आपल्याच अशिक्षित आदिवासी बांधवाना शिक्षित करण्याचा ध्यास ; विचानभाईंची अतुल्य कामगिरी !

0

एक दिवस विचानभाई बसमधून प्रवास करीत असतांना कंडक्टरला आठ रुपयांच्या तिकीटासाठी दहा रुपये दिले पण परत दोन रुपये त्यांना मिळालेच नाही. असे फक्त त्यांच्याच बाबतीत घडले असे नाही तर अनेक प्रवाश्यांच्या बरोबर हा किस्सा घडला विचान भाई यांचे कोणतेही शिक्षण झालेले नव्हते पण थोडीफार माहिती असल्यामुळे त्यांनी कंडक्टर कडे दोन रुपये मागितले, इतर लोकही आपापले उर्वरित दोन रुपये मागू लागले तेव्हा विचान भाई यांना जाणवले की जर हे लोक शिक्षित असते तर त्यांना कुणीही फसवू शकले नसते. त्याच वेळी त्यांनी आपल्या भागात एक अशी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जिथे मुले शिकू शकतील आणि भविष्यात अशा अडचणींचा सामना करू शकतील.


विचानभाई गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील एक आदिवासी गाव पिस्तीया मध्ये राहतात. काही वर्षापूर्वी त्यांच्या गावातील जास्तीत जास्त लोक हे अशिक्षित होते आणि जवळपास कोणतीही शाळा नव्हती की जिथे ही मुले शिकू शकतील. त्यामुळे गावातील मुले नदीवर मासे पकडणे, उनाडक्या करणे अशातच दिवस घालवीत असत. विचानभाई यांनी विचार केला की, जर शाळा असती तर मुले आपला वेळ वाया न घालवता अभ्यास करून भविष्यात काहीतरी करू शकली असती. इथले लोक मजुरीसाठी सौराष्ट्रातल्या भागांमध्ये जवळजवळ ६-७ महिने त्यांच्या मुलांसह जात असतात.


विचानभाईंनी विचार केला की, ‘जर कामगारांच्या मुलांनी माझ्याजवळ राहून अभ्यास केला तर त्यांचे पालकही आपल्या कामावर चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रीत करू शकतील.’ त्यानंतर मी २००५ मध्ये मुलांसाठी वसतिगृह तयार केले आणि लोकांना समजावले की मी त्यांच्या मुलांना माझ्याजवळ ठेवू इच्छितो, जिथे राहून ते शिकू शकतील, खेळू शकतील तसेच बागडू शकतील.’ त्यांनी विश्वास दिला की या दरम्यान जर मुलांची तब्येत खराब झाली तर ते फोनवरून त्यांच्याशी संपर्क करतील. याची सुरुवात त्यांनी १७ मुलांपासून केली ज्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था त्यांनी स्वतः केली. यामुळे हळूहळू लोकांचा त्यांच्यावर विश्वास वाढायला लागला आणि आज त्यांनी तब्बल १११ मुलांना सांभाळून त्यांच्या अभ्यासाची जबाबदारी पण घेतली आहे. यात ३६ मुली आणि ७५ मुले आहेत. याव्यतिरिक्त असे आदिवासी मुले पण आहेत जे अनाथ असून त्यांच्याकडे शेतीवाडी काहीही नाही. आपल्या कामाच्या प्रारंभी मुलांचा फक्त प्राथमिक शाळेत प्रवेशच करून दिला नाही तर त्यांच्या राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था पण केली. तसेच त्यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती कारण ते स्वतः शेती करत असून मुलांच्या अन्नाची सोय लोकांकडून धान्य मागून पूर्ण करीत आहेत. कधी लोक त्यांना मका द्यायचे तर कुणी डाळ, तेच शिजवून विचानभाई मुलांना खाऊ घालीत असत.


विशेष गोष्ट अशी की आपल्या घरातूनच त्यांनी या कामाची सुरुवात केली. हळूहळू मुलांच्या सोयीसाठी त्यांनी शाळेची पण सुरुवात केली. आज त्यांच्या शाळेत पहिली ते आठवी पर्यंतच्या अभ्यासाची सोय आहे. येथे शिकणाऱ्या मुलांच्या राहण्यासाठी दोन इमारती आहे ज्याला त्यांनी ‘श्रीराम लीला विद्यार्थिगृह’ असे नाव दिले आहे. यातील एका इमारतीत मुले तर दुसरीकडे मुली राहतात. अभ्यासासाठी एका शेडची व्यवस्था केली आहे. याव्यतिरिक्त जर कुणी आजारी पडलेच तर उपचारासाठी ते जवळच्या सरकारी दवाखान्यात घेऊन जातात. त्यांच्या या शाळेची वेळ सकाळी १० वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असते.


विचानभाई सांगतात की, ही शाळा लोकांनी दिलेल्या दानावर चालते त्यामुळे बऱ्याच वेळेस त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. त्यांच्या कुटुंबात त्यांचे आई-वडील, पत्नी, दोन मुले आहेत. या सगळ्यांचा कामात पूर्ण सहयोग असतो. त्यांचा धाकटा मुलगा दहावीत शिकत आहे व मोठा मुलगा मुकेश याने शिक्षण शास्त्राचा अभ्यास केला असून तो शाळेतील मुलांना शिकवण्याचे काम करतो. मुकेश सांगतात की, ‘माझ्या वडिलांचे स्वप्न आहे की ते आदिवासी मुलांची देखभाल करतील आणि मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. घरातील हे काम मी नाहीतर कोण करणार?’.


‘श्रीराम लीला वसतिगृह’ यामध्ये संगणक आणि वाचनालयाची खास सोय केलेली आहे. या विद्यार्थ्यांना शाळेतील आणि वसतिगृहातील वातावरण खेळीमेळीचे आणि आनंदाचे वाटते म्हणून त्यांचे पालक जेव्हा मोलमजुरी करून गावात परत येतात तेव्हा त्यांच्याबरोबर राहण्यापेक्षा मुले येथेच राहणे पसंत करतात. तसेच इथले आदिवासीसुद्धा समजदार झाले आहेत की त्यांना मुलांचे हित कशात आहे ते कळायला लागले आहे. येथे राहणारी मुले मोफत शिक्षणच घेत नाही तर त्यांना पुस्तके, गणवेश पण मोफत दिला जातो. विचानभाई सांगतात की, ‘हे काम मी यासाठी करीत आहे की बाहेरगावचे कोणीही येऊन हे काम करू शकत नाही म्हणून ते मलाच करावे लागणार आहे.

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे