माणसाच्या रुपातील देवासारखे रुग्णाईतांच्या सेवेसाठी झटणारे पद्मश्री डॉ तात्याराव लहाने!

स्वत:च्या किडन्या निकामी झाल्यावरही रुग्णसेवेसाठी मान अपमान यश अपयशाच्या हिंदोळ्यावरचा एक अनोखा प्रवास!

0

महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून मुंबईत सरकारी इस्पितळात मोठ्या संख्येने लोक येत असतात, त्यांच्यावर उपचार व्हावे आणि त्यांना जीवनाचा आनंद पुन्हा घेता यावे म्हणून या रुग्णालयात दिवसरात्र राबणारे डॉक्टर हे त्यांच्यासाठी देवापेक्षा कमी नसतात, मात्र या देवाच्या बरोबरीचा दर्जा मिळालेल्या डॉक्टरच्या आत देव नसेल तरी सह्रदय माणूस मात्र नक्कीच जीवंत असायला हवा तरच या दूरून आलेल्या गरीब रुग्णांना सेवा आणि उपचार आपुलकीने आणि प्रेमाने मिळू शकतात. पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी नेमके तेच केले आहे. आज मुंबईच्या जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून ते कार्यरत आहेत, मात्र त्यांच्यातील माणूस अहोरात्र रुग्णाच्या सेवेत अविरतपणे झटत असतो. गेल्या अनेक वर्षापासून अक्षरश: लाखो रुग्णांना जगण्याची नवी दृष्टी देणा-या डॉ लहाने यांचा जीवनप्रवास तसा सोपा नव्हता. सामान्य घरातून आलेल्या या डॉक्टरांच्या जीवनात अनेक मान अपमानांचे क्षण आले, संकटे आली, मात्र किडनीच्या आजारावर मात करत त्यांनी आजही रुग्ण सेवा सुरूच ठेवली आहे. त्यांच्या या कार्याबाबत युवरस्टोरी मराठीने त्यांच्याशी संवाद साधला. त्याचा हा सारांश.


तात्याराव म्हणाले की, मराठवाड्याच्या मागास भागात जन्मलेल्या मला शाळेत शिक्षण घेत असताना यश-अपयश म्हणजे काय याचा अनुभव लहान वयातच आला. जेव्हा दहावी च्या वर्गात गेलो तेव्हाच हे समजले. ‘स्कूल डे’ म्हणजे हुशार मुलांना एक दिवस मास्तर व्हायचा दिवस असायचा. पहिला येणाऱ्या विद्यार्थ्यांला दिवसभरासाठी हेडमास्तर केले जायचे. मी नववीत पहिला आलो होतो त्यामुळे मीच हेडमास्तर होणार हे नक्की होते, पण माझ्याकडे चांगले कपडे नाहीत असे सांगून पाटलाच्या मुलाला हेडमास्तर करण्यात आले. तुम्हाला ज्ञान असूनही मान मिळत नाही, आणि अपमान कसा असतो हे त्यादिवशी शिकलो. तात्याराव म्हणाले की, तरीही ही गोष्ट आईवडिलांना सांगितली नाही, कारण त्यांनी पुन्हा कर्ज काढून कपडे घेतले असते.

तात्याराव म्हणाले की, “वैद्यनाथ कॉलेजला प्रवेश घेतला. त्या महाविद्यालयात ७ विद्यार्थी मेडिकलला होते. त्यांनी विशेष कोचिंग करण्यासाठी २० मुलांची बॅच निवडण्याचा निर्णय घेतला. मेरिटच्या २० मुलांना मुलाखतीसाठी बोलविले. त्यांची नावे बोर्डावर लावली. माझे नाव पहिल्या क्रमांकावर होते. मुलाखतीत मला एक प्राणिशास्त्रावरचे पुस्तक वाचण्यासाठी दिले. त्यात ‘स्टमक’ (stomach) हा शब्द मी माझ्या गुरुजींनी शिकवल्याप्रमाणे ‘स्टमच’ वाचला. मला उच्चार येत नाहीत म्हणून मेरिटमध्ये असूनही त्या बॅचमध्ये मला प्रवेश मिळाला नाही. इतकंच नाही, तर मला पुस्तके व हॉस्टेलला राहण्यासही नकार देण्यात आला.”


डॉक्टर म्हणतात की, अपमान-अपयशाचा असा अनुभव नेहमीच येत होता पण मी जिद्द सोडली नाहीच. ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत झाडांना पाणी घालून मिळालेल्या पैशातून अभ्यास केला. उच्चारांनी ज्ञानात किंवा हुशारीत फरक पडत नाही हे सिद्ध करण्यासाठी खूप अभ्यास केला. निकाल लागला आणि कळलं की, मी एकटाच मेडिकलला गेलो होतो. अपमान, अन्याय झाल्याची भावना बळावल्यानेच जिद्दीने, नेटाने अभ्यास केला आणि डॉक्टर झालो. डॉक्टर सांगतात.

एम.एस. तसेच एम.पी.एस.सी.ची परीक्षाही उत्तीर्ण करून डॉ लहाने अंबेजोगाई येथे अधिव्याख्याता या पदावर रुजू झाले. अंबेजोगाईत डॉक्टरांचे नाव विचारत रुग्ण येण्यास सुरुवात झाली होती; पण आणखी एक जीवघेणं संकट मे १९९२ मध्ये आले. दोन्ही किडनी निकामी झाल्याने डॉक्टरांना मुंबईला हलविण्यात आले. तपासण्या झाल्या आणि त्यांना डायलिसीसवर ठेवण्याचा सल्ला दिला गेला. त्यावेळी १९९४ सालच्या जुलैमध्ये औषधोपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात त्यांनी बदली करून घेतली. बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांना आणखी एक-दोन वर्षच आयुष्य असल्याचे जाहीर केले आणि विमा काढण्याचा सल्ला दिला.


डॉ म्हणतात, “मी खूपच खचून गेलो. माझ्या मुलाबाळांचं काय? माझी बायको सुलू, आई-वडील, बहीण-भाऊ, सासू हे सर्वच माझ्यावर अवलंबून होते. त्यांच्यासाठी मी विमा काढला. सुलू व आई-वडील घरात असायचे.”

पुढे डॉक्टरांनी डायलिसिस सुरू केले. दहा आठवडे डायलिसिस झाल्यावर किडनी बदलता येईल, असे सांगितले. त्यांच्या घरातील सर्वच जण किडनी देण्यासाठी तयार होते. त्यात अंजनाबाईंची म्हणजे डॉक्टरांच्या आईची किडनी सर्वात जास्त मॅच झाली. २२ फेब्रुवारी १९९५ ला त्यांची शस्त्रक्रिया डॉ. माधव कामत व डॉ. चिवबर यांनी सर जे.जे. रुग्णालयातच केली आईच्या या अफाट प्रेमाने त्यांना पुनर्जन्म मिळाला. त्यानंतर पुढचं आयुष्य गरिबांची सेवा करण्यात घालविण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या मते औरंगाबाद व मुंबईच्या शस्त्रक्रिया पद्धतीत खूपच फरक होता. तेथील निवासी डॉक्टरांपेक्षा लहाने निपुण नाहीत असे सांगण्यात येत होते. तरी डॉ. रागिणी पारेख यांनी त्यांना बऱ्याच गोष्टी शिकविल्या. तरीही रुग्णसंख्या वाढत नव्हती, कारण बाहेर ‘फॅकोइमलशी पिफकेशन’ पद्धतीने शस्त्रक्रिया होत होत्या. त्या शिकण्यासाठी मग ते अहमदाबादला गेले. याशिवाय विभागात १० लाख रुपयांचे फॅकोचे मशीन घेतले, शस्त्रक्रिया सुरू केल्या. तिसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया करताना गुंता निर्माण झाला. डॉ लहाने खूप खचले, परत अंबेजोगाईला जायची तयारी त्यांनी केली; पण डॉ. रागिणी व डॉ. मनोज यांनी डॉ. केकी मेहतांकडे त्यांना घेऊन गेले. डॉ. मेहता शस्त्रक्रियेच्या वेळी आले. त्यांच्या समोर डॉ लहाने यांनी शस्त्रक्रिया सुरू केल्या आणि सर्वांच्या समोर १३ शस्त्रक्रिया गुंतागुंत न होता यशस्वी केल्या. त्या दिवसापासून त्यांची भीती गेली ती कायमची!


एक महत्त्वाचा टप्पा पार पडला होता. हे मशीन जे.जे.त आल्याचे कळल्याने रुग्णसंख्येतही खूप वाढ होऊ लागली, ती अगदी आजतागायत चालूच आहे. असे त्यांनी सांगितले. नेत्र विभागाचे नाव चांगले झाल्याने रुग्णांची संख्या खूपच वाढली. त्यात अगदी इतर ठिकाणी शस्त्रक्रिया करून त्यात गुंतागुंत झालेले रुग्णही येऊ लागले.

त्यातून रोज नव्याने रुग्ण येत राहिले आणि बघता बघता शस्त्रक्रियांचा आकडा वाढत लाखांच्या घरात गेला. त्यातूनच २००८ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. डॉ लहाने म्हणतात की, “मला विनोबाजींची वाक्यं नेहमी आठवतात- जशीच्या तशी नव्हे, मात्र अर्थ साधारण असा आहे- तलवारीशी ढालीने लढा, तलवारीची धार आपोआप बोथट होते.” या काळात त्यांना नेहमीच वेगळे अनुभव येत राहिले त्यांच्या कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न देखील काही लोकांनी अनेकदा केला मात्र त्यात त्यांना नेहमीच अपयश आले कारण डॉ लहाने यांच्या पाठीमागे लाखो दिन-दु:खीतांचे आशिर्वाद नेहमीच होते.

अधिष्ठाता झाल्यानंतरच्या अनुभवांचे तर एक पुस्तक होऊ शकते, असे ते सांगतात. ते म्हणतात, “या खुर्चीवर बसल्यानंतर चित्रच बदललं. अचानक सगळीकडे प्रेमाचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येक जण फारच प्रेमाने वागत, नतमस्तक होत. ज्यांना कधी भेटलो नाही तेही लोक दहा जन्मांपासूनचे मित्र असल्यासारखे वागू लागले. त्या सर्वाच्या वागण्यामुळे माझाही सर्वावर विश्वास बसला. इतके मित्र मिळाल्याने मीही फार खूश होतो.”

प्रत्येकावर त्यांचा विश्वास होता; पण इथेच आणखी एक पराभव त्यांची वाट बघत होता. माणसांवर ठेवलेल्या विश्वासाचा पराभव त्यांना स्विकारावा लागला. या दरम्यान त्यांच्यावर एक प्रसंग आला. त्यावेळी त्यांच्याबरोबर २४ तास बसणारे, त्यांच्या नावाने सत्ता वापरणारे गायब झाले. त्यांचे फोन बंद. मग इतरांचे काय? असे अनुभव डॉक्टरांना आले. या परिस्थितीतून ते निभावले; पण यातून एक गोष्ट नक्की कळली, की अडचणीच्या वेळी तुमच्याबरोबर तुमचे कुटुंब व तुम्ही एकटे असता. बाकी असतो तो सगळा आभास.

अर्थात रुग्णालयाच्या बाहेर मात्र आजही प्रत्येक जण घरच्यासारखं प्रेम करतो. जवळची माणसे अशा वेळीच ओळखता येतात. तुम्ही फक्त चांगलं काम करत राहायचं. लोकांसाठी केलेलं हे काम आणि दुसऱ्यांना मदत करून मिळालेले आशीर्वाद हेच संकटातून मार्ग काढण्यासाठी मदत करत असतात असे मानून ते काम करत राहतात. आणि माणूस म्हणून रुग्णांच्या सेवेसाठी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता आपले काम करत राहतात.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.