टॅक्सीचालिका भरती! भविष्यातील भारतात ‘भारती’च ‘भारती!!’

0

पैसा मिळवून देणाऱ्या जवळपास प्रत्येक कामात पुरुषांचीच मक्तेदारी. काही कामे तर खास पुरुषांचीच, मग पुरुषांचेच म्हणून ओळखले जाणारे एखादे काम एखादी स्त्री जेव्हा पहिल्यांदा करते, तेव्हा अवघ्या समाजाच्या भुवया उंचावतातच. अनेक लोक अशा स्त्रीला नावेही ठेवतात. ‘हे काम तर माणसांचं आणि या बयेला काय दुसरं कामंच मिळालं नव्हतं’, असा सल्लावजा प्रश्नही लोकांतून केला जातो.

बंगळुरूत असंच एक अवचित घडलं. भारती नावाच्या भगिनीने टॅक्सी चालवण्याचं लायसन्स काढलं. अन् अवघ्या बंगळुरूची जिभ टाळूला भिडली. कोण काय तर कोण काय बोलू लागलं. अर्थात बंगळुरूतल्या बायका कार वगैरे चालवत होत्या, पण टॅक्सीच्या व्यवसायात एकही बाई नव्हती. आधी लोकांना वाटलं, ‘काढलं असेल लायसन, सहज फॅशन म्हणून वा पॅशन म्हणून पण भारती जेव्हा खरोखर टॅक्सी चालवू लागल्या. प्रवासी भरू लागल्या. लोकांच्या जिभा चराचरा चालू लागल्या. टॅक्सीत ड्रायव्हर सिटवर एक स्त्री बसलेली आहे, हे कुणाला सहन होईना, म्हणजे डोळ्यांना हे असं पाहण्याची सवयच नव्हती ना. भारती यांची टॅक्सी जेव्हा सिग्नलवर थांबायची चारही रस्त्यांवरल्या सर्व नजरा त्यांच्यावर स्थिर व्हायच्या. पण आताशा हे दृश्य बंगळुरूच्या सवयीचं झालेलं आहे.


भारती फॅशन वा पॅशन म्हणून टॅक्सीचालक बनल्या, असे काही नाही. त्यामागे एक कार्यकारणभाव आहे.

भारती मूळच्या आंध्र प्रदेशातील वारंगल जिल्ह्यातल्या. कामधंद्याच्या शोधात त्या २००५ मध्ये बंगळुरूत दाखल झाल्या. आई आणि भाऊही समवेत होते. बंगळुरूतले सुरवातीचे दिवस खडतर असेच होते. नोकरी काय इतकी सहज मिळत नाही. भारती यांनी सुरवातीला मग कपडे वगैरे शिवण्याचे काम केले. मिळेल त्या ऑफिसात पडेल ते काम करणेही सुरूच होते. आला दिवस कसा तरी ढकलणे चाललेले होते. चांगल्या नोकरीचा शोधही सुरू होता. याचदरम्यान एका अशासकीय सेवाभावी संस्थेच्या संपर्कात त्या आल्या. ही संस्था महिला वाहनचालकांच्या शोधात होती. सुरवातीला भारती यांना संस्थेचा हा प्रस्ताव कसानुसाच वाटला.

भारती पहिली भारतीय महिला...

टॅक्सी तर माणसं चालवतात. आपण चालवू शकू का? शिकलो तरी हा व्यवसाय आपल्याला जमेल का? लोक आपल्या टॅक्सीत बसतील का? आपल्याला नावे ठेवतील का? असे नाना प्रश्न त्यांच्या पुढ्यात नाचू लागले. संस्थेच्या स्वयंसेवकांनी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला असे काही उत्तर दिले, की भारती यांचा सगळा भारच हलका झाला. मी टॅक्सी चालवणार, त्यांनी ठरवून टाकले. आणि त्या टॅक्सी चालवणे शिकल्याही. मग आरटीओत लायसन्ससाठी अर्ज केला. टॅक्सीसाठी लायसन्स घेणाऱ्या भारती या पहिल्या भारतीय महिला होत, हे येथे उल्लेखनीय!

नवी दिल्ली! भारताच्या राजधानीतून भारती यांना मग नोकरीचा एक प्रस्तावही आला. पंधरा हजार रुपये दरमहा वेतनाची हमी देण्यात आली, पण भारती यांनी नम्रपणे नकार दिला. बंगळुरू त्यांना सोडायचे नव्हते. बंगळुरूतच टॅक्सी चालवायची म्हणून त्यांनी मग वेगवेगळ्या ट्रॅव्हल एजन्सीज्ना भेटी देणे सुरू केले. ‘एंजेल सिटी कॅब्स’कडून त्यांना काम मिळाले. ‘एंजेल सिटी कॅब्स’ ही महिला चालकांना प्राधान्य देणारी पहिली ट्रॅव्हल एजंसी. भारती पात्र होत्या. कुठलीही अडचण आली नाही. काही दिवसांनी ‘उबेर कॅब्स’ने भारती यांना संधी दिली. वेतनातही लक्षणीय वाढ दिली. भारती या ‘उबेर कॅब्स’च्या पहिल्या महिला चालक.

भारती आता मर्सिडिज घेणार...

टॅक्सीच्या वेगासह भारती यांच्या आयुष्यालाही आता वेग आलेला होता. पैसा खुळखुळू लागलेला होता. थोड्याच दिवसांनी भारती यांनी स्वत:ची कार विकत घेतली आणि तीही ‘फोर्ड फिएस्टा!’ भारती मागे वळून बघायलाच तयार नाहीत. आता त्यांचे मर्सिडिज घेण्याचे चाललेय. बंगळुरूत आता अनेक महिलांनी टॅक्सी चालक म्हणून आपली व्यावसायिक कारकीर्द सुरू केलेली आहे आणि भारती याच या सगळ्या जणींच्या प्रेरणास्थान आहेत. एकदा प्रसिद्ध महिला उद्योगपती तथा ‘बायोकॉन’च्या अध्यक्षा किरण मुजुमदार-शाह यांनी स्वत:साठी म्हणून टॅक्सी बुक केली होती आणि भारती जेव्हा त्यांना घ्यायला गेल्या, तेव्हा त्या थक्क झाल्या होत्या. किरण यांनी भारती यांचे कोण कौतुक केले होते!


टॅक्सीचालक म्हणून महिला का पुढे येत नाहीत, त्यामागे तीन मुख्य कारणे असल्याचे भारती यांचे मत आहे. एक महिला टॅक्सीचालक म्हणून आजवर आलेल्या अनुभवांच्या आधारावर त्या सांगतात…

१) महिला वाहनचालकांच्या क्षमतेवर लोकांना विश्वास नसतो.

२) टॅक्सी चालवणे, हे पुरुषांचेच काम आहे. बाईबापडी कशी चालवणार टॅक्सी, अशी समाजाची मानसिकता आहे.

३) महिला स्वत:ही महिलांसाठी ठरलेली साचेबद्ध कामे करण्याला प्राधान्य देतात. शिक्षिका, परिचारिका आदी. टॅक्सीचालिका हा शब्दच महिलांना चमत्कारिक वाटतो.

पण, मागे देशाच्या राजधानीत… हो नवी दिल्लीतच… घडलेल्या एका गुन्ह्यात एक महिला प्रवासी टॅक्सीचालकाच्या पुरुषी मानसिकतेचा बळी ठरली. आणि या दुर्घटनेने देशभरातील महानगरांतून महिला टॅक्सीचालकांचा भाव वधारला. अनेक महिला प्रवासी आता महिला टॅक्सीचालिकेची मागणी करू लागलेल्या आहेत. सध्याच महिला टॅक्सीचालिकांचे प्रमाण बऱ्यापैकी वाढलेले दिसते आहे. टॅक्सीच्या स्टिअरिंगवर भविष्यात भरपूर भारती भारतामध्ये दिसतील!


लेखक : आलोक सोनी

अनुवाद : चंद्रकांत यादव