वाजीद खान – विश्वविक्रमांना गवसणी घालणारा प्रयोगशील कलाकार

0

लहानपणी पावसाच्या पाण्यात कागदी नावा सोडण्याचा खेळ आपण सगळ्यांनीच कधी ना कधी खेळला असेल... स्वतः तयार केलेल्या त्या नावा पाण्यात तरंगू लागल्यावर त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच.... त्यातच मुले खुष होऊन जातात... पण वाजीद खान यांचे स्वप्न मात्र मोठे होते... कागदी नावांच्या पुढे जात काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरवलेही... त्यांनी एक छोटे जहाजच बनवले, जे पाण्यावर तरंगू शकत होते. तर वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षीच वाजीद खान यांनी जगातील सर्वात छोट्या इस्त्रीचा शोध लावला, ज्याची नोंद पुढे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये झाली. आज या चौतीस वर्षीय कलाकाराकडे आयर्न नेल आर्ट पेंटींगचे (छोट्या खिळ्यांचा वापर असलेली एक विशिष्ट शैली) पेटंट असून, जागतिक विक्रमासांठीच्या पाच वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स मध्ये त्यांची नोंद झाली आहे आणि दोनशे शोधही त्यांच्या नावावर जमा आहेत.

जन्मजात कलेचे वरदान लाभलेल्या या कलाकाराचा प्रवास जितका सुंदर तितकाच प्रेरणादायीही... जाणून घेऊया त्यांची कहाणी...

जगभरातील बहुतेक सर्व कलाकार आणि संशोधकांप्रमाणेच वाजिद खान हेदेखील अगदी सामान्य परिस्थितीतूनच पुढे आले. पण, त्यांच्या स्वतःच्याच देशात मात्र ते काहीसे दुर्लक्षितच राहीले. मंदसौर जिल्ह्यापासून अवघ्या अकरा किलोमीटरवर असलेल्या सोनगिरी या गावात त्यांचा जन्म झाला आणि तेथेच त्यांचे बालपण गेले. शाळेत सातत्याने मिळणाऱ्या कमी गुणांमुळे वाजिद यांना बालपणी कमीपणा वाटत असे. पण त्याही परिस्थिती जे काही साहित्य हाती लागेल, त्यासह आपले अद्वितीय प्रयोग करणे मात्र त्यांनी सुरुच ठेवले. पाचवीत असतानाच त्यांनी शाळा सोडली आणि त्यानंतर अखेरीस घरही सोडले.

नवनवे प्रयोग

“ माझ्या आयुष्यातील निर्णायक क्षण तेंव्हा आला, जेंव्हा माझ्या आईने मला तेराशे रुपये दिले आणि छंदाचा पाठपुरावा करण्यासाठी घर सोडण्याचे आव्हानही दिले. काहीतरी असामान्य करण्यासाठीच मी बनलो आहे, यावर फक्त तिचाच विश्वास होता,” वाजिद सांगतात. त्यावेळी त्यांच्या संघर्षाला खरी सुरुवात झाली. जगण्यासाठी कमाई करायची आणि त्याचवेळी नवनवीन प्रयोगही सुरुच ठेवायचे, तेही वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी.... हे खरे तर खूपच मोठे आव्हान होते. त्या काळात टेक्निकल रोबोटस् अर्थात तांत्रिक यंत्रमानवांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले. नेमकी अशीच एक संधी त्यांना मिळाली आणि मित्राच्या मदतीने त्यांनी अहमदाबाद येथील एनआयएफ इन्स्टीट्यूटमध्ये काम करायला सुरुवात केली.

“ १९९८ साली मी थर्माकोलची निवड केली होती. पण, अखेर मी आयर्न नेल्स अर्थात लोखंडी खिळ्यांच्या सहाय्याने पोट्रेटस् बनविण्याच्या प्रयोगांना सुरुवात केली. २००४ साली आणखी काही शिकण्याच्या आणि प्रयोग करण्याच्या इच्छेने मी इंदौरला आलो. आज मी मुंबई आणि इंदौर अशा दोन्ही शहरांमध्ये स्थिरावलो आहे,” वाजिद सांगतात.

२००५ मध्ये वाजिद यांनी लोखंडी खिळ्यांपासून बनविलेले महात्मा गांधी यांची पोट्रेट अखेर पूर्ण केले. १.२५ लाख लोखंडी खिळ्यांपासून बनलेल्या या पोट्रेटवर ते सातत्याने तीन वर्षे काम करत होते. तर त्याच वर्षी वाजिद यांनी जगातील कदाचित पहिलेच थ्री डी पेंटींग तयार केले. कॅनव्हासवर ऍक्रेलिक रंगांचा वापर करुन त्यांनी हे पेंटींग केले होते. पण त्यांना स्वतंत्र ओळख मिळण्यास आणखी काही काळ जावा लागला आणि ती वेळ अखेर २०१० मध्ये आली, जेंव्हा त्यांचे पहिले पोट्रेट वीस लाख रुपयांना विकले गेले “ गांधींजींच्या पोट्रेटसाठी पन्नास लाखापर्यंतची बोली लागूनही मी ते कधीच विकले नाही. ते नेहमीच माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ राहील,” ते सांगतात. आजपर्यंत त्यांनी मदर तेरेसा, जिजस ख्राईस्ट, धीरुभाई अंबानी यांसारख्या अनेकांची आयर्न नेल पोट्रेटस् बनविली आहेत. त्यासाठी ते खास बेस (आयात केलेली शीटस्) वापरतात, ज्यावर ते पेन्सिलच्या सहाय्याने केवळ पोट्रेटचा आरंभ बिंदू आणि शेवटचा बिंदू यामध्या बाह्यरेखा (एकप्रकारे चित्राची रुपरेखा) फक्त काढतात. “ शीटवर मी कधीच आधी पोट्रेट काढत नाही. माझ्या डोक्यात ते चित्र पक्के असते आणि मी त्या अंत:प्रेरणेनुसार चालतो,” वाजिद सांगतात.

पण त्यांनी स्वतःला केवळ एकाच कलाप्रकारात अडकवून ठेवलेले नाही. टाकून दिलेले ऑटोचे सुट्टे भाग, वैद्यकीय उपकरणे आणि ब्लॅक क्वारी स्टोन्समधूनही त्यांनी काही विलक्षण लॅंडस्केप्स आणि पोट्रेटस् तयार केली आहेत. त्यापैकी सेव द गर्ल चाईल्ड या मोहिमेसाठीचे त्यांचे काम विशेष लक्षवेधी ठरले आहे. त्यामध्ये त्यांनी वैद्यकीय उपकरणांचा वापर करत रडणाऱ्या मुलीची एक सुंदर कलाकृती बनविली होती. पण त्यांच्या आजपर्यंतच्या कामात निसंशयपणे सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते त्यांच्या बुलेट आर्टवर्कने....

“ बुलेट अर्थात बंदुकीची गोळी ही हिंसेची निशाणी आहे आणि गांधीजींनी तर आपल्याला अंहिसा शिकवली. त्यामुळे त्यांचेच पोट्रेट बुलेटच्या सहाय्याने बनवून, यामधील विरोधाभास स्पष्ट करणे, यापेक्षा चांगला मार्ग अहिंसेचा संदेश देण्यासाठी असूच शकत नव्हता,” वाजिद सांगतात. विशेष म्हणजे, त्यांच्या सर्व पोट्रेटमध्ये काळ्या रंगाचा वापर उठून दिसतो, कारण काळा हा सर्वात शक्तीशाली रंग असल्याचे वाजीद यांना वाटते.

कलाकारांच्या कल्याणासाठी काम

वाजीद यांना त्यांच्या आयर्न नेल आर्टसाठी २००९ मध्ये पेटंट मिळाले. गिनिज बुकशिवाय त्यांचे नाव गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्, इंडीया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् आणि आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्येही नोंदले गेले आहे. त्यांच्या १४० शोधांसाठी आणि कलाकृतींसाठी पेटंट मिळविण्यासाठी ते लवकरच अर्ज करणार आहेत. ८ मार्च, २०१५ ला त्यांना आयआयएम अहमदाबाद येथे व्याख्यान देण्याकरीता आमंत्रित केले होते, जेथे ते व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण गोष्टींबाबत बोलले.

“ पण मला माहित आहे की पैसा आणि प्रसिद्धी सर्वकाळ राहू शकत नाही. पवित्र कुराणात सांगितले आहे, ‘दुसऱ्यांसाठी जगा, स्वतःसाठी नाही.’ त्यामुळे मी शारिरीकदृष्ट्या अंपंग आणि गरजू लोकांना कलेच्या सहाय्याने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. मी सुदैवी आहे, कारण माझी पत्नी मरीयमही कला प्रेमी आहे आणि आम्ही दोघे मिळून मुंबई आणि इंदौरसारख्या शहरांमध्ये कार्यशाळा घेतो आणि त्याचबरोबर ग्रामीण भागांतही कार्यशाळा घेतो, जेणेकरुन तेथील कलाकार शोधता येतील आणि त्यांना शिकविता येईल,” ते सांगतात.

कतारमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकासाठी एक विशेष शिल्प तयार करण्याची जबाबदारी वाजीद यांच्यावर सोपविण्यात आली आहे. “ मला माझी प्रसिद्धी यशासाठी धडपडणाऱ्या कलाकार आणि संशोधकांना जगभरात ओळख मिळवून देण्यासाठी वापरायची आहे. मला स्वतःची एनजीओ सुरु करायची नाही. त्यापेक्षा शांतपणे काम करत या कलाकारांना मदत करायची आहे आणि त्यांना स्वतंत्र बनवायचे आहे,” ते पुढे सांगतात.

वाजीद यांचे काम आगामी काळात कदाचित हॉलीवूडमध्येही दिसणार असून प्रयोग करत रहाण्याची आणि कला शिकविण्याची त्यांची इच्छा आहे. २०१६ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यान देण्याची त्यांची योजना आहे.

अशा अजून प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी आमच्या पेज Facebook ला लाईक करा

आता वाचा अशाच काही प्रेरणादायी कहाण्या :

शालाबाह्य मुलाने कसा उभारला ६० कोटींचा व्यवसाय

भागीदारी व्यवसायात आणि नात्यातही पक्क्या मैत्रिणी, अपर्णा आणि केतकी घडवतायत त्यांची स्वत:ची यशाची कहाणी

डॉगी आणि माऊसाठी कस्टमाईज कपडे आणि ऍक्सेसरीजचा देशातला एकमेव ब्रॅण्ड ‘पेट्रीओट’

लेखक – मुक्ती मसिह

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन