ऐतिहासिक चित्रपट करताना इतिहासाचा विपर्यास करणं हा गुन्हा - ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल याचं मत

0

इतिहासावर चित्रपट निर्मिती करताना कलात्मक स्वातंत्र्य घेऊन इतिहासाचा विपर्यास करणं हा गुन्हा आहे. ऐतिहासिक चित्रपट करताना ऐतिहासिक घटनांशी खेळ करणे योग्य नाही. कारण आपला इतिहास त्यातील व्यक्ती, घटना प्रसंग हा आपला वारसा आहे. त्यामुळे इतिहासाचा विपर्यास करणे चुकीचे आहे, असं मत ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी शुक्रवारी पुण्यात व्यक्त केलं.

१४ व्या पुणे अांतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन नुकतंच झालं. यावेळी श्याम बेनेगल आणि ज्येष्ठ कलाकार सौमित्र चटर्जी यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यानिमित्त बेनेगल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

इतिहास आणि चित्रपट निर्मिती यावर बोलताना ते म्हणाले की, " भारत एक खोज हा कार्यक्रम मी पंडित नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया याच्या आधारावर तयार केला, पण इतिहासातील कोणत्याही घटनेत बदल केला नाही. त्यामुळे इतिहास रुपेरी पडद्यावर दाखवताना त्यामध्ये बदल करणं चुकीचं आहे." असं ते म्हणाले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहे. त्यावर बोलताना बेनेगल म्हणाले की, " बोस यांच्या मृत्यूबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाला किंवा ते मंगोलियात गेले किंवा अलहाबाद मध्ये ते साधू झाले अशा अनेक गोष्टी नेताजींबद्दल सांगितल्या जातात. पण या सगळ्यात मला जी त्यांच्या कुटुंबियांकडून मिळालेली माहिती अशी, सुभाष बाबू बँकाॅकहून मंगोलियाला जायला निघाले होते, त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे सुरक्षा रक्षक हबिबुरेह्मान हे होते. तसंच त्यांचा बरोबर जपानचे एक सेना अधिकारी पण होते. विमानाच्या इंधनाच्या टाकीला आग लागल्याने नेताजी आणि जपानी अधिकारी जखमी झाले त्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना जपानी अधिकाऱ्यांचा आधी मृत्यू झाला आणि नंतर नेताजींचा झाला. हेच सत्य आहे. पण तरीही नेताजींच्या मृत्यू बाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्या चुकीच्या आहेत. पंडित नेहरू यांच्यामुळे नेताजींचा मृत्यू झाला असंही सांगितलं जातं पण त्यात तथ्य नाही. कारण जर नेताजी जिवंत असते तर त्यांनी लपून राहण्याचं काही कारणच नव्हतं त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत,पण तरीही नेताजींचं कर्तृत्व आणि महत्त्व कमी होत नाही " यावर बेनेगल यांनी प्रकाश टाकला.

बेनेगल यांनी अनेक समांतर चित्रपट केले. त्यांचे अनेक चित्रपट हे स्त्री केंद्रित आहेत. त्यावर ते सांगतात कि, स्त्रिया याच आपल्या समाज व्यवस्थेच्या गाभा आहेत. भारत आणि आशियाई देशातील समाज व्यवस्था आणि कुटुंबव्यवस्था याचे मुळही स्त्रियाच आहेत. त्यामुळेच स्त्री केंद्रित चित्रपटांची निर्मिती केल्याचं ते सांगतात.

त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्री स्मिता पाटीलने भूमिका केल्या आहेत. अनेक चित्रपट कलाकार हे कलाकार आणि नंतर ते स्टार होतात पण स्मिता पाटील ही तारका म्हणूनच जन्माला आली होती. तिच्या केवळ नऊ वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक उत्तमोत्तम सिनेमे केले. स्मिता ज्या उत्स्फूर्तपणे अभिनय करायची तसं अद्याप कोणालाही जमलेलं नाही, असंही बेनेगल यांनी सांगितलं.

सेन्सॉर बोर्डाबाबत बोलताना श्याम बेनेगल म्हणाले की, सेन्सॉर बोर्ड हे चित्रपटांना प्रमाणपत्र देण्यासाठी आहे. पण बरेचदा कलात्मकतेकडे दुर्लक्ष करून चित्रपटातील काही दृश्य कापून टाका अशा सूचना दिल्या जातात. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाबाबत चित्रपट क्षेत्रात नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि बोर्डाच्या कामात सुसूत्रता आणि समावेशकता आणण्यासाठी सल्लागार समिती नेमली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या कामात सर्वसमावेशकता असावी, म्हणजे संपूर्ण देशाचं नेतृत्व त्यामध्ये असावं ते फक्त मुंबई केंद्रित असू नये, हा त्यामागचा मुख्य उद्देश असल्याचं बेनेगल यांनी सांगितलं.

यासंदर्भात याधीही अनेक समित्या नेमल्या गेल्या होत्या, पण त्यांचं काम सकारात्मक नसल्याने त्याचा काही उपयोग झाला नाही. नवीन समिती नक्कीच सकारात्मक अहवाल सादर करेल असा विश्वास श्याम बेनेगल यांनी व्यक्त केला.