'दास्तानगोई'तून 'सून भई साधो ': अंकित चढ्ढा …’

0

कथाकथनाला एक प्राचीन परंपरा आहे. जातक कथा असोत अगर पंचतंत्रातील गोष्टी, लोककथा असोत अगर दक्षिण भारतातील बुर्रा कथा वा मग विल्लू पातू… किंवा थेट ती इंटरनेट अन् डिजिटल मिडियाच्या जमान्यातील आपली ‘युवर स्टोरी’च का असेना!

थोडक्यात गोष्ट ऐकवणे ही एक पारंपरिक कला आहे. उदाहरणार्थ ‘दास्तानगोई’… कथाकथनाची ही शैली अरबस्तानात जन्माला आली. सोळाव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंतचा काळ ‘दास्तानगोई’साठी भारतातला सुवर्णकाळ होता. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील नबाबांच्या प्रांतांतून या कलेचे विशेष प्रचलन होते. सामान्य लोकही दिवसभरातल्या काबाडकष्टानंतर विरंगुळा म्हणून ‘दास्तानगोई ’च्या (गोष्ट ऐकवणारा) मैफलीत सहभागी होत असत.

‘दास्तानगो’ काय करायचा तर गोष्ट जितकी लांबवता येईल तितकी लांबवायचा. आता जसे बिअरबार सर्रास असतात तसे तेव्हा दारूचे गुत्ते असतच आणि त्यांना शराबखाना म्हटले जाई. असेच अफिमचे अड्डेही तेव्हा असत. त्यांना अफिमखाना म्हटले जायचे. अफिमखान्यांतूनही ‘दास्तानगो’ची... म्हणजेच गोष्टीवेल्हाळांची मैफल रंगत असे. तिथे दास्तानगोला जरा जास्तच दादही मिळे. कथाकथनाला रंग चढत जाई तसा अफिमचा कैफही चढत जाई. मज्जा येई.

‘दास्तान-ए-अमीर हम्ज़ा’ (अमीर हम्जाची गोष्ट) या काळात फार प्रचलित होती. गोष्टीतील नायक अर्थातच अमीर हम्ज़ा. अमीर हम्जा हे इस्लामचे प्रेषित हज़रत मुहम्मद पैगंबर यांचे काका होते. ते पराक्रमी होते. अमीर हम्जा यांच्या याच पराक्रमांच्या कथा हे ‘दास्तानगो’ ऐकवत असत. वीररसाचा पुरेपूर वापर करत अत्यंत जोशात ऐकवल्या जाणाऱ्या या कथांतून लोक आनंद लुटत.

अमीर हम्ज़ा यांचा उल्लेख सम्राट अकबर यांच्या ‘हम्ज़ा-नामा’तूनही आढळतो. अकबर स्वत:ही या कथा अगदी तल्लीन होऊन ऐकत आणि आपल्या राण्यांनाही ऐकवत असत.

मोगलाई काय पेशवाईही पुढे गेली. इंग्रजराज सुरू झाले. १८५७ चा उठाव दडपून टाकल्यानंतर इंग्रज सरकारने लखनौ आणि दिल्लीच्या नबाबांना लक्ष्य केले. या दोन्ही ठिकाणच्या नबाबांना मिळत असलेल्या सगळ्या सोयी-सवलती इंग्रजांनी रद्दबातल ठरवल्या. इंग्रजांच्या या धोरणाचा फटका नबाबांना जितका बसायचा तितका बसलाच, पण ‘दास्तानगो’ही यात भरडले गेले. कथाकथनाची ही कला अस्ताला लागली. ‘दास्तानगों’ आता मोजकेच शिल्लक उरले. विसावे शतक उजाडले तशी ही कला जणू कायमची लयाला गेली. मृतप्राय झाली. मिर बाक़र अली हे उरलेले सुरलेले आणि अखेरचे ‘दास्तानगो.’ १९२८ मध्ये त्यांचे निधन झाले.

‘माया मरी न मन मरा’

उर्दूतील ख्यातनाम साहित्यिक आणि टीकाकार शम्सउर रेहमान फारुकी आणि त्यांचे पुतणे तसेच लेखक व रंगकर्मी महमूद फ़ारूक़ी यांनी मिळून गेली काही वर्षे या मृत कलेविषयीच्या संशोधनात घालवली. ‘दास्तानगोई’चे पुनरुज्जीवन करण्याचा विडा उचलला. कबर खोदली. दफन झालेली कला बाहेर काढली. दोघांचा बऱ्यापैकी शिष्यपरिवार. त्यांच्यासह युवकांच्या मदतीने ‘दास्तानगोई’चे नुतनीकरणही शक्य झाले. ‘दास्तानगोई’ अशाप्रकारे पुन्हा जिवंत झाली... आणि धूळही झटकली गेली.

२००५ मध्ये दास्तानगोईच्या पुनरुज्जीवनाला प्रारंभ झाला. आणि आज अगदी नव्या दमाचे कलावंत आपल्या नव्या-जुन्या कथांसह जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत. आणि विशेष म्हणजे ‘अफिमखान्या’सारख्या शापित रंगमंचापासूनही या नव्या ‘दास्तानगों’नी ‘दास्तानगोई’ला मुक्त केलेले आहे.

‘दास्तानगोई’ मुळात एक अशी कला आहे, ज्यात आयोजनासाठी काही खास असे करावे लागत नाही. अफिमखान्यातून, नबाबखान्यांतून आणि एकूणच पारंपरिक नियमबंधनांतून पूर्णपणे स्वतंत्र होऊन ही कला आता शाळा-महाविद्यालयांत जाऊन पोहोचलेली आहे. सभागृहे, समारंभ, अलाहाबादेतील माघ मेळा आणि एवढेच काय तर साहित्य संमेलनांतूनही नव्या दमाचे ‘दास्तानगो’ आपली कला उधळत आहेत.

… आणि आता ही गोष्ट अशा एका ‘दास्तानगो’ची आहे… ज्याची पार्श्वभूमी धडधडीत अरबेतर आहे. इतकेच नव्हे तर मुस्लिमेतर आहे. अंकित चड्ढा असे या नव्या दमाच्या ‘दास्तानगो’चे नाव आहे. अंकित नुसतेच दास्तानगो नाहीत तर ते एक कथाकार आहेत, लेखक आहेत, आपल्या क्षेत्रातील व्यावसायिक आहेत आणि त्यातीलच संशोधकही आहेत.

इतिहासाची वहिवाट आणि मार्केटिंगमध्ये उच्च कोटीची गुणवत्ता प्राप्त केल्यानंतर आता आपल्या कलेलाच ते आपला उद्यम मानतात. नाविन्य हा त्यांच्या कथाकथनाचा केंद्रबिंदू आहे.

मध्यप्रदेशातील एका छोट्याशा शहरात संत कबीर या महात्म्याची गोष्ट सांगताना मी अंकित चड्ढा यांना पहिल्यांदा पाहिले आणि त्यांचा दिवाणा झालो.

‘तिनका कबहुँ ना निंदये’

दिल्ली विद्यापीठातील हिंदू महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना पथनाट्यांशी अंकित यांचा परिचय झाला. काही पथनाट्यांतून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या. पुढली काही वर्षे महाविद्यालयात ‘इब्तिदा’ ही नाट्यसंस्थाही चालवली. या प्रवासातच त्यांनी स्वत:साठीचा ठावठिकाणा ठरवून घेतला.

नाटके लिहिली. अंकित यांची सुरवातीची नाटके आणि लेखन हे बेरोजगारी, विस्थापनाचे दु:ख, ग्राहक-जागरण अशा सामाजिक विषयांना वाहिलेले होते.

शिक्षण आटोपल्यावर अंकित यांनी कॉर्पोरेट मार्केटिंगमध्ये नोकरी पत्करली. इथेही ते लिहित असत. पण हे सगळे लेखन जाहिरातकेंद्रित स्वरूपाचे होते. वस्तूच्या विक्रीसाठीचे हे सगळे लेखन आणि कॉपी रायटिंगचे साचेबद्ध काम… अंकित यांच्यासारख्या सर्जनशिल कलावंताला कंटाळवाणे वाटणारच. पण करत होते शेवटी नोकरी होती ना.

हा काळ आठवताना अंकित सांगतात, ‘‘हो कंटाळलो होतो, पण या नोकरीने मला पैसे तर मिळवून दिलेच पण आणखीही खुप काही दिले. म्हणून या नोकरीचे उपकार विसरता यायचे नाहीत. माझ्यातले मार्केटिंगचे कौशल्य या नोकरीनेच बाहेर काढले. त्याला वाव दिला. कामात तुम्ही प्रामाणिक असायला हवे, हे मी शिकलो. लेखनातही एका प्रकारची शिस्त आवश्यक असते, हे देखिल मी या नोकरीतूनच शिकलो.

गुरु गोविंद दोनों खड़े

मार्केटिंगमध्ये दोन वर्षे काढल्यानंतर अंकित यांनी मेहमूद फारुकी यांच्यावतीने आयोजित ‘दास्तानगोई’ कार्यशाळेबाबत ‘फेसबुक’वर वाचले. फारुकी यांनी दानिश हुसैन यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजिली होती. कार्यशाळेबाबत अंकित सांगतात,

‘‘मला कधीही वाटले नव्हते, की मी एक ‘दास्तानगो’ म्हणून नावारूपाला येईन म्हणून. आयुष्यातल्या इतर चांगल्या अनुभवांप्रमाणेच हा अनुभवही तसा अचानकच वाट्याला आला. उदाहरणार्थ एखाद्याचे प्रेम जसे आमच्या वाट्याला अचानक येते, तसा. पथनाट्यांबाबतही माझे असेच झाले होते. पथनाट्य आणि दास्तानगोईमध्ये साम्यही बरेच. इथे ना लाइटची गरज, ना स्टेजची… गोष्ट सांगणारा आणि गोष्ट ऐकणारे या दोघांमध्ये एकदम सरळ असे नाते जुळले पाहिजे, की बास झाले. मला हे फार भावले. ‘दास्तानगो’चे रूपडे लेवून तुम्ही आपली गोष्ट बेलाशक ऐकवू शकता. अर्रे व्वा… मेहमूदगुरूजींनी माझे आयुष्यच बदलून टाकले!’’

अंकित यांच्या मते ‘दास्तानगोई’ हे उद्यमाचेच एक रूप आहे. उद्यमाला जे घटक आवश्यक असतात, ते सगळे ‘दास्तानगोई’त अंतर्भूत आहेत. शमसूर रेहमान फारुकी यांचे संशोधन आहे. मेहमूद फ़ारूक़ी यांचे दिग्दर्शन आहे. अनुषा रिज़वी (‘पिपली लाइव्ह’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका) यांचे डिझाईन आहे. आणि वरून दानिश हुसैन सारख्या कलावंताचा अभिनय असे सगळे मिळून या कलेला एक नव्या आयामापर्यंत घेऊन गेले , असे अंकित यांचे म्हणणे आहे. अंकित यांचे मार्केटिंगमधले ज्ञानही त्यांना उपयोगी पडते.

मेहमूद फ़ारुक़ी हेच दीपस्तंभ

अंकित सांगतात, ‘‘उस्ताद मेहमूद फ़ारुकी यांच्यासोबतचे माझे नाते म्हणजे या प्रवासातील सर्वोत्तम पडाव आहे. फारुकीसरांच्या घरीच दास्तानगोईबाबतच्या सगळ्या बैठकी पार पडतात. इतकेच काय रंगीत तालिमही त्यांच्या घरीच होते. मला त्यांनी उर्दू शिकवले. मेहमूदसरांसोबत राहूनच मी गुरू-शिष्य परंपरा काय असते, तेही शिकलो. मी जिथे कुठे अडखळतो, गुरुजींचा एक मंत्र मला पुढल्या पावलासाठी बळ देतो. रस्ता दाखवायला प्रकाश देतो. मेहमूद सर माझ्यासाठी एक असा बाप आहे, जो आपल्या मुलाच्या डोक्यावर पुस्तकांचे ओझे टाकत नाही, उलट पुस्तके अशा ठिकाणी ठेवून देतो, जिथून मुलगा वाटेल ते उचलून घेईल आणि वाचून घेईल.’’

‘माटी कहे कुम्हार से’

पुढे सलग दोन वर्षे अंकित अमीर हम्जा यांच्या पारंपरिक कथा ऐकवत राहिले. हे काम करत असताना ‘दास्तानगोई’च्या तत्वज्ञानाशी जुळले. आणि यात काही नवे करण्याची इच्छाही त्यांच्या मनात हेलकावे खाऊ लागली.

दास्तानगोच्या पद्धतीला एक नवे रूप द्यावे आणि नवे विषयही त्यात घालावेत, अशी अंकित यांची इच्छा होती. याच काळात मेहमूद फारुकी यांनी डॉ. विनायक सेन यांच्याविरुद्ध चाललेल्या कारवाईच्या विरोधात ‘दास्तान-ए-सॅडेशन’ लिहिले होते. ही कथा अंकितसाठी प्रेरणा ठरली. आपणही नवीन विषय शोधावेत म्हणून त्यांचे डोळे आता अधीर झाले. दास्तानगोईची शैली कायम ठेवत त्यांनीही ‘दास्तानगोई’वरच एक ‘स्कूप’ (टवाळखोर नक्कल) लिहिली. रसिकांनी अंकित यांना डोक्यावर घेतले.

अंकित सांगतात, ‘‘एकीकडे आधुनिक गोष्टी या पारंपरिक कलेत मी जरूर स्वीकारत होतो, पण कलेच्या परंपरेचा जो गाभा आहे, त्याला मी हात घातलेला नव्हता… म्हणून परंपराही माझ्या साथीला होतीच. संत कबीर आणि अमिर खुसरो यांचा प्रभाव माझ्यावर होताच. सुफी विचार मला भावतातच. सुफी परंपरा ही एक सुधारणेचीच परंपरा. सुधारणेसाठी शिक्षण आवश्यक आणि अचानक मला जाणवले, की शिक्षणाच्या प्रचारासाठी आपण ‘दास्तानगोई’चा वापर करू शकतो यार!’’

पुढे अंकित यांनी ‘दास्तान-ए-मोबाईल’ लिहिले. अर्थातच हे विनोदी होते. कौतुक झाले. अंकित यांनी ठरवून टाकलेलेच होते, की दास्तानगोई कलेला नवीन विषय आणि नवीन प्रकारांनी मढवायचे. आणि या कलेलाच आपले अवघे आयुष्य समर्पित करायचे. मग त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि संपूर्ण वेळ दास्तानगोई एके दास्तानगोई… असे सुरू झाले.

‘कहत कबीर सुनो भई साधो’

नोकरीचा राजीनामा अंकितच्या आई-बाबांना काही आवडला नाही. अंकितने आयएएसचा अभ्यास करावा, ही देखिल त्यांची इच्छा होतीच. अंकित यांच्या आयुष्यातल्या या घडामोडींनी आई-बाबा म्हणून त्यांना धडकीच भरलेली होती. त्यात हा गोष्टीच सांगत फिरतो म्हणून ते कमालीचे चिंतेत असत. अंकित यांनी लहान मुलांसाठी एक खास कथा रचली. शाळेत आणि सार्वजनिक कार्यक्रमांतून ते ही कथा ऐकवू लागले. याच दरम्यान अंकित यांची आईही एका ‘दास्तानगोई’ला हजर राहिली. आपला मुलगा कबिरावर गोष्ट सांगतोय आणि लोक ती तल्लीन होऊन ऐकताहेत, हे दृश्य या माऊलीने पाहिले. गोष्ट होती…. ‘दास्तान ढाई आखर की!’ आणि या माऊलीला कळले, की आपला मुलगा मामुली नाही, तो तर एक वेगळीच हस्ती आहे! मग मुलाला त्यांनी मोकळे सोडले.

विशेष म्हणजे कबिरावरली ही कथाही सुनियोजित वगैरे नव्हती. कबीर महोत्सवाच्या आयोजकांना ‘कबीर यांचे जीवन और तत्वज्ञान’ या विषयावरील गोष्ट अपेक्षित होती, आणि मेहमूद फ़ारूक़ी यांनी ऐनवेळी ही जबाबदारी आपल्या या शिष्यावर सोपवलेली होती. पुढे अंकित यांनी कितीतरी वर्षे कष्ट उपसले आणि ‘दास्तान-ए-कबीर’ पूर्णत्वाला आली.

‘‘सर्वसंपन्न अशी आमची ही कला. इतिहास, साहित्य आणि अभिनय असा त्रिवेणी संगम म्हणजे ‘दास्तानगोई.’ कबीरही सर्वगुणसंपन्न होते. दास्तानगोईसाठी त्यांच्याहून आदर्श चरित्र कुणाचे असणार? कबीर यांनी स्वत: कधीही आपला दोहा लिहून घेतला नाही. मौखिक परंपरेतून त्यांचे काव्य जगले. स्वत: कबीरच जणू मला विणत आले. माझ्या विचारात आले आणि म्हणाले, ‘सुनो भाई साधो…’ आणि मी ऐकत गेलो… बोलत गेलो…

साई इतना दीजिये

अंकित यांच्यासमोर आता आर्थिक प्रश्न उरलेले नाहीत. आपला बराच वेळ आता ते वाचनात आणि लेखनात घालवतात. आपले काम एक दीर्घकाळाची गुंतवणूक आहे, हे त्यांना ठाऊक आहे त्यामुळे उंचावरून सूर मारण्यापेक्षा पोहत राहणे अधिक महत्त्वाचे आहे.

अंकित यांच्या कलेत आधुनिकोत्तर काळाचा म्हणजेच सांप्रत काळाचा अधिक प्रभाव दिसून येतो. इतिहास आणि भविष्याच्या दरम्यान पूल बनवणे, हेच वर्तमानाचे कार्य असते, असे अंकित यांचे याबाबतीतले मत आहे. वर्तमान काळ जर कलेच्या सादरीकरणातून प्रतिबिंबित झाला नाही, तर इतिहास, परंपरा आणि भविष्याच्या दृष्टीनेही ते अन्यायकारक असेच ठरेल. ‘दास्तानगोई’च्या मुळे नेहमीच ‘होशरूबाच्या जादू’त रुजलेली राहतील, तिथे नव्या कथांतून जर ‘दास्तानगों’चे पोट आणि परिवार चालत असेल, तर बिघडले कुठे. हा तर दास्तानगोई आणि दास्तानगो दोघांचाच विजय आहे.’’

आपल्या संशोधनाच्या संदर्भात अनेक शिक्षक, विद्यार्थी, रंगकर्मी, संगीतकार आणि सरकारच्या विविध खात्यांशी संवाद, समन्वय साधावा लागतो आणि अंकित यांना हे फार आनंददायी वाटते.

‘धीरे-धीरे रे मना’

यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही अंकित हे नम्र आहेत. आपल्या नम्रतेचे श्रेयही ते दास्तानगोईच्या परंपरेला आणि श्रोत्यांबद्दलच्या प्रेमाला देतात.

ते म्हणतात, ‘‘तुम्ही कॉर्पोरेटमध्ये नोकरी करत असला तर तुम्हाला चांगला बोनस मिळतो. श्रोते हे आमचे बोनस आहेत. पुन्हा या कामात जो आनंद मिळतो, तो अन्यत्र कुठे मला मिळणारही नाही. बरेच श्रोते मला सांगतात, की मी दास्तानगोईच्या माध्यमातून देशाचा इतिहास, संस्कृती, भाषा आणि साहित्याला समृद्ध करण्याचे पवित्र कार्य करतोय. तेव्हा आनंद वाटतोच. अभिमानही दाटून येतो.’’

अंकित आणि त्यांच्यासारखे अनेक युवक आपल्या सादरीकरणातून आज दास्तानगोई कला समृद्ध करताहेत. मुले आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी दास्तान लिहिताहेत. ‘ॲलिस इन वंडरलँड’मधून प्रेरणा घेऊन अंकित यांनी नुकतीच 'दास्तान- ए-एलिस' पूर्ण केलेली आहे.

सम्राट अकबर यांच्या नवरत्नांतील एक अब्दुर रहीम ख़ान-ए-ख़ानाँ यांच्यावरही अंकित संशोधनकार्य करताहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी 'दास्तान दारा सिकोह की' (दारा शुकोहची कथा) पूर्ण केलेली आहे. या क्षेत्रातील नवोदितांना मार्गदर्शन करताना अंकित म्हणतात, ‘‘एकतर सादर करावयाची कथा स्वत: लिहायला हवी. स्वत:ची प्रतिभा ओळखणे आणि आतला आवाज शोधणे फार महत्त्वाचे. मी कुठल्या विषयावर उत्तम गोष्ट सांगू शकतो, हे मला कळले पाहिजे. जर कळले तर तीच तुमची सर्वोत्तम गोष्ट असेल. बाजारात विकल्या जाणाऱ्या फिल्मी किवा क्रिकेटपटूंच्या गोष्टींहून ती खचितच सरस असेल.’’

Related Stories