ग्रबिटची पौष्टीक खाद्य वितरण सेवा खास व्यस्त मुंबईकरांसाठी

ग्रबिटची पौष्टीक खाद्य वितरण सेवा खास व्यस्त मुंबईकरांसाठी

Thursday December 24, 2015,

4 min Read

आज आरोग्याबाबत जागरुकता निश्चित निर्माण झाली आहे. तसेच योग्य आहार आणि व्यायामाचे महत्वही लोकांना पटले आहे. पण विशेषतः घरापासून दूर रहाणाऱ्यांसाठी घरच्या अन्नासारखे पोषक जेवण मिळणे दुरापास्त झाले आहे आणि योग्य आहाराचे महत्व कितीही पटत असले, तरी हॉटेलमध्ये मिळणारे तेलकट जेवण घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच राहिलेला नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेत, जुन २०१५ ला ग्रबिट (Grubit) या स्टार्टअपला सुरुवात झाली. ही कंपनी सुरु करण्यामागे लक्ष्य होते, ते ग्राहकांना पौष्टीक आहार, वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ आणि रास्त दरात योग्य त्या प्रमाणात अन्नपदार्थ पुरविण्याचे... ही कंपनी सुरु करण्यामागे आणखी एक विशेष उद्देश होता. आरोग्यपूर्ण जीवनशैली असावी, अशी आजकाल खरे तर प्रत्येकाचीच इच्छा असते, मात्र त्यादृष्टीने अतिशय आवश्यक असे पोषक, चविष्ट, वैविध्यपूर्ण आणि महत्वाचे म्हणजे कॅलरी काऊंटेड असे जेवण तयार करण्यासाठीचा उत्साह नसतो. इच्छा आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये असलेले हे अंतर भरुन काढणे हा ग्रबिटचा महत्वाचा हेतू होता. त्यादृष्टीने प्रत्येकाच्या गरजेनुसार योजिला गेलेला आहार, कॅलरी काऊंट आणि दररोज नवा मेन्यु या वैशिष्ट्यांचाही त्यांनी आवर्जून समावेश केलेला दिसतो. जाणून घेऊया ग्रबिटची कथा..

मुंबईत स्थित ग्रबिटची मुहूर्तमेढ रोवली ती आयआयटीच्या चार माजी विद्यार्थ्यांनी मिळून... जतीन झकारीया, मानविता जनगम, आयुषी सिंह राठोड आणि हर्षवर्धन जाधव हे चौघे ग्रबिटचे संस्थापक.

image


जतिन सांगतात, “ आरोग्याला पोषक अन्न खाण्याच्या बाबतीत लोक आज खूपच जागरुक झाले आहेत. मात्र रोजचे आयुष्य खूपच धकाधकीचे झाले आहे आणि त्यामुळे घरीच जेवण बनविण्याची पुरेशी इच्छा आणि मुख्य म्हणजे ताकदच उरत नाही. त्याचबरोबर रोजच्या रोज व्यायाम करण्यासाठीही पुरेशी प्रेरणा नसते. हे लक्षात घेऊनच आम्ही योग्य प्रमाणात पोषक जेवण देण्याची सोय देऊ करत आहोत.”

लोकांची आहाराची पातळी लक्षात घेऊन आणि त्यांच्या गरजेनुसार ग्रबिट त्यांना सेवा देऊ करते – कठोरपणे आहाराचे पालन करणाऱ्या व्यक्तींसाठी दर दिवशी ३०० पेक्षा कमी कॅलरीज, खाण्यापिण्याबाबत जागरुक पण खवैये असलेल्यांसाठी दर दिवशी ५०० कॅलरीज आणि माफक प्रमाणात आहाराविषयी काटेकोर असणाऱ्यांसाठी दर दिवशी ७०० कॅलरीज – अशा प्रकारे सेवा देण्यात येते.

ग्रबिटची सुरुवात

कॉर्पोरेट क्षेत्रात वित्त विभागात काम करताना आयुषीला पौष्टीक जेवणाची कमतरता प्रकर्षाने जाणवू लागली. त्यावेळच्या आपल्या अनुभवांबद्दल बोलताना त्या सांगतात, “ मी एक खवय्यी आहे, मात्र घरापासून आठ वर्षे दूर राहिल्याने माझ्या आरोग्यावर विपरित परिणाम झाला. यामागचे सर्वात मोठे कारण होते ते म्हणजे वेळीअवेळी आणि वाईट दर्जाचे जेवण घेण्याची सवय... त्यामुळेच खास करुन घरापासून दूर रहाणाऱ्यांसाठी किंवा अतिशय व्यस्त वेळापत्रक असणाऱ्यांसाठी पोषक, पौष्टीक आणि त्याचबरोबर वेळेवर मिळेल, असे जेवण पुरविण्यासाठी आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली.” ग्रबिटकडे कॅलरीजचा विचार करुन तयार केलेला खास मेन्यू असून, त्यामध्ये कॉंटीनेंटल खाण्यापासून ते अगदी पारंपारीक भारतीय घरगुती जेवणापर्यंत विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत आणि प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार त्यामधून निवड करु शकतात.

image


ग्रबिट खास करुन कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांना सेवा देऊ करते, ज्यांच्याकडे घरी जेवण बनविण्यासाठी आणि कॅलरीजवर लक्ष ठेवण्यासाठी वेळच नसतो. मुंबईमध्ये त्यांचे सर्वाधिक ग्राहक हे लोअर परळ आणि वरळी या भागांतील ऑफीसेसमध्ये काम करणारे असून त्यापाठोपाठ पवईमध्ये मोठी ग्राहक संख्या आहे.

ग्रबिटकडे त्यांचा स्वतःचा पोषणतज्ज्ञ आहे, जो ग्राहकाच्या गरजांनुसार, त्या कॅलरीजमध्ये बसले, अशाप्रकारे प्रत्येक मेन्यू बनवितो. त्याचबरोबर त्यांच्याकडे ‘नो-ऑईल आणि नो-प्रोसेसिंग’ धोरण आहे, ज्यामुळे ठराविक कॅलरीजनुसार जेवण तयार करण्यात ते आणखी वैविध्य आणू शकतात.

“ सध्या आम्ही सदस्यत्वावर आधारीत मॉडेलनुसार काम करत आहोत आणि सकाळी नऊच्या आधीच सर्व मागण्या नोंदविण्यात येतात, जेणेकरुन आम्ही योजनाबद्ध पद्धतीने वेळेत जेवण पोहचवू शकतो,” जतीन सांगतात.

नाष्ट्याच्या वेळी लोक बऱ्याचदा जंक फुड खातात, त्यामध्ये बदल घडविण्याच्या हेतूने ग्रबिटने कोल्ड प्रेस्ड ज्युसेस देण्यास सुरुवात केली आहे. दिवसातील प्रत्येक जेवण हे पोषकच बनविण्याचे लक्ष्य यामागे आहे. ग्रबिटने आतापर्यंत पाचशेहून अधिक पोषक लंच दिले आहेत.

भारतीय खाद्य वितरण बाजारपेठ

वाढते शहरीकरण, खर्च करण्याजोग्या उत्पन्नामधील वाढ, काम करणाऱ्या स्त्रियांची वाढती संख्या आणि स्मार्टफोन्सची वेगाने होणारी वाढ, या सगळ्या गोष्टी आरोग्यदायी जेवणाची वाढती गरज दाखवून देतात. अतिशय व्यस्त वेळापत्रक असणाऱ्यांना कॅलरी जाळण्यासाठी व्यायाम करण्याची इच्छा असते, पण हे नियमितपणे करण्यासाठी लागणारा उत्साह आणि वेळ मात्र त्यांच्याकडे नसतो.

भारतीय खाद्यपदार्थ सेवांची बाजारपेठ ही ५० बिलियन अमेरिकी डॉलर्स एवढी असून ती प्रतिवर्षी अकरा टक्क्यांनी वाढत आहे. तर ऑनलाईन खाद्य वितरणाचे मूल्य हे १५ बिलियन अमेरिकी डॉलर्स असून गेल्या १२ महिन्यांपासून ते ४० टक्क्यांनी वाढले आहे.

image


या क्षेत्रातील इतर खेळाडू

कॅलरीकेअर (CalorieCare), यमिस्ट (Yumist), डायल-ए-डायट “(Dial-a-Diet), फुडीझम (Foodizm) हे ग्रबिटचे काही स्पर्धक आहेत. मात्र या सगळ्यांपेक्षा ग्रबिटचे वेगळेपण हे आहे, की टीफीन, कॅलरी काऊंट, आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ, योजनाबद्ध आहार अशा इतर सेवांच्या सहाय्याने एक व्यापक सेवा देण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. जतीन सांगतात, “ रोज एकाचप्रकारचे जेवण दिल्याने येणारा तोचतोचपणा टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. दररोज आम्ही जगभरातील विविध वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ देऊ करतो. आम्ही केवळ ऑलिव्ह ऑईलमध्येच जेवण बनवतो आणि ते आम्ही आमच्या ग्राहकांना दिलेल्या वचनाप्रमाणेच चविष्ट, पौष्टीक आणि कॅलरीजनुसार असते.”

भविष्यातील योजना

आहार आणि पोषणविषयक सल्ला देऊ शकेल, असे स्वतःचे किचन सुरु करण्याची ग्रबिटची योजना आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीनुसार आहार कार्यक्रम सुरु करण्याची आणि आरोग्यविषयक सेवांची सूची देण्याचाही त्यांचा मानस आहे.

लेखक – सुशील रेड्डी

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन