आभाळाच्या कुशीत, रानातल्या तंबूत ‘लेट्स कॅम्प आऊट’सोबत लुटूयात, सुरक्षित कॅम्पसाईटची मजा…

0


“मोकळ्या रानात पहडून आकाशाला पाहण्याची मजा काही औरच असते आणि आपल्या तंबूतून थेट सूर्यास्त दिसला तर त्या पेक्षा सरस आणखी काहीच नसतं”. लेटस् कॅम्प आऊट (LetsCampOut)चे संस्थापक अभिजीत म्हात्रे यांनी निसर्गाच्या कुशीत शिरण्याकरता  कॅम्प आऊट ची सुरूवात केली. निसर्गाचा निखळ आनंद सर्वांना घेता यावा पण निसर्गाला कोणतीही हानी न पोहचवता, याच प्रेरणेने त्यांनी या व्यवसायात पाऊल टाकलं.

राज्यामध्ये काही निवडक जागांवर लेटस् कॅम्पआऊट चा आनंद लुटता येतो. अभिजीत सांगतात, “आमच्याकडे लोणावळा, राजमाची, फणसराई, तुंगराळी आणि शिरोटा याठिकाणी 12 कँपसाईटस् आहेत. पाचगणी, काशिद, कास, माथेरान या गजबजलेल्या ठिकाणांपेक्षा खूप निवांतपणा आणि मोकळीक आमच्या कॅम्पसाईटसवर मिळते”.

चार वर्षांपूर्वी देशात निकृष्ट दर्जाच्या कँपिंग उपकरणं आणि स्थळांमुळे कँपिंगला जाताना अभिजीतचा भ्रमनिरास होत होता. त्यामुळे आपणच याबाबतीत काहीतरी करावं असं अभिजीतला वाटू लागलं. अभिजीत एका आंतरराष्ट्रीय बँकेत कामाला होते. एका प्रकल्पाकरता त्यांची चैन्नईला बदली झाली. दुसऱ्या ठिकाणी जावं लागल्याने कंपनीकडून त्यांना तीन वर्ष अतिरिक्त भत्ता मिळत होता. ही वाढीव रक्कम ते बाजूला ठेवू लागले. आपला विचार पक्का झाल्यावर त्यांनी मग याच रकमेचा भांडवल म्हणून वापर करत ‘लेटस् कॅम्प  आऊट’ सुरू केलं.

लवकरच अभिजीतचा मित्र अमित जामबोटकर त्यांना सामील झाले. अमितनाही साहसी जीवनाची आवड आहे. दोघांची आवड समान असल्याने त्यांचं मेतकूट चांगलं जमून आलं. अमितने हॉस्पीटॅलिटी क्षेत्रातल्या मोठ्या पदाच्या नोकरीला रामराम ठोकला आणि लेटस् कॅम्प आऊट मध्ये सामील झाले.

अभिजीत आपल्या कँपस् आणि साईटबाबत अधिक माहिती सांगतात, “कँपिंगमध्ये अधिक सुसूत्रता आणि साधेपणा आणणं हा आमचा उद्देश होता. 2010 मध्ये आम्ही एका कँप ग्राउंडवर पाच कँप्सनी सुरूवात केली. लोकांना कँप्सबद्दल त्यावेळी एवढं काही माहीत नव्हतं. त्यामुळे आम्हांला बॅटींगला खूप छान पीच मिळालं. आमची सुरूवातच दणक्यात झाली. लोकांनी ही कल्पना खूप उचलून धरली”.

पहिली बॅच साहसी लोकांचीच होती. हळूहळू माउथपब्लिसिटीनं खूप लोकांना त्यांच्या कँपसाईटकडे खेचून आणलं. अभिजीत सांगतात, “गेल्या दोन वर्षात कुटुंब, महिलांचे गट, मित्र-मैत्रिणींचे गट, जोडपी अशा वेगवेगळ्या गटांनी आमच्या कँपसाईट्सचा आनंद घेतला. हल्ली लोकांकडे वेळ खूप कमी असतो. पटकन बाहेर जाऊन येता येईल आणि त्यात साहसीपणाही हवा असतो. तणावातून बाहेर पडायला अशाच गोष्टींच्या शोधात ते असतात. कॉर्पोरेटस् मध्ये आकाशाला गवसणी घालण्याचे सर्व साहसी प्रकार खूप लोकप्रिय आहेत. आम्ही पाळीव प्राण्यांचीही विशेष काळजी घेतो. त्यामुळे लोकांना त्यांच्या कुटुंबातल्या विशेष सदस्याला घेऊन आमच्या कँम्पसाईटमध्ये येता येतं. पाळीव प्राण्यांसाठी आम्ही पेटस् कँप आऊट आणि आऊट अँड लाऊड असे दोन विशेष कार्यक्रम आखले आहेत. संगिताचाही यात अनोखा वापर आम्ही करतो”.

लेटस् कँप आऊटच्या ग्राहकांची संख्या खूप मोठी आहे. खूप लोकांच्या पसंतीस ते उतरले आहेत. वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं, सेवा, रॉक क्लायबिंग, जंगलातला नाईट ट्रेक, ग्रहताऱ्यांचा वेध आणि बार्बेक्यूची सुविधा अशा बऱ्याचशा आकर्षक बाबी ते पुरवतात. निसर्ग संवर्धन आणि गावकऱ्यांशी सौहार्दाचे संबंध या गोष्टींना त्यांच्या कँपसाईटसमध्ये खूप महत्त्व आहे. अभिजीत सांगतात, “आमच्या सर्व कँपसाईटस् आमच्या मालकीच्या आहेत. आमची काही धोरणं आहेत. इकोटुरिझमला चालना देण्याकरता आम्ही स्थानिक लोकांकडून जेवण घेतो. कँप्सच्या जागी सौरऊर्जेचा वापर करण्यात येतो. कँपच्या जागी कोणतंही बांधकाम करण्यात आलेलं नाही. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता स्थानिकपातळीवर ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यांचा वापर कँपसाईटवर करण्यात येतो”.

अभिजीत आपल्या कँपसाईट्स बाबत भरभरून बोलतात, “पाच वर्षांनंतर आम्ही अभिमानाने सांगू शकतो की, कँपसाईटच्या विश्वात आम्ही उत्कृष्ट उपकरणांचा वापर करून लोकांना साहसी आणि अद्भूत आनंद देण्यात यशस्वी ठरलोय. स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्या गावाची आर्थिक घडी बसवायला हातभार लावत आहोत. आतापर्यंत मुंबई आणि पुण्यातल्या लोकांवर आमचा अधिक भर होता. पण आता आम्ही आमचा आवाका उत्तर आणि दक्षिणेला वाढवत आहोत. सुलाफेस्ट, एनएच7, इंडिया बाईक विक, द लॉस्ट पार्टी या सारख्या काही साहसी खेळ आणि कँपसाईट्सचा व्यवसाय असणाऱ्या कंपन्यांसोबत आम्ही भागीदारी करणार आहोत. वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी करून आमच्या ग्राहकांना सतत काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत आहोत”.

लेटस् कँप आऊट हळूहळू प्रगती करत मोठी झेप घेतली आहे. धडपडत, शिकत शिकत आता आपल्या नाड्या त्यांनी चांगल्याच बळकट केल्या आहेत. मुंबई, पुणे आणि बेंगळुरूमध्ये त्यांची 20 जणांची टीम काम करत आहे. या सगळ्यांना साहसाची आवड आहे. आपापल्या अनुभवांमधून कंपनीचा फायदा कसा करायचा आणि लोकांना अधिकाधिक आनंद कसा द्यायचा हे कसब त्यांना चांगलचं अवगत झालंय.

पण इथे सगळंच काही गुडी गुडी आहे असं नाही. इतर क्षेत्रांप्रमाणे त्यांनाही काही आव्हानांना तोंड द्याव लागत आहे. अभिजीत सांगतात, “कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे इथं नेहमीच कोणीनाकोणी नवीन मंडळी आपला तंबू ठोकत असतात. या क्षेत्राची माहिती, अनुभव काहीही हाती नसताना हे लोक उण्यापुऱ्या ज्ञानावर, कमी किंमतीत लोकांना कँपसाईटच्या मोहात पाडतात. पण सुरक्षेशी केलेली तडजोड लोकांच्या जीवावर बेतते. गेल्या वर्षी अशाच एका अननुभवी कँपसाईटच्या जाहिरातीला भूलून काही मुलं साहसी सफारीवर आले होते. मुलांचा त्यांच्या पालकांशी संपर्क होत नव्हता. 150 मुलांसोबत केवळ दोनच प्रशिक्षक होते. प्रचंड पाऊस येत होतो. या मुलांच्या घाबरलेल्या पालकांना आमच्या त्या भागातल्या कँपसाईटची नेटवरून माहिती मिळाली. आणि त्यांनी आम्हाला मदत करण्याची विनंती केली. आम्ही लगेचच स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने या मुलांना शोधायला सुरूवात केली. ही मुलं आम्हांला एका ओढ्याजवळ सापडली. प्रचंड पाण्यामुळे ही मुलं तिथे अडकली होती. आम्ही त्यांची सुटका करून लोणावळ्याला सुरक्षित जागी त्यांना पोहचवलं”.

लेटस् कँप आऊटची आपल्या कामातली तत्परता आणि प्रामाणिकपणाचं त्यांच्या यशाची गुरूकिल्ली आहे. निसर्गाशी मैत्री आणि सुरक्षिततेशी कोणतीच तडजोड करत नसल्यामुळे कोणत्याही अधिक प्रसंगांना त्यांना तोंड द्याव लागत नाही. कँपला गेल्यावर फक्त आपलं मनोरंजनच होत असं नाही. आपल्याला निसर्ग अनुभवयाला मिळतो. निसर्ग संवर्धन, सुरक्षिततेच्या प्रत्येक पातळीची कसून चाचणी, कचरा व्यवस्थापन, सौरऊर्जेचा वापर, स्थानिकांना रोजगार यासर्व गोष्टींचा समावेश केल्यास कँपिंगचा आनंद नक्कीच द्विगुणीत होतो.

या सारख्याच आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कथा :

२१व्या शतकातील 'ढेपेवाडा' एक जिंदादिल वास्तू 

मैदानी खेळांना नवसंजीवनी देणारा क्रीडा क्षेत्रातील एक स्तुत्य उपक्रम ‘गेट अ गेम’

ट्रीप प्लॅन करताय? मग तर ‘इन्स्पायरॉक’शिवाय पर्यायच नाही !


लेखिका – फ्रन्सिस्का फेरारिओ

अनुवाद – साधना तिप्पनाकजे