English
 • English
 • हिन्दी
 • বাংলা
 • తెలుగు
 • தமிழ்
 • ಕನ್ನಡ
 • मराठी
 • മലയാളം
 • ଓଡିଆ
 • ગુજરાતી
 • ਪੰਜਾਬੀ
 • অসমীয়া
 • اردو

ऐशोआरामाच्या जीवनाचा त्याग करत समाजसेवा करणारे अर्थतज्ज्ञ

असं म्हटलं जातं की आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराची आपल्याला सवय होऊन जाते आणि आपल्या दिनचर्येचा एक भाग बनते या  सवयीचे आपण इतके गुलाम बनतो की त्यातून बाहेर पडणे कठीण होते. मात्र काहीजण असेही असतात जे  ऐशोआरामाच्या जीवनाचा त्याग करत वेगळा मार्ग निवडतात आणि समाजाच्या सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावतात. अर्थतज्ज्ञ असलेले आणि  ४० वर्षांपासून मुंबई सारख्या महानगरात एका मोठ्या पदाचा कार्यभार सांभाळणारे  गोपाल कृष्ण स्वामी, ही एक अशी व्यक्ती आहे जी उत्तराखंडाची राजधानी देहरादून व मसुरी यांच्यामधील एक गाव पुरकुल मध्ये राहून आपली संस्था ‘पुरुकुल युथ डेव्हलपमेंट सोसायटी’ व ‘पुरुकुल स्त्री शक्ती’ तर्फे समाजासाठी आपल्या परीने काही तरी करण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त गरीब व निरक्षर मुलांनाच शिक्षित न करता स्त्रियांना सुद्धा आर्थिक स्वावलंबनाचे धडे देत आहेत.

 

गोपाल कृष्ण स्वामी पेशाने अर्थतज्ञ आहे व जवळजवळ ४० वर्षापासून मुंबईत राहून परदेशी चलन  आयात व निर्यातीच्या क्षेत्रात सल्लागाराच्या रुपात काम करत होते. जेव्हा त्यांनी आपल्या कामाच्या निवृत्तीचा विचार केला तेव्हा नवी मुंबईचे घर विकून हिमालयाच्या कुशीत जाऊन समाजासाठी काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. याच विचारांना दिशा देऊन ते आपल्या परिवारासोबत देहरादूनला आले व मागच्या २० वर्षा पासून इथे राहून निरक्षर मुलांना साक्षर करून येथील स्त्रियांनाही आत्मनिर्भर बनवत आहेत. स्वामी सांगतात की, त्यांनी २० वर्षा मध्ये उत्तराखंडाच्या देहरादूनमध्ये राहून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे.

 स्वामींची ‘पुरुकुल युथ डेव्हलपमेंट सोसायटी’ ही संस्था शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत. येथे ४०० पेक्षा जास्त मुल मोफत शिक्षण घेतात व एप्रिल नंतर ही संख्या ५०० च्या पुढे जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या शाळेच्या प्राथमिक वर्गापासून ते १२वी पर्यंतच्या वर्गाला सीबीएसची मान्यता मिळाली आहे. या संस्थेची विशेषता म्हणजे ते शालेय शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्याची शिकवण देऊन विविध उपक्रमांमध्ये मुलांना पारंगत करत आहे. ज्यामध्ये नृत्य, योग, खेळ व बेकरीचे पदार्थ शिकवले जातात.

मागच्या १६ वर्षांपासून स्वामी व त्यांच्या पत्नीने मुलांच्या विकासासाठी स्वतःला पूर्ण पणे समर्पित केले आहे.

गोपाल कृष्ण स्वामी यांनी जेव्हा या शाळेची सुरवात केली तेव्हा या गावात दूर पर्यंत एकही शाळा नव्हती तसेच गावाची परिस्थितीही सुधारीत नव्हती. पण आज या शाळेमुळे जवळपासच्या मुलांना शिक्षणाबरोबरच कपडे, जेवण व बसची सुविधा प्रदान केली जाते. स्वामी यांनी युवर स्टोरीला सांगितले की,’’मुले आमच्या बरोबर आठवड्यातील ६ दिवस व दिवसाचे १० तास असतात. मुलांचा योग्य प्रकारे विकास होण्यासाठी आम्ही मुलांचे स्वास्थ्य तसेच त्यांच्या पौष्टिक आहाराकडे विशेष लक्ष पुरवतो. हेच एक कारण आहे की आज १५-१६ वर्षानंतर सुद्धा मुले आमच्या बरोबर रहात आहेत. स्वामी यांनी जेव्हा शाळेची स्थापना केली तेव्हा १० वर्षा पेक्षा जास्त वयाच्या मुलांना ते आपल्या जवळ ठेवत होते. पण आता ३-४ वर्षाचे मुले सुद्धा त्यांच्याकडे शिकायला येतात. इथे शिकणाऱ्या मुलांचा विकास चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्यांना वसतिगृहाची सुविधा देण्यासाठी स्वामी प्रयत्नशील आहेत.

‘पुरुकुल युथ डेव्हलपमेंट सोसायटी’ तर्फे स्त्रियांच्या कौशल्याला पारखून त्यांना प्रोत्साहित केले जाते. येथील स्त्रिया रजई व गोधडी तयार करण्याच्या कामाबरोबरच ४५ पेक्षा जास्त नवीन उत्पादन तयार करतात. स्त्रियांनी बनवलेल्या या उत्पादनाला ऑर्डर मिळवण्यासाठी ही संस्था त्यांना मदत करते. त्याचबरोबर या उत्पादनाला चांगली बाजारपेठ उपलब्ध करवून देते. आज सुमारे १८० स्त्रिया या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. या स्त्रियांना मोफत जागेबरोबरच अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान केल्या आहेत ज्यामुळे त्या आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. याशिवाय महिलांनी त्यांच्या मदतीने ‘सेल्फ हेल्प ग्रुप’ तयार केला आहे जिथे त्या अनेक प्रकारचे उत्पादने तयार करतात. या व्यतिरिक्त पुरकुल पासून जवळच १० किलोमीटर दूर दोन नवीन केंद्र आहे जिथे ९० स्त्रिया कार्यरत आहेत. इथे येण्या जाण्यासाठी स्त्रियांना मोफत बसची सुविधा मिळत आहे. तसेच नवीन येणाऱ्या स्त्रियांना सुद्धा कामाच्या मोफत प्रशिक्षणाबरोबरच जेवण व दवाखाना यासाठी सवलत प्रदान केली जाते व त्यांच्या मुलानां शाळेत शिक्षणाची मोफत व्यवस्था केली जाते.

स्वामी फक्त शिक्षण व स्त्रियांच्या प्रगतीच्या क्षेत्रात काम करत नसून ज्या गावात शौचालयाची सुविधा नाही तिथे ते बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यांनी आतापर्यंत उत्तराखंडात ५० पेक्षा जास्त घरात शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी त्यांचे लक्ष्य जवळच्याच शिवली गावात २० पेक्षा जास्त शौचालय बनवण्याचा आहे.     

वेबसाइट : www.purkal.org

लेखक : हरीश
अनुवाद : किरण ठाकरे

This is a YourStory community post, written by one of our readers.The images and content in this post belong to their respective owners. If you feel that any content posted here is a violation of your copyright, please write to us at mystory@yourstory.com and we will take it down. There has been no commercial exchange by YourStory for the publication of this article.

Related Stories

Stories by Team YS Marathi