महिला आणि बालकांसाठी १४ वर्षांच्या ‘स्नेहा’चा लढा

महिला आणि बालकांसाठी १४ वर्षांच्या ‘स्नेहा’चा लढा

Monday October 26, 2015,

5 min Read


कोणत्याही देशाला आपलं भविष्य चांगलं असावं असं वाटत असेल तर त्यासाठी आधी वर्तमानावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं. देशाचा सुदृढ विकास करायचा असेल तर त्यात त्या देशातील महिलांची महत्त्वाची भूमिका असते. बाळाला जन्म देण्यापासून ते त्याचे पालनपोषण आणि त्याची पहिली शिक्षिका बनण्याची जबाबदारी महिलांवरच असते. त्यामुळेच महिला स्वस्थ आणि सुशिक्षित असणं ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं एक अटच असते. पण भारतासारख्या विकसनशील देशात आजही महिला आणि नवजात बालकांची परिस्थिती सुधारलेली नाही ही चिंतेची बाब आहे. आजही भारताच्या लोकसंख्येपैकी ५० टक्के संख्या असलेल्या महिलांना त्यांच्या मुलभूत हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो. ही समस्या आणखी गंभीर होते जेव्हा त्याच महिलांच्या पोटी जन्मलेल्या बाळांनाही अशाच हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. भारतात कुपोषणामुळे मुलांचे बळी जाणं ही किरकोळ घटना समजली जाते. कुपोषित आणि अशिक्षित मुलं हे शहरी भारताचं चित्र आहे. सार्वजनिक रुग्णालयांची दुरवस्था आणि सरकारी सुविधा फक्त कागदावरच राहतात. प्रत्यक्षात महिला आणि नवजात बाळांची स्थिती भयंकर होत आहे. देशाच्या विकासाचा जो आराखडा सरकारने तयार केलाय तो या समस्या सोडवल्याशिवाय परिपूर्ण होऊच शकत नाही. समाजातील प्रत्येक घटकाला आणि प्रत्येक व्यक्तीला या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. समाजाप्रती आपलीही जबाबदारी असल्याचा विचार केला ‘स्नेहा’ने…


image


नव्वदच्या दशकात राष्ट्रीय अतिदक्षता केंद्रात (एनआयसीयू) गरिब वर्गातील कुपोषित आणि अशक्त बालकांवर उपचार करत असताना डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांच्यासमारे एक धक्कादायक केस आली. एका ६ आठवड्यांच्या बाळावर बलात्कार झाल्याच्या घटनेने ते हादरुन गेले. याच घटनेमुळे स्नेहा (सोसायटी ऑफ न्युट्रिशन, एज्युकेशन अँड हेल्थ ऍक्शन) हा संस्थेचा जन्म झाला. स्नेहा ही अशी एक संस्था आहे जी महिलांना शिकवते आणि त्याचबरोबर समाजातील क्रुरतेचा सामना करण्यासाठी त्यांना सक्षम करण्याचं कामही करते. एनआयसीयूमध्ये काम करत असताना एक गोष्ट स्पष्ट झाली होती की महिलांवर खूप मोठ्या प्रमाणात बळजबरी केली जातेय. पण जिथे त्यांच्यावर अत्याचार झाले होते त्याच ठिकाणी एनआयसीयूमधून पुन्हा त्यांना पाठवायचं हा अमानुषपणा होता. याच विचारसरणीमुळे ‘स्नेहा’सारख्या सक्षम आणि सक्रीय संस्थेचा जन्म झाला.


image


स्नेहा या संस्थेची स्थापना होऊन १४ वर्ष पूर्ण झाली आहेत. बालकांमधील कुपोषण, महिला सबलीकरण आणि कौटुंबिक हिंसाचाराबाबत जागृती करणं हा या संस्थेचा उद्देश आहे. याद्वारे स्नेहा या संस्थेने भारतातील लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. या संस्थेने देशभरातील जवळपास १५ हजार महिलांची प्रसुती सुरक्षितपणे होण्यासाठी सहकार्य केलं आहे. तर कौटुंबिक हिंसेच्या बळी ठरलेल्या सुमारे साडेतीन हजार महिलांचं समुपदेशनही केले आहे. मुंबईतील धारावीमध्ये लहान मुलांचं आरोग्य आणि कुपोषण या विषयावर आधारित २१ महिन्यांची प्रशिक्षण आणि प्रायोगिक कार्यशाळा स्नेहा या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आली होती. याद्वारे या भागातील तीव्र कुपोषणग्रस्त मुलांची संख्या २१ महिन्यात १८ टक्क्यांनी कमी करण्यात यश मिळालं. शहरांमधील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी काम करण्याचा आणि ज्या महिलेला आवश्यकता असेल तिला मदत करण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. महिला आणि बालकांच्या समस्या सोडवण्यासोबत शिक्षणाचा प्रसार करण्याचाही संस्थेचा उद्देश आहे. स्नेहा संस्थेला काम करत असताना काही धक्कादायक गोष्टी जाणवल्या. यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक कुटुंब कुपोषण ही गंभीर समस्या आहे हे मानायलाच तयार नव्हते. भारतात तीन वर्षांच्या आतील मुलांपैकी ४६ टक्के मुलं कुपोषित असतात. मुलांचं वय खूप कमी असल्याने कुपोषणाशी संबंधित अनेक बाबी आई-वडिलांना माहित असणं आवश्यक असतं कारण त्यामुळे ते त्या मुलाचं पालनपोषण नीट करु शकतात.


image


सध्या स्नेहा या संस्थेने पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या जवळपास १७ हजार मुलांची आरोग्य तपासणी केली आहे. महिला आणि मुलांना आरोग्य आणि शिक्षणाबाबत मदत करणं एवढाच उद्देश संस्थेचा नाही तर त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी तयार करण्याचाही उद्देश आहे. या कामात प्रसारमाध्यमं आणि सरकारची भूमिका महत्त्वाची आहे कारण त्यांच्या प्रयत्नांमुळे या क्षेत्रात वेगानं परिवर्तन होऊ शकतं. प्रत्यक्षात सरकार आणि प्रसारमाध्यमं यासाठी प्रयत्न करत आहेत पण ही समस्याच एवढी मोठी आहे आणि तिची व्याप्तीही जास्त असल्याने आणखी प्रयत्नांची गरज आहे. चांगलं आरोग्य आणि कुपोषणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जास्त प्रमाणात प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं स्नेहा संस्थेच्या सीईओ व्हेनेसा डिसूजा सांगतात. सरकारच्या सामाजिक कल्याण योजनेद्वारे चालवल्या जाणाऱ्या सामायिक बालविकास सेवा उपक्रमांतर्गत भारतात मुलांमध्ये वाढणाऱ्या कुपोषणाच्या समस्येवर लक्ष ठेवलं जातं, पण तरीही आणखीही प्रयत्न होणं गरजेचं आहे. देशभरातील विविध संस्थांतर्फे अंगणवाड्यांच्या माध्यमातून ३ ते ६ वर्षांपर्यंतच्या मुलांवर लक्ष ठेवलं जातं पण याचा अर्थ शून्य ते तीन वर्षांपर्यंतच्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी कोणतीही यंत्रणाच उपलब्ध नाही, हे धक्कादाययक आहे कारण याच मुलांना कुपोषणाचा सर्वाधिक धोका आहे.


image


शून्य ते ३ वर्षांपर्यंतच्या मुलांना त्यांची आई आणि त्यांच्या कुटुंबियांवर अवलंबून रहावं लागतं. यात आईचं दूध, शासकीय रुग्णांलयांमधून मिळणाऱ्या सोयी सुविधा आणि घरात मिळणारं आरोग्यदायी अन्न हेच मुलांसाठी पालन-पोषणाचा आधार असतं. या मुलांना दिल्या जाणाऱ्या या गोष्टी योग्य असल्या पाहिजेत याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं सेन्हाच्या टीममधील प्रीती पिंटो सांगतात. भारतातील अनधिकृत वस्त्यांमध्ये काम करणाऱ्या स्नेहाच्या टीमला एक गोष्ट आढळली की इथल्या लोकांना मुलभूत सोयीसुविधा मिळवण्यासाठी खूप वाट पहावी लागते. हीच परिस्थिती कुपोषणाला कारणीभूत ठरते. इथं असलेल्या सार्वजनिक आरोग्य़ सेवांच्या अभावामुळे लोकांना आरोग्यदायी वातावरण मिळत नाही. त्यामुळेच इथल्या लोकांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळावं याला स्नेहाच्या टीमचं प्राधान्य असतं. या वस्त्यांमध्ये सांडपाण्याचा निचरा करण्याची कोणतीही व्यवस्था नसते. रस्ते अरुंद असतात, घरातील कचरा रस्त्यांवरच टाकला जातो आणि शौचालयांची तर कोणतीही ठोस उपाययोजनाच नसते. याच कारणांमुळे महिला आणि मुलांमध्ये आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. स्नेहा संस्थेने या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे आणि या वस्त्यांमध्ये ते दिसतंही. स्नेहा संस्थेने महिला आणि मुलांना फक्त आरोग्य आणि शिक्षण दिलंय असं नाही तर कौटुंबिक हिंसाचार कायद्याविषयी जागरुकही केलंय. या वस्त्यांमध्ये राहण्यासाठी स्वच्छ वातावरण तयार करणं हे स्नेहाच्या प्रमुख कार्यांपैकी एक आहे आणि देशभरातही त्यांचं हे कार्य पाहता येऊ शकतं. आपल्या कार्याची माहिती देण्यासाठी संस्थेतर्फे कविताचं उदाहरण दिलं जातं. स्नेहा संस्थेच्या मदतीशिवाय कविताला जीवन जगणं कठीण होतं, कारण कविताला तिच्या नवऱ्यासह सासरच्यांनी ९ महिन्यांची गर्भवती असताना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. ती ७० ते ७५ टक्के भाजली होती. कविताला लग्न झाल्यापासूनच हुंड्याच्या मागणीसाठी दररोज मारझोड केली जात होती. याच प्रतिकूल परिस्थितीत कविताला स्नेहाची साथ लाभली. कविताला योग्य उपचार मिळवून देण्यापासून ते तिच्या केसमध्ये योग्य कायदेशीर सल्ले घेण्यापर्यंत स्नेहा तिच्यासोबत कायम उभी राहिली. जी घटना कविताच्या बाबतीत घडली तशीच घटना इतर महिलांच्या बाबतीत घडू नये यासाठी संस्था प्रयत्न करते आहे आणि महिलांना जागृत करते आहे. महिलांचं सबलीकरण आणि त्यांना असलेले कायदेशीर हक्क त्यांना समजावून सांगण्याचं काम स्नेहा करतेय. स्नेहा संस्थेने देशभरात याबाबत पाऊल उचललं आहे आणि कविता हे त्यांच्या कार्याचं उत्तम उदाहरण आहे.


image


    Share on
    close