वयाच्या ५५ व्या वर्षी यश मिळवणारा तरुण : अच्युता बचल्ली

वयाच्या ५५ व्या वर्षी यश मिळवणारा तरुण : अच्युता बचल्ली

Wednesday November 04, 2015,

4 min Read

तरुण उद्योजकांच्या यशाच्या कथा आपण दररोज ऐकतो आणि वाचतो. पण यूनीलॉग कंटेन्ट सोल्युशंसचे संस्थापक अच्युत्ता बचल्ली यांनी आपली जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर वयाच्या ५५ व्या वर्षी नोकरी सोडून उद्योगात प्रवेश केला आणि तो यशस्वी करुन दाखवला आहे. ज्या वयात लोकांना निवृत्तीचे वेध लागतात त्याच वयात अच्युता यांनी १५ वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला. ही कंपनी माहितीचं व्यवस्थापन, उत्पादनाचे तक्ते आणि प्रचंड माहितीच्या विश्लेषणाचं काम करते. ही कंपनी आज अमेरिका आणि युरोपातील ४५ ग्राहकांना सेवा पुरवत आहे.


अच्युत्ता बचल्ली ,संस्थापक ,यूनीलॉग कंटेन्ट सोल्युशंस

अच्युत्ता बचल्ली ,संस्थापक ,यूनीलॉग कंटेन्ट सोल्युशंस


एका कंपनीत नोकरी करत असताना अच्युता हे आपल्या कामामुळे मोठ्या पदापर्यंत पोहोचले होते. अनेक परदेश दौऱ्यांमधून त्यांनी कंपनीला १.५ कोटी डॉलर कमवून दिले होते. त्यांचे परदेशातील ग्राहक त्यांनाच कंपनीचे मालक समजायचे. पण भारतात करारासाठी आल्यानंतर त्यांना त्या प्रक्रियेत मी कुठेही दिसत नसे. त्यातूनच मग काहीतरी नवीन आणि ओळख देणारं करायचं या निश्चयातून यूनीलॉग सोल्युशन्सची संकल्पना अस्तित्वात आली.

स्टार्टअपचा निर्णय घेतला असला तरी आपल्या आधीच्या कंपनीशी स्पर्धा करायची नाही असा निश्चिय त्यांनी केला. यूनीलॉग सोल्युशन्सचं आधीचं नाव श्रीसॉफ्ट होतं. या अंतर्गत डेटा एंट्री आणि कॅटलॉगसारख्या सामान्य सेवा दिल्या जायच्या. नंतर त्यांनी डेटा क्लीनसिंग, टॅक्स ऑन मेल सर्विस यासारख्या सेवा सुरू केल्या. दोनवर्षांपूर्वी त्यांनी उत्पादन विकासाच्या कामाला सुरूवात केली आहे.

यूनीलॉग सोल्युशन्सला पहिलं ग्राहक कसं मिळालं याची कथा अच्युता यांचे पुत्र आणि कंपनीचे विक्री प्रमुख सुचित बचल्ली सांगतात तेव्हा अच्युता यांच्या समर्पणवृत्तीची प्रचिती येते. अमेरिकेतील एक बायोटेक्नॉलॉजी कंपनी फिशर सायंटिफिकने अच्युता यांना बोलणीसाठी बोलावलं पण विमानाच्या तिकीटासाठी पैसे नसल्यानं त्यांनी क्रेडीट कार्डवर सोनं खरेदी केलं आणि ते मोडून त्यातून आलेल्या पैशातून ते अमेरिकेला गेले. तिथं जगात पहिल्या तीन क्रमांकांवर असलेल्या आयटी फर्मपैकी एकाशी यूनीलॉगची स्पर्धा होती. पण अखेर ते काम अच्युता यांनाच मिळालं कारण अच्युता यांनी त्यांच्याकडे काहीही काम नसल्याचं प्रामाणिकपणे फिशर सायंटिफिकच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. तसंच बोलणीसाठी वकील आणणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केल्यानं कंपनीचे अध्यक्ष वॉल्टर राऊस एवढे खूश झाले की आज ते यूनीलॉग सोल्युशन्सचे सल्लागार आहेत.

अनेक गोष्टी नशीबानं मिळाल्यानं प्रगती करता आली असं अच्युता प्रामाणिकपणे सांगतात.पण त्याचबरोबर लोकांवर विश्वास दाखवा आणि त्यांना सोबत घेऊन काम करा. कर्मचाऱ्यांवर कोणताही दबाव न टाकता त्यांच्याकडून काम करुन घेतलं तर त्याचे परिणाम सकारात्मक असतात. एका केमिकल कंपनीत काम केलं असलं तरी अच्युता यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम सुरू केलं कारण तेव्हा या क्षेत्रात जास्त संधी होत्या. सुरूवातीला सारं काही सुरळीत होतं, पण २००१ मध्ये इंटरनेटच्या उद्य़ोगातील मंदीचा फटका कंपनीलाही बसला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या १०० वरुन थेट १५ वर आली. २००४ मध्ये सुचित कंपनीत आले तेव्हा कंपनी पुन्हा उभी करावी लागणार होती. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीचा हळूहळू पण सतत विकास होतोय.

नोकरीत असताना संपूर्ण जग फिरल्यामुळे या क्षेत्रात भविष्यात खूप उत्पन्न असेल याचा अंदाज असल्यानं हे क्षेत्र निवडल्याचं अच्युता सांगतात. त्यांनी आपले नातेवाईक आणि मित्रांकडून पैसे उधार घेऊन व्यवसाय सुरू केला. आता कंपनीचं उत्पन्न कोट्यवधींच्या घरात गेलंय.

यूनिलॉगने सुरूवातीला अभियांत्रिकी सेवांच्या आऊटसोर्सिंगचं काम केलं. विविध प्रकल्प, रासायनिक कारखाने, रिफायनरी यांना सेवा पुरवणाऱ्या सल्लागार कंपन्यांना अभियांत्रिकी सेवांच्या आऊटसोर्सिंगचं काम दिलं जायचं. तसंच त्यांनी कॅड ड्रॉइंग आणि जीआयएस पिक्चर्ससाठी बिल बनवण्याचा कामं केलं. यूनीलॉग आता एक सेवा कंपनीऐवजी निर्मिती करणारी कंपनी बनली आहे. हळूहळू कंपनी आता फक्त आपल्याच उत्पादनावर सेवा देणार असल्याचे संकेत सूचित देतात.

यूनीलॉग CIMM2 आणि XRF2 नावानं दोन उत्पादनांची विक्री करते. CIMM2 हे ऑलनाईन स्टोअर्ससाठी ई कॉमर्सचा सर्वसमावेशक उपाय आहे. तर XRF2हे असं उत्पादन आहे ज्याच्या माध्यमातून माहितीचं विश्लेषण करण्यासाठी उपयोग होतो. मैसूरमध्ये 'आर अँड डी' (रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेन्ट) केंद्राची उभारणी केल्याचा यूनीलॉगला अभिमान आहे. या केंद्रात मैसूरच्या आसपासच्या परिसरातील ४०० अभियंते आणि पदव्युत्तर पदवीधारक कर्मचारी आहेत. अच्युता हे मैसूरमध्ये शिकले आहेत त्यामुळे तिथेच 'आर अँड डी' केंद्र उभारल्याचा त्यांना अभिमान आहे आणि त्यातून त्यांनी खर्चही कमी केला आहे.

यूनीलॉगचे कर्मचारी अहोरात्र काम करत असतात. कंपनी त्यांना ओव्हरटाईम देत नाही. कोणतीही समस्या असली तरी आमचे कर्मचारी वेळकाळाचा विचार न करता ती सोडवण्यासाठी सज्ज असतात, असं सुचित सांगतात. मोबाईल ऍप्लिकेशन आणि फॉर्च्युन ५० कंपन्यांना उपाययोजना देण्यासाठी यूनीलॉग कंपनी प्रसिद्ध आहे.

सेवा क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे कंपनीनं २००९ पासून स्वत:चं उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला. सध्या कंपनीची दोन उत्पादनं तयार आहेत. एकदा ही उत्पादनं तयार झाली की कंपनी सेवा क्षेत्रातून बाहेर पडून फक्त उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्याच्या विचारात असल्याचे संकेत सुचित देतात.

सुचित बचल्ली

सुचित बचल्ली


यूनीलॉगकडे काहीतरी नवीन सुरू करण्याची क्षमता आहे. वडिलांना सुरू केलेले हे काम सतत करत राहण्याचा निर्धार सुचित व्यक्त करतात. नवीन उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांकडे नाविन्यपूर्ण संकल्पना असावी आणि त्याचबरोबर त्यांच्यात महत्त्वाकांक्षा आणि धैर्य असलं पाहिजे या दोन महत्त्वाच्या गोष्टी धान्यात ठेवण्याचा सल्ला अच्युता तरुणांना देतात. नवीन उद्योजकांनी आपल्या संकल्पनेचा एकच आराखडा तयार करावा त्याला पर्यायी आराखडा ठेवूच नये म्हणजे त्यावर एकाग्रतेने काम करता येते. हे सांघिक काम आहे. उत्पादन, विक्री आणि आर्थिक व्यवहार पाहणारे तीन स्वतंत्र लोक असावेत, त्यामुळे कामात सुसूत्रता येते असंही अच्युता सांगतात.