‘स्वच्छ भारत’ साठी शालेय विद्यार्थ्यांचे घाणीच्या साम्राज्याविरुद्ध एक आव्हान ‘द बॅग इट चॅलेंज’

‘स्वच्छ भारत’ साठी शालेय विद्यार्थ्यांचे घाणीच्या साम्राज्याविरुद्ध एक आव्हान ‘द बॅग इट चॅलेंज’

Wednesday December 23, 2015,

3 min Read

स्वच्छतेप्रती शाळांना आपसात जोडण्याचा एक वेगळा उपक्रम सुरु केला आहे दिल्लीच्या इंदिरापूरम जवळील डीपीएसचा एक विद्यार्थी अक्षय प्रकाश यांनी. स्वच्छतेबद्दल असलेल्या कळकळीने इतर शाळांना या मोहिमेला जोडण्याचा ‘द बॅग इट चॅलेंज’ या नावाने एक अनोखे अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत शाळेतील मुले एका ठराविक जागेची निवड करून त्या जागेची स्वच्छता करून कचरा पिशवीत भरतात आणि इतर दुसऱ्या तीन शाळांना आवाहन करता की त्यांच्यापेक्षा अधिक कचरा पिशवीमध्ये भरावा.


image


अक्षय यांना या अभियानाची प्रेरणा ‘एएलसी द आईस बकेट चॅलेंज’ पासून मिळाली जे मागच्या वर्षी इंटरनेट वर मोठ्या प्रमाणात प्रसिध्द झाले होते. यात आव्हान पूर्ण करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला नामांकित करते. अक्षय सांगतात की, रोज शाळेतून घरी जातांना त्यांना रस्त्यात हिंडन नदी लागते जिथे घाण आणि कचऱ्याचा ढीग असतो. ‘मला हे दृष्य बघून वाईट वाटायचे की आपल्या नद्या किती प्रदूषित आहेत’. त्याचवेळेस पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाची मोहीम हाती घेतली. तेव्हा अक्षयने विचार केला की अस्वच्छता ही आपल्या देशाची सगळ्यात मोठी समस्या आहे. या समस्येच्या निवारणासाठी त्यांनी स्वच्छता अभियानाला अशा प्रकारच्या आव्हानाची जोड दिली.


image


अक्षय यांनी आपल्या या अभियानाचा प्रारंभ आपल्या शाळेपासून सुरु केला आणि आज १८ शाळांनी ‘द बॅग इट चॅलेंज’ ला पूर्ण केले आहे. या शाळांमध्ये डीपीएस स्कूल, इंदिरापुरम, केम्ब्रिज स्कूल, जयपुरिया स्कूल आणि इतर अनेक शाळा सहभागी आहेत. या अभियानांतर्गत शाळेचे विद्यार्थी एका जागेची निवड करून तेथील स्वच्छता करतात. तसेच त्यांच्यात एक स्पर्धा होते, त्यासाठी ‘द बॅग इट चॅलेंज’ तर्फे शाळेचे विद्यार्थी दुसऱ्या शाळेला फक्त आव्हानच देत नाही तर त्यांना त्यांच्यापेक्षा अधिक कचरा पिशवीत गोळा करायला सांगतात. यामध्ये दुसऱ्या शाळेसमोरील आव्हान हे जास्तीत जास्त कचरा साफ करण्याचे असते. ‘द बॅग इट चॅलेंज’ च्या कल्पनेवर अक्षय यांनी ११ वी पासूनच सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी आपली ही कल्पना केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या समोर मांडली व त्यांनी या कामासाठी अक्षय यांना प्रोत्साहन दिले. यानंतर अक्षय यांचा स्वतःवरचा विश्वास वाढला, त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी पण त्यांचा उत्साह वाढवून प्रत्येक स्तरावर त्यांना मदत केली. अक्षय सांगतात की, ‘त्यांच्या मुख्याध्यापकांनी प्रत्येक क्षणाला त्यांचे समर्थनच केले नाही तर त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढविला’. प्रारंभी काही लोकांनी आमच्यावर अविश्वास दाखविला त्यांना ही शंका होती की हे काम आम्ही करू शकू की नाही. पण आमच्या मुख्याध्यापकांनी आमच्यावर विश्वास दाखविला आणि आमच्या अभियानाचा शुभारंभ झाला.


image


आज अक्षय यांच्या या अभियानाने इंदिरापुरम, जयपुरिया बाजार व अनेक जागांची स्वच्छता केली आहे आणि अजून अशाप्रकारच्या बऱ्याच ठिकाणी ही मोहीम सुरु आहे. त्यांच्या या अभियानासाठी डीपीएसच्या संबंधातील बऱ्याच शाळा जोडल्या गेल्या आहेत. याअंतर्गत डीपीएस कल्याणपूरने त्यांच्या या आव्हानाचा स्वीकार केला आहे. अक्षय सांगतात की, ‘जर एक शाळा तीन शाळांना स्वच्छतेचे आव्हान देतात तेव्हा आपण जास्तीत जास्त शाळांपर्यंत संदेश वाहकाचे काम करू शकतो आणि आज १८ शाळेंनी हे आव्हान पूर्ण केले आहे’.


image


अक्षय यांनी आपल्या मोहिमेची कल्पना स्वच्छ भारत अभियानाच्या निर्देशकांसमोर मांडली ज्याची त्यांनी खूप प्रशंसा केली. याव्यतिरिक्त त्यांना नागरी विकास मंत्रालयाने एक पत्र पाठविले आहे ज्यात त्यांनीin पोर्टल तर्फे या अभियानात सामील होण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. याव्यतिरिक्त त्यांना आश्वासन दिले की जी शाळा ‘किंग बॅगर्स अवार्ड’ जिंकेल त्या शाळेला त्यांच्या विभागातर्फे सन्मानित केले जाईल.


image


सध्या ‘द बॅग इट चॅलेंज’ च्या अंतर्गत देशभरातल्या जवळजवळ १५०० शाळांना या अभियानात सहभागी करण्याचा मानस आहे. आज अक्षय आणि त्यांच्या टीमने सर्व स्वच्छता अभियानाची माहिती ठेवली आहे ज्यात कोणत्या शाळेने किती कचरा गोळा केला आणि तसेच त्या वेळचे फोटो आणि व्हिडीओ काढले जातात व त्याच वेळेस पुढच्या तीन शाळांचा हिशोब ठेवला जातो. अक्षय यांनी आपल्या या अभियानाला यशस्वी करण्यासाठी वेबसाईट आणि फेसबुक पेज बनविले आहे. त्यामुळे ज्या शाळेला या अभियानात सामील होण्याची इच्छा असेल त्या शाळेला या साईटवर पूर्ण माहिती मिळू शकेल. १२ वीत शिकणारे अक्षय असे मानतात की या अभियानाने त्यांच्या अभ्यासावर काहीही परिणाम होत नाही ते अभ्यासकरून या कामासाठी वेळ काढतात.

Website : www.thebagitchallenge.org

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close