आजारापेक्षा आरोग्याकडे, दुःखापेक्षा आनंदाकडे आणि भीतीपेक्षा प्रेमावर लक्ष्य केंद्रित करण्याची गरज आहे - चिलू चन्द्रन

0

नव्याने आयुष्य सुरू करायला कुठलेही काळाचे किंवा वयाचे बंधन नाही. आपल्याकडे जर इच्छाशक्ती असेल, कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायचे धैर्य असेल, आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारायची तयारी असेल तर आपण जीवनात कशावरही मात करू शकतो, हे डिबाॅक्सच्या संस्थापक चिलू चन्द्रन यांच्या उदाहरणावरून दिसून येते.  "मी कधी आरशात धड बघितलेही नव्हते. या पृथ्वीवरील सर्वात मोठे ओझे मी आहे, मी काहीच कामाची नाही, काहीही चांगले करायला मी अजिबातच सक्षम नाही असे मी ठरवून टाकले होते. माझ्या बाबतीत जे जे वाईट घडले त्याचा सगळा दोष मी स्वतःला द्यायचे आणि जे काही चांगले घडायचे त्याचे श्रेय मी दुसऱ्या कोणाला तरी किंवा नशिबाला द्यायचे ". चिलू सांगतात.  

जगभरातल्या अनेक स्त्रियांना स्वतःच्या जीवनात आणि चिलू यांनी वर व्यक्त केलेल्या मनोगतात साधर्म्य आढळेल, म्हणूनच चिलू यांची कहाणी सांगण्याची गरज आहे. आम्ही चिलूशी संवाद साधला. त्यांच्या आत्मशोधाच्या आणि आत्मस्वीकृतीच्या प्रवासाचा हा वेचक अंश.

''माझा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी माझे वडील मुलगीच व्हावी म्हणून मदुराईच्या देवळात आर्तपणे प्रार्थना करत होते . डिसेंबर १९६३ मध्ये एका पुरोगामी मध्यमवर्गीय तामीळ ब्राह्मण कुटुंबात चिलू यांचा जन्म झाला. मुलाच्या जन्मानंतर साडेतीन वर्षांनी झालेल्या या मुलीची कुटुंब उत्कटतेने प्रतीक्षा करत होते.

त्यांचे पालक परंपरावादी होते पण तरीही काळाच्या पुढे जाऊन विचार करणारेही होते. त्यांची आई सुरुवातीला गृहिणी होती. नंतर ती पर्यायी उपचार क्षेत्रात अग्रणी ठरली. त्यांच्या वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे त्यांचे शिक्षण बंगळूरू आणि चेन्नईला झाले. शेवटी १९८५ मध्ये त्यांचे कुटुंब मुंबईला स्थिरावले.

''माझ्या पहिल्या विवाहसंबंधात माझा शारीरिक आणि लैंगिक छळ झाला तर दुसऱ्या विवाहात लैंगिक छळाबरोबरच भावनिक आणि मानसिक अपंगत्वही माझ्या वाट्याला आले''. शारीरिक छळात शरीरावर ओरखडे उमटतात. भावनिक आणि मानसिक छळ तुमचे अस्तित्वच पुसून टाकतो. हुशारीने केलेला मानसिक छळ ओळखणे कठीण असते. मला तर तो ओळखायला खूप वर्ष लागली. तीव्र स्वरूपाचा आत्मशोध घेतल्यानंतर मी तो ओळखू शकले. माझ्या दोन्ही विवाहांपैकी जास्त कोणता क्लेशदायक होता हे आजही मला सांगता येत नाही''.

चिलूंना खरे तर पदवीनंतर काही तरी वेगळे करायची इच्छा होती पण लग्न करण्याच्या पालकांच्या इच्छेपुढे त्यांनी मान तुकवली. त्यांचा नवरा निर्व्यसनी होता पण त्यांच्या वैवाहिक आयुष्यातल्या चार वर्षात त्याने त्यांचा शारीरिक छळ केला आणि कार्यालयातही त्यांची प्रतिमा मलीन केली.

गर्भारपणातही त्याने त्यांचा छळ केला. त्यांनी एका मुलीला जन्म दिला पण ७२ तासातच तिचा मृत्यू झाला. दुसऱ्यांदा त्या गर्भवती राहिल्या. ग़र्भपात केला नाही तर त्यांना ठार करण्याची धमकी त्यांच्या नवऱ्याने दिली. आपले दुःख इतरांसमोर मांडायची चिलूंची हिंमत झाली नाही. त्यामुळे हीच गोष्ट मागल्या पानावरून पुढे चालू राहिली. अखेर एका वाईट रात्रीनंतर त्या नवऱ्याच्या तावडीतून पळाल्या. ''अखेर माझा घटस्फोट झाला. मी मुक्त झाले पण स्वतःपासून मी फार दूर गेले होते".

घटस्फोटानंतर वर्षभरातच एका समान मित्राच्या माध्यमातून एका माणसाशी त्यांची भेट झाली. त्यांच्या पहिल्या नवऱ्यापेक्षा त्यांना तो पूर्णपणे वेगळा वाटला. त्या प्रेमात पडल्या. त्यांनी पुन्हा लग्न केले. ''कधी लग्न होतंय असे मला वाटत होते. कारण यशाचे, सुखाचे मोजमाप मी नवरा असण्यातच करत होते".

दुसऱ्या विवाहातला त्यांचा नवरा विचित्र हुकूमशहा होता. त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जसे की त्यांनी काय घालावे, काय बोलावे, कसे राहावे, हे तो ठरवत होता . त्यांनी गबाळे कपडे घालणे अपेक्षित असायचे जेणेकरून इतर पुरुषांचे लक्ष त्यांच्याकडे वेधू नये.

चिलू १० वर्षे पूर्णपणे त्याच्या अधीन होऊन राहिल्या. पहिला संसार मोडलेला असल्यामुळे त्याच्या विरोधात उभे ठाकण्याची त्यांची हिंमत झाली नाही. तडजोड करत संसार टिकवणे भाग असल्याचे त्यांना वाटत होते.

त्यांची दोन मुले ही त्यातल्या त्यात त्यांना दिलासा होती. पण अखेर उरलेसुरले मानसिक स्वास्थ्य वाचवण्यासाठी आणि मुलांसाठी शक्तीचा स्रोत बनण्यासाठी संसार मोडून मुलांसह त्या घराबाहेर पडल्या. "मुलांनी त्यांच्या क्षमतांच्या बळावर उभे राहिले पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे हे मला त्यांना उदाहरणावरून शिकवायचे होते. शिवाय सर्व गोष्टींचा त्याग केलेली आणि भविष्यात मुलांना पदोपदी ते ऐकवून दाखवणारी आई मला व्हायचे नव्हते".

"अलीकडेच मी माझे नाव स्वीकारायला आणि त्याच्या वैशिठ्याबाबत अभिमान बाळगायला शिकले आहे". लहानपणापासून चिलूंना स्वतःचे नाव काट्यासारखे खुपायचे. नावावरून सतत त्यांची खिल्ली उडवली जायची . "शाळेमध्ये भर वर्गात एका शिक्षकांनी मला हे कसले नाव असल्याचे खिजवले. पालकांच्या मनात काय होते की त्यांनी असले नाव ठेवले. सगळेजण हसले".

पहिल्या लग्नात सासरचे त्यांचे चिलू नाव पचवू शकले नाहीत म्हणून त्यांनी त्यांचे नाव राजलक्ष्मी ठेवले. त्याचे लक्ष्मी असे लघुकरण पुढे झाले.  दुसऱ्या लग्नातही त्यांचे चिलू नाव खटकले. मग उत्तर भारतीय परंपरेनुसार शालिनी असे त्यांचे नाव बदलण्यात आले."पण हे सर्व व्यर्थ होते. अजूनही सगळे मला चिलू अशीच हाक मारतात. अलीकडेच मी माझे नाव स्वीकारायला आणि त्याच्या वैशिष्ठ्यपूर्णतेबद्द्ल अभिमान बाळगायला शिकले आहे. 

माझा गर्भपात झाला होता पण त्यावेळी दोन वर्षांच्या असलेल्या माझ्या मुलासाठी मला पुन्हा उभे राहायचे होते. त्यांच्या तिसऱ्या गर्भारपणातली आणि दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या वेळेची गोष्ट आहे. कमरेखालच्या त्यांच्या चेतनाच त्यांनी गमावल्या. त्यावर शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय होता. यातून त्या पूर्णपणे ब-या होण्याची शक्यता ५० टक्के होती आणि गर्भाला धोका होता. पण धोका पत्करायचा त्यांनी ठरवले. नशिबाने मुलगी वाचली. पण पुन्हा चालण्यासाठी त्यांना दीड वर्ष प्रयत्न करावे लागले. त्यानंतर त्यांना तोंडाचा आणि मानेचा पक्षाघाताचा झटका आला. दोन आठवडे त्या अंथरुणाला खिळून होत्या.

त्यातून पूर्णपणे बरे व्हायला त्यांना बराच काळ लागला. चिलू शारीरिकदृष्ट्या सक्रिय होत्या पण त्यांचा पाठीचा कणा दुबळा झाला होता. बराचसा काळ त्यांना झोपून राहावे लागे. पण कालांतराने त्यांनी झोपून राहायला नकार दिला आणि व्यायाम सुरू केला. काही वर्षातच त्या नृत्याचे विविध प्रकार शिकल्या आणि कार्यक्रमात आठ वेगवेगळी नृत्ये केली.

पुढल्या काही वर्षात त्या एका धावपटूंच्या गटात सहभागी झाल्या आणि प्रथमच त्या मुंबई अर्धमॅरेथॉनमध्ये धावल्या. परिस्थिती सुधारत आहे, असे वाटत असतानाच अचानक २०१३  मध्ये त्यांच्या उजव्या बाजूला पक्षाघाताचा झटका बसला. "याचा परिणाम माझ्या मेंदूवर झाला. मला भोगावी लागलेली ही सर्वात वाईट गोष्ट होती. माझ्या उजव्या हाताची हालचाल होत नव्हती. उजव्या डोळ्याने नीट दिसत नव्हते. चालण्यावर परिणाम झाला आणि मी वाचाही गमावली. एखाद्या लहान मुलाप्रमाणे मला नव्यानं सुरुवात करावी लागली". पण कठोर परिश्रमांच्या बळावर ब-याच हालचाली त्या पूर्वीप्रमाणे करू लागल्या आहेत.

"स्वतःमध्ये काही बदल घडवायचा असेल तर तो केवळ आपण आणि आपणच घडवू शकतो. बदलासाठी केवळ आपण स्वतःच बदलायची आवश्यकता असते. आपण बदललो तर सर्व काही आणि आपल्या भोवतीचा प्रत्येक जण बदलतो."

जेव्हा त्या त्यांच्या दुस-या विवाहसंबंधातून बाहेर पडल्या तेव्हा त्यांच्याकडे ना पैसे होते, ना धड नोकरी होती ना त्यांना त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा होता. एक वेळच्या जेवणाचीही त्यांना भ्रांत असायची. घटस्फोटातून मानसिक शांतीखेरीज त्यांना पोटगीदाखल काही मिळाले नाही. न्यायालयीन लढाई लढणे त्यांना परवडणारे नव्हते. त्या निराशेच्या तीव्र गर्त्यात सापडल्या. धूम्रपान आणि मद्यपान त्या करू लागल्या. आत्मशोधासाठी त्यांनी मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. आत्महत्येचा विचार त्यांच्या मनात डोकावू लागला.

एक दिवस स्वतःला संपवण्याच्या उद्देशाने त्या त्यांच्या इमारतीच्या १९व्या मजल्यावर गेल्या. "उडी मारण्याच्या हेतूने मी पॅरापेटवर उभी होते. अचानक एखाद्या ताकदीने मला मागे खेचल्याचे जाणवले आणि मी सुखरूपपणे बाजूला पडले. मला भान आले आणि जाणीव झाली असा भेदरटपणा करण्याएवढी का मी कवकुवत आहे. स्वतःचे जीवन बदलण्याचा आणि मुलांसाठी जगण्याचा निर्णय मी घेतला."

त्या क्षणापासून परिस्थिती बदलायला लागली. चिलू पुस्तकं वाचू लागल्या, शोध घेऊ लागल्या, आध्यात्मिक मेळ्यांना जाऊ लागल्या. त्यांनी उपचार घेतले. आपली वेदना समजून घेण्याचा प्रयत्न त्या करू लागल्या. स्वतःला पत्र लिहायला त्यांनी सुरुवात केली. हळूहळू चिलूंनी जीवनकौशल्यं आत्मसात केली आणि जीवनातल्या अपरिहार्यतेबद्दल त्यांना प्रश्न पडू लागले.

" आपण ज्या चौकटीत प्रेम करतो त्याला आव्हान दिल्याने निराशेवर मात करण्यात मला साहाय्य मिळाले. मी काही वाईट व्यक्ती नव्हते आणि आयुष्यात पुढे चांगल्या गोष्टी घडतीलही, ज्याला मी लायक आहे हे मला जाणवले. निरुपयोगीत्वाची भावना मनातून पूर्णपणे निघून गेली. मुलांचं निर्व्याज, अमाप प्रेम आणि विश्वास यामुळे स्वतःची किंमत मला कळली."

मात्र तरीही परिस्थिती पूर्णपणे सुधारली नव्हती. अधूनमधून त्यांना निराश वाटत असे. अशाच एके दिवशी आपल्या चिंता दारूच्या पेल्यात बुडवण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. सर्व काही संपवण्यासाठी पुन्हा खिडकीकडे लक्ष जात होते. मग त्या रडल्या. निराशेवर मात करता यावी यासाठी हसल्या आणि मग झोपण्यासाठी त्यांनी स्वतःला बजावले. दुस-या दिवशी सकाळी त्या उठल्या तेव्हा ज्या प्रश्नांची उत्तरे त्या शोधत आहेत ती आपल्या अंतर्मनातच असल्याचे त्यांना जाणवले. या आत्मजाणीवेतूनच मला ताकद मिळाली आणि मी प्रेरित झाले. 'आपल्याकडे नेहमी पर्याय उपलब्ध असतो आणि नियमाला कोणीही अपवाद नसतं, याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे.'

या जगात बदल घडवण्याच्या उद्देशाने डिबॉक्सची स्थापना करण्यात आली आहे. आजारपणामुळे अनेक गोष्टी चिलूंच्या विस्मरणात गेल्या.

आजूबाजूची प्रत्येक गोष्ट त्यांना अनोळखी आणि नवीन वाटू लागली. काही वेळा काही गोष्टी मला आठवायच्या मग मी मलाच प्रश्न विचारायचे या घटनेतून मला काय संदेश मिळाला. यासंदर्भात मी पुस्तक लिहिले असून, ते प्रकाशित व्हायचे आहे.

याचाचा दुसरा भाग म्हणजे त्यांनी एक उपक्रम सुरू केला आहे. ज्यातून लोकांना मर्यादित जाणिवांपलीकडे जाऊन विचार आणि कृती करायला सक्षम केले जाते. 'लोकांचे पूर्वग्रह बाजूला सारून जीवनातली भीती बाजूला सारून प्रेमाने त्यांना जीवन जगण्यास मदत करण्यासाठी मार्ग आहे. मनातले कप्पे बाजूला सारून विचार करण्याची आणि जगण्याची तर गरज आहेच शिवाय खरे तर हे कप्पेच नष्ट केले पाहिजेत. " या उपक्रमाचे नाव 'डिस्ट्रॉय द बॉक्स' वरून डिबॉक्स असे ठेवले आहे. नामकरणाचे श्रेय त्या त्यांच्या मित्राला देतात.

व्यक्तिगत समस्या भेडसावणाऱ्या लोकांचे जीवन सुरळीत व्हावे, यासाठी चर्चा, भावनिक आदानप्रदान, व्यक्त होणे, पोषक आहार या माध्यमातून प्रशिक्षण देणे हा डिबॉक्सचा हेतू आहे. शिबिरं आणि चर्चा 'थिअरी ऑफ अॅब्युन्डन्स'वर आधारित असतात. स्वतःवर प्रेम करणे का आवश्यक आहे? स्वार्थीपणा आणि आत्मकेंद्रितपणा कसे उत्तम गुण आहेत, यावर इथे चर्चा केली जाते.

आपापली समस्या, गोष्ट इथे ऐकली जाते. 'छोट्या छोट्या गटांमधून स्वतःच्या समस्येबद्दल, वैयक्तिक गोष्टींबद्दल बोलल्यामुळे मोठा बदल घडून येतो.' चिलू सांगतात. याखेरीज उत्तम तब्येतीसाठी काही खास पदार्थ इथे दिले जातात. काही नटस, सीड बटरस् आणि असे काही पदार्थ त्यांनी विकसित केले आहेत.

"ही तर सुरुवात आहे" चिलू सांगतात " आजारापेक्षा आरोग्याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. दुःखाऐवजी आनंदावर आणि भीतीऐवजी प्रेमावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपण जे देऊ ते आपल्याला परत मिळणार आहे. आपण जसा विचार करणार आहोत, तसेच प्रत्यक्षात येणार आहे. आपण आपले आयुष्य बदलू शकतो आणि ते पूर्णत्वाकडे नेऊ शकतो. तसेच प्रत्येकासाठी प्रेरणास्रोत होऊ शकतो. विश्वास ठेवण्याची आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याची आपल्याला गरज आहे.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

रात्र गस्तीच्या वेळी तान्ह्या मुलीला सोबत घेऊन जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी 'अर्चना झा'

कथा एका ‘योगा गर्ल’ची  

सर्व अडचणींवर मात करत अंध सिद्धूची कमाल, ९९ कोटीपर्यंत पाढे तोंडपाठ, आता तयारी आयएएसची...

लेखिका : तन्वी दुबे
अनुवाद : सोनाली कुलकर्णी-काकडे