नवउद्योजकाच्या वायरलेस तंत्रज्ञान कंपनीचं बाजारात वर्चस्व

नवउद्योजकाच्या वायरलेस तंत्रज्ञान कंपनीचं बाजारात वर्चस्व

Monday April 11, 2016,

5 min Read

तुमच्याकडे भले जगातलं अति उत्तम उत्पादन असेल, लाखो-करोडो लोकांची समस्या त्याद्वारे सोडवता येत असेल, पण तुम्ही ते उत्पादन बाजारात आणायला उशीर करता कामा नये. तत्परतेने काम करत जेवढ्या लवकर तुम्ही उत्पादन घेऊन बाजारात उतराल, यशाचा मार्ग तितकाच सुकर होईल. प्रवीण भागवत आणि त्यांची कंपनी एअर टाइट नेटवर्क्स (आताची मोजो नेटवर्क्स) यांची मॅकडोनाल्डस् सोबतच्या व्यापाराची संधी अशाच काही बाबींमुळे हुकली.

सेल्स हेडने फोनवरून शिकागोमधून पॉझिटिव्ह बातमी मिळेल असं सांगितल्यावर, प्रवीण आणि कंपनी सीओओ डेव्हिड किंग यांचे प्राण कानात गोळा झाले होते. पण आंतरराष्ट्रीय फूड चेनला त्यांचं वायफाय सिक्युरिटी उत्पादन दाखवायला त्यांना साधी वेळही देण्यात आली नाही. प्रवीण सांगतात, “पण सेल्स हेडने त्याच्या प्रयत्नांची शिकस्त केली आणि लवकरच मॅकडोनाल्डस् आमच्या कंपनीचे पहिले ग्राहक बनले”.

मोजो नेटवर्क्सची टीम

मोजो नेटवर्क्सची टीम


उद्योजकत्वाच्या वाटेवर

प्रवीण यांनी आयआयटी खडगपूरमधून पदवी संपादन केली. पीएचडी झाल्यावर ते आयबीएममध्ये संशोधन विभागात रुजू झाले. त्यांची टीम वायफाय बनवण्याचं काम करत होती. त्यावेळी त्यांचे बरेचसे मित्र आणि सहकारी स्वतःचा उद्योग सुरू करण्याकरता सिलिकॉन व्हॅलीत दाखल होत होते. मग प्रवीणलाही आपलं स्वतःचं काही तरी सुरू करावं असं वाटू लागलं. पण त्यांच्या पत्नीचं वैद्यकीय शिक्षण सुरू असल्यानं ते न्यूयॉर्कला जाऊ शकत नव्हते. त्यांनी सिलिकॉन व्हॅलीत जायचं ठरवलं, त्यावेळी डॉट कॉम तेजीत होतं.

उद्योजकत्वाचा गोंधळ

प्रवीण भारतात येऊन तंत्रज्ञानसंबंधी स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करू लागले. प्रवीण सांगतात, “भारतात याबाबतीत गोंधळ असताना मला स्टार्टअप सुरू करायला चांगला वाव आहे असं वाटलं. सिलिकॉन व्हॅलीत सर्व सुरळीत सुरू असताना, तिथं तुमच्या कामाचा फारसा प्रभाव  पडणार नव्हता”. भारतात त्यावेळी बऱ्याच आयटी कंपन्या होत्या. पण प्रवीणला तंत्रज्ञानाशी निगडीत नाही, तर आयटी सर्व्हिस बेस कंपनी सुरू करायची होती.

प्रवीण भारतात परतले. आयआयटी कानपूरमध्ये ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. प्राध्यापक म्हणून काम करत असतानाच त्यांचं स्टार्टअपचं कामही सुरू झालं. त्यांनी २००३ मध्ये वायफाय तंत्रज्ञान कंपनी ‘एअर टाइट नेटवर्क्स’ ची स्थापना केली. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून कंपनीच्या कामाला सुरूवात झाली.

ज्ञात आणि अज्ञातातली दूरी मिटवणं

वायफाय निर्मिती करणाऱ्या कोअर टीमचा सदस्य असल्यामुळे प्रवीणला त्यातल्या बऱ्या वाईट खाचाखोचा चांगल्याच अवगत होत्या. त्यामुळे त्यांनी वायफाय सुरक्षितपणे वापरण्याचं तंत्रज्ञान बनवण्याचं ठरवलं. आयआयटी कानपूरमध्ये असताना त्यांनी बनवलेल्या टीमने पुढे येऊन तंत्रज्ञानाची निर्मिती केली. पण त्याचा व्यापार करायला पैशाची गरज होती. त्यामुळे ते भांडवल उभारण्याकरता प्रयत्न करू लागले. सहा सात महिने प्रयत्न करूनही त्यांच्या हाती मात्र काहीच लागलं नाही.

आपल्या टीममध्ये तंत्रज्ञानासोबतच व्यवहारज्ञान असणाऱ्या व्यक्तींना घेण्याची प्रवीण यांना जाणीव झाली. मग त्यांनी व्हॅलीतला त्यांचा मित्र समीर सिन्हांशी संपर्क साधला. त्यांना ही कल्पना चांगलीच भावली आणि मग तेही प्रवीणच्या प्रकल्पात सामील झाले. याच दरम्यान एका परिसंवादात टेक महिंद्राचे सीइओ किरण देशपांडे यांच्याशी प्रवीणची गाठ पडली. बोलता बोलता प्रवीणने आपल्या उद्योगाची माहिती किरण यांना दिली. त्यांनाही कल्पना आवडली आणि तेही प्रवीण आणि समीरसोबत या प्रकल्पाचे कोअर टीम मेंबर झाले.

प्रविण, समीर आणि किरण सुरुवातीच्या काळात

प्रविण, समीर आणि किरण सुरुवातीच्या काळात


भारतातून त्यांना भांडवल मिळण्याची काही लक्षणं दिसेनात. मग त्यांनी सिलिकॉन व्हॅलीत जायचं ठरवलं. त्यांनी एका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सीओओ) नियुक्ती केली. व्हॅलीतल्या एका यशस्वी वायरलेस कंपनीचा सीओओ आणि तज्ज्ञ डेव्हिड किंग यांनी त्यांना सीओओ नियुक्त करण्याचा सल्ला दिला. कारण मधल्या काळात त्यांच काम चांगलचं अपुरं राहिलं होतं. प्रवीण आणि टीमने डेव्हिडचीच सीओओ म्हणून नियुक्ती केली. डेव्हिडने कामाला जोरदार सुरूवात केली.

भारतात सिलिकॉन व्हॅली कंपनी उभारणे

प्रवीण सांगतात, “आमच्या लक्षात आलं की, भारताबाहेर आम्ही तंत्रज्ञान उभारतोय. पण त्याकरता अमेरिकेबाहेरील बाजारातही हे उत्पादन पोहचवणारी मजबूत टीम बांधणं आवश्यक आहे. वायरलेस क्षेत्रात आयपीओ कंपनी उभारणारी व्यक्ती आमच्यासमोर होती”.

२००४ पर्यंत एअर टाइट नेटवर्क्सचं पुणे आणि कॅलिफोर्नियात बस्तान बसलं. दीड वर्षानंतर ट्रायडेंट कॅपिटल, वालडेन इंटरनॅशनल, ग्रॅनाइट कॅपिटल आणि ब्लूप्रिंट व्हेंचर्स यांनी सिरिज ए राउंडद्वारे प्रवीणच्या कंपनीत ६६ कोटी ३६ लक्ष ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली.

सुरूवातीचे दिवस

सुरूवातीचे दिवस


बदलाचे वारे

मॅकडोनाल्डमधील बैठकीत २० मिनिटांनंतर त्यांना काय बोलायचं याचा अंदाज आला. ग्राहकाच्या मनात असलेल्या पर्यायांपेक्षा त्यांचं उत्पादन अधिक दमदार होतं. हा व्यवहार उत्तमपणे यशस्वी करण्याकरता, त्यांनी त्यांचे सर्व कुशल इंजिनिअर्स कामाला लावले. २००९ पर्यंत या टीमला वायफाय सुरक्षा व्यवसायात चांगलाच नफा मिळू लागला. त्यांनी गुंतवणुकीचे तीन हप्ते मिळवले. त्याचवेळी त्यांना जाणवलं की, आता वायफायचा वापर सर्वच जण करतात. पण फार कमी लोकच वायफाय सुरक्षित करण्याकरता पैसे देतात. संरक्षण किंवा अतिसुरक्षा क्षेत्रात काम करणारे लोकच सुरक्षित वायफायचा वापर करतात.

विकासाचे वाटसरू

पाच वर्षाच्या यशस्वी वाटचालीनंतर त्यांनी त्यांची टीम परत बांधायचं ठरवलं. कंपनीच्या एका ग्राहकाने त्यांच्याकडे असलेल्या उपकरणांचं रुपांतर वायफाय एक्सेस पॉईंटस् मध्ये करण्याबाबत टीमकडे विचारणा केली. मग टीमला आणखी चालना मिळत, वायफाय एक्सेस त्यांच्या पोर्टफोलियोचा भाग बनला. आता त्यांचं उत्पादन सॉफ्टवेअर स्विचसारखं काम करतं. एका स्विच डिवाइसचा उपयोग वायफाय सुरक्षेसाठी होतो तर दुसऱ्या स्विच डिवाइसचा उपयोग वायफाय एक्सेस पॉइंटसाठी होतो.

त्यांच्या ग्राहकांची संख्या वाढू लागल्यावर एकाच मध्यवर्ती ठिकाणाहून कामकाज हाताळणं त्यांना खूप अवघड होऊ लागलं. मग त्यांनी एक नवीन सॉफ्टवेअर बनवलं. २०११ पासून क्लाऊड वरून मोजो नेटवर्क्स या नावाने ते कामकाज हाताळत आहेत. आज मोजो नेटवर्क्सचा मासिक वाढ दर ५० टक्के आहे. टाइम वार्नर केबल, एफडिए, हिल्टॉन, ओव्हरस्टॉक आणि एडिपी सध्या त्यांचे ग्राहक आहेत. मोजो नेटवर्क्सचे गुंतवणुकदार फैसल ए सोहेल, व्यवस्थापकीय संचालक, प्रेसिडिओ पार्टनर्स सांगतात, “मोजो नेटवर्क्सच्या टीमने वायरलेस क्षेत्रात नवनवीन शोधांची त्यांची गती कायम ठेवलीय. वायरलेस सुरक्षा क्षेत्रात ते आघाडीवर आहेत. पुढच्या पिढीचा क्लाउड वायफायवरही तेच प्रबळ दावेदार आहेत. विकासाचे जोरकस प्रयत्न ते करत आहेत”.

वायफायचा बाजार

मार्केटस्टँडमार्केट्सच्या अहवालानुसार, २०२० पर्यंत वायफायचा बाजार २,२३१ अब्ज ७१ कोटी ३ लक्ष २० हजार रुपयांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. आशिया, पॅसिफिक आणि लॅटिन अमेरिकन भागांमध्ये सरासरी वार्षिक विकास दर २२.६ आणि २०.२ टक्क्यांनी वाढेल. इंटरनेटचा अचूक वापर, अत्याधुनिक उपकरणांचा अधिकाधिक वापर आणि विकत घेण्याची क्षमता यामुळे ही वाढ होणार आहे. या क्षेत्रात जागतिक पातळीवर एटी अँड टी आणि सिस्कोही मोजोचे प्रबळ स्पर्धक आहेत.

लेखिका – सिंधू कश्यप

अनुवाद – साधना तिप्पनाकजे