भुकेल्या पोटासाठी रोटी बँक...

0

मराठवाडा हा अतिशय दुष्काळग्रस्त विभाग आहे. पावसाच्या लहरी कारभारामुळे या दुष्काळात दरवर्षी भर पडतो आहे. यामुळे दिवसेंदिवस मराठवाड्यातल्या लोकांच्या समस्या वाढत आहे. औरंगाबाद हे मराठवाड्यातलं सर्वात मोठं शहर. लोकसंख्येची घनता ही बऱ्यापैकी. औरंगाबादमध्ये राहणाऱ्या एक कोटी १७ दशलक्ष लोकांमध्ये मुस्लिम समाजाची संख्या सुमारे ३१ टक्के आहे. घरात कमवता माणूस एक आणि खायला हात १० अशी अवस्था प्रत्येक घरात असते. त्यामुळे शहरातल्या गरिबीत दिवसेंदिवस भर पडतोय. अनेकांना उपाशी पोटीच दिवस काढावा लागतो. अशी अनेक कुटुंब फक्त घरात अन्न नाही म्हणून वणवण भटकत असतात. कामासाठी.. अन्नासाठी.. ही मंडळी निश्चितच भिकारी नाहीत. फक्त ऐपत नाही. हातात पैसे नाहीत. काम करण्याची इच्छा आहे. पण कमवलेले पैसे पुरत नाहीत. बरं आज ताटात अन्न मिळालं त उद्या मिळेलच याची शाश्वती नाही. असा सामाजिक प्रश्न औरंगाबाद आणि आसपासच्या विभागात सतावतोय. बरं हातावर पोट असणाऱ्या गरीबांची ही संख्या मुस्लिमांमध्ये जास्त असली तरी इतर समाजामध्ये ही ती बऱ्यापैकी आहे. अशावेळी इथं जात-पात न मानता जो भुकेला आहे त्याला रोज पोटभर जेवण मिळण्यासाठी औरंगबादच्या हारुन मुकाती इस्लामिक सेंटरनं 'रोटी बँक' हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. गेल्या दोन महिन्यापासून सुरु केलेल्या या उपक्रमाला आता चांगला प्रतिसाद मिळतोय. हे विशेष. यापूर्वी उत्तरप्रदेशातल्या बुंदेलखंड इथं असाच उपक्रम हाती घेण्यात आला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जीन्सी-बायजीपुरा रोड इथल्या हारुन मुकाती इस्लामिक सेंटरमध्ये ही रोटी बँक चालवण्यात येत आहे. युसुफ मुकाती यांच्या पुढाकारानं ही रोटी बँक चालवण्यात येत आहे. या कामात त्यांची पत्नी कौसर, आणि चार बहिणी सीमा शालीमार, मुमताज मेमन, शहनाज शबानी आणि हुमा परीयानी यांच्या मदतीनं हे रोटी बँक चालवतात.

कशी चालते रोटी बँक?

रोटी बँकची संकल्पना अगदी सोपी आहे. ज्याला शहरातल्या गरीबांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यानं कमीत कमी दोन रोटी (चपात्या) आणि भाजी किंवा मांसाहारी पदार्थ(चिकन-मटन), रोटी बँकसाठी द्यावेत. दिवसभरात जमलेल्या रोटी आणि भाजी किंवा चिकन-मटन गरीब कुटुंबियांना देण्यात येते. हे अन्न इथं देण्यासाठी त्यासंबंधीतला फॉर्म दान करणाऱ्या व्यक्तीकडून भरण्यात येतो. त्यात त्याची संपूर्ण माहिती आणि किती रोटी आणि भाजी दान करणार याचं गणित असतं. जेणेकरुन दिवसाला किती जणांना आपण या रोटी देऊ शकू याचा अंदाज लावणं सोपं जातं. तशीच पध्दत हे अन्न ज्यांना दिलं जातं त्यांच्यासाठी आहे. त्यानं फॉर्म भरुन आपल्याला किती रोटी लागणार आहेत याची नोंद करावी. म्हणजे बँकेत जसे पैश्याची देवाणघेवाण होते किंवा तशीच इथं रोटी डिपॉजिट करता येते आणि रोटी व्हीड्रॉ पण करता येते.

बँकेचं एक तत्व आहे. हे अन्न भिकाऱ्यांना दिलं जात नाही. तर ज्यांना खरंच गरज आहे. ज्यांची क्षमता असूनही ज्यांना स्वत: खायला घेणं जमत नाही, किंवा क्षमता नाही त्यांची नोंदणी इथे करण्यात आली आहे. त्यांना ही रोटी दिली जाते.

रोटी बँक या अनोख्या उपक्रमाबद्दल युसुफ मुकाती सांगतात ”अनेक वर्षांपासून गरीब घरातली माणसांना दोन वेळचं अन्न मिळण्याची समस्या असते. यात मुस्लिम समाजातल्या लोकांची संख्या जास्त आहे. घरात एकूलता एक कमवणारा आणि कुटुंबियांची संख्या पाच ते सात. अश्यावेळी हे कुटुंब एक तर अर्धपोटी जीवन कंठत असतं किंवा मग उपाशीच गुजराण करत असतं. म्हणून रोटी बँक असावी अशी संकल्पना पुढे आली. आपल्या घरातल्या दोन रोटी या लोकांना द्यायच्या आहेत. कल्पना फक्त मनात असून चालत नाही तर ती प्रत्यक्षात आणणंही महत्वाचं असतं म्हणून आमच्या घरातूनच कामाला सुरुवात झाली. अगदी सुरुवातीच्या काळात २५० दाते मिळाले. पाहता पाहता दात्यांची यादी वाढत गेली. हे मोठं मानवीय काम आहे. अशा कामाला लोकांचा हातभार लागतोय म्हणजे लोकांमध्ये माणुसकी अजूनही जिवंत आहे. मी घरात भरलेल्या पोटानं झोपत असताना, काही अंतरावर कुणीतरी अर्धेपोटी किंवा उपाशी झोपलंय ही कल्पना करणं अशक्य आहे. हे भान आलं म्हणजे देणारे हात वाढतात. आम्हाला रोटी बँकच्या संदर्भात हाच अनुभव आलाय.”

सकाळी ११ ते रात्री ११ ही रोटी बँक सुरु असते. लोकांनी दिलेली रोटी, भाजी आणि इतर गोष्टी चांगल्या आहेत ना याची खातरजमा करुन घेतली जाते. इथं आणल्यावर त्याचं योग्य जतन व्हावं आणि अगदी रात्री पर्यंत येणाऱ्या लोकांना ते मिळावं यासाठीची सोयही इथं करण्यात आलीय. रोटी बँकला दान देणाऱ्या लोकांची संख्या वाढतेय आणि त्याचबरोबर इथून रोटी घेऊन जाणाऱ्या लोकांची संख्याही. युसुफ सांगतात, “ ही संख्या वाढणं समाजासाठी लोकांना चांगल्या गोष्टी करायच्या आहेत याचं द्योतक आहे. आम्ही आता दिवसाला सरासरी ५०० कुटुंबांना रोटी पुरवतो. शिवाय एकूण दाते किंवा लाभार्थ्यांमध्ये अन्य समाजाच्या लोकांची संख्याही कमालीची आहे. यामुळे सामाजिक सलोखा ही चांगला राखला जातोय. जाती धर्मापलिकडे जाऊन लोकांनी याकडे पहायला सुरुवात केली आहे हे विशेष.

आता या अनोख्या कार्यक्रमाबाबत जसजसं लोकांना समजायला लागलंय तसतसं लोक स्वत:हून इथं डोनर म्हणून येत आहेत. अनेक लग्नाच्या कार्यक्रमानंतर राहिलेलं अन्न इथं देण्यात येतं. शिवाय अनेकजण आधीच काही प्रमाणात अन्न इथं पाठवून देतात. शिवाय आता कॉर्पोरेट आणि अन्य मोठ्या कंपन्यांकडे ही दान देण्यासाठी आवाहन करण्यात आलंय. मोठे रेस्टॉरंट आणि डिलक्स हॉटेल्स यांनाही अतिरिक्त अन्न, रोटी बँकेला देण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी लोकांच्या घरी जाऊन रोटी आणण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे रोटी बॅंकला चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.

यासारख्या आणखी काही सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या कथा वाचण्यासाठी आमच्या YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

निस्वार्थपणे मोफत शिक्षणसेवा देणारे स्वामी आणि चीन्नी  

महिला ढोल पथकानं दुष्काळग्रस्तांसाठी मागितला धान्याचा जोगवा

गरीबांच्या शिक्षणासाठी लोकल ट्रेनमध्ये ‘दान’ मागणारा प्रोफेसर...

Related Stories

Stories by Narendra Bandabe