विदर्भात कापसाची यशस्वी शेती, निराश शेतक-यांसमोर आदर्श लिलाबाईंचा!

0

ही कहाणी त्याच विदर्भातील आहे, जेथे यशस्वी शेतकरी असल्याची उदाहरणे एखाद-दुसरीच पहायला मिळतात. या भागात ऐकू येतात त्यात आत्महत्या करणा-या शेतक-य़ांच्या किंकाळ्या. त्यांच्या कुटूंबियांचे अश्रू आणि उजाड होत चाललेली शेती. अशातच त्यांच्यातूनच एका यशस्वी शेतक-याची कहाणी पुढे येते, तेंव्हा ते एखाद्या उत्सवा सारखे असते. आणि ती महिला शेतकरी असेल तर कुणालाही तिच्याबाबत जाणून घेण्याची उत्कंठा असणारच. लिलाबाई, या त्या महिला आहेत ज्यांनी हा विचार आपल्या कामातून अयोग्य असल्याचे सिध्द केले आहे की, केवळ पुरूषच यशस्वीपणाने शेती करु शकतात. एक एकर पासून सुरुवात करणा-या लिलाबाईंची आज चाळीस एकर शेती आहे, आणि विशेष म्हणजे त्या स्वत:च या शेतात राबतात. महाराष्ट्रातील पिंपरी गांवी राहणा-या लिलाबाई यांना शेती करण्याची प्रेरणा आशाण्णा तोतावर यांच्या जीवनातून मिळाली. त्या सांगतात की ते पिंपरी गावात राहात होते. त्यांनी यवतमाळ मध्ये मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीनची शेती केली होती. लोकांमध्ये ते त्यामुळे प्रसिध्द झाले होते, आणि सन्मान मिळवत होते. लिलाबाई कमी शिकल्या असल्यातरी त्यांच्याकडे अनेक वर्षांच्या अनुभवाची जमापूंजी आहे. त्याबळावरच त्यांनी गावातील पुरुषांकडून सन्मानाची वागणूक मिळते.

सन१९६५ मध्ये त्यांचे लग्न एका अनाथ व्यक्तीशी झाले. त्यावेळी त्या चवथ्या वर्गात होत्या. असे असले तरी त्यांचे अर्धवट शिक्षण त्यांच्या मार्गात येऊ शकले नाही आणि आज त्या यशस्वी शेतकरी आहेत आणि पतीसोबत मजेत जीवन व्यतीत करत आहेत.

त्यांचे म्हणणे आहे की, पुरुषांपेक्षा बायकाच जास्त चांगली शेती करू शकतात. त्यासोबतच त्या घरकामातही योगदान देतात, त्यामुळे त्या पुरूषांपेक्षा जास्त सक्षम आहेत. या गावातील महिला शेतीमध्ये असतात, आणि पुरुष घरातील कामे सांभाळतात, किंवा जनावरांची देखभाल करतात. लिलाबाई मानतात की अजूनही शेती समजून घेण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे शेतीचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे मात्र जे पीक हाती येते आहे त्याच्या विक्रीनंतर शेतक-यांच्या हाती योग्य मोबदला पडत नाही ही मुख्य समस्य़ा आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात शेतक-यांची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. यातून त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे. त्या सांगतात की, जेंव्हा त्यांनी शेतीची सुरुवात केली त्यावेळी गावातील शेतजमिनींची किंमत प्रति ४०एकरला दहा हजार रुपये होती. सध्याच्या काळात तुम्हाला चाळीस हजार रूपये देण्याचे ठरवले तरी एक एकरसुध्दा मिळणार नाही. शेतीच्या पध्दतीत बदल झालेत. लोकांनी किटनाशके वापरण्यास सुरूवात केली आहे, त्यातून जमिनींची सुपिकता कमी होत आहे. जास्त नफा मिळवण्याच्या प्रयत्नात लोकांनीच जमिनींला रासायनिक खतांमुळे खराब केले आहे. आम्ही प्रयत्न करतो की कमीतकमी खते वापरली जातील आणि शेती तसेच जमिनीला वाचविता येईल.

लिलाबाई सांगतात की, त्या सुरूवातीपासून शेतीच करतात. त्यांनी सांगितले की सुरवात केली तेंव्हा तर त्यांच्याजवळ एक एकर जमीन सुध्दा नव्हती. कुटूंबाची आर्थिक स्थिती देखील खराब होती. पण त्यांनी हार न मानता आणि बचत करून त्यातून सन१९६९मध्ये हजार रुपयांना चार एकर जमीन विकत घेतली. त्यानंतर त्यांच्या यशाची कहाणी सुरू झाली. एक-एक करून त्यांनी जमिनी विकत घेतल्या, आज त्यांची किंमत पन्नास लाख रुपये प्रति चार एकर पर्यंत पोहोचली आहे. त्यांनी शेती करतानाच केलेल्या बचतीतून तीस एकर जमीन घेतली आणि त्यातही शेतीची सुरुवात केली.

त्या अभिमानाने सांगतात की, त्यांच्या घरातील रोज लागणा-या सा-या जिनसा त्यांच्या शेतातूनच येतात आणि कित्येकवर्षांपासून त्यांनी धान्यदुकानातून काहीच खरेदी केली नाही. त्या दहा एकरात ज्वारी, दोन एकरात गहू आणि एक एकरात तांदुळांची शेती करतात. बाकीच्या जमिनीवर त्या कापूस आणि सोयाबीनचे पिक घेतात. शेतात काय पेरायचे किती पेरायचे याचे निर्णय त्या स्वत:च घेतात. आपल्या मेहनतीने त्यांनी शेतीतून खुप उत्पन्न मिळवले आहे, त्यातून आपल्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच त्यांनी मुलांच्या शिक्षणावरही खर्च केला आहे. आज त्यांच्याकडे एक मोठे साठवण केंद्र आहे ज्यात त्या शेतीतून आलेला कापूस साठवून ठेवतात. त्यातून तो सुरक्षित राहतो आणि बाजारात त्यांना चांगली किंमत मिळते. ज्यावेळी गावातील शेतक-यांना प्रति क्विंटल कापसाला ३८०० रुपयांचा भाव मिळतो, त्याचवेळी लिलाबाई त्यांचा कापूस ४२०० रुपयांना कापूस विकण्यात यशस्वी होतात. त्याबरोबरच त्यांच्याकडे १४ पाळीव जनावरेही आहेत. सहा गायी, चार म्हशी, चार बैल आहेत. त्या सांगतात की, त्यांचे मन तर शेतात लागते पण जनावरांशिवाय त्या स्वत:ला अपूर्ण समजतात, असे असले तरी त्यांच्या पालनपोषणाचे श्रेय त्या आपल्या पतीलाच देतात.

लिलाबाईंनी सांगितले की, त्यांच्या घरातल्यांना फार डॉक्टरांकडे जावे लागत नाही कारण घरातील खाणेपिणे शुध्द असते. घरचे दुध आणि घरच्या शेतातील अन्नामुळे सारेच निरोगी आहेत. खरोखर लिलाबाईंचे जीवन कुणालाही प्रेरणा मिळावी असेच आहे. एखाद्या महिलेला शिक्षण नसले तरी किंवा तिचे कपडे आधुनिक नसले तरी ती सशक्त असू शकते, पुरुषांच्या बरोबरीने समाजात तिला मान असतो. लिलाबाईंच्या जीवनाकडे पाहताना हे लक्षात येते की, त्यांनी केवळ शेती करून यश मिळवताना लोकांचा हा समज खोटा तर ठरवलाच की, शेतीत यश मिळत नाही. पण याशिवाय पती आणि कुटूंबावरील प्रेमातून त्यांनी हे देखील दाखवून दिले की शेतकरी देखील सुखाने जगू शकतात. चाळीस एकर शेतीची मालकी मिळवणे साधी गोष्ट नाही. एका महिलेसाठी रुढीवादी समाजात त्यातून सन्मानाची जागा मिळणे निश्चितच उल्लेखनीय कार्य म्हणावे लागेल ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

लेखक : सर्वेश उपाध्याय

अनुवाद : किशोर आपटे.