देशातले पहिले ‘करिश्मा कोच’ दानिश शेख अन् दान आनंदाचे!

देशातले पहिले ‘करिश्मा कोच’ दानिश शेख अन् दान आनंदाचे!

Monday December 07, 2015,

6 min Read

दानिश शेख हे बहुदा देशातील पहिले ‘करिश्मा कोच’ असावेत. दानिश स्वत:च एक चटकन फोफावणारा ‘करिश्मा’ आहेत, ‘जलवा’ आहेत. त्यांचे हास्य घायाळ करेल इतपत खट्याळ आहे. दानिश म्हणजे एकाहून एक ‘धांसू’ कल्पनांचे भंडार आहे. पुन्हा त्यांच्याकडे एक असा ठरलेला मार्ग आहे, ज्यावरून ते आपल्या ‘करिश्मा’ या कोचिंग स्टार्टअपला पुढल्या पातळीवर नेतीलच नेतील. पण इथंच एक गोची आहे. दानिश बऱ्यापैकी तुमच्या-आमच्यासारखे आहेत. ‘जर मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता’ अशा आशेचा गजर ते करत नाहीत. आशेचे गाजरही दाखवत नाहीत. त्यांच्या मते हा एक़ अवास्तव आणि असिद्ध तर्क आहे. त्यांचे स्वत:चे जीवन त्यांच्या दाव्याला सिद्ध करणारे असे आहे. ते म्हणतात, ‘करिश्मा एक कौशल्य आहे, जे आत्मसात केले जाऊ शकते.’

दानिशचा जन्म, शिक्षण इंदूरला झालेले. कॉन्व्हेंट स्कुलमध्ये ते शिकले. दानिशची त्याच्या शिक्षकांनाही काळजी वाटे. हा मुलगा अंतर्मुख, चश्मीश आणि सतत त्रस्त असलेला असा. याचे बिचाऱ्याचे पुढे काय होईल? दहावीतील दानिशने मिळवलेली श्रेणी ही पुरेशी नसल्याने त्याला शाळा बदलावी लागली. पुढे बारावीची परीक्षाही तो दुसऱ्या प्रयत्नात कशीबशी उत्तीर्ण झाला.

image


दानिश सांगतात, ‘‘पुस्तके हीच माझी एकमेव मित्रमंडळी.’’ Dale Carnegie यांनी लिहिलेले ‘हाऊ टू विन फ्रेंडस् अँड इन्फ्ल्युएंस पीपल’ हे पुस्तक दानिशच्या वाचण्यात आले आणि दानिशला आत्मनिरीक्षणाची तसेच आत्मपरीक्षणाची सवय लागली. सोळा वर्षांचा दानिश लवकरच पुस्तकांतल्या थिअरी तपासू लागला. तत्व, सिद्धांत तपासू लागला. वास्तव जगण्यातील परिस्थितींशी या सिद्धांतांची सांगड घालू लागला. दररोज एका अनोळखी व्यक्तीशी बोलण्याचे धोरण त्याने आखले आणि त्याबरहुकूम अंमलबजावणीही सुरू केली. ‘‘मी आतापर्यंत गेल्या १२ वर्षांत ५००० अनोळखी लोकांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केलेली आहे,’’ असा दानिश यांचा दावा आहे.

‘‘मला जर अनोळखी लोकांसोबत गप्पा रंगवण्याची खोड नसती तर मी माझी जोडच हरवून बसलो असतो. या सवयीतूनच मला माझा एक जानी दोस्त मिळाला.’’ मुंबईतील जय हिंद महाविद्यालयात ‘ह्युमन नेटवर्क’ या विषयावर नुकत्याच झालेल्या TEDx talk दरम्यान दानिशने हा अनुभव सांगितला. विद्यार्थ्यांनी अत्यंत गंभीरपणे हे संवादसत्र ऐकले. ‘‘मला लोकांचे निरीक्षण करायला आवडते. आपल्या अवती-भवती मानवी मानसशास्त्राचा पसाराच पसारा आहे. आपण फक्त एक क्षण थांबा घ्यावा आणि त्याकडे लक्ष द्यावे. कितीतरी गोष्टी आपल्या लक्षात येतील. येऊ लागतील.’’ दानिश या सत्रात सांगत होते. दानिशच्या ‘करिश्मा’चे गमक अनेक स्त्रोतांत दडलेले आहे. त्याचे अनेक प्रवाह आहेत. लोकांचे निरीक्षण, अगणित पुस्तकांचे वाचन आहे. दानिशच्या वैज्ञानिक संशोधनाला या सगळ्यांचा आधार आहे.

दानिशचा विद्यमान प्रवास हा तो १८ वर्षांचा असताना सुरू झालेला होता. इंदूरमधल्याच Webdunia.com वेबदुनिया.कॉम या आयटी/माध्यम कंपनीत स्थानिक भाषा संपादक पदासाठी दानिशने उत्साहाच्या भरात मुलाखत दिली. अनेक अनुभवी, प्रशिक्षित भाषाप्रभूंना मात देत त्याने बाजी मारली. पुढे प्रत्येक अनुषंगिक यश दानिशचा आत्मविश्वास आणि ‘करिश्मा’ वाढवणारे ठरले. विशीतच दानिशने शंभर ॲनॅलिस्ट सदस्यांच्या चमूचे नेतृत्व करीत मायक्रोसॉफ्टचा आव्हानात्मक प्रकल्प यशस्वी करून दाखवला. वयाची २१ वर्षे पूर्ण केली आणि जागतिक प्रकल्प व्यवस्थापक म्हणून त्याने Lionbridge Inc. जॉइन केली. कंपनीच्या इतिहासात इतक्या महत्त्वाच्या पदावर एकविशीच्या छोकऱ्याची नियुक्ती पहिल्यांदाच झालेली होती. पुढल्या वर्षी दानिश साहजिकच बावीसचा झाला आणि त्याला ‘याहू! इंडिया’ने उचलले! इथे त्याने आंतरराष्ट्रीय उत्पादन व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडली. (Yahoo! Mail, Yahoo! Messenger) अर्थात या कंपनीतही अशा महत्त्वाच्या पदावर सर्वाधिक तरुण म्हणून त्याला ख्याती मिळाली.

दानिश यांचे जीवन विरोधाभासांनी भरलेले अन् भारलेले आहे. उत्पादन व्यवस्थापन या विषयातील योग्यता त्यांनी अर्जित केलेली होती आणि संवाद तसेच प्रशिक्षणाचे क्षेत्र त्यांच्या वाट्याला आले. एखादी आकर्षक म्हणावी अशी पदवीही त्यांनी संपादिलेली नव्हती. तरीही ते अधाशी म्हणावे इतपत पुस्तकांसाठी हापापलेले असत. अफाट वाचन. आणि आज ते शिक्षण संस्थांतून सेमिनार आयोजित करत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी www.danishsheikh.com हे पोर्टल सुरू केले. लोकांना ‘करिश्मा’ कला शिकवणे हे त्यांच्या या ‘स्टार्टअप’चे उद्दिष्ट. करिश्मा म्हणजे असे तंत्र ज्याद्वारे आपण इतरांना आपल्याकडे आकर्षित करू शकतो. थोडक्यात व्यक्तिमत्व विकासाचे धडे या पोर्टलच्या माध्यमातून लोक गिरवू लागले.

‘करिश्मा’चे गुणिले अन् भागिले

दानिश सांगतात, ‘‘करिश्मा ही एक अशी गोष्ट होती, जिचे मला आधीपासून आकर्षण होते. या विषयावर मी माझे स्वत:चे असे संशोधन सुरू ठेवलेले होते. जेव्हाही मला जरा मोकळा वेळ मिळे, यावर मी काम करत असे. काही लोकांचा इतरांवर प्रभाव कुठल्या कारणांनी पडतो, त्याचा मी अभ्यास करत असे. कालपरत्वे एखाद्याचे व्यक्तिमत्व ‘करिश्माई’ करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी पायरी दर पायरी अध्यापन पद्धती मी तयार केली. विकसित केली. ‘बिझनेस स्कुल्स’मध्ये मी आमंत्रित अध्यापक म्हणून पुढे भाषणे देऊ लागलो. माझा छंद असलेले ‘करिश्मा कोचिंग’ लवकरच माझा श्वास बनले.’’

करिश्म्याचे कितीतरी प्रकार असतात, असे दानिश यांचे म्हणणे आहे. दानिश यांचा पुढील प्रकारांवर अधिक भर होता. अधिकारक्षम करिश्मा, दिव्य करिश्मा आणि कारुणिक करिश्मा. ‘‘उदाहरणार्थ स्टिव्ह जॉब्स यांचा करिश्मा दिव्य होता कारण त्यांनी भविष्याकडे पाहून आपले उत्पादन ठरवलेले होते. मदर टेरेसा यांचा करिश्मा हा कारुणिक या प्रकारात मोडणारा आहे. कारण मदर ज्यांच्याकडे काहीही नाही अशा फाटक्या लोकांच्या सेवेला समर्पित होत्या. तथापि, मी ‘करिश्मा’ अशा काही प्रमाणात आणि प्रकारात विकसित केला, की तो प्रत्येक परिस्थितीत काम करतो. उपयुक्त ठरतो,’’ हे सांगताना दानिश यांचा आत्मविश्वास ओसंडून वाहत असतो.

दानिश यांचा दृष्टिकोन वास्तववादी आहे. ते म्हणतात, ‘‘मला माहित आहे प्रत्येक परिस्थितीत माझ्याकडे उत्तरे असतीलच असे नाही. हे वगळताही माझ्याकडे सुस्पष्ट अशी एक पद्धत आहे. मुख्य म्हणजे उमेदवारनिहाय माझा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. मीच नियम बनवतो आणि मीच मोडतो. माणसे वेगवेगळ्या प्रकारची असतात. म्हणून माझे तंत्रही त्याबरहुकूम वेगवेगळे असते.’’

दानिश यांच्या क्लायंटस्ची यादी पाहिली, की त्यांचा प्रभाव पडल्याशिवाय राहात नाही. मिस इंडिया खिताब विजेती ते सीईओ, विधीतज्ज्ञ, नव्या उद्योग-व्यवसायांचे संस्थापक आणि यशस्वी उद्योजक-व्यावसायिक अशा उच्चभ्रू वर्गातील ही मंडळी आहे. दानिश म्हणतात, ‘‘एकदा एका पत्रकाराने मला विचारले, की तो माझ्याशी का बोलतोय आणि माझ्यात असे काय आहे, ज्याबद्दल तो काहीतरी छापू शकणार आहे. एखादे असे प्रसिद्ध नाव आहे काय, ज्याच्यासाठी मी काम केलेले आहे. मी त्याला सांगितले, की मी कुणाचेही नाव उघड करू शकत नाही. कारण तसे केले तर तो माझ्या व्यवसायातील माझ्या नैतिक मुल्यांचा भंग ठरेल. माझी मुलाखत कुणी नाही घेतली तरी चालेल पण हा नियम मी कधी मोडलेला नाही.’’ दानिश त्यांच्यातल्या विनोदाचे अंगही उलडतात, म्हणतात, ‘‘एक हायप्रोफाईल क्लायंट माझा इतका घनिष्ट मित्र बनलाय, की मी त्याला ‘टीव्हीसी’च्या धर्तीवर प्रसारण करण्याजोगा माझा व्हिडिओपट बनवायला सांगू शकतो!’’

दानिश यांनी नुकतेच संयुक्त अरब अमिरातीत आपले एक सत्र यशस्वीरित्या आयोजिले. पुढल्या वर्षी इंग्लंडला ते ‘करिश्मा ट्रेनिंग’ घेणार आहेत. एवढे मोठे यश मिळवल्यावरही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. ते म्हणतात, ‘‘मी जेव्हा मुंबईला आलो. गोरेगावला एका लहानशा फ्लॅटमध्ये मी राहात असे. आता मी पाली हिलवर राहातो. पण गतकाळातील माझा संघर्ष मला नेहमी जमिनीशी खिळवून ठेवतो. अनुभवांच्या विद्यापीठात संघर्ष नावाच्या शिक्षकांकडून मी खुप काही शिकलोय. माझ्या क्लायंटस्नाही मी तेच सांगतो. करिश्मा तुमच्यात दडलेला आहे. तुमच्या वैयक्तिक अनुभवांतून त्याचे चित्र रेखाटा. तुमच्यातला करिश्मा तुमच्यासमोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. एकदा त्याच्याशी तुमची ओळख पटली, की इतरांना पटवण्यात तुम्ही तरबेज झालाच म्हणून समजा.’’

प्रशिक्षणाच्या कुठल्याही पारंपरिक पद्धतीशी दानिश सहमत नाहीत. ‘‘मी अनेक प्रशिक्षक पाहिले आहेत. त्यांचे बारकाईने निरीक्षण केलेले आहे. बहुतांशी ते सगळेच औपचारिक साचेबद्ध पद्धती वापरतात. मी पारंपरिक पद्धतीने आणि साचेबद्ध कधीही जगलेलो नाही. त्यामुळे मी हा मार्ग अन्य कुणाला सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’’ असे यावर त्यांचे म्हणणे आहे.’’

लेखिका- मुक्ती मसिह

अनुवाद- चंद्रकांत यादव