भावना कालरा : छोट्या शहरातील स्वप्न अन्‌ महानगराचे शंका-समाधान

भावना कालरा : छोट्या शहरातील स्वप्न अन्‌ महानगराचे शंका-समाधान

Monday December 07, 2015,

5 min Read

एखाद्या महिलेकरिता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणे सोपे नाही. त्यातही ती बापडी जर एखाद्या छोट्या शहरातील असेल तर गोष्ट आणखीच अवघड होऊन बसते. तुम्हाला या कथनातील सत्यता पडताळून पहायची असेल तर भावना कालरा यांच्याशी एकदा बोलून बघा, त्यांना विचारून बघा. हे सगळं अगदी स्फटिकासारखं स्वच्छ समोर येईल. भावना यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात या दिव्यातूनच आपला प्रवास केलेला आहे. कितीतरी आव्हानांना त्या सामोऱ्या गेल्या आहेत. कितीतरी आव्हाने त्यांच्या समोर अडथळा म्हणून उभी ठाकलेली आहेत. भावना भिलाई या लहान शहरात जन्मल्या आणि वाढल्या. विद्यार्थीदशेत संगणकापेक्षा गणितातच त्यांना अधिक रस होता.

बरं… भावना यांना वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी विद्याशाखेतून प्रवेश मिळण्याइतपत गुणही बारावीत मिळू शकलेले नव्हते. अखेर त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. भिलाई महिला महाविद्यालयातून गणित हा मुख्य विषय घेऊन त्यांच्या बीएससीला सुरवात झाली. अर्थात त्यांच्यासाठी हे सगळे म्हणजे नाइलाजास्तव स्वीकारलेल्या पर्यायासारखे बोचणारे नव्हतेच. गणित हा आधीपासूनच भावना यांच्या आवडीचा विषय होता. पण युग संगणकाचे आहे, याचे भान भावना यांना होते. मग त्यांनी संगणक प्रयोगशाळेतही रस घ्यायला सुरवात केली. दिवसेंदिवस तो वाढवायला सुरवात केली. रस येऊ लागला तशा भावना या विषयातील अधिकाधिक ज्ञान संपादन करण्यासाठी जणू उतावळ्या बनल्या. ‘बेसिक कॉम्प्युटर कोर्स’साठी त्यांनी आपले नाव नोंदवले.

image


भावना यांनी पदवी संपादन केली आणि त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना सुचवले बेटा आता हीच स्थिरस्थावर होण्याची वेळ आहे. आपल्या पायावर उभे राहण्याची वेळ आहे. अर्थात एका लहान शहरातील मुलींसाठी ही गोष्ट काही वेगळीही नाही. पदवी झालीना मग आता नोकरी शोधा एखादी अशीच लहान शहरातील पालकांची मुलींबद्दलची मानसिकता असते. मुलींनीही उच्च शिक्षण वगैरे घ्यायचे असते, असा विचार सहसा अशा शहरांतील पालक करत नाहीत. भावना यांनी आई-वडिलांकडून सहा महिन्यांची मुदत मागून घेतली. सहा महिन्यांत नोकरी शोधते म्हणून सांगितले. शब्दाबरहुकूम या कालावधीत एक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट जॉइन केले. प्रशिक्षक म्हणून नोकरी सुरू केली. याचदरम्यान २००० मध्ये त्यांचे लग्न झाले.

पुढे पतीसमवेत त्या अमेरिकेत गेल्या. नवा देश, नवी संस्कृती भावना यांना जरा भांबावल्यासारखेच झाले. भिलाईसारख्या गावच्या मुलीला इथल्या सगळ्याच गोष्टी अवघड वाटत किंबहुना धक्कादायक वाटत. परिणाम असा झाला, की त्या कमालीच्या घरकोंड्या बनल्या. घरातून बाहेर पडायचे म्हटले म्हणजे भावना यांच्या अंगावर काटा उभा राही. अमेरिकेतून भारतात फोन लावायचा म्हणजे महागडी गोष्ट, पण इथं आई-वडिलांना फोन लावला म्हणजे पहिली २५ ते ३० मिनिटे रडण्यातच खर्ची व्हायची. दिवसभर इतर काही न करता, कशातही न रमता भावना यांची आतल्या आत घुसमट सुरू होती.

अशात पतीची कंपनी बंद पडली. पुढे लगेचच ९/११ ची दुर्घटना घडली. भावना यांना मग यजमानांनी संगणक शास्त्रातून पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. जेणेकरून भावना यांनाही तिथं एखादी नोकरी शोधता, धरता यावी. बोस्टन विद्यापीठात ‘एमएस प्रोग्राम’ या अभ्यासक्रमात भावना यांनी प्रवेश घेतला. भावना यांचे बोस्टनमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे यजमान भारतात आले आणि आपल्या व्यावसायिक उपक्रमासाठी त्यांनी इथे काही माणसांची जमवाजमव केली. टिम बनवली. भावनाही सोबत होत्या. बॅकएंड आणि इंटिग्रेशन उभारणीत त्या या टिमला मदत करू लागल्या. यादरम्यानच त्या एन१बी व्हिसासाठी पात्र ठरल्या.

२००५ मध्ये भावना बोस्टनला परतल्या. एका अशासकीय सेवाभावी संस्थेसाठी स्वयंसेविका म्हणून त्यांनी कार्य सुरू केले. भावना यांनी संस्थेची वेबसाइट तयार करण्यात मदत तर केलीच, शिवाय संस्थेच्या इतर तांत्रिक बाजू सांभाळल्या. पुढे लवकरच भावना यांनी ‘स्पोर्टस्‌ रॉयल्टी सिस्टिम्स’ ही कंपनी जॉइन केली. क्रीडा क्षेत्राशी निगडित असे हे स्टार्टअप होते. ‘स्पोर्टस्‌ रॉयल्टी सिस्टिम्स’ म्हणजे क्रीडाप्रशंसक, क्रीडारसिकांसाठी आपल्या आवडत्या संघाला वा खेळाडूला पाठिंबा देण्याचे एक व्यासपीठच होते. अथ पासून इतिपर्यंत या सगळ्या व्यासपीठाची उभारणी भावना यांनी एकहाती केली. शून्यातून सगळे उभे केले. भावना सांगतात, ‘‘मला या क्षणापर्यंत सामोरे आलेल्या आव्हानांपैकी हे सगळ्यांत अवघड आव्हानांतील एक होते. मोठी जबाबदारी माझ्यावर होती आणि माझ्याकडून खुप अपेक्षाही होत्या. मला ती पार पाडायची होती आणि सर्व अपेक्षांच्या कसोटीवर उतरायचे होते.’’

कंपनी २००६ मध्ये बंद पडली आणि नेमके याच काळात भावना यांना प्रसूतीच्या दीर्घकालिन रजेवर जायचे होते. पुढे त्यांनी केअरडॉटकॉम care.com ही कंपनी जॉइन केली. त्यांचे यजमानच या कंपनीच्या अभियांत्रिकी बाजूचे सर्वेसर्वा होते. भावना यांनी घरबसल्या हे काम सुरू केले. भावना म्हणतात, ‘‘मला कार्यालयात अजिबातच जावेसे वाटत नव्हते. एकतर माझे यजमानच प्रमुख आणि त्यांनाच मला रिपोर्टिंग करावे लागे. आपली ओळख इतर संबंधितांपासून लपून रहावी म्हणून माझा हा घरबसल्या कामाचा आटापिटा होता.’’

घर की कार्यालय, कौटुंबिक जबाबदाऱ्या की व्यावसायिक जबाबदाऱ्या असा प्राधान्याचा पेचप्रसंग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील बहुतांश महिलांवर ओढवतो. भावना मात्र दोन्ही आघाड्या अगदी नेटक्या सांभाळतात. भावनाच्या यांच्या समोरील मुख्य आव्हान म्हणजे तोच-तोचपणा, रटाळपणाची झलक जरी कुठे दिसली तरी भावना यांनी तिथली नोकरी सोडलीच म्हणून समजा.

• २००८ मध्ये भावना यांनी यूप्रॉमिस जॉइन केली होती कारण त्यांचे यजमान इथे काम करत होते. अन्य सहकाऱ्यांपैकी पुष्कळ जणांना त्या आधीपासून ओळखत होत्या. नंतर त्यांनी बँक ऑफ अमेरिका जॉइन केली. त्यांनी इथे ग्राहक सेवा ॲअॅप्लिकेशन साकारले आणि आकारले.

• २०१० मध्ये त्या आणि त्यांचे यजमान भारतात परतले. आपल्या मुलांसाठी चांगल्या शाळेचा शोध त्यांनी इथं घेतला, पण कुठलीही त्यांना मनाजोगी वाटली नाही. भावना यांच्या यजमानांनी या समस्येचे समाधान म्हणून प्रकार आणि दर्जानुसार शाळांच्या यादीचे पोर्टल सुरू केले. हा उपक्रम राबवत असतानाच त्यांची भेट ‘टिचरजी’ पोर्टलच्या संस्थापकांशी झाली. पुढे दोघांनी मिळून ‘थिंकविद्या’ सुरू केले.

• आयबीएममध्ये काम करत असताना तिथले नोकरशाहीवजा वातावरण भावना यांना अडचणीचे वाटले. एकतर याआधी त्यांनी ‘स्टार्टअप’ प्रकारातील आस्थापनांमध्ये कामगिरी बजावलेली होती. यातून त्यांचा स्वतंत्र बाणा विकसित झालेला होता. मुख्य म्हणजे काम म्हणून करायला आयबीएममध्ये फारसे काही नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांच्या यजमानांच्या ‘थिंकविद्या’ या व्यावसायिक उपक्रमाचे सहसंस्थापक सोडून गेलेले होते. तंत्रज्ञानाची बाजू सांभाळणाऱ्या व्यक्तीच्या शोधात यजमान होतेच. जेणेकरून ते व्यावसायिक बाजू सांभाळू शकतील. काखेला कळसा आणि गावाला वळसा, ही बाब यजमानांच्या लक्षात आली आणि भावना यांच्याकडे त्यांनी हा विषय काढला. मग भावना यांनी आयबीएमला सोडचिठ्ठी दिली आणि फेब्रुवारी २०१३ मध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून त्यांनी ‘थिंकविद्या’ जॉइन केले.

• ‘थिंकविद्या’ आज ज्या स्वरूपात आहे, ते सगळेच भावना यांच्या कौशल्याचे फलित आहे. ‘थिंकविद्या’चे अर्बनप्रो असे नवे नामकरणही झाले. शिक्षण क्षेत्रासंबंधीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासह आता गृहोपयोगी सेवाही यात समाविष्ट झाल्या आहेत.

भावना म्हणतात, ‘‘जगण्याच्या या सगळ्या धावपळीत एक महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली आणि ती म्हणजे तुम्ही जर एखाद्या आकांक्षेसाठी टोकाचे आसुसलेले असाल तर ती आकांक्षा पूर्ण व्हावी म्हणून नियतीही तुमच्या मदतीला धावून येते. सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुकूल अशा घडत जातात.’’ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एखाद्या महिलेला तितकेसे यश मिळू शकत नाही, असे ज्या कुणाला वाटते, त्याच्यासाठी भावना या एक उदाहरण आहेत आणि या क्षेत्रात स्वत:ला आजमावू इच्छिणाऱ्यांसाठी तर त्या प्रेरणेचा झरा आहेत.

लेखक- आदित्य भूषण द्विवेदी

अनुवाद- चंद्रकांत यादव