर काम चालू आहे व त्यांना अपेक्षा आहे की पुढील दोन महिन्यात ही साईट सुरु होईल. या साईटवर हस्तकलेचे सामान विकण्याचे काम केले जाईल तसेच मातीने बनवलेल्या वस्तूंपासून हाताने चालणारे पंखे सुद्धा यात सामील असतील. नौशाबा सांगतात की, “माझा उद्देश या वेबसाईटला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु करण्याचा आहे म्हणजे जगभरात वाराणसीचे नाव प्रसिद्ध होऊन येथील लोकांची नवीन ओळख निर्माण होईल.”

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

धर्मापलीकडे जाऊन मुलांच्या शिक्षणाकरिता झटणारी ʻदिपालयʼ

विदेशातील नोकरीसोडून सुरू केली शाळा, शिक्षणासोबतच मुलींना जीवनात उभे करण्यासाठी वयाच्या ७६व्या वर्षीही धडपडणारे विरेंद्र सँम सिंह!

‘मुली शिकल्या तर समाजाची प्रगती होईल’ या विचारांना सत्यात परिवर्तीत करणारे धीरेंद्र

लेखिका – गीता बिश्त
अनुवाद – किरण ठाकरे