महिला सक्षमीकरणासाठी अन्यायविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणाऱ्या सुनिता कृष्णन

महिला सक्षमीकरणासाठी अन्यायविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणाऱ्या सुनिता कृष्णन

Tuesday May 24, 2016,

12 min Read

सुनिता लहानपणापासूनच हुशार होत्या. आठ वर्षांच्या असताना त्यांनी गतीमंदी मुलांना नृत्याचे धडे दिले. बारा वर्षांच्या असताना त्यांनी झोपडपट्टीतल्या मुलांसाठी प्रशिक्षण केंद्रं उघडलं, १५ वर्षांच्या होईस्तोवर त्यांनी दलितांच्या उद्धारासाठी कार्य सुरु केलं होतं. किशोरवयात त्याच्यावर सामुहिक बलात्कार झाला. या भयंकर दुर्दैवी घटनेनंतर त्यांनी महिलांच्या शोषण आणि अत्याचाराविरोधात आंदोलन छेडलं. महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी सुरु केली प्रज्ज्वला नावाची संस्था. या प्रज्ज्वलाने हजारो महिलांच्या जीवनात नवीन उमेद जागवली आहे.

image


सोळा वर्षांची ही मुलगी इतर मुलींपेक्षा वेगळी होती. तिचा विचार वेगळा, जगण्याचा दृष्टीकोन वेगळा, स्वप्नं वेगळी आणि ध्येय वेगळी, असं तिचं सगळंच विश्व आगळं होतं. सकाळी ती महाविद्यालयात शिकायला जायची तर संध्याकाळी येताना जवळच्या वेश्यावस्तीत फेरफटका मारायची. ती कधी वेश्यांच्या घरी जायची, तर कधी त्या जिथं जाऊन शरीरविक्री करतात त्या ठिकाणी पोचायची. या मुलीला वेश्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या होत्या. त्यामुळे ती दररोज या वेश्यांना भेटायची, संधी मिळाली तर त्यांच्याशी बोलायची नाही तर लांबूनच त्यांचं काय चाललंय याचं निरीक्षण करायची. दररोज, सतत, वारंवार अनेकांकडून होणारं शोषण आणि त्याच्याशी होणाऱ्या गैरवर्तणूकीला बळी पडणाऱ्या महिलांना बघून या मुलीला दु:ख व्हायचं. तिला नेहमी वाटायचं की अत्याचार करणाऱ्यांपासून या मुलींना मुक्ती द्यावी, कधीतरी संधी मिळाल्यावर ही मुलगी वेश्यालय चालवणाऱ्या सुत्रधारांना विनंती करायची की या मुलींना सोडून द्यावं. पण या मुलीच्या गोष्टी ऐकून शरीरीविक्री करणारे तिच्यावर रागवायचे, तिला तिथून हुसकावून लावायचे. पण तिने आपली जिद्द सोडली नाही. 

एके दिवशी बंगळूरू शहरातल्या वेश्यालयात ही मुलगी गेली. तिला शंका होती की वेश्यालय चालवणारे तिला शिव्या देणार. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडलं. या मुलीनं वेश्यालयात प्रवेश करताच त्या लोकांनी तिला एका दुसऱ्या मुलीशी भेट घालून दिली. ही दुसरी मुलगी निव्वळ १२ ते १३ वर्षांची होती. या मुलीला दाखवत १६ वर्षांच्या या मुलीला आव्हान दिलं की तुला मुक्ती द्यायचीय ना तर पहिल्यांदा या मुलीला मुक्त कर. आणि मग तिनं हे आव्हान स्विकारायचं ठरवलं. आधी तिनं या मुलीचे हावभाव, वागणूक अश्या सर्व गोष्टींचं निरिक्षण करायला सुरुवात केली. तिला लवकर समजलं की ही मुलगी गतीमंद आहे. मानसिकरित्या आजारी आहे. यामुळेच या छोट्या मुलीला वेश्यालयातल्या वेश्या मुक्ती मिळवून देऊ इच्छीत होत्या. मग या मुलीला जवळून समजून घेण्याचा प्रयत्न तिनं केला, तेव्हा तिला धक्काच बसला. तिला समजलं की तिला दररोज अनेक पुरुष आपल्या वासनेचं शिकार बनवत होते. तरुण असो किंवा म्हातारे सर्वच प्रकारचे पुरुष या छोट्या मुलीला बरबाद करत होते. आपली वासनापूर्ती करण्यासाठी ते पुरुष या मुलीच्या ब्लाऊजमध्ये पाच किंवा दहा रुपयांची नोट ठेवून निघून जायचे. ती नोट ती मुलगी न्याहाळत बसायची. मुलीला काहीच समजत नसे की तिच्याबरोबर काय होतंय आणि का होतंय. तिला हे सुध्दा माहित नव्हत की हातातल्या नोटीचा उपयोग कसा आणि कश्यासाठी करायचा. या गतीमंद मुलीला होणारा त्रास बघून त्या मुलीला खुप वाईट वाटलं. तिनं या गतीमंद मुलीच्या सुटकेचा ध्यास घेतला. पण या मुलीला साधं बोलताही येत नव्हतं. तिचं कुटुंब नक्की कुठं राहतं, याबद्दलची माहिती मिळवणं अत्यंत कठिण होतं. अगदी लहानपणापासून गतीमंद व्यक्तींबरोबर काम करणाऱ्या या मुलीनं या पीडित मुलीच्या तोंडातून निघणाऱ्या तुटक्या मुटक्या शब्दांवरुन तिचं गाव कोणतं आहे याचा शोध लावला आणि तिथं तिला पोचवण्याचे प्रयत्न सुरु केले. 

या मुलीनं आपल्या वडिलांच्या कार्यालयातल्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याला गाडीचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. गाडी मिळाली आणि या गतीमंद मुलीबरोबरच त्या वेश्यालयातल्या इतर चार महिलाही त्या गाडीत बसल्या. या मुलीला तिच्या घरापर्यंत सुखरुप पोचवण्याची जबाबदारी या चौघींनी घेतली होती. मात्र या मुलीच्या गावात परिस्थिती वेगळीच होती. या मुलीचे वडील मोठे जमिनदार आणि श्रीमंत होते. एका दुर्घटनेत आई-व़डील दोघे वारले. आता तिच्या नातेवाईकांनी सर्व संपत्ती हडपण्यासाठी तिला महामार्गावर सोडून दिलं. आणि तिथंच भेटलेल्या एकानं तिला बंगळूरूमध्ये वेश्यालयात आणून विकलं. पुन्हा गावात आल्यावर तिला न्याय मिळवून देण्यासाठी पंचायतीची मदत घेण्यात आली. तिच्याबाबतीत नक्की काय घडलंय हे पंचायती समोर सांगण्यात आलं नाही. या मुलीला पुन्हा तिचं घर मिळवून देण्यासाठी सोबत आलेल्या त्या चार जणींनी बंगळूरूमध्ये तिच्यासोबत काय घडलं यबद्दल कमालीची गुप्तता पाळली, याचं १६ वर्षांच्या या मुलीला फार आश्चर्य वाटलं. ऐरवी शिव्या शाप देणाऱ्या या महिलांनी या असहाय्य मुलीला वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. पंचायतीनं तिला न्याय मिळवून दिला. याचबरोबर एका मुलीला वेश्यालयातून बाहेर काढण्याचं १६ वर्षाच्या मुलीनं घेतलेलं हे आव्हान पूर्ण केलं होतं. या छोट्याश्या यशानं या मुलीचा विश्वास दुणावला आणि तिनं वेश्यालयामधून मुलींची सुटका करण्यासाठी एका आंदोलनाची सुरुवात केली. गतीमंद असलेल्या या मुलीपासून सुरु झालेलं काम आजही अविरत सुरु आहे. ही १६ वर्षांची मुली आता मोठी झाली आहे, देशभरात नव्हे तर जगभरात तिचं नाव पोचलंय. तिचं नाव आहे डॉ. सुनिता कृष्णन.

image


डॉ. सुनिता कृष्णन साहसी आहेत, त्या कशालाही घाबरत नाहीत. यामुळेच त्यांनी मानवी तस्करी संपवण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे.

तुमच्या मनात इथं एक प्रश्न उपस्थित झाला असेल १६ वर्षांची सुनिता वेश्यालयात का जात होती ? सुनिता स्वत: सामुहिक बलात्काराच्या शिकार बनल्या होत्या. १५ वर्षांच्या असताना त्यांच्यावर आठ जणांनी बलात्कार केला होता. त्या दिवसांमध्ये सुनिता एका गावात जात असत. हे गाव खूप मागासलेलं होतं. तिथल्या दलित मुली-मुलांना शिकवल्यानं कदाचित त्यांच्या आयुष्यात नवी उमेद येईल म्हणून सुनितांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली. त्या अजाणत्या वयातही त्यांनी दलितांचे हक्क, माणूस म्हणून असलेले हक्क याबद्दल सांगायला सुरुवात केली होती. याचा परिणामही जाणवू लागला होता, पण गावातल्या काही लोकांच्या डोळ्यात हे खुपायला लागलं. धमक्या येऊ लागल्या. पण सुनिता घाबरल्या नाहीत. एकेदिवशी संध्याकाळी घरी परत जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला, त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांच्यावर आठ जणांनी सामुहिक बलात्कार केला. या घटनेची आठवण सुनिता यांना नकोय. त्या म्हणतात,” या घटनेमुळे माझं आयुष्यच बदललं. त्यापूर्वी माझं सर्व काही सुरळीत सुरु होतं. पण त्या एका दिवशी सर्व काही बिघडलं. मी जणू एव्हरेस्टवर पोचली होती आणि तिथून कुणीतरी मला धक्का दिला आणि मी थेट जमिनीवर आपटले..” आश्चर्याची बाब म्हणजे गावातल्या पंचायतीनं बलात्काऱ्यांना दोषी ठरवायचं सोडून झालेल्या घटनेला सुनिताच जबाबदार असल्याचं म्हटलं.

हा काळ सुनितासाठी फार कठिण होता. या घटनेनंतर आई-वडील, नातेवाईक या सर्वांनाच ती जे काही काम करतेय ते चुकीचं वाटू लागलं. ज्या कामासाठी तिला शाबासकी मिळत होती, त्यासाठी आता तिला चुकीचं ठरवण्यात येऊ लागलं. पण सुनिता आपल्या विचारांवर ठाम राहिली. निराशेला आसपासही भटकू दिलं नाही. आपली साहसी वृत्ती सोडली नाही. स्वत:वरचा विश्वास तिने कायम ठेवला.

image


सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर सुनिता कृष्णन यांनी बलात्कार पीडित महिलांना भेटण्याचा निर्णय केला. त्यांचं दु:ख त्यांना जाणून घ्यायचं होतं. त्यासाठीच त्या वेश्यालयात येत होत्या. तिथल्या महिलांना भेटल्यावर त्यांना एक गोष्ट समजली ती म्हणजे आपण तर फक्त एकदाच बलात्काराचे शिकार झालो. पण इथल्या महिलांवर रोजच बलात्कार होतोय. रोजच या महिलांना वासनेचं शिकार बनवलं जातंय. त्या गतीमंद मुलीची वेश्यालयातून मुक्तता केल्यानंतर सुनिता यांनी आपलं आयुष्य या अश्या महिलांसाठी समर्पित करायचं असं ठरवलं. आणि पुढे तेच त्याचं ‘मिशन’ बनलं. असं नाहीए की सुनिता कृष्णन यांनी पहिल्यांदा समाजसेवेची जबाबदारी घेतलीय. आठ वर्षांची असताना त्यांनी गतीमंद मुलांची मदत करायला सुरवात केली. या मुलांना त्या डान्स शिकवायच्या. जेणेकरुन त्यांच्या आयुष्यातही आनंदाचे काही क्षण येतील आणि मानसिक स्थिती सुधारेल. हे करण्यामागेही काहीतरी होतं. सुनिताचं कुटुंब मध्यमवर्गीय होतं. तिचे वडील सर्वे ऑफ इंडिया मध्ये काम करत होते. ते आपल्या कुटुंबातले शिकलेले पहिले व्यक्ती होते. त्या अगोदर हे कुटुंब अगदी गरीबीत जीवन कंठत होतं.

जन्मल्यापासून सुनिता याचं आय़ुष्य आव्हानांनी वेढलेलं होतं. जन्मापासून त्या अपंग होत्या. त्यांचा एक पाय थोडासा वाकडा होता. त्यामुळे त्या थोडंसं लंगडत चालयच्या. त्यांच्या आजीला हे समजलं., त्यामुळे त्या नेहमीच सुनीता यांच्या पायाला पट्टी बांधून ठेवायच्या. सुनिताला इतर मुलांसारखं खेळायला मिळायचं नाही. याचा एक फायदा असा झाला की त्या दिवसभर पुस्तकांमध्ये गर्क असायच्या. एवढ्या लहान वयात वाचनाची सवय लागली. त्यामुळे त्या शाळेत पहिल्या यायच्या. त्यांच्या बोलण्यातून त्या अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांची समज काढायच्या, म्हणूनच घरातले सर्व त्यांना ‘दादी-अम्मा’ म्हणायला लागले होते. आपल्या छोट्या बहिणीचीच नव्हे तर आसपासच्या मुलांच्या अभ्यासाची जबाबदारीही सुनिता यांनी घेतली. एक दिवस जेव्हा त्यांनी गतीमंद मुलांना शिकवायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या मनात येऊन गेलं की या मुलांसाठी काहीतरी करायला हवं. त्यांना आनंद मिळवून देण्यासाठी त्यांना डान्स शिकावावं असं त्यांच्या मनात आलं. सुनितांचा स्वत:चा पाय ठिक नव्हता तरीही त्यांनी या मुलांना डान्स शिकवायला सुरुवात केली. पुढे जाऊन त्यांनी १२ व्या वर्षी एक प्रशिक्षण केंद्रच सुरु केलं. त्याचं झालं असं की त्यावेळी सुनिता यांच्या वडिलांची बदली विशाखापट्टम इथं झाली होती. तिथल्या नवीन शाळेत जाताना त्यांना लक्षात आलं की घराच्या आसपास असलेल्या झोपडपट्टीतली मुलं शाळेत जात नाहीत. ते नुसते दिवसभर भटकत राहतात. त्यांनी मनात विचार केला की जर या मुलांना शिक्षण मिळालं तर ती आपल्या पायावर उभं राहू शकतील. त्यांचं जीवन सुकर होईल. मग सुनितानं एका छोट्याश्या खोलीत हे प्रशिक्षण केंद्र सुरु केलं. ती सकाळी शाळेत जायची आणि संध्याकाळी या छोट्याश्या खोलीत शिक्षिका बनायची. बारा वर्षांची शिक्षिका. हे जेव्हा तिच्या मुख्याध्याकांना समजलं तेव्हा तिला शाबासकी दिली.

image


एका प्रश्नाच्या उत्तरात सुनिता म्हणाल्या “ माझं जीवन ईश्वराची देणगी आहे. देवानं मला काहीतरी काम करण्यासाठी हा जन्म दिलाय. लोकांची मदत करायचं आपसूक माझ्या मनात येतं. मग मी अशा लोकांना शोधते ज्यांना मदतीची गरज आहे. जे पीडित आहेत. काही ठरवून असं काम नाही करत मी. गरीब, असहाय लोक जेव्हा मला भेटतात तेव्हा त्यांना मदत करण्याची शक्ती आपसूकच माझ्यात येते.”

सुनितांना जेव्हा विचारलं की तुमच्या जीवनातला सर्वात मोठा संघर्ष कुठला? तेव्हा त्या म्हणाल्या. “ दुसऱ्यांना माझा जो संघर्ष वाटतो तो खरा माझा संघर्ष नाहीए. मला या संघर्षात नेहमी यश दिसतं. दुसऱ्यांच्या नजरेत जो संघर्ष असतो ते माझ्या नजरेतून यशाचा मार्ग असतो.” सुनिता पुढे सांगतात,” लहानपणी स्वत:ला समजून घेणं, स्वत:चा स्विकार करणं, खूप मोठं आव्हान होतं माझ्यासाठी. माझ्यात काय आहे, काय नाही हे मी स्वत:ला पूर्णपणे समजून घेतलं. ”

सुनिता कृष्णन यांनी वेश्या व्यवसायाविरोधात लढाई सुरु केलीय. या अमानवीय व्यवसायात जबरदस्तीनं आणल्या गेलेल्या असंख्य निष्पाप तरुणींना बाहेर काढण्याची त्यांची ही मोहीम सुरु आहे. असंख्य मुलींची या अमानवीय कामातून मुक्तता केलीय. त्यांनी आपलं आयुष्य या अश्या महिलांच्या सुरक्षेसाठी आणि पुनर्वसनासाठी समर्पित केलंय. पण हे काम तेवढं सोपं नाही. पण तरीही त्या हे काम करत आहे. यामुळे या व्यवसायातल्या लोकांना तुरुगांची हवा खावी लागली, त्यांचा हा धंदाच उध्वस्त झाला. या कारणांमुळे सुनिता यांचे शत्रूही खूप झालेत. त्यांना अनेकदा धमक्या येतात. त्यांच्यावर अनेकदा हल्लेही झाले. पण या हल्ल्याचा त्यांच्या कामावर काहीही परिणाम झालेला नाही. त्या आपलं काम करतच राहतायत, न घाबरता. त्या वेश्या व्यवसायाच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणींना बाहेर काढतायत. त्यांची मुक्तता करतायत. त्यांना माणूस म्हणून पुन्हा जगू देण्याची संधी देतायत. त्यांना त्यांच्या पायावर उभं रहायला मदत करतायत. त्यांच्यावर जे हल्ले झाले, त्याबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “ माझ्यावर असा काही हल्ला झालेला नाही कारण त्याला मी हल्ला मानत नाही, जो समाज माझ्या बाबतीत करतंय त्याला मी हल्ला समजते. जे हे लोक करतायत त्यांच्या हल्ल्यांना मी पुरस्कार समजते. जर त्यांनी माझ्यावर हल्ला करुन माझे हात तोडले नाहीत, तर त्यांनी राग कसा आणि कुठे काढायचा.” या हल्ल्यांबद्दल त्या पुढे म्हणतात, “मी केलेल्या कामाची काही तरी पोचपावती मिळायला नको का? ज्याने मला समजेल की मी जे काही करतेय योग्य आहे की नाही. हे नको का समजायला? हे हल्ले माझं प्रगती पुस्तक आहे. आणि त्यांच्याबद्दल विचार केला तर समजतं की मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालीय.”

image


पण हे सर्व मस्करीत सांगत असताना त्या गंभीर होतात आणि म्हणतात “जर या हल्ल्यांमध्ये मला काही झालं तर मी सुरु केलेलं हे काम. माझी लढाई कुठपर्यंत जाईल. याची मला चिंता आहे. जे काम करण्यासाठी मी या जगात आलेय. ते पूर्ण झालं की भले माझे प्राण गेले तरी काहीही फरक पडणार नाही. माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे की ज्या कामासाठी त्यानं मला जगात आणलंय ते काम पूर्ण होईस्तव त्यानं मला जगात ठेवावं. माझ्या जीवनाचं लक्ष्य पूर्ण झाल्यावर माझे प्राण गेले तर चालतील.”

तुमच्या जीवनाचं लक्ष्य काय आहे हे विचारल्यावर सुनिता म्हणाल्या,” माझं एकच लक्ष्य आहे. या जगात कुणी शोषित राहू नये. एक असा समाज अस्तित्वात यावा जिथं प्रत्येकामध्ये सुरक्षेची भावना असावी. मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकाला सुरक्षित वाटावं, मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची गरज भासणार नाही, प्रज्ज्वला सारख्या संस्थांची गरज भासणार नाही.”

हे लक्ष्य पूर्ण होणं शक्य आहे का ? या प्रश्नावर त्या म्हणाल्या,” अशक्य असं काही नाही. या जगात सर्व काही आपण बनवलंय, सर्व काही आपण बिघडवलंय. जर प्रत्येकानं असं ठरवलं की मी शोषण करणार नाही तर शोषण बंद होईल. शोषण बंद करणं हे एका सुनिता कृष्णनचं काम नाही. तर ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. सर्वांनी विचार केला, एकत्रित काम केलं तर सुरक्षित समाजाचं लक्ष्य पूर्ण होईल.”

सुनिता कृष्णनच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आलेत जिथं त्यांना जीवघेण्या संघर्षाचा सामना करावा लागला. पण त्यांनी मैदान सोड़लं नाही. जोवर त्यांना यश मिळालं नाही तोवर त्या लढत राहिल्या. अशीच एक घटना होती १९९६ मधली मिस वर्ल्ड स्पर्धा. जी बंगळूरूमध्ये आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा थांबवण्यासाठी त्यांनी कसोशीनं प्रयत्न केले होते. सुनिता म्हणतात की काही लोक महिलांना भोगवस्तू समजतात आणि हेच लोक अश्या सौदर्यस्पर्धांचं आयोजन करतात. या सौदर्यस्पर्धांमुळं महिलांना जे सन्मान आणि अधिकार मिळायला हवेत ते मिळतंच नाहीत. या स्पर्धेला विरोध करणाऱ्या सुनिता कृष्णन यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. ते ही एक दोन दिवस नाही तर तब्बल दोन महिने. सुनिता म्हणतात की हे एक षडयंत्र होतं. अचानक त्यांना अटक करण्यात आलं. त्यांच्या वडिलांना सांगण्यात आलं की सुनिताकडे अंमली पदार्थ सापडले. अटकेतला हा काळ ही सुनितांना खूप काही शिकवून गेला. बंदीस्त महिलांना समजून घेता आलं. त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या. त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दलची नवी माहिती त्यांना मिळाली. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ६० दिवसांमध्ये सुनिताला बदलायला कपडेच दिले नाहीत. तुरुंग प्रशासनानं असं का केलं असावं हे समजलं नाही पण त्यामुळे इथं येणाऱ्या महिलांना काय काय भोगावं लागत असेल याचा अंदाज त्यांना आला.

तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचं आयुष्य जास्त खडतर झालं. जे आपले लोक होते ते दुरावले. पोलीस आणि प्रशासनानं असा त्रास दिला की त्यांना आपलं बंगळूरू शहर सोडावं लागलं. स्थितीच अशी होती की ज्या शहरात लहानाची मोठी झाली ते आपलं बंगळूरू शहराला रामराम करावा लागला. त्यांनी हैद्राबाद शहराच्या दिशेनं कुच केलं. पुढे जाऊन हे हैद्राबाद शहरच त्यांची कर्मभूमी झाली.

हैद्राबादला आल्यावर सुनिता यांना ब्रदर वर्गीस भेटले. ते तिथल्या झोपड़पट्टींतल्या लोकांसाठी काम करत होते. सुनितांनी त्यांना मदतीचा हात दिला. हळूहळू त्यांनी ब्रदर्स यांच्याबरोबर जायला सुरुवात केली. इथल्या लोकांशी ओळख वाढू लागली. अनेक नवीन साथीदार भेटले. आता हैद्राबादमध्ये राहून सामाजिक काम करायचं असं सुनिता यांनी पक्क केलं. इथंच प्रज्ज्वला या स्वयंसेवी संस्थेची पायाभरणी झाली. त्याला कारणही तसंच होतं. त्या वर्षी म्हणजे १९९६ मध्ये जुन्या हैद्राबाद शहरात बदनाम असलेली ‘मेहबूब की मेहंदी’ या वेश्यावस्तीला उठवण्यासाठी पोलीस आणि सरकारनं मोहिम उघडली. पण या महिलांच्या पुनर्वसनासाठी सरकारकडे कुठलीच योजना नव्हती. पहिल्यांदा पोलीसांनी यातल्या अनेक महिलांना अटक केली. त्यानंतर त्याचे ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यांना या शहरात जगूच द्यायचं नाही असंच जणू प्रशासनानं ठरवलं होतं. त्यामुळेच अनेकींना आत्महत्या करावी लागली. ‘मेहबुब की मेहंदी’ भागात राहणाऱ्या या महिलांच्या मदतीसाठी कुणीच पुढे आलं नाही. या अश्या परिस्थितीत सुनिता कृष्णन यांनी एक मोठा निर्णय घेतला. सामाजिक कार्यकर्ता ब्रदर जॉर्ज वेट्टिकटिल यांच्या साथीनं त्यांनी एक संस्था स्थापन केली. जिचं नाव ठेवण्यात आलं प्रज्ज्वला. प्रज्ज्वलानं मेहबूब की मेहंदी विस्थापित महिलांसाठी काम करायला सुरुवात केली. हे काम आजही सुरु आहे.

सुनिता यांच्या नेतृत्त्वाखाली प्रज्ज्वलानं काम करायला सुरुवात केली. याद्वारे शोषित आणि पीडित महिलांना न्याय देण्यासाठी संघर्ष सुरु झाला. शरीरविक्री व्यवसायात असलेल्या विकृत लोकांविरोधात, दलाल, गुंड, बदमाश आणि बलात्काऱ्यांविरोधात लढून त्या महिलांच्या पुनर्वसनाचं काम करण्यासाठी प्रज्ज्वला समर्पित आहे. सुनिता कृष्णन यांनी शोषित, पीडित महिलांच्या न्यायासाठी एक मशाल प्रज्ज्वलित केलीय. यामुळे असंख्य महिलांच्या जीवनातला अंधार दूर झालाय. समाजसेवा आणि महिलांसाठी केलेल्या कामाबद्दल भारत सरकारनं पदश्री देऊन सुनिता कृष्णन यांचा सन्मान केला आहे. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

नऊवर्षाच्या वयातच पारो कशा बनल्या, देशाच्या पहिल्या महिला हॉकर? का मिळाला राष्ट्रीय पुरस्कार ?

अंशत: कर्णबधीर, वय वर्ष २३ आणि ध्येय, लोप पावणारी हस्तलेखन कला जपण्याचं, कोलकात्याच्या कृतिका रामकृष्णनची ध्येयवेडी कहाणी

‘ऑस्टीयोजेनिसिस’ आजाराने पीडित पूनम श्रोत्रीच्या उत्तुंग वाटचालीची कहाणी

    Share on
    close