फुटबॉलच्या माध्यमातून गरिबीशी लढा देणारी ʻकिझाझीʼ

0

लहानपणी चालायला शिकल्यापासूनच फ्रान्को सिल्वा हे फुटबॉल खेळू लागले. मुळचे मेक्सिकोचे असलेले फ्रान्को वयाच्या आठव्या वर्षी होस्टन येथे स्थलांतरीत झाले. होस्टन येथील अनेक क्लबसाठी खेळताना फ्रान्को लहानाचे मोठे झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी टफ्टस विद्यापीठात प्रवेश घेतला. विद्यापीठाच्या संघाकरिता ते चार वर्षे खेळले. काही निवडक खेळाडूंसोबत आंतरराष्ट्रीय संघात खेळण्याकरिता त्यांनी स्पेनचा प्रवासदेखील केला. त्यांनी कायम फुटबॉलवर प्रेम केले मात्र त्यांचे ध्येय औषधशास्त्राचा शल्यविशारद होण्याचे होते. ते सांगतात, ʻमला लहानपणापासूनच लोकांना मदत करायला आवडते आणि वैद्यकिय क्षेत्रात मला ते साध्य करता येते. त्यामुळे मला या आव्हानात्मक क्षेत्रात काम करण्यास आवडले असते. अनेक वर्षांकरिता म्हणजेच टफ्टस येथून शिक्षण पूर्ण करेपर्य़ंत माझे हेच ध्येय होते आणि ते पूर्ण करण्यासाठी मी दरदिवशी भरपूर मेहनत करत होतो. मात्र आयुष्याने माझ्याकरिता काही वेगळेच ठरवले होते.ʼ

टफ्टस विद्यापीठातील परिक्षांच्या एका महिन्यापूर्वी ते ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयाचा अभ्यास करण्यासाठी वाचनालयात गेले. तेव्हा त्यांच्या मित्राने त्यांना दुपारनंतर खेळायचे असल्यास येण्यास सांगितले. फ्रान्को सांगतात की, ʻभलेही मी माझ्या अभ्यासाबाबतीत कितीही समर्पित असलो, तरी बोस्टन येथील थंड वातावरणात फुटबॉल खेळायची संधी मला सोडवत नव्हती. अखेरीस मी त्यांच्यासोबत खेळण्यासाठी तयार झालो. १५ वर्षांचा खेळ केल्यानंतर त्या खेळात माझी एवढ्या वर्षांची भीती सत्य ठरली. या खेळात माझ्या गुडघ्याला दुखापत झाली. माझ्या डॉक्टरांनी ही गुडघ्याची दुखापत गंभीर असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.ʼ त्या दुखापतीत फ्रान्को यांचे एन्टेरियर क्रुसिएट लिगामेंट फाटले होते, तसेच त्यांचा गुडघादेखील सरकला होता. वैद्यकिय भाषेत त्यांचा गुडघा कायमचा दुखापतग्रस्त झाला होता. ʻया दुखापतीमुळे माझे आयुष्य गोंधळून गेले होते आणि मी आयुष्याचा पुनर्विचार करू लागलो होतो. या दुखापतीमुळे माझे भौतिक आयुष्यच पालटून गेले होते. मी या दुखापतीमुळे माझ्या शैक्षणिक वर्गांना जाऊ शकत नव्हतो. परिणामी माझा अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण पूर्ण व्हायला वेळ लागला. त्यासाठी मला अजून एका वर्षाचा कालावधी लागला. तर मी आता कधीच खेळू शकत नाही, अशी मला आंतरिक भीती वाटू लागली होती. ही सर्वांकरिता तशी फार मोठी गोष्ट नव्हती. मात्र मी माझ्या संपूर्ण आय़ुष्यातील आनंद फुटबॉल आणि ओळख फुटबॉल या खेळाशी जोडून घेतली होती. त्यामुळे पुन्हा फुटबॉल खेळू शकत नसण्याच्या शक्यतांनी मला पूर्णपणे हादरवले होते. परिणामी मला तणाव वाटत होता.ʼ, असे फ्रान्को सांगतात.

दोन महिन्यांच्या वैद्यकिय उपचारांच्या कालावधीत त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली, तसेच औषधांचा कोर्सदेखील पूर्ण झाला. त्यासोबतच त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. आता त्यांना मेडिकलच्या अर्जाकरिता एक वर्ष वाट पाहायची होती. ʻया कालावधीत मी अनेक विषयांची पुस्तके वाचली तसेच अनेक बड्या हस्तींची भेट घेतली. तर मी अंतर्मनात अनेक शोध लावत होतो. जसे की मी माझी क्षमता तपासत होतो, या क्षेत्राचा एका मिशनप्रमाणे विचार करत होतो फक्त कारकीर्द म्हणून नव्हे. त्यासोबतच मी सामाजिक उद्योजकतेच्या जगाचा विचार केला, असा व्यवसाय ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल होतील.ʼ, असे फ्रान्को सांगतात. तेव्हा त्यांना जगात फुटबॉलचे जे वेड आहे त्याचा फायदा घेऊन गरिबीशी लढण्याची कल्पना सुचली. ʻ३.५ दशकोटी चाहते असलेल्या खेळाचा वापर करुन मी जगासमोरील मोठ्या संकटाला लढा देण्याचा विचार करत होतो. एका सर्वात मोठ्या गोष्टीचा वापर करुन मी दुसऱ्या सर्वात मोठ्या गोष्टीचा सामना करणार होतोʼ, असे फ्रान्को सांगतात. फ्रान्को फुटबॉलबाबतीतील एका वेगळ्या गोष्टीबद्दल सांगतात. फ्रान्को यांचे अनेक आदर्श व्यक्ती अतिशय गरिबीच्या पार्श्वभूमीतून आले आहेत. त्या खेळाडूंनी गरिबीची परिस्थिती अनुभवली असल्याने गरिबीमुळे येणाऱ्या अडचणींची त्यांना माहिती आहे.

फ्रान्को यांनी ʻकिझाझीʼची स्थापना केली. किझाझी याचा अर्थ स्वाहिली भाषेत पिढी, असा होतो. ʻहे नाव सांकेतिक होते. कारण किझाझी याचा अर्थ नव्या पिढीतील खेळाडू, फुटबॉलची नवी पिढीʼ, असे ते सांगतात. सुरुवातीला फ्रान्को यांना फुटबॉल या खेळाचा वापर गरिब मुलांना मदत करण्यासाठी करायचा होता. विक्री केलेल्या प्रत्येक बॉलनंतर ते दुसरा बॉल गरिब मुलांना दान करणार होते. २०१५च्या सुरुवातीला गरिबीचा सामना करण्यासाठी अनुकुल अशा वस्तूंवर ते संशोधन करत असताना अनेक गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या. फ्रान्को सांगतात, ʻअनेक आठवडे सखोल संशोधन केल्यानंतर आमच्या लक्षात आले की, कपडे, जेवण यांसारख्या गोष्टी जर गरिबांना दान केल्या, तर ते अत्यावश्यक परिस्थितीत चालू शकते. मात्र गरिबीच्या मूळ संकटाचा कायमचा निपटारा कऱण्यासाठी हे पुरेसे नाही. त्यामुळे या संकटाची त्यांना अनेकप्रकारे माहिती होत होती, मात्र त्याच्या मुळाशी जाण्यास ते अपयशी होत होते. अनेक प्रकरणांमध्ये लोकांना वस्तू दान करणे, हे तसे पाहता अहितकारक होत होते. त्यामुळे दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याच्या त्यांच्या वृत्तीत वाढ होत होती.ʼ गरिबीवर मात करण्यासाठीच्या दुसऱ्या पर्यायावर फ्रान्को यांनी बराच काळ विचार केला. तेव्हा त्यांना मोहम्मद युनुस आणि त्यांच्या मायक्रोक्रेडिटद्वारे आर्थिक सबलीकरणाच्या मॉडेलची माहिती मिळाली. ʻया माध्यमातून आम्हाला लोकांना स्वतः पैसे कमावण्याची संधी देऊन त्यांची गरिबी दूर करता येणार होती. अशी संधी तयार करणे, हे आमच्या या ध्येयाचे पहिले पाऊल होते.ʼ या कार्यात येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करणे, हे किझाझी याचे सौंदर्य आहे. त्यामुळे फुटबॉल खेळाचा वापर सकारात्मक बदल घडवण्यासाठी होत होता. गरिबीच्या मुळासोबत लढण्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे होते. किझाझीने या दोन गोष्टींमधील दरी मिटवली.

ʻप्रत्येक विक्री होत असलेल्या किझाझी उत्पादनातील नफ्याचा काही भाग आम्ही मायक्रोलोन्सकरिता निधी म्हणून देत होतो. याप्रकारे आम्ही या सर्व प्रक्रियेची पुनर्रचना केली. प्रत्येक वेळी आम्ही एखादे उत्पादन विकत होतो आणि त्याच्या नफ्यातील काही भाग किझाझी फंडमध्ये निधीस्वरुपात देत होतो. त्या निधीतून आम्ही कर्ज देत होतो. प्रत्येक वेळेस कर्ज फेडणे हे जरुरीचे होते. त्यानंतर आम्ही नव्या व्यक्तीला कर्ज देत होतो. अशाप्रकारे ही साखळी सुरू राहिली आणि आमचा निधी कधी पूर्णपणे संपला नाही. उलट त्याचा वारंवार वापर होत राहिला आणि तो अधिक वाढत राहिला.ʼ हे मॉडेल प्रत्येक विक्रीगणिक तसेच उत्पादनागणिक अधिक शक्तिशाली होत गेले. ध्येयप्राप्तीकरिता आम्ही किझाझीला एका ब्रॅण्डचे स्वरुप द्यायचे ठरविले. फिलिपाईन्स, केनिया, बोलिविया, इंडिया, एल साल्वाडोर, माली आणि अझरबैजान येथील लोकांना अगोदरच मायक्रोलोन्सचा पुरवठा करण्यात आला होता. किझाझी ही एक फेयरट्रेड प्रमाणित कंपनी होती. फुटबॉल खेळाकरिता वापरण्यात येणाऱ्या चेंडूंची ते निर्मिती करत होते.

सामाजिक कारणासाठी करण्यात येणारी उद्योजकता ही कमकुवत नसते. अनेक अडचणींवर मात करत ती कायम आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहण्याचा तसेच मार्गावर राहण्याचा प्रयत्न करत असते. फ्रान्को सांगतात की, आमचे पहिले आव्हान हे लोकांमध्ये सकारात्मक परिणाम घडवण्याचे होते आणि ते नक्कीच सोपे नव्हते. ते सांगतात, ʻप्रत्येक मुद्दा हा अडचण अधिक जटील बनवणारा होता. सामाजिक कार्याची जेव्हा लोकांना जाणीव करुन द्यायची असते, तेव्हा आपल्याकडे फक्त काही सेकंदांचा वेळ असतो त्यांना राजी करण्यासाठी.ʼ त्यांच्याकरिता दुसरे आव्हान होते ते आर्थिक निर्णयांचे. वाढता नफा आणि वाढता प्रभाव यांच्यात समतोल राखणे, याचा सामना ते करत होते. याबाबत आपली मते मांडताना फ्रान्को सांगतात की, ʻमाझे लक्ष हे या सर्वाच्या केंद्रस्थानी होते, ज्यावर आमचा सर्वाधिक प्रभाव अवलंबून होता. त्यासाठी आम्ही किझाझीची उभारणी केली होती. असे असले तरी, आम्हाला प्रगती करणे गरजेचे होते आणि त्यासाठी व्यवसाय यशस्वीरित्या चालू राहणे आवश्यक होते. व्यवसायाचा प्रभाव आणि नफ्यात समतोल राखण्यासाठी आम्हाला कायमच अथक प्रयत्न करावे लागले आहेत. सामाजिक उद्योजकतेत कायमच या संघर्षाचा सामना करावा लागतो.ʼ

फ्रान्को सांगतात की, आम्हाला आमची पैशाची मदत करणाऱ्या संस्थेच्या स्वरुपात ओळख निर्माण करायची नव्हती, जी लोकांना गरज असल्यास आर्थिक मदत करते. आम्हाला आमची एका ब्रॅण्डस्वरुपात ओळख निर्माण करायची होती. एक असा ब्रॅण्ड जिथे खेळाडूंना त्यांच्या खेळाचा आनंद घेण्यासाठीची उत्पादने मिळतील. मात्र त्यांची भावना ही बक्षिस घेतल्याप्रमाणेची असेल. कारण ते अशा ब्रॅण्डची उत्पादने वापरत असतील, ज्यांनी सर्व भर हा खेळाच्या सौंदर्यावर दिला असेल ना की खेळाच्या हव्यासावर. अशी भावना खेळांडूंना येण्याकरिता आम्ही सांगतो की, We do not sell a ball, we sell an experience. फ्रान्को यांची किझाझीबद्दल अनेक स्वप्ने आहेत. किझाझी हे त्यांच्याकरिता फक्त स्वप्न नसून, त्यांना अपेक्षित असलेल्या कार्य़ातील क्रांती आहे. त्यांना विश्वास आहे की, कोण्या एका व्यक्तितील क्षमता ते या गोष्टीद्वारे बाहेर काढू शकतात, ज्याची कदाचित त्याला जाणीवदेखील नसेल. ʻमाझे आदर्श हे अनेक ठिकाणी आहेत. मात्र कशाप्रकारे एका मोठ्या यशाची सुरुवात एका कल्पनेपासून होते, यावर आधारित त्या सर्व गोष्टी किंवा विचार आहेत. सर्वात चांगली आणि शक्तिशाली गोष्ट अशी की, मानवताही एका विचारापासून सुरु झाली. तिचे बीज सर्वत्र पेरण्याचे किझाझीचे ध्येय आहे. ज्याची नंतर मोठी झाडे होऊन जगाचे पोषण करतील. मोठ्या गोष्टी मनातच सुरू होतात आणि त्या सत्यात उतरवण्याकरिता अथक परिश्रमांची गरज असते, ही मानसिकता नेहमीच मला प्रेरणा देतेʼ, असे फ्रान्को सांगतात.

लेखक - स्निग्धा सिन्हा

अनुवाद - रंजिता परब

Related Stories

Stories by Team YS Marathi