टॉकबिज'च्या रूपाने व्हाट्सऍपला पर्याय, पुण्यातील तरुणाची तंत्रज्ञानात गरुडझेप !

1

'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून बेरोजगारांना दिशा देण्याचे काम पुण्यातील एका तरुणाने केल आहे. शेतकरीराजा असो अथवा बिझनेसमन, स्मार्ट फोन हा प्रत्येकाचा अविभाज्य घटक बनत चालला आहे. एकीकडे देशातील शहरे स्मार्ट होत असताना दुसरीकडे प्रत्येक भारतीय स्मार्ट होत चालल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अशातच पुणे शहरातील बिबवेवाडी येथील पंकज साळुंखे या तरुणाने 'टॉकबिज' नावाचा संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचा ऍप विकसित करून देशभरातील स्वदेशीच्या ना-याला एकप्रकारे हातभार लावला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातील प्रत्येक जण आपल्या भावना व्यक्त करत असतो. एकढेच नव्हे तर आपले आर्थिक व्यवहारही मोबाईलद्वारे केले जात आहेत. ज्या ऍपद्वारे प्रत्येक जण एकमेकांशी संपर्क साधत होता ते सर्व परदेशी बनावटीचे ऍप आहेत. अशातच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा देशभरात दिला. त्याद्वारेच पंकज साळुंखे यांना प्रेरणा मिळाली आणि स्वदेशी ऍप तयार करण्याची त्यांनी मनोमन खूणगाठ बांधली.


संगणकतज्ज्ञ असलेल्या पंकज साळुंखे यांनी अहोरात्र मेहनत केली. अखेर त्यांना यश आले आणि 'टॉकबिज' नावाच्या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या ऍपने जन्म घेतला. पंकज यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बघताबघता केवळ महिनाभरात ५० हजाराच्यावर भारतीयांनी 'टॉकबिज ऍप डाउनलोड केले. परदेशी बनावटीच्या व्हाट्सअपला स्वदेशी बनावटीच्या 'टॉकबिज'च्या रूपाने पंकज यांनी भारतीयांना एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

संगणकतज्ज्ञ पंकज साळुंखे म्हणाले की, 'टॉकबिज' ऍपमध्ये फेसबुकसह इतरही अनेक ऍप एकत्रपणे उपलब्ध होणार आहेत. तसेच, महत्त्वाचे म्हणजे देशातील अनेक बेरोजगारांना 'टॉकबिज' ऍप रोजगाराची संधी निर्माण करून देणार आहे. यामुळे अल्पावधीतच 'टॉकबिज'ला उदंड प्रतिसाद मिळत असून, 'मेक इन इंडिया'चे स्वप्न साकार झाल्याचे समाधान पंकज यांना लाभत आहे.

'टॉकबिज' ऍपची वैशिष्टये अशी :
* 'टॉकबिज'वर इतर अनेक सुविधा उपलब्ध असून, बेरोजगारांसाठीही अनेक संधी आहेत.
* आलेला वर्डमेसेज तुम्ही ऐकू शकता. आलेल्या मेसेजखालील बटनाला टच केल्यानंतर वर्ड टू व्हॉईसद्वारे मेसेज ऐकू येतो.
* मेसेज शेड्युल करता येतात. तुमच्या मित्राला अथवा नातलगांना वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्री १२ वाजता शुभेच्छा देणारा मेसेज         टाइम शेड्युल करा. तुमचा मेसेज बरोबर १२ वाजता पोहचेल.
* 'टॉकबिज'वर डीपी ठेवण्यासाठी मल्टिपल सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक डीपी ठेवता येतात.
* फेसबुकवर ज्याप्रमाणे तुम्ही पोस्ट टाकता तशी पोस्ट तुम्हाला 'टॉकबिज'वरूनही टाकता येते, हे विशेष.
* फेसबुकप्रमाणेच स्टेटस आणि प्रोफाइलसुद्धा टाकता येते.
इच्छाशक्ती आणि कष्ट, जिद्द याबळावर यशप्राप्तीचे समाधान लाभते असेच पंकज साळुंखे यांच्या 'टॉकबिज' यास्वदेशी ऍप निर्मितीबाबत म्हणावे लागेल. पंतप्रधान मोदी यांच्या 'मेक इन इंडिया'च्या हाकेला प्रतिसाद दिल्याने सर्व स्तरातून पंकज यांचे कौतुक होत आहे.