पूजेच्या साहित्यासाठी बाजार कशाला ऑनलाइन सुविधा असताना ? सिया उमेशची अफलातून कल्पना, व्यवसायामुळे मिळाली अनेक गरीब मुलींना संधी

पूजेच्या साहित्यासाठी बाजार कशाला ऑनलाइन सुविधा असताना ?  सिया उमेशची अफलातून कल्पना, व्यवसायामुळे मिळाली अनेक गरीब मुलींना संधी

Saturday January 02, 2016,

4 min Read

रोज जिथे घरच्या जेवणाची भ्रांत असेल, तिथल्या मुली मोठमोठाली स्वप्न पाहू शकतात का ? तर सिया उमेशच्या बाबतीत याच उत्तर होय असंच आहे. अत्यंत गरीब घरातली ही मुलगी, पण आपल्या ध्येय प्राप्तीसाठी तिनं नेहमीच नशिबाला थेट टक्कर दिली. आज तिचा स्वत:चा व्यवसाय आहे, ज्यामध्ये ती पूजेचं सर्व साहित्य ऑनलाइन विकते.

सियाची कहाणी अत्यंत प्रेरणादायक आहे. लहान असताना सियानं आपल्या बहिणींना शिक्षणासाठी पैसे नसल्यानं शाळा सोडलेलं पाहिलं. तरीही ३ मुलींमधल्या या धाकटीला तिच्या आईनं शिक्षण पूर्ण करायची ताकद दिली. शाळेत गेल्याने तिचा उत्कर्ष झाला आणि या एका कारणासाठी सिया आपल्या आईला सतत धन्यवाद देते. " मी आज जिथे उभी आहे, मला असं वाटतं की, शिक्षण हे कोणत्याही पालकानं आपल्या मुलांना दिलेली सर्वात मौल्यवान भेटवस्तू आहे." सिया आपली कहाणी सांगत होती.

image


शालेय शिक्षण संपताच , सियानं आपल्या महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च पेलण्यासाठी नोकरी सुरु केली. बचतीचा मार्ग अवलंबिला. पदवी मिळाल्यावर सियाला बेंगळूरू मधल्या एका बायो-टेक्नोलॉजी कंपनीत नोकरी लागली. इथे आल्यावर प्रत्येक आठवड्याच्या शेवटी ती तिच्या पालकांना मेंगलोरला भेटायला जायची. २०१० मध्ये सियाचे वडील आजारी पडले आणि तिला घरी परतावं लागलं, पण हे तिच्यासाठी फायद्याचं ठरलं.

ती हळूहळू आपल्या आठवणी सांगत होती, " त्यावेळी तिथे परतणं म्हणजे धोका होता, कारण पुरेशी बचत माझ्याकडे नव्हती आणि बायो-टेक अभियांत्रिकी पदवीसाठी मेंगलोर शहरात नोकरी मिळणं तसं कठीणच होतं. काही महिने बेरोजगार म्हणून घालवले आणि माझ्याकडची बचतही संपली. अखेर एक व्यवसाय करायचं ठरवलं आणि यावेळी पुन्हा एक अक्षरश: महत्त्वाचा कोपरा माझ्या ध्यानी आला."

सियानं आपला नवा व्यवसाय सुरु केला फक्त ५०० रुपये गुंतवून ! ही कल्पना अगदी भन्नाट होती. पूजेचं साहित्य ऑनलाईन विकणं. ही नवीन संकल्पना हळूहळू चांगली काम करु लागली. अशा पद्धतीची बाजारपेठ लोकानाही अगदी नवीन होती आणि हा व्यवसाय वाढणार हे तिच्या ध्यानात आलं. याची मागणी वाढणार, खास करून परदेशस्थ भारतीयांकडून ! कर्मश्या या तिच्या दुकानात, उच्च प्रतीचे पूजेचं साहित्य, अधिप्रमाणित रुद्राक्ष आणि मौल्यवान रत्ने देखील. तिच्याकडे रांगोळीचे छापेही आहेत, त्याचबरोबर विविध पूजा यंत्र आणि आध्यात्मिक दागिनेसुद्धा .

ती स्वत:चा हा व्यवसाय सांभाळत होती . एकनिष्ठ सैनिकासारखी, उत्पादन घेण्यापासून पॅकिंग करून ती पाठवण्यापर्यंत. तर या व्यवसायात मिळालेला पैसा तिने पुन्हा व्यवसायात गुंतवला. आपला पहिला कर्मचारी नेमण्यापूर्वी सहा महिने तिने स्वत:च खिंड लढवली . " मी उत्पादनांची यादी करता करता झोपून जायची. उठल्यावर पुन्हा विक्रीचा अंदाज घ्यायचे. शेवटी सहा महिन्यानंतर, कर्मश्यामध्ये एका नव्या कर्मचाऱ्याची नेमणूक झाली, नव्या तिचं नाव. ती आमच्या परिवाराचा सर्वात महत्त्वाचा घटक, जिच्या जीवावर आजही कर्मश्या अविरत सुरु आहे."

" नव्याची तेव्हा दहावी झाली होती आणि ती एका विडी उद्योगात काम करत होती. या १८ वर्षाच्या मुलीत मी काय पाहिलं तर ते म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असतानाही आणि कोणतंही ध्येय नसतानाही प्रचंड उर्जा आणि क्षमता तिच्यात आहे. ती सकाळी तिच्या पॅकिंगच्या नोकरीवर जायची आणि संध्याकाळी मी तिला एक तासभर संगणक शिकवायचे. हळूहळू नव्यानं संगणकातल्या अनेक गोष्टी आत्मसात केल्या. त्या म्हणजे फोटो एडिटिंग, फोटोग्राफी, यादीचं व्यवस्थापन करणे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने आमच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला म्हणजेच विलासीनीला स्वत: शिकलेलं शिकवू लागली ."

image


"भारतासारख्या देशात आर्थिक चणचणीमुळे आणि सकारात्मक उद्दिष्ट्य डोळ्यासमोर नसल्यानं लोक शिक्षण सोडून देतात, तिथे त्यांच्या विद्यापीठाच्या पदवीवर ते किती शिकू शकतील किंवा त्यांना काय येतं याचं मुल्यांकन केलं जाऊ नये." सियानं एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि याचमुळे कर्मश्यानं शिक्षण देण्याच, प्रशिक्षण देण्याची आणि नवनवीन कला तंत्र नव्या कर्मचाऱ्यांना अवगत करवून देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. आणि हे शिक्षण त्यांच्या जुन्या अनुभवी कर्मचाऱ्यांतर्फे दिलं जातं हे महत्त्वाचं. आज त्यांचा १० कर्मचाऱ्यांचा चमू आहे आणि या सर्वजणी अगदी हलाखीच्या परिस्थितीतून वाढलेल्या आहेत . कर्मश्या त्यांना शिकवून, त्यांचा विकास करवून त्यांना सक्षम बनवण्यासाठी कटीबद्ध आहे. त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरून त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहू नयेत अशी अपेक्षा कर्मश्याची आहे . त्यांना इंग्रजी शिकवलं जातं, जी गावाकडच्या मुलींसाठी आजही एक मोठी पायरी पार करण्यासारखं आहे.

सियाच्याही आयुष्यात उतार चढाव आले. ती भाड्याच्या घरात राहून तिचा व्यवसाय करत होती, तिथे शेजारी-पाजारी किंवा मग घरमालक यांच्या त्रासामुळे ( ज्यांना ती हे जे काही करत होती ते आवडत नसे) तिला सतत घर बदलावं लागत असे. यामुळे तिला असं वाटत की छोट्या उद्योगानाही आयटी कंपन्यासारखा दर्जा मिळावा ज्यामुळे त्यांना अनेक सुविधा लाभतात.

इतक्या कमी वयात अशा खडतर प्रवासामुळे, सियानं ईबेशी मिन्स बिझनेस स्पर्धेच्या सहा विजेत्यांमध्ये स्थान मिळवलं, यात आश्चर्य नाही .

सियाची आई ती सोळा वर्षांची असताना वारली. आजही तिच्यासाठी तिची आई एक प्रेरणा आणि गुरु म्हणून अस्तिवात आहे . सिया आपल्या व्यवसायातल्या यशाचं श्रेय ईबे या वेब पोर्टलला ही देते, ज्यामुळे तिला तिची उत्पादन ऑनलाइन विकता आली. आज ती १५०० चौरस फुटाच्या जागेत काम करते आणि तिची स्वत:ची वेबसाईट आहे आणि अर्थात तिच्या मदतीला आहेत सक्षम स्त्रिया, ज्यांना तिनं सक्षम होणं म्हणजे काय हे शिकवलं जसं तिच्या आईने तिला शिकवलं, अगदी तसंच !

लेखिका: पुर्णिमा मकाराम

अनुवाद : प्रेरणा भराडे