ख्वाडामधली बानू बनली मराठीतला चर्चित चेहरा

ख्वाडामधली बानू बनली मराठीतला चर्चित चेहरा

Saturday January 02, 2016,

3 min Read

मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये हल्ली दरआठवडयाला नवनवीन चेहरे येताना दिसतायत. मराठीचा वाढता आवाका पहाता निर्माते दिग्दर्शक नवीन फ्रेश चेहऱ्यांचा शोध मोठ्या प्रमाणात घेताना दिसतात. अॅक्टिंग स्कूल, ड्रामा ग्रुप किंवा महाविद्यालयीन एकांकीकांमधून असे नवे चेहरे निर्माता दिग्दर्शकांना आवर्जुन मिळतात. पण फँड्री, ख्वाडा सारख्या सिनेमांच्या निमित्ताने ग्रामीण भागातल्या होतकरु आणि उमेदीच्या कलाकारांना वाव मिळू लागलाय.

वैष्णवी ढोरे हे असेच एक उमेदीचे नाव. ख्वाडामध्ये साकारणारी वैष्णवी ही तशी पुण्याची पण तिचे मूळ गाव पुण्याजवळचे एरडवणे. सतरा वर्षाची वैष्णवी तिच्या आजी आजोबांसोबत तिथे एका झोपडीवजा खोलीत रहाते. वैष्णवी वर्षाची असताना तिचे वडिल वारले तर ती बारा वर्षांची असताना न्युमोनियाने तिची आई वारली, यानंतर तिच्या आजी आजोबांनी तिला वाढवलं. तिची आजी घरकामं करते तर आजोबा चौकीदार आहेत. प्रतिकुल परिस्थितीतही तिच्या आजी आजोबांनी तिचा योग्य पद्धतीने सांभाळ केलाय हे वैष्णवीशी बोलताना जाणवते.

image


वैष्णवी सांगते, “अभिनयाची आवड मला लहानपणापासूनच होती, माझी आई असतानाच माझे नृत्याचे शिक्षण सुरु झाले होते, तीन वर्षाची असल्यापासून मी भरतनाट्यम शिकतेय. माझ्या आईच्या मृत्युनंतर खरेतर माझे नृत्याचे शिक्षण परवडणारे नव्हते पण माझ्या गुरुंनी एकही पैसा न घेता माझे शिक्षण सुरु ठेवले. यादरम्यान नृत्याबरोबरच शाळेतनं मी नाटकाचे धडेही गिरवू लागले.

माझ्या आजी आजोबांना खरेतर माझं अभिनयाचं वेड फारसं रुचायचं नाही कारण अभ्यास सांभाळून नाटकाच्या तालमी करताना मला घरी यायला उशिर व्हायचा ज्यामुळे माझ्या आजी आजोबांना सतत चिंता लागून रहायची. मी सध्या पुण्याच्या एसपी महाविद्यालयामध्ये शिकतेय तिथे माझ्या अभिनयाची आवड मला चांगल्या पद्धतीने जोपासता येते.”

image


ख्वाडाच्या निमित्ताने कॅमेरासमोर अभिनयाचा अनुभव हा वैष्णवीसाठी नवा नाहीये. यापूर्वी वैष्णवीने एका शॉर्टफिल्ममध्येही काम केलेय. महाविद्यालयामध्ये एकांकीकांमधून काम करतानाच वैष्णवीने अभिनयासाठी पुरस्कारही जिंकले. ख्वाडाच्या आधी वैष्णवीला मराठी मालिकांसाठी विचारले गेले होते पण मुंबईत जाऊन रहाणं हे परवडण्यासारखं नाही म्हणून ती आत्तापर्यंत प्रायोगिक नाटकामध्ये सक्रिय राहिली. आता मात्र ख्वाडानंतर खूप वेगवेगळ्या भूमिकांसाठी तिच्याकडे विचारणा केली जातेय.

ख्वाडाच्या संधीबद्दल वैष्णवी खूप उत्साहात सांगते, “माझा हा पहिला सिनेमा जो मला माझ्या अभिनयाच्या बळावर मिळाला. पुण्यात ख्वाडासाठी ऑडिशन असल्याचे मला माझ्या नाटकाच्या ग्रुपमधून कळले मी ऑडिशनला गेली आणि बानूसाठी माझी निवड झाली, यानंतर दिग्दर्शकांनी मला धनगरी भाषा शिकायला सांगितले, घोडेस्वारीचे प्रशिक्षणही घ्यायला लावले, मी हे सगळं प्रामाणिकपणे केलं आणि ख्वाडाचे माझे शुटिंग सुरु झाले, तिथे गेल्यावर कळलं की मी जी घोडेस्वारी इथे शिकलेय ती आणि प्रत्यक्ष सिनेमातली घोडेस्वारी खूप वेगळी आहे, सिनेमात मी दऱ्याखोऱ्यांमधून घोडेस्वारी करणार होते, मग पुन्हा एकदा शुटिंग सुरु असतानाच मी अशा घोडेस्वारीचा श्रीगणेशा केला.

image


ख्वाडा सिनेमा तयार झाला, प्रदर्शित झाला आणि लोकांच्या पसंतीसही उतरला. ख्वाडासाठी आम्ही सर्व टीमने अनेक ख्वाडे पार केलेत आणि आज जेव्हा यशाचा अनुभव आम्ही घेतोय तेव्हा या परिश्रमाची चव अधिक गोड वाटू लागलीये. ”

image


वैष्णवी आता अभिनयातच स्वतः करिअर करु इच्छितेय, तिचे महाविद्यालयीन शिक्षणही सोबत सुरु आहेच. ख्वाडामुळे तिचा चेहरा आणि अभिनय घराघरात पोहचलाय, मनोरंजन क्षेत्रातली नवनवी दालनं तिच्यासाठी आपोआप उघडली आहेत. तेव्हा पहायचं ख्वाडामधली ही कणखर बानू कुठच्या नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येतेय ते.