काय आहे मराठी भाषा? तिचा गौरव? आणि काय आहे तिच्या गौरव दिनाचे महत्व? जाणून घेवूया

काय आहे मराठी भाषा? तिचा गौरव? आणि काय आहे तिच्या गौरव दिनाचे महत्व? जाणून घेवूया

Monday February 27, 2017,

4 min Read

‘माझीया मराठीचिये बोलु कवतिके, अमृता तेही पैजा जिंके’ असे सुमारे साडेसातशे वर्षापूवी ज्या मायबोली मराठीबद्दल संत ज्ञानेश्वर सांगून गेले त्या मायमराठीचा आज गौरव दिन. त्या निमित्त ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ असे म्हणत आपल्या मातृभाषेचा गौरव काय आहे त्याची थोडी माहिती घेवूया! त्यापूर्वी सर्व वाचकांना ‘युवर स्टोरी मराठी’च्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !


image


१) मराठीचा डंका इतिहासात उत्तर भारतात नेहमीच वाजत राहिला, १८५७च्या स्वातंत्र्य समराची सुरूवात जिच्या ललकारीने झाली ती आरोळी मराठमोळ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई तांबे- नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच ‘मी माझी झाशी देणार नाही’ असे म्हणून दिली होती. म्हणूनच कवी वसंत बापट यांनी ‘मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले’ असे म्हटले आहे.

२) रशिया, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत. त्यावर आजही मराठीतून कार्यक्रम सादर होतात.

३) महाराष्ट्राशिवाय देशात हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी बांधव राहतात. तर सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचा या व्यवसायात फ़ार मोठा वाटा आहे. याचे कारण १७६०मध्ये मराठ्यांचे राज्य अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडोदा ते बंगाल असे ‘अटक ते कटक’ पसरले होते. तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर तृतीय क्रमांकावर होती. आज मराठीचे स्थान दहावे आहे. १७६१मध्ये पानीपतच्या पराभवानंतर या साम्राज्याचा काही प्रमाणात –हास होण्यास सुरूवात झाली.

४) आजही कराचीत(पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.

५) मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी अखिल भारतीय संमेलने होत नाही.

६) मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे.

७) संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडीया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.

८) महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.

९) देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा मुंबईचा आहे.

१०) मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर या भाषेला तमिळ भाषेप्रमाणेच ‘अभिजात भाषे’चा दर्जा देण्याच्या प्रयत्नाला हातभार लागणार आहे.

मित्रांनो, मराठीमधील ज्ञात आद्य ग्रंथ समजला जातो तो चक्रधर स्वामी यांचा ‘लिळा चरित्र’ हाच! ज्ञानेश्वरांच्याही आधी होवून गेलेल्या या मानवतावादी संतांच्या साहित्याचे लेखन प्राकृत म्हणजे मराठीत होते. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे आपल्या भाषेतील ‘ळ’ हे अक्षर जपा कारण हेच आपल्या भाषेचे वैभव आहे. कारण केवळ मराठीत ‘ल’ आणि ‘ळ’ ही दोन स्वतंत्र अक्षरे आहेत, हे तुम्हाला माहिती नसेल ना? या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते आहेत मात्र त्यातून वेगळे अर्थ ध्वनित करण्याचे सामर्थ्य माझ्या केवळ मराठीत आहे!

अनेकदा ‘ळ’ चा उच्चार काही लोक सहजपणे ’ल’ सारखाच करतात मात्र ‘ल’ नाही, ‘ल’ आणि ‘ळ’ च्या मधला करतात. पण आपल्या भाषेच्या वैभवाला जपा. या अक्षरांचा नीट समजून वापर करा हेच आजच्या वैभव दिनाचे सांगणे आहे. कारण ‘ल’ हा उच्चार जगातील सर्व भाषांमधे आहे. पण ‘ळ’ हा उच्चार भारताबाहेर फक्त नेपाळमधे आहे, बाकी जगात कोठेही नाही. भारतात देखील ‘ळ’ हा उच्चार सर्वत्र नाही.

संस्कृत मध्येही सध्या ‘ळ’ नाही. हिंदी, बंगाली, आसामी मधे ‘ळ’ नाही. सिंधी, गुजराती मध्ये ‘ळ’ आहे, पण त्याचा फारसा वापर होत नाही. मराठी व दक्षिण भारतातील सर्व भाषात ‘ळ’ आहे, आणि वापर भरपूर आहे. कारण तमिळ आणि मल्याळम, तेलगू या तिन्ही भाषांच्या नावाच्या उच्चारातच ‘ल आणि ‘ळ’ आहे. ‘ल’ व ‘ळ’च्या उच्चारातील सारखेपणा मुळे ‘ळ’च्या ऐवजी ‘ल’ म्हटले किंवा लिहिले तर कुठे बिघडते असे अनेकांना वाटत असेल कदाचित. पण हिंदीत ‘कमल’ आणि मराठीत होते, कमळ!

‘ल’ काय, किंवा ‘ळ’ काय? काय फरक पडतो? पहा मराठीत तसे होत नाही.’ल’ की ‘ळ’ यावरून अर्थात किती फरक पडतो. काही शब्द पाहू. अंमल – राजवट अंमळ - थोडा वेळ. वेळ time समय,वेल- झाड, सायलीचा वेल वगैरे, खल- गुप्त चर्चा किंवा खल बत्ता मधील खल, खळ- गोंद, पाळ - कानाची पाळ, पाल -.सरडा, पाल वगैरे, नाल.-घोड्याच्या बैलांच्या खुरांना मारतात ती धातूची पट्टी, नाळ - बाळ आईच्या पोटात असताना अन्न पुरवठा वगैरे करणारा बेंबीशी संबंधीत अवयव, जिला मराठीत वारही म्हणतात. कल - निवडणूकीचा कल, झुकाव, कळ - वेदना, पोटातील कळ किंवा यंत्राचे बटण, लाल - लाल रंग, लाळ – थुंकी, ओल - पावसात भिंतीला येणारा ओलसरपणा, ओळ – रेघ, मल – शौच, मळ - कानातला, त्वचेचा मळ यापासून गणपती झाला. माल – सामान, माळ - मण्यांची माळ, हार, चाल - चालण्याची ढब त्याची चाल ऐटदार आहे वगैरे, चाळ - नर्तकीच्या पायातील घुंगरांचा दागिना, दल.- राजकीय पक्ष, संघटना जनता दल, पुरोगामी लोकशाही दल, दळ - भाजी अथवा फळाचा गर, वांग्याचे दळ वगैरे, छल.- कपट, छळ – त्रास, काल – yesterday, मागे गेलेला दिवस, काळ - कालखंड वगैरे, मृत्यु. गलका - ओरडा आरडा, गळका - पाण्याचा पाईप लिकेज असणे वगैरे. हे आहे या भाषेचे वैभव आपल्या भाषेला जपा.इंग्रजी, हिंदीचे आक्रमण रोखा. इंग्रजी, हिंदीच्या नादात थाळीला थाली म्हणू नका. खाली म्हणजे वरतीच्या विरुद्ध under, down,हिंदीत.खाली रिकामे, मराठीत गाडी रिकामी होते, खाली होत नाही.’ळ’ जपा मराठीचे सौंदर्य जपा, तिचा अमृताशी पैजा घेणारा गोडवा जपा हेच या गौरव दिनाचे सांगणे आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद!