मुंबईतील गरजूंसाठी देवदूत एक रिक्षाचालक

0

‘मुन्नाभाई एसएससी’ हे नाव कोणत्याही सिनेमाचे किंवा त्यातल्या पात्राचे नाही तर ते एका रिक्षाचालकाचे आहे. ज्यांना सगळी मुंबई या नावाने ओळखते. या खऱ्या पात्राचे नाव आहे संदीप. जे गेल्या १६ वर्षापासून मुंबईमध्ये रिक्षा चालवीत आहेत. ते ठेक्यात सांगतात की ज्या सोयी खासगी टॅक्सी किंवा विमानात मिळणार नाही त्या त्यांच्या रिक्षात मिळतात, याशिवाय ते वयस्कर व्यक्तींना भाड्यामध्ये सुट देतात, अंधांना आणि रुग्णांना मोफत सेवा देतात. एवढेच नाही तर ते स्वतःच्या पैसे खर्च करून त्यांना मदत पण करतात. तसेच ते मिळणाऱ्या भाड्यातून दोन रुपये जमा करून गरीब व रुग्णांना मदत करतात. ते बॉलीवूड अभिनेता संजय दत्त यांचे मोठे चाहते आहेत.


रिक्षा ड्रायव्हर कसे बनले?

संदीप हे दहावीपर्यंत शिकलेले आहेत आणि बॉलीवूड अभिनेता संजय दत्तचे चाहते असल्यामुळे त्यांच्या मित्रांनी त्यांना ‘मुन्नाभाई एसएससी’ हे नाव दिले. संदीप हे एका टूर आणि ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये काम करीत होते. या दरम्यान त्यांना लक्झरी बसमध्ये कामाची संधी मिळाली. तिथे त्यांना जाणवले की बसमध्ये थोडेसे फेरबदल केल्याने त्यांना एक नवीन रूप मिळू शकते. पण काही कारणास्तव त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या नजरेला अजून एक गोष्ट खटकली ती म्हणजे मुंबईतील रिक्षाचालक नेहमी आपल्या प्रवाशांबाबोबर हुज्जत घालतात. प्रवाशांना त्यांचा नकार ऐकून नेहमी मनस्ताप सहन करावा लागतो. याशिवाय जे लोक मुंबईच्या बाहेरून इथे फिरायला आले आहेत त्यांना बऱ्याच वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. तेव्हा त्यांनी विचार केला की ते स्वतः रिक्षा चालवून लोकांचा रिक्षाचालकांच्या प्रती असलेला दृष्टीकोन बदलू शकतील.


रिक्षामधल्या सुविधा

आज त्यांच्या रिक्षामध्ये गाणे ऐकण्यासाठी रेडीओ आहे, कुणाशी बोलण्यासाठी पीसीओची सोय आहे, मोबाईल चार्जर आहे, कुणाच्या मोबाईल मधील बॅलन्स संपला असेल तर रिक्षात बसून रिचार्ज करता येते आणि कुणाला प्रवासादरम्यान कॉफी प्यायचा आनंद घ्यायचा असेल तर त्याची पण व्यवस्था आहे. प्रवासादरम्यान कुणाला कंटाळा आला असेल किंवा महत्वाच्या कामासाठी इंटरनेटची गरज असेल तर ती सुद्धा चिंता नाही कारण त्यांच्या रिक्षात वाय-फाय ची सुविधापण आहे, काही खाण्यासाठी चॉकलेटची पण सोय आहे. जर प्रवाशी कुणी महिला असेल तर आरशाची पण सोय आहे. त्यांच्या रिक्षात बसून कुणीही रोजच्या सोन्या-चांदीचे व डॉलरचे भाव जाणू शकतात, स्टॉक मार्केट संबंधित माहिती जाणून घेऊ शकता, हवामानाची माहिती घेवू शकता. तहान भागविण्यासाठी पाण्याची बाटली आणि वेळ व दिवस बघायला घड्याळ आणि कॅलेंडरची पण व्यवस्था आहे.

लोकांची मदत

संदीप यांनी आपल्या रिक्षाला हायटेक बनविले असले तरी पण याच रिक्षाद्वारे त्यांची समाजसेवा पण सुरु आहे. ते आपल्या रिक्षात बसणाऱ्या वयस्कर लोकांना भाड्यात सुट देतात. जसे मुंबईमध्ये रिक्षा भाडे १८ रुपयाने सुरु होते पण वयस्कर लोकांनाकडून सुरूवातीचे मीटर भाडे १० रुपयाप्रमाणे घेतात. एवढेच नाही तर ते अंधांना तसेच रुग्णांना दवाखान्यात सोडण्याचे काम मोफत करतात. संदीप सांगतात की बऱ्याचवेळा लोक माझ्या कामाला मदत म्हणून जास्त पैसे देवू करतात ते मी गरिबांना वाटतो, याशिवाय संदीप त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोफत प्रवास सेवा देतात. संदीप यांच्या रिक्षात प्रथमोपचार पेटी( फर्स्टएड किट) नेहमी ठेवलेली असते. ज्याचा वापर ते रस्त्यात जखमी अवस्थेत भेटणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी करतात. सन २००४ मध्ये त्यांच्या आईला कॅन्सर झाला म्हणून ते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कॅन्सरग्रस्त लोकांना भेटून आपल्या परीने शक्य तेवढी मदत करीत असतात. याशिवाय डायलिसीस करणाऱ्या गरीब लोकांना पण आर्थिक मदत करतात. संदीप हे आर्थिकदृष्ट्या जरी भक्कम नसले तरीपण ७०० रुपयांची मदत करण्याची त्यांची दानत आहे. याव्यतिरिक्त जे लोक त्यांच्या रिक्षात बसतात त्यांना ते निवेदन करतात की त्यांचे जुने कपडे दान करा जेणेकरून ते गरीबांमध्ये त्याचे वाटप करू शकतील.


संजय दत्त चे चाहते

संदीप हे अभिनेता संजय दत्त चे खूप मोठे चाहते आहेत. म्हणूनच मागच्या अडीच वर्षापासून संजय दत्तच्या जेलमध्ये असण्याने संदीप यांनी पायात चप्पल किंवा बूट घालणे बंद केले आहे. विशेष म्हणजे संजय दत्त सुद्धा त्यांचा आदर करतात. संजय दत्तला जेलमधल्या काही कैद्यांकडून संदीपच्या या त्यागाबद्दल कळले तेव्हा पॅरोलवर बाहेर आल्यानंतर त्यांनी संदीपला आपल्या घरी चहाला आमंत्रित करून विचारले की ‘चप्पल कब पेहनोगे?’ उत्तरादाखल संदीपने सांगितले की जेव्हा ते स्वतः त्यांच्या घरी चहा प्यायला येतील तेव्हाच चप्पल घालेल. त्यांनी आपल्या डाव्या हातावर संजय दत्त यांचे एक टॅटू पण काढले आहे.


हायटेक संदीप

संदीपची रिक्षाच हायटेक नाहीतर ते स्वतःपण हायटेक आहेत. ते फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम आणि हाईकवर पण उपलब्ध आहेत. ते यांच्याद्वारे ऑनलाईन रिक्षाची सुविधापण देतात. यासाठी ते ५० रुपये बुकिंग चार्ज करतात आणि अर्ध्या तासात बोलावलेल्या ठिकाणी पोहोचण्याचे आश्वासन देतात. आरटीओ विभागाने पण संदीप यांना चांगल्या वर्तणुकीमुळे सन्मानित केले आहे. संदीपच्या खास रिक्षात अभिनेता सलमान खानने पण प्रवास केला आहे. याशिवाय अनेक टीव्ही आणि रेडीओ शो त्यांच्या रिक्षात झाले आहेत. यामुळे ते मुंबईतच नाही तर परदेशात पण प्रसिद्ध आहेत मग ते लंडन असो कॅलिफोर्निया असो किंवा जोहान्सबर्ग, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड प्रत्येकाशी ते इंटरनेटद्वारे जोडलेले आहेत.


लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे