आपण खरोखर काळजी करतो काय ? माझी लाडकी पिल्लं !!!

0

भद्रा एक छोटसं कुत्र्याचं पिल्लू. अगदी पाच महिन्यांचं, पण तिनं देशभरात एक कणवेची लाट उसळवली. ती माझ्या शेरु सारखीच. मला आठवतंय, मी जेव्हा एसपीसीए रुग्णालयात त्याला पहायला गेलो होतो, तो आजारी होता. त्या छोट्याश्या खोलीत इतर कुत्र्यांबरोबर होता. मला बघताच धावत आला. मी त्याच्या डोक्यावरुन हात फिरवला. तो जणू सांगत होता मला इथून घेऊन चल. त्याच्या घरी जिथं तो लहानाचा मोठा झाला होता. मी डॉक्टरांना विचारलं पण ते त्याच्या तब्बेतीबद्दल काहीच पक्कं सांगत नव्हते. मी परतलो, पण त्याच्या नजरेनं मला भद्रासारखंच अस्वस्थ केलं होतं. त्याला गाठ होती, त्याचा इलाज नव्हता.

शेरुचा रंग भद्रासारखाच होता. तो तिच्यापेक्षा थोडा उंच होता. मला माहित नाही त्याचं वय काय होतं. तो आमच्या अपार्टमेन्ट कॉम्प्लेक्सचा एक भाग होता. जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटलो तेव्हा तो एकदम धडधाकट होता. माझ्या इतर दोन कुत्र्यांसोबत आमच्याबरोबर चालायचा. तो नेहमीच आपली शेपटी हलवत रहायचा. माझे कुत्रे अनेकदा त्याच्यावर भुंकायचे. पण त्यानं कधीच त्यांना उत्तर दिलं नाही. तो नेहमी आमच्यापासून अंतर ठेवून चालायचा. माझ्या छोट्या कुत्र्यांजवळ येणाऱ्या इतर भटक्या कुत्र्यांवर तो भुंकायचा. त्यांना आमच्या आसपासही येऊ द्यायचा नाही. तो रक्षकासारखा होता. आपल्या उपस्थितीत त्या दोघांना कुणी काही करु नये, अशी जणू त्याची भावना होती. तो कधीच कुणाला चावला नाही पण तरीही अपार्टमेंन्ट कॉम्प्लेक्समधल्यांना तो नकोसा होता. त्यांना तो बाहेर जावासा वाटत होता.

एकदा त्याच्या डोक्यावरुन हात फिरवताना जाणवलं की त्याचे तिथले केस फारच कडक आहेत. मी त्याकडे दुर्लक्ष केलं. काही दिवसांनी जाणवलं की त्याचे केस गळायला लागलेत. मी आमच्या नेहमीच्या डॉक्टरांना ते सांगितलं. ते म्हणाले त्याला कदाचित संसर्ग झाला असेल, त्याला औषधांची गरज आहे. मी औषधं आणली. त्याला दुध आणि इतर गोष्टींमधून ती औषधं दिली. काही दिवसात फरक दिसू लागला. त्याला पुन्हा केस येऊ लागले. तो पुन्हा तंदरुस्त वाटू लागला. एके दिवशी त्याच्या मानेवर एक जखम दिसली. त्यात पू साचला होता. त्याला त्रास होत होता. मी त्याला इतका दु:खी कधीच पाहिलं नव्हतं. मी जखमेचे काही फोटो काढले, डॉक्टरांना दाखवले. त्यांनी मला त्याच्या जखमेवर लावण्यासाठी मलम दिलं. त्याला प्रचंड वेदना होत असताना मला त्यानं जखमेवर हात लावू दिला. डॉक्टरांनी त्याला एसपीसीए प्राण्याच्या हॉस्पीटलमध्ये घेऊन जायचा सल्ला दिला. मी एम्बुलेन्स मागवली. ते त्याला हॉस्पीटलमध्ये घेऊन गेले. त्याला जायचं नव्हतं, तो घाबरला होता.

भद्रा खरोखरच भाग्यवान होती. दुसऱ्या मजल्यावरुन फेकल्यानंतरही ती तेवढी गंभीर जखमी झाली नव्हती. तिचे पाय आणि मानेला दुखापत झालीय. आणि ती तीन-एक आठवड्यात बरी होईल. पण तिला फेकून दिल्याचं लागलीच कुणालाच माहित नव्हतं. एका माणसानं तिच्यावर केलेला अत्याचार आणि त्यामुळं झालेल्या असह्य वेदना घेऊन ती दहा दिवस तडफडत राहिली असेल. अन्न-पाण्याशिवाय. त्या दिवसांमध्ये ती कशी जगली याचा कधी कुणी विचार तरी केला असेल काय? आपण माणसं थोडसं काही झालं तरी डॉक्टरांकडे जातो. कुणीतरी घरचं आपल्या सोबत असतं पण या मुक्या प्राण्यांचं काय?

आणखी एक कुत्रा होता. मी त्याला रोज खायला द्यायचो. तो अचानक आमच्याकडे येणं बंद झाला. मी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही. एक दिवस मी गाडीत बसत होतो तेव्हा मी एका कुत्र्याचं विव्हळणं ऐकलं. तो तोच होता. माझ्या गाडीच्या आसपास फेऱ्या मारत होता. मी गाडीतून बाहेर आलो. त्याला शीटी वाजवली. त्याच्या शेपटीतून रक्त येत गळत होतं. तिथं जखम होती. मी  विचार केला इतक्या महिन्यांनंतर तो माझ्याकडे कश्यासाठी आला असेल? त्याला माझ्याकडून काही वैद्यकिय मदत हवी असेल का? तो दु:खी असताना माझ्याकडे त्याला मदत मिळेल असं त्याला वाटत असावं का? तो बोलून दाखवू शकत नव्हता. मी फक्त कल्पनाच करु शकत होतो.

आणखी एक घटना. एक दिवस मी ऑफिसमधून परत येताना माझ्या घराजवळच एक कुत्री दिसली. तिच्यासोबत एक पिल्लू होतं. मी आसपासच्या कुत्र्यांना खायला घालायचो पण या दोघांना कधी पाहिलं नव्हतं. मी तिच्या जवळ गेलो. ते पिल्लू हलत नव्हतं. मी त्याला तपासलं, नाडी सूरु होती. ते फारच आजारी होतं. मी त्याला दूध दिलं. अनेकदा आपल्या पिल्लाजवळ आलेल्या माणसांवर कुत्रे भुंकतात पण त्याची आई माझ्यावर भुंकली नाही. मी डॉक्टरांना फोन केला पण ते म्हणाले आता फार उशीर झालाय. उद्या या.

दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठलो, बाहेर गेलो तेव्हा ते पिल्लू श्वास घेत नव्हतं. त्याची आई तिथंच होती. मी विचार करत होतो तिनं माझ्या दाराशी ते पिल्लू का आणलं असेल? माझा पत्ता तिला कुणी दिला? ती इतर ठिकाणी का गेली नाही? आमच्याकडे तिला मदत मिळेल असं तिला का वाटलं असेल? ती मला सांगू शकली नाही किंवा मी तिची भाषा समजू शकलो नाही. मी माझ्या कुत्र्यासोबत, म्हणजेच मोगू आणि छोटू सोबत संवाद साधू शकत होतो. ते कधी आनंदी आहेत, त्यांना कधी भूक लागलीय हे मला समजायचं. मोगू तर रात्री त्याला पॉटीला जायचं असेल तर मला उठवायचा. मी रात्री बाहेर जाताना त्याला सांगून जायचो, तू घाबरु नकोस मी लवकर येईन. मग तो इतरांना त्रास द्यायचा नाही, शांत रहायचा. पण भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत हे शक्य नसतं.

एकेदिवशी एक बाई माझ्या घराबाहेर दिसली, ती घाबरलेली होती. ती मला म्हणाली तुमची कुत्री बाहेर फिरतायत, ती मला चावतील. मी हसलो. खुत्री चावतात असं नेहमीच वाटतं राहतं. मी तिसरीत असताना एका कुत्रीनं मला सुध्दा चावलं होतं. पण माझं त्यांच्याबद्दलचं प्रेम कमी झालं नाही. ते वर्षांगणिक वाढत राहिलं. त्यांच्याशिवाय जगण्याचा मी कदाचित विचार करु शकत नाही. मी कुठंही भटक्या कुत्र्यांसोबत खेळतो. मी जेव्हा त्यांना बोलावतो तेव्हा ते शेपटी हलवत येतात. लुधियाना पेट्रोलपंपाजवळ मी एका कुत्र्याला भेटलो, त्याच्याशी हात मिळवला. बिस्कीट दिलं. राणी जी मला तिसरीत असताना चावली ती काही वाईट कुत्री नव्हती. तिला भूक लागली होती. मी तिच्यासमोर ब्रेड धरत होतो आणि नंतर पळत होतो. असं झालं म्हणूनच ती मला चावली. जर कुत्रे चावत असते किंवा लोकांना जखमी करत असते तर शेरुनं मला किंवा माझ्या कुत्रांना इजा पोचवली नसती का? ज्यांना मी खायला दिलं त्यांनी ही तसंच केलं असतं, नाही का? पण तसं झालं नाही. पण ते सर्व माझ्यासोबत आनंदी असायचे. ते माझ्यावर उड्या मारायचे. मला जखमी करायला नाही तर मीं त्यांना आवडत होतो. त्यांना माझ्याबरोबर खेळायचं होतं. मी कधीच माणूस विरुध्द प्राणी असा संघर्ष पाहिला नाही.

आपल्या शेवटच्या दिवसात शेरुला तो जिथं आयुष्यभर राहिला ती जागा सोडायची नव्हती. मला त्याला मदत करायची होती. काय माहित माझं त्याला त्या जागेवरुन हॉस्पीटलमध्ये घेऊन जाण्यानं त्याची जगण्याची इच्छा संपली असेल? त्याला हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर तो दोन आठवडे होता, त्यानंतर एक दिवस तो जमिनीवर पडला आणि पुन्हा उठलाच नाही. जेव्हा डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूबद्दल सांगितलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं. स्वत:ला दोषी ठरवू लागलो. माझ्या दाराशी ते छोटं पिल्लू वारलं तेव्हाही मला तेवढंच दु:ख झालं. मला त्याच्या आईची माफी मागावीशी वाटतेय, जिनं त्याला माझ्या दाराशी आणलं. पण रात्री त्याला हॉस्पीटलमध्ये घेऊन जाऊ शकलो नाही. ज्यांना मी अन्न देऊ शकलो नाही, किंवा मदत करु शकलो नाही त्या सर्वांबद्दल मला वाईट वाटतंय. चांगलं अन्न आणि जगणं त्यांचाही हक्क होता. आपल्या या पुढारलेल्या समाजात आपण खरंच त्यांची दु:खं जाणण्याचा प्रयत्न करतो काय़? ती खूप प्रेमळ असतात. ते तुमच्यावर प्रेम करतात, माणसासारखी कुठलीही अपेक्षा न ठेवता.

कुत्रे चावत नाहीत असं म्हणणाऱ्याला मी अजून भेटलेलो नाही. मला माहितेय ते चावतात. पण जेव्हा त्याला उद्युक्त केलं जातं, घाबरवलं जातं, मारलं जातं तेव्हाचं. ते तहानलेले असताना किंवा भुकेले असताना चावतात. गावाकडे कुत्र्यांना खाणं आणि पाणी दिलं जातं. ती एक धार्मिक प्रथा आहे. तिथं प्राणी आणि माणसात एक नैसर्गिक असं घनिष्ठ नातं आहे. पण शहरांनी त्यांना अनाथ बनवलंय. कुत्र्यांसाठी जागा सोडलेली नाही. त्यांना विचित्र वातावरणात राहावं लागतं. रस्त्यांवर ते कुठल्याही क्षणी वेगानं धावणाऱ्या गाड्यांचे बळी पडतात. आपण माणसांनी त्यांच्यावर आक्रमण केलंय, त्यांच्यावर अत्याचार केलाय. तरीही आपण त्यांना दोष का द्यावा? 

लेखक : आशुतोष, ज्येष्ठ पत्रकार आणि आम आदमी पक्षाचे नेते
अनुवाद : नरेंद्र बंडबे