‘कोरा’ची कथा : बुद्धी अन्‌ शहाणपणाचा लेखाजोखा!

‘कोरा’ची कथा : बुद्धी अन्‌ शहाणपणाचा लेखाजोखा!

Sunday December 20, 2015,

4 min Read

‘कोरा काय आहे?’ असं जर तुम्ही विचारत असाल तर तुम्ही वेबवरले बरेच काही मुकलेले असता आणि जेव्हा मी खूप काही बोलत असतो तेव्हा अर्थातच मला ‘कोरा’ Quora माहिती असते. थोडक्यात ‘कोरा’ ही एक प्रश्नोत्तरांची वेबसाइट आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष आहे, अशा खुप साऱ्या साइटस्‌ आहेतच की. पण कोराने आपले एक आगळे स्थान निर्माण केलेले आहे. स्वत:चा कोरिव ठसा उमटवलेला आहे. ब्रह्मांडात जे जे म्हणून काही अस्तित्वात आहे, त्या त्या सर्वच गोष्टींसंदर्भात अगदी कुठलाही प्रश्न कुणी उपस्थित केला तर त्याबाबतची इत्थंभूत माहिती बुद्धिनिष्ठ उत्तरादाखल इथं सप्रमाण उपलब्ध आहे.

ॲअॅडम डी’अँजेलो Adam D’Angelo आणि चार्ली चिवर Charlie Cheever यांनी कोराची स्थापना केली. ‘फेसबुक’मध्ये हे दोघे याआधी अभियंता म्हणून होते. जुन २००९ मध्ये ‘कोरा’चा जन्म झाला आणि त्यापुढल्या वर्षी ‘कोरा’चे लोकार्पण झाले. लोकांसाठी ती खुली झाली. फेसबुकमधून आलेल्या मंडळींनी ‘कोरा’ सुरू केल्यामुळे एक आगळे वलय होतेच. हा एक कोरा चेकच होता म्हणा! ‘असाना’ ‘पॅथ’, ‘ज्युमो’, ‘क्लाउडेरा’ या तारांकित यादीत समाविष्ट व्हायला यामुळेच ‘कोरा’ला वेळ जावा लागला नाही. कोराच्या लोकप्रियतेला आकाश अपुरे येऊ लागले. उत्तराच्या शोधात असणाऱ्या जगभरातील वारकऱ्यांसाठी लवकरच ‘कोरा’ म्हणजे एक ‘पंढरपूर’ बनले. उत्तराच्या आशयाचा दर्जा कोराने कायम ठेवला. कोरा अशा लोकांकडून प्रश्नांसाठी उत्तरे उपलब्ध करत असे, ज्यांच्याशी आपला कधी संपर्क होईल, अशी साधी कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. आता हे प्रश्न बघा… मुर्ख बनणे म्हणजे नेमके कसे वाटते? …पेंग्विनला मिठी मारल्यावर कसे वाटते? इतर अन्य कुठल्याही व्यासपीठावरून जी उत्तरे मिळूच शकणार नाहीत, अशी उत्तरे इथं मिळतात. पत्रकारांसाठी तर ‘कोरा’ ही सोन्याची खाणच आहे. माहितीचा स्त्रोत आहे. बातम्यांच्या कितीतरी कल्पना पत्रकारांना या वेबसाइटवरून सुचू शकतात. सुचतात. अशा लोकांशी त्यांचा इथं संपर्क होतो, जे त्यांच्याही कक्षेपलीकडले असतात.

image


उपक्रमाच्या प्रारंभासंदर्भात ॲअॅडम डी’अँजेलो ‘कोरा’मध्ये स्वत:च लिहितो…

‘‘चार्ली आणि मी बरेचसे काम एप्रिल २००९ मध्ये सुरू केलेले होते. काही प्रारूप माझ्याकडे तयार होते. अगदीच शून्यापासून ही सुरवात नव्हती, पण शून्याच्या फार पुढेही नव्हती. जुनमध्ये रिबेकाने ‘कोरा’ जॉइन केली. आघाडीची धुरा सांभाळली. सप्टेंबरमध्ये अभियंता म्हणून केव्हिनने ‘कोरा’ जॉइन केली. दुसरा टप्पा आम्ही जानेवारी २०१० मध्ये हाती घेतला. इतर कुणी यात नव्हते. मी आणि चार्लीने मिळून नऊ महिन्यांत हे काम संपवले. हिशेब केला चार्ली आणि माझे मिळून ९ महिने, रिबेकाचे ७ महिने, केव्हिनचे ४ महिने असा तो होतो. तुम्ही कामाचे माणसी तास म्हणाल तर माझ्या अंदाजाने आठवड्याला ते ६० भरतात. पण मला वाटते विकासचक्राचे नेमके मोजमाप करायचे तर हा काही योग्य मार्ग नाही. कारण उत्पादन विकासाची संपूर्ण प्रक्रिया यात नमूद नाही. कल्पना सुचण्यापासून ते तिच्या अंमलबजावणीपर्यंत आमचे ९ महिने खर्ची पडले. आम्ही सातत्याने कितीतरी कल्पना जोखल्या. त्याच-त्याच कल्पना दुसऱ्यांदाही जोखल्या. कितीतरी वेळा योजना बदलल्या. या काळात पाया आम्ही इतका खोल रचला, की ‘प्रारंभिक उत्पादन’ म्हणूनही आमची इमारत अत्यंत ‘बुलंद’ अशी उभी राहिली. पुढल्या वाटचालीसाठी आम्हाला हे कष्ट कामी आले. पुढली वाटचाल त्याने सुकर झाली. पुढेही या कष्टाचे चिज होतच राहील. बरं या पहिल्या ९ महिन्यांत बाकीचा खुप सारा वेळ इतर कामांतही गेलाच. नेमणुका, औपचारिकपणे कंपनी नियमित करणे, कार्यालयाकरिता जागा शोधणे, ‘डोमेन नेम’ मिळवणे, कर्मचाऱ्यांचे पगार आणि अन्य लाभ ठरवणे अशी आणि अशा स्वरूपाची ही इतर लहानमोठी कामे होती. आवश्यक होती.’’

युजर्सची आकडेवारी आणि इतर कार्यकलापांबाबत कोराने कुठलीही माहिती जाहीर अशी केलेली नाही, पण AppData महिन्याला २ लाख ७० हजार ही आकडेवारी युजर्सबाबत देतो. खरंतर हे म्हणजे हिमनगाचे एक टोकच. ‘कोरा’च्या आशय अन्‌ विषयांची तसेच कार्यकलापांची संख्या हेच या वेबसाइटच्या लोकप्रियतेचे खरे प्रमाण होय. ‘कोरा’ची या वर्षातील मे महिन्यात ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सने वृद्धी झालेली आहे. पिटर थाएलनेही ‘कोरा’चा विकास आराखडा आपल्या योजनेत समाविष्ट केला, यावरून ‘कोरा’चा थाटमाट दिसून येतो. (‘भारतातील नव्या उपक्रमात Peter Thiel चे कसे चुकले’ हे जाणून घेणेही रंजकच ठरावे.)

‘कोरा’ ‘याहू’पेक्षा वेगळे कसे! आहे उत्तर? बरं… सोपं आहे कारण ‘चेक विकिपिडिया’ किवा ‘आस्क युवर टिचर’ सारखी उत्तरं कुठल्याही प्रश्नावर इथं तुम्हाला मिळणार नाहीत. याहू! प्रश्नांच्या संख्येवर भर देते तर कोराच्याबाबतीत तसे नाही. कोराकडे उत्तर द्यायला सिलिकॉन व्हॅलीतील तज्ज्ञांचा चमू आहे. इथं दर्जा महत्त्वाचा आहे. ट्विटरप्रमाणे कोराचाही दरारा आहे. अर्थातच ट्विटर आणि कोरामध्ये फरक आहे. कोरा हे एक एकात्मिक माहितीचा स्त्रोत आहे, तर ट्विटरची अंगभूत गुणवत्ता वेगळी आहे. ट्विटर हे ब्रेकिंग न्यूजसाठी आहे. कोरा हे अचुक आणि विस्तृत माहितीसाठी आहे.

image


कोरातील उत्तरांत दृष्टिकोनांतील वैविध्य आणि खोली आढळते. बरेचदा इथं पत्रकारांनाही चिमटा काढला जातो. जे लोक कधी कुणाशी बोलत नाही ते त्यांचे मत इथं खुलेपणाने व्यक्त करतात. मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक जटिल प्रश्नांची तालिका आणि आणि या तालिकेच्या उत्तरांची मालिका असे ‘कोरा’ हे एक अत्यंत भव्य असे भांडार आहे.

थोडा वेळ काढा कधीतरी आणि एखाद्या बुद्धिचातुर्यपूर्ण विषयावर ‘कोरा’मध्ये गुदगुली करून तर बघा…


लेखक : जुबिन मेहता

अनुवाद : चंद्रकांत यादव