पुरूषांची मक्तेदारी मोडून ‘महिला राज’ स्थापणारी भारती

चूल आणि मूल हेच स्त्रीचं जीवन, ही संकल्पना मोडीत काढून, आव्हानं पेलत पुरूषांची मक्तेदारी नष्ट करणा-या भारतीची ही गोष्ट. सर्वसामान्य कुटुंबातली, टेलरिंगचा व्यवसाय करणारी भारती चक्क ड्रायव्हर काय बनते, इतर महिलांनाही हा व्यवसाय निवडण्याची प्रेरणा काय देते, केवळ प्रेरणा देऊन न थांबता त्यांना प्रशिक्षण काय देते, आणि टॅक्सीचा व्यवसाय चालवणा-या कंपनीत भागीदार काय होते, हा सगळा प्रवास वेगळ्या वाटेवरचाच आहे. भारतीच्या धाडसाची ही कथा.

पुरूषांची मक्तेदारी मोडून ‘महिला राज’ स्थापणारी भारती

Wednesday August 19, 2015,

4 min Read

बायोकॉनच्या सर्वेसर्वा किरण मुझुमदार शॉ यांनी जेव्हा ऑफीसला जाण्यासाठी कॅब बूक केली, तेव्हा कॅबची ड्रायव्हर एक महिला आहे हे बघून त्यांना सुखद धक्काच बसला. म्हणूनच त्यांच्यासाठी हा आगळावेगळा, एक सुंदर असा प्रवास होता. या कॅबच्या ड्रायव्हर, भारती यांच्यासाठीही ती अभिमानाची बाब होती. 

पुरूषांची मक्तेदारी मोडणा-या भारती

पुरूषांची मक्तेदारी मोडणा-या भारती


भारती या ‘उबेर बंगळुरूच्या’ पहिल्या महिला शोफर ( चालक) . पुढे भारतींनी स्वत:ची कार विकत घेतल्यानंतर त्या या कंपनीच्या थेट पार्टनरच झाल्या होत्या. असं पाऊल उचलल्यानं भारतींना हवं त्या प्रकारचं काम करण्याचं स्वातंत्र्य मिळालं. यासोबतच इतर महिला ड्रायव्हर्सना प्रशिक्षण देण्याचा आत्मविश्वास मिळाला. त्यांना त्यांनी विकत घेतलेल्या ‘फोर्ड फिस्टा’ या गाडीचे ईएमआय भरता येतील असे पुरेसे पैसे सुद्धा मिळू लागले. आणि पुढच्याच वर्षी आपण मर्सिडीज खरेदी करायची असं त्यांनी ठरवून टाकलं.

केवळ ड्रायव्हिंगचे बारकावे काय आहेत हे शिकत असताना भारतींना इतकं मोठं यश कसं काय मिळालं? असा प्रश्न आपल्या मनात नक्कीच आला असणार. हे पाहण्यासाठी आपण थोडेसं मागं जाऊ या. भारती या मूळच्या आन्ध्रप्रदेशातल्या एका छोट्या शहरातल्या. आपल्या भावासोबत २००५ या साली त्या बंगळुरूला आल्या. भारतींचं शिक्षण म्हणाल, तर जेमतेम १० वी पर्यंतच झालेलं. त्या टेलरिंगचं काम करत होत्या. काही काळानंतर त्यांना या कामाचा कंटाळा येऊ लागला. म्हणून दुसरं एखादं काम मिळतंय का याचा त्या शोध घेऊ लागल्या. नंतर त्या एका स्वयंसेवी संस्थेच्या संपर्कात आल्या. नेमकं याच संस्थेला महिला ड्रायव्हर्स हव्या होत्या.

ड्रायव्हरचं काम स्वीकारणं याबाबत काय निर्णय घ्यावा ते भारतींना कळत नव्हतं. कारण ड्रायव्हिंग शिकायची म्हटलं म्हणजे हातातलं काम सोडावं लागणार. आणि सर्वसाधारणपणे महिला कुठे ड्रायव्हरची नोकरी करतात ? ड्रायव्हिंग म्हटलं म्हणजे हे काम पुरूषांचंच असतं आणि पुरूषांचं वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात खरच मी एक स्त्री म्हणून कामासाठी योग्य आहे का? मला ड्रायव्हिंगचं काम जमेल का? असे अनेक प्रश्न भारतींना सताऊ लागले. यावर बराच विचार केल्यानंतर भारतींनी टेलरिंगचं काम सोडायचं आणि ड्रायव्हर बनायचं हा निर्णय घेतला. भारतींनी हा निर्णय घेतला ते २००९ चं वर्ष होतं. त्यावेळी दिल्लीत महिला ड्रायव्हर्सना प्रोत्साहन देण्याची मोहिम सुरू होती. भारतींना मग पिवळा बॅच मिळाला. आणि महिन्याला १५००० रूपये इतका पगार.

बदललेल्या या परिस्थितीमुळं काम सुरू करण्याच्या आधीच भारतींच्या मनात या कामाबाबत आशा निर्माण झाली, आत्मविश्वास मिळाला. आपण बंगळुरू सारख्या शहरातच काम करावं अशी भारतींना इच्छा होती आणि काम मिळावं म्हणून त्यांनी अनेक ट्रॅव्हेल्स अँड टुरिझम ऑपरेटर्सना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला. या दरम्यान, त्या एंजलसिटी कॅब या टॅक्सी सेवा देणा-या कंपनीच्या संपर्कात आल्या. एंजलसिटी कॅब ही महिला ड्रायव्हर्स असलेली पहिली कंपनी होती. भारतींनी याच कंपनीत काम सुरू केलं. काही काळानंतर ऑक्टोबर २०१४ मध्ये त्या उबेर या कंपनीत ड्रायव्हर म्हणून रुजू झाल्या. पुढच्या चार महिन्यांमध्ये भारतींनी स्वत:ची गाडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि २०१५ च्या फेब्रुवारी महिन्यात ‘फोर्ड फिस्टा’ ही गाडी बूकही करून टाकली.

ही गाडी खरेदीची घटना कोणत्याही यशाहून कमी नाही. यामुळं भारतींना आपल्या मोठ्या स्वप्नांच्या पंखांना उंच भरारी मारण्याचा आणि ही भव्य स्वप्न साकार करण्याचा जणू परवानाच मिळाला. 

ती आली,, तिनं पाहिलं आणि जिंकलं सुद्धा !

ती आली,, तिनं पाहिलं आणि जिंकलं सुद्धा !


महिला ड्रायव्हिंगच्या व्यवसायात का येत नाहीत ? भारतींच्या मते याची कारणं म्हणजे:

1) ड्रायव्हर होणं ही गोष्ट महिलावर्गात स्वीकारली जात नाही.


2) परंपरेनं जे व्यवसाय महिला करत नाहीत अशा क्षेत्रात महिलांना मोठ्या आव्हानांना सामोर जावं लागणं.


3) आणि ज्या महिला आत्तापर्यंत केवळ चूल आणि मूल करत आल्या आहेत, आपलं कुटुंब, आपला नवरा, मुलं आणि घराची काऴजी घेणं यातच गुंतलेल्या असतात, अशा महिलांना त्या प्रकारचं प्रशिक्षण नसल्यामुळं बाहेरच्या जगात लोकांशी कसा व्यवहार करावा याची माहिती नसते. 


महिलांच्या अधिकारासाठी झटणा-या संस्थेच्या एक कार्यकर्त्या म्हणून भारतींनी पूर्वी काम पाहिलं असल्यांमुळं ही गोष्ट त्यांच्या चटकन लक्षात आली. मग त्यांनी महिलांसमोर आपलं स्वत:चं उदाहरण ठेवत महिलांना प्रेरणा मिळावी म्हणून काम करायचं ठरवलं. या सोबतच आपल्याला माहीत असलेलं कौशल्य इतर महिलांना शिकवणं असा कार्यक्रमही त्यांनी आखला.

उबेर, बंगळुरूचे महाव्यवस्थापक, भाविक राठोड म्हणतात, “भारतीनं नवी कार विकत घेण्याचा निर्णय घेतला हे जेव्हा आम्हाला भारतीनं सांगितलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. आमच्या लक्षात आलं की भारतींनी आत्मविश्वासानं आणि स्वतंत्रपणे काम करायला सुरूवात केली आहे, हे जाणून आम्हाला खरच खूप समाधान मिळालं. या उद्योगात आवश्यक असलेला दृष्टीकोण बदलण्यासाठी भारती नक्कीच यशस्वी होईल याची आम्हाला खात्री आहे.”

या उद्योगात एक विशेष सेवा म्हणून उबेरनं एक अॅप सुद्धा विकसित केलं. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून उबेरनं ‘BHARTI’ या प्रोमो कोडसह ही सेवा पहिल्यांदा वापरणाऱ्यांसाठी ५०० रूपये सवलतीची ऑफर देण्याची योजना सुद्धा आखली. ‘SHARE MY ETA’ हे फिचर देखील या अॅप सोबत जोडण्यात आलय. यामुळं आत्ता आपण नेमकं कुठे आहोत हे तिला/ त्याला समजू शकतं आणि इतरांना ( कुटुंबीय, मित्र, सहकारी) ही ग्राहकाचं नेमकं लोकेशन समजू शकतं. 

नवं व्यवसायिक क्षेत्र निवडून आव्हानं पेलणा-या सर्वच ‘भारतींना’ आपण सलाम करू या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ या.