प्रदूषणविरहित ई-वाहन क्षेत्रात क्रांती करणाऱ्या : ‘हेमलता अन्नामलाई’

प्रदूषणविरहित ई-वाहन क्षेत्रात क्रांती करणाऱ्या :  ‘हेमलता अन्नामलाई’

Friday October 23, 2015,

6 min Read

भारतात प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे. अशा स्थितीत आवश्यकता असताना देखील इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार आपले अपेक्षित स्थान बनवू शकलेला नाही. रस्त्यांवर धावणा-या अशा वाहनांची संख्या जवळजवळ नसल्यासारखीच आहे. या परिस्थितीचे कारण म्हणजे सरकारी अनास्था आणि योग्य स्थितीत उपलब्ध नसलेले तंत्रज्ञान हे आहे. परंतु सरकारने सन २०२० पर्यंत दरवर्षी ७० लाख इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहने रस्त्यांवर आणण्याची आपली महत्त्वाकांक्षा असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे निराशेने भरलेल्या या वातावरणात आशेचा एक किरण मिळाला आहे.

अशा परिस्थितीत उद्योग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी हा उद्योग संघर्ष करतो आहे. अशातही काही निवडक कंपन्या या क्षेत्रात एका सोनेरी भविष्याच्या निर्मितीसाठी दिवस-रात्र परिश्रम करत आहेत. भारतात सध्याच्या घडीला इलेक्ट्रिक उद्योग हे क्षेत्र आपल्या बाल्यावस्थेतून जात आहे. अशा उदयोग क्षेत्रात एका नव्या तंत्रज्ञानाच्या निर्मात्यांच्या रूपात आपले स्थान शोधण्याच्या दिशेने प्रयत्न करणा-या कंपनीचे नाव आहे अॅम्पीयर इलेक्ट्रिक (Ampere Electric). ही कंपनी ई-सायकल, ई-स्कूटर निर्मिती व्यतिरिक्त वजन वाहून नेण्यासाठी 'ई-ट्रॉली' आणि कचरा व्यवस्थापन, तसेच अपंग व्यक्तींसाठी विशेष वाहनांची निर्मिती करून वापरासाठी बाजारात लाँच करत आहे.

हेमलता अन्नामलाई जपानला एका संमेलनात भाग घेण्यासाठी आपल्या पतींसोबत जात असताना प्रवासात त्यांच्या मनात एक कंपनी स्थापन करण्याबाबत विचार आला. आयसीसी गाडयांचे युग हे ही आता गतकाळीची गोष्ट आहे असे विचार त्या संमेलनात एका वक्त्याने मांडले. पुढे या विषयाबाबत सविस्तर बोलत असताना तो वक्ता म्हणाला, की येणा-या काळात इलेक्ट्रिक वाहन हेच भविष्यातील नव्या काळाचे वाहन बनणार आहे.

हेमलता यांनी २००७ या वर्षी 'अॅम्पीयर इलेक्ट्रिक'ची स्थापना केली. या कंपनीची सुरूवातीची गुंतवणूक होती ५० दशलक्ष रूपये. ती रक्कम आता इक्विटी गुंतवणूकीत परावर्तीत झालेली आहे. उत्पादन निर्मितीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ही कंपनी सुरू करणे हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक होते.

हेमलता अन्नामलाई

हेमलता अन्नामलाई


हेमलता म्हणतात, “ आमची टीम हे काम अतिशय आवडीने आणि प्रामाणिकपणे करत असल्यामुळे या कामाचे बारकावे जाणून घेण्यास आम्हाला मुळीच वेळ लागला नाही. दरम्यानच्या काळात आमच्याकडून चुकाही झाल्या, मात्र या चुकांनी आमचा पाया अधिक मजबूत बनवण्याचे काम केले. आणि आत्तापर्यंत आलेल्या अडचणींशी सामना केल्यामुळेच आम्ही प्रगतीच्या या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. या शिवाय प्रतिभावंतांना आमच्या टीममध्ये सहभागी करून घेण्याच्या कामातही आम्हाला पुष्कळ अडचणींचा सामना करावा लागला.”

हेमलता यांनी वयाच्या २७ व्या वर्षी उदयोग क्षेत्रात आपले पहिले पाऊल ठेवले होते. प्रारंभिक काळात सुरू केलेल्या व्यावसायिक सेवा, तंत्रज्ञान प्रशिक्षण, टूर आणि तिकिट बुकिंग व्यतिरिक्त कंपनीने प्रतिभेच्या शोधासाठी एका आंतरराष्ट्रीय सल्ला सेवा केंद्राशी जोडलेल्या उद्योगाचा पाया रचला. एक साखळी उद्योजिकेच्या रुपात हेमलता यांनी विविध प्रकारच्या उदयोगांना उभारणे आणि ते चालवण्यात आपल्या जीवनाची १५ वर्षे खर्ची घातलेली आहेत. उदयोग क्षेत्राला प्रत्येक दिवस आपल्या सोबत नवी आव्हाने आणि यश घेऊनच उगवत असतो, मात्र त्या दिवसांमधून मिळालेल अनुभव हा अमूल्य असाच असतो असे हेमलता यांचे म्हणणे आहे.

प्रसिद्ध उदयोगपती रतन टाटा यांनी बंगळुरूमधील या इलेक्ट्रिक वाहन उत्पादक स्टार्टअप कंपनीत एक गुप्त स्वरुपात (आकडा जाहीर न केलेली) गुंतवणूक केली आहे. हेमलता म्हणतात, “ आम्ही आत्तापर्यंत ई-सायकल आणि ई-स्कूटरसाठी उपयुक्त असलेले ३६ व्होल्ट आणि ४८ व्होल्ट चार्जर्सची यशस्वीपणे निर्मिती करत आहोत. अशा प्रकारे आम्ही रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करत आहोत. या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकल वाहनांच्या क्षेत्रात सक्रीय असलेल्या भारतीय उदयोजकांमध्ये अम्पीयर ला एक विश्वसनीय पर्यायाच्या रुपात स्थापित करणार आहोत.”

बी२सीच्या क्षेत्रात इलेक्ट्रिक सायकल आणि इलेक्ट्रिक स्कूटर ही अॅम्पीयरची प्राथमिक उत्पादने आहेत. या व्यतिरिक्त ही स्टार्टअप कंपनी बी२बीच्या जगात कुरिअर बॉईज आणि घरापर्यंत सामान पोहोचवणारासाठी ई-स्कूटरची निर्मिती करत आहे.

ई-सायकलच्या रपेटला तयार

ई-सायकलच्या रपेटला तयार


सुरूवातीपासूनच संशोधन आणि विकास हा अम्पीयरचा कणा राहिलेला आहे. अॅम्पीयर ही स्टार्टअप कंपनी भारतात ई-वाहनांसाठी स्वत:च्या ३६ व्होल्ट आणि ४८ व्होल्टच्या चार्जर्सची निर्मिती करणारी पहिली कंपनी आहे.

हेमलता सांगतात, “ चार्जर ही भारतासाठी नेहमीच सर्वात मोठी समस्या राहिलेली आहे. कारण परदेशातून आयात होणारे चार्जर्स हे भारतीय रस्त्यांची स्थिती आणि अनियमीत वीज पुरवठ्याचा सामना करण्यासाठी अजिबात सक्षम नसतात.”

अम्पीयर इलेक्ट्रिक कंपनीची सर्व वाहने ही कंपनीच्या आर अँड डी टीमने तयार केलेल्या मोटर्स आणि नियंत्रकांद्वारे चालतात. या व्यतिरिक्त बॅटरीचे आयुर्मान वाढवण्यासाठी कंपनीने एक उपयुक्त चीप बनवली आहे.

हेमलता पुढे सांगतात, “ आम्ही आमचा बुहुतेक कच्चा माल हा भारतात पसरलेल्या स्थानिक बाजारांमधून खरेदी करतो. परंतु बॅटरी बनवण्यासाठी आवश्यक असलेले शिसे आणि चुंबकांसारख्या वस्तू भारतात मिळत नाहीत. यामुळे या वस्तू चीनमधून आयात कराव्या लागतात. आम्ही आयातीच्या या परावलंबित्वाला इतर कोणते पर्याय आहेत का याची तपासणी करत आहोत. सध्या दरवर्षी सुमारे ३० हजार वाहनांची निर्मिती करण्याची आमची क्षमता आहे.”

स्थानिक बाजाराच्या स्थितीनुसार देशातच उत्पादने कशी तयार होतील यावर सरकार पूर्णपणे जोर देत आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात व्यापाराच्या संधी कितीतरी पटीने वाढतात.

ई-स्कूटरचा  नवा जमाना  येत आहे

ई-स्कूटरचा नवा जमाना येत आहे


हेमलता सांगतात, “ एक प्रकारे आमच्या छोट्याशा प्रयत्नांद्वारे पूर्णपणे देशातच तयार झालेल्या वाहनांची निर्मिती करून या उद्योगाची भविष्यातील दिशा निश्चित करण्यात आम्ही आपले योगदान दिले आहे.” इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याबाबत लोकांना प्रेरित आणि प्रोत्साहित करण्याच्या कामी सरकारने देखील यापूर्वी अधिक रस दाखवलेला आहे. आता लोकांनीही पुढे येऊन या वाहनांचा वापर करण्याबाबत जागरूक होण्याची गरज आहे.

ही कंपनी तामिळनाडू आणि केरळमध्ये अपंगांसाठी इलेक्ट्रिक वाहने तयार करणारी पहिली कंपनी आहे असा या कंपनीचा दावा आहे. याशिवाय अॅम्पीयरने हातमाग आणि कापड गिरण्यांमध्ये काम करणा-या कामगारांसाठी ‘त्रिशूल’ या नावाचे विशेष वाहन देखील तयार केले आहे. ज्या २० ते ४० वयोगटातील महिला कामगारांना दररोज आपले काम करण्यासाठी कारखान्यामध्ये १२ ते १५ किलोमीटर पायी चालावे लागत होते अशा कामगारांचा मुख्यत: यात समावेश आहे.

हेमलता सांगतात, “ स्थापनेपासूनच एंपायरने महिला सशक्तीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आमच्या कारखान्यात ३० टक्के महिला कर्मचारी आहेत आणि लवकरच ही संख्या आम्ही दुप्पट करण्यात यशस्वी होऊ.”

बाजाराची स्थिती काय आहे आणि अधिकाधिक लोक ई-वाहनांच्या वापराबाबत कसे जागृत होतील या गोष्टी मुख्यत्वे लक्षात घेऊनच या वाहनांच्या किंमती ठरवण्यात आल्या आहेत. कंपनीच्या ई-सायकलची किंमत २० ते ३० हजार रूपयांदरम्यान आहे तर ई-स्कूटरची किंमत २० हजार ते ४५ हजार रूपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे.


हेमलता सांगतात, “ आपले लक्ष गाठण्याच्या सरकारच्या कामात आम्ही महत्त्वपूर्ण भूमिका बजाऊ अशी आम्हाला आशा आहे. ७० लाख वाहनांपैकी १५ ते २० टक्के वाहनांची निर्मिती करून त्यांचे वितरण करण्याचा आमचा मानस आहे. जवळच्या अंतरांसाठी लोकांनी ई-बाईकचा वापर करावा यासाठी आम्ही लोकांना प्रोत्साहित करतो. याबरोबर सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमात आपले योगदान देत पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दिशेने सुद्धा काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

सध्या अॅम्पीयर इलेक्ट्रिक दर महिन्याला सुमारे २०० वाहनांची विक्री करत आहे. सरकारने कंपनीला अंतरिम अनुदान दिल्यानंतर २०१० ते २०१२ या दोन वर्षांच्या कालखंडात हा आकडा वाढून ६८७ इतका झाला होता.

येत्या ३ वर्षांमध्ये कंपनीला आपला विस्तार देशातील अन्य दहा राज्यांमध्ये करायचा आहे. या व्यतिरिक्त ही कंपनी यावर्षीच्या अखेरीपर्यंत दोन नवीन मॉडेल सुद्धा बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. याबरोबर ही कंपनी येत्या तीन वर्षांमध्ये आपल्या कारखान्याचे संचलन पूर्णपणे केवळ महिलांच्या हातात असेल अशा कारखान्याची निर्मिती करणार आहे.

शेवटी हेमलता सांगतात, “ आपल्या सरकारने ‘मेक इन इंडिया’ बाबत केवळ बोलण्याऐवजी लघु उदयोग निर्माण क्षेत्रात काम करणा-या निवडक कंपन्या शोधून त्या कशा चांगल्या प्रकारे चालवू शकतो हे दाखवून दिले पाहिजे. अर्थात हे वाटते तितके सोपे काम नाही, परंतु म्हणतात ना ‘इच्छा तिथे मार्ग’.”