गरजवंतांना ‘जग’ दाखवणारी १७ वर्षांची करूणामयी आरूषी.

‘केल्याने होत आहे रे आधि केलेचि पाहिजे’ हे संतवचन प्रत्यक्ष जगण्याची कमाल दाखवली आहे अवघ्या १७ वर्षांच्या आरूषीनं. डोळ्यांना अंधूक दिसतय, मात्र पैसे नसल्यामुळं चष्मा विकत घेता येत नाही ही समस्या सोडवण्याचं व्रत आरूषीनं घेतलं आणि ते पूर्णही करून दाखवलं. अशक्य वाटणारी गोष्ट आरूषीनं करूणेच्या मार्गानं कशी करून दाखवली याबाबतची ही कथा.

0

दृष्टी म्हणजे काय, तर पाहण्याची क्षमता आणि अवस्था अशी आपण दृष्टीची व्याख्या करू शकतो. परंतु या शब्दाचा मूळ अर्थ केवळ इतकाच नाही. दुस-यांना मदत करण्याचा अर्थ फक्त गरजूंना खाणं-पिणं देणं किंवा कपडे देणं किंवा मग त्यांच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था करणं इतकाच असू शकत नाही. जर तुमच्यामध्ये दुस-यांना मदत करण्याची दूरदृष्टी असेल तर तुम्ही मार्गात आलेल्या सर्व अडचणींना पार करून समाजासाठी काहीतरी आणखी वेगळं करू शकता. १७ वर्षांची आरूषी गुप्तानं हेच दाखवून दिलय आणि याचेच ती एक जिवंत उदाहरण बनली आहे.

सन्मान स्वीकारताना आरूषी गुप्ता
सन्मान स्वीकारताना आरूषी गुप्ता

आरूषी दिल्लीच्या बाराखंबा रोडवर असलेल्या मॉडर्न स्कूलमध्ये इंटरचा अभ्यास करतेय. २००९ मध्ये आरूषीनं डोळ्यांच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांना मदत करण्याचं ठरवलं आणि व्यक्तिगत पातळीवर “ स्पेक्टॅक्युलर अभियाना”ची सुरूवात केली. जे चष्मे जुने झाले म्हणून लोक ते वापरण्याचं बंद करतात आणि मग फेकून देतात असे चष्मे गोळा कऱण्याचं काम आरूषीनं आपल्या या अभियानाच्या माध्यमातून सुरू केलं. आरूषी असे चष्मे गोळा करते आणि ते हेल्प एज इंडिया, जनसेवा फाऊंडेशन आणि गूंज अशा स्वयंसेवी संस्थांकडे पाठवते. या संस्था असे चष्मे गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात.

आरूषी जेव्हा दहा वर्षांची होती त्यावेळी तिच्या मनात अशा कार्याचा विचार पहिल्यांदा आला. आपला जुना चष्मा फेकून देण्यापेक्षा जर तो कुण्या गरीबाला दिला तर त्या चष्म्याचा त्याला नक्कीच उपयोग होऊ शकेल असं तिला त्यावेळी जाणवलं. थोडी मोठी झाल्यानंतर तिनं याबाबत गंभीरपणे विचार करायला सुरू केलं. परंतु हा मुद्दा आपण विचार करतोय तितका सोपा नाही असं तिच्या लक्षात आलं. सुरूवातीला तिचं लहान वय तिच्या या समाजसेवेच्या विचाराच्या आडवं आलं, परंतु आपल्या विचारावर ठाम असलेल्या आरूषीनं हार पत्करली नाही आणि दुस-यांना मदत करण्याचं तिचं स्वप्न जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसं साकार होत गेलं.

आपल्या देशात आत्ताच्या घडीला ज्यांना दृष्टीदोषामुळं चष्म्याची आवश्यकता आहे, पण हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळं चष्मा खरेदी करू शकत नाहीत अशा गरजू लोकांची संख्या जवळजवळ १५ कोटी इतकी प्रचंड आहे. ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असं मानून आरूषी आपले शेजारी, चष्म्याची दुकानं, वेगवेगळ्या संस्था आणि ओळखीच्या लोकांकडून जुने चष्मे गोळा करते आणि ते वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांपर्यंत पोहोचवते. या व्यतिरिक्त आरूषी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या मदतीनं नेत्र तपासणीची मोफत शिबीरं आयोजित करते. इथवर न थांबता ती मोतीबिदूंच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी सुद्धा शिबिरांचं आयोजन करते.

आत्तापर्यंच्या तिच्या प्रवासात तिच्या आईवडिलांनीही तिला पाठिंबा देऊ केलाय आणि व्यक्तिगत पातळीवर जी जी शक्य आहे ती ती मदत देखील केली आहे. तिच्या शाळेनं सुद्धा तिला शक्य ते सर्व प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. आरूषीला सगळीकडून अशी मदत मिळत गेली असली, तरी तिच्या समाजसेवेचा हा प्रवास अजिबात सोपा नाही. इतरांना आपला हा विचार समजावून सांगणं हे तिच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं. आरूषी याबाबत बोलताना सांगते की या कामासाठी जेव्हा लोकांकडून तिला काहीही प्रतिसाद मिळत नसायचा तेव्हा ती खूपच निराश व्हायची.

जुने चष्मे गोळा करता यावेत म्हणून आरूषी सार्वजनिक ठिकाणांवर ड्रॉपबॉक्स ठेवण्याची व्यवस्था करते. दानाची इच्छा असलेल्या लोकांनी यायचं आणि आपले जुने चष्मे या ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचे यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. आपलं हे अभियान अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावं या उद्देशानं आरूषी दरोरोज खूप लोकांच्या भेटी घेते आणि आपल्या या कार्याच्या संदर्भात जितकं समजावता येईल तितकं समजावण्याचा प्रयत्न करते. याव्यतिरिक्त ती इतर अनेक मार्गांनी प्रयत्न करून अधिकाधिक लोकांना आपले जुने चष्मे दान देण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न देखील करते.

आरूषीनं जे जे प्रयत्न केले ते व्यर्थ न जाता त्याचे सकारात्मक परिणाम तिला मिळाले. तिच्या प्रयत्नांमुळं १५०० हून अधिक लोकांनी या अभियानाचा लाभ घेतलेला आहे आणि हे तिच्या यशाचंच उदाहरण नाही का? आरूषी म्हणते, “ दान करण्याची काही किंमत मिळत नाही, परंतु त्या द्वारे तुम्ही किती तरी लोकांचे धन्यवाद मिळवू शकता”

या कामाची दखल घेत आरूषीची ‘पॅरामेरिका स्प्रिट ऑफ कम्यूनिटी’ पुरस्कारासाठी फायनलिस्ट म्हणून निवड करण्यात आली. शेवटी याद्वारे तिच्या प्रयत्नांना समाज मान्यता आणि सन्मान मिळाला. या अभियानाला लोकांनी दिलेली शाबासकीची थाप आणि मिळणारी वाहवा पाहून मला माझ्या कार्यात अधिक जोमानं काम करण्याची प्रेरणा मिळते अशा शब्दात आरूषी आपल्या भावना व्यक्त करते.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe