“नटसम्राटमधली कावेरी ही एक आदर्श बायको” - अभिनेत्री मेधा मांजरेकर

0

काकस्पर्श, दे धक्का सारख्या संवेदनशील सिनेमांमधून आपला अभिनयाचा ठसा ठळकपणे उमटवणारी अभिनेत्री मेधा मांजरेकर ही नेहमीच निवडक भुमिका करताना दिसत आलीये. मेधा आता नटसम्राट या आगामी सिनेमात दिसणारे. मेधाचे पति आणि प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे लेखन दिग्दर्शन असणाऱा हा सिनेमा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला प्रसिद्ध होतोय, ज्यात मेधा नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकरांच्या बायकोची कावेरीची व्यक्तिरेखा साकारतेय.

नटसम्राट या सिनेमात नटश्रेष्ठ अप्पासाहेब बेलवलकरांची भु्मिका साकारतायत नाना पाटेकर. “नानांसोबत काम करणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता, त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे अॅक्टींग स्कूलमध्ये काम करण्यासारखे होते, हिंदी तसेच मराठी सिनेमातला महत्वाचा काळ त्यांनी पाहिलाय आणि आजही त्यात ते सक्रीय आहेत, मला सुरुवातीला खुप टेंशन आले होते पण त्यांनीच माझे हे टेंशन कमी केले आम्ही प्रत्येक सीन आधी करुन पहायचो,”

“या वयातही त्यांच्यातला उत्साह शिकण्यासारखा आहे, फक्त स्वतःचे सीन नाही तर इतर कलाकारांच्या सीन्समध्येही ते सेटवर हजर असायचे, जिथे खटकेल ती गोष्ट सांगायचे महेशशी बोलायचे. खरेच नटसम्राटचा हा अनुभव मला अभिनेत्री म्हणून खुप गोष्टी शिकवून गेलाय जे पुढे इतर व्यक्तिरेखा साकारताना माझ्यासाठी फायदेशीर ठरतील.”

नटसम्राटची घोषणा झाली तेव्हा या सिनेमात कावेरीची भुमिका रिमा लागू साकारणार होत्या पण काही कारणांमुळे त्या सिनेमातनं बाहेर पडल्या आणि मग कावेरीची जागा कोण घेणार याबद्दल चर्चा सुरु झाली. “वेळ कमी होता कारण शुट सुरु झाले होते तेव्हाच रिमा बाहेर पडल्या त्यामुळे त्यांची जागा घेणाऱ्या दुसऱ्या अभिनेत्रीला भुमिकेचा अभ्यास करण्यासाठी फारसा वेळ मिळणार नव्हता, याचदरम्यान नानांनी मला कावेरीचे संवाद वाचायला दिलेत, तयार रहा असेही सांगितले, मीही सुरुवात केली. खरेतर कावेरी माझ्यासाठी नवी नव्हती, महेशचे नटसम्राट हे स्वप्न होते त्यामुळे या सिनेमाच्या सुरुवातीपासून मी या सिनेमाशी जोडली गेली होती

मी कावेरी साकारायला सुरुवात केली तेव्हा माझा संपुर्ण विश्वास माझ्या दिग्दर्शकांवर म्हणजे महेशवर होता, मला खात्री होती की महेश माझ्याकडून कावेरी तंतोतंत साकारुन घेईल याची.”

नटसम्राटनंतर काही दिवसांनी मेधाचा आणखी एक सिनेमा प्रदर्शित होतोय, ज्याचे नाव आहे बंध नायलॉनचे. या सिनेमात ती महेश मांजरेकरसोबत पहिल्यांदाच अभिनय करताना रुपेरी पडद्यावर दिसणारे. “बंध नायलॉनचे ही एक कौटुंबिक कहाणी आहे, आजच्या कुटुंबांची, यातल्या नातेसंबंधांची, सोशल मिडीया, टेक्नॉलॉजी याच्या वाढत्या प्रभावामुळे आज माणसांच्या आयुष्यातनं नात्यांचा ओलावा काहीसा मिटत चाललाय, सोबत असतानाही फोनवर चॅट करणे, वाढदिवसाच्या शुभेच्छा फोनवरुन मेसेज करणे आणि अगदी रक्षाबंधनची राखी किंवा संक्रांतीचे तिळगुळही फोनवरुन मेसेज करुन साजरी करणाऱ्या या पिढीला पुन्हा एकदा खऱ्या नात्यांची जाण करुन देण्याचा हा प्रयत्न असेल.

यात मी महेशसोबत त्याच्या बायकोची भुमिका करतेय, आजी आजोबा आणि त्यांच्या नातीचे भावबंधही यात तुम्हाला पहायला मिळतील, हा सिनेमाही नवीन वर्षात जानेवारी महिन्यातच प्रदर्शित होतोय.”

काकस्पर्शनंतर एका अंतराळाने मेधाचे नटसम्राट आणि बंध नायलॉनचे हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. याचा आनंद मेधाशी बोलताना जाणवतो, नवीन भुमिका नवी आव्हाने प्रेक्षकांना किती रुचतायत ते पहायचे...