“कामाप्रती असणारी निष्ठा आणि चिकाटी, ह्या गुणांमुळेच ध्येयप्राप्ती होते.” सुजाता विस्वेस्वरा उपाध्यक्ष, आरोग्यसेवा व जैवविज्ञान, विप्रो

“कामाप्रती असणारी निष्ठा आणि चिकाटी, ह्या गुणांमुळेच ध्येयप्राप्ती होते.” 
सुजाता विस्वेस्वरा उपाध्यक्ष, आरोग्यसेवा व जैवविज्ञान, विप्रो

Wednesday December 02, 2015,

6 min Read

image


सुजाता विस्वेस्वरा ह्या विप्रोच्या आरोग्य व जैवविज्ञान शाखेच्या निरसन-वितरण (Solution delivery) विभागाच्या प्रमुख आहेत. सुजाता बंगलोरच्या अशा एका पुराणमतवादी कुटुंबात वाढल्या आहेत, जेथे त्यांनी उच्च शिक्षण घेण्याची शक्यता कमी होती. पण त्यांना गणित आणि विज्ञान ह्या विषयात रुची असल्यामुळे त्यांनी अभियांत्रिकीचेच शिक्षण घेण्याचा निश्चय केला होता. अखेरीस त्यांनी एम.टेक. पर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि तांत्रिक विभागात स्वतःची कारकीर्द घडवली.

त्यांची जीवन कथा म्हणजे अटल निर्धार आणि एकाग्रचित्त ध्येयधारणेचे उत्तुंग उदाहरण आहे.

लग्न करून स्थिरस्थावर होण्यासाठीच माझे संगोपन झाले होते

माझा जन्म हैद्राबाद येथे झाला पण मी माझे संपूर्ण आयुष्य बंगलोरमध्येच राहिले होते. मी माझे शालेय शिक्षण मिलर्स रोडच्या सेंट अॅन्स् शाळेत पूर्ण केले आणि नंतर नॅशनल कॉलेज मध्ये विद्यालयीन शिक्षण घेतले. हैद्राबादच्या जे.एन.टी.यु. मधून मी एम.टेक. झाले. मी एका अतिशय रूढीवादी कुटुंबातून आले आहे आणि मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यास माझ्या पालकांचा विरोध होता. त्यांना असे वाटत होते की पी.यु.सी. चे शिक्षण पूर्ण झाल्यावर, लगेच मी लग्न करून स्थिरस्थावर व्हावे. अखेर मला त्यांची खूप लाडीगोडी लावून मनधरणी करावी लागली, तेंव्हा त्यांनी एका अटीवर मला माझ्या मनाप्रमाणे उच्च शिक्षण घेण्याची परवानगी दिली आणि ती अट महणजे ते मला शिक्षणासाठी बंगळूरूच्या बाहेर जाऊ देणार नाहीत. जर मला अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे असेल तर ते मी फक्त बंगलोर मध्ये राहूनच करू शकणार होते. माझ्या सुदैवाने मला बंगलोरमधील बी.एम.एस. विद्यालयात प्रवेश मिळाला.

योग्य साथीदाराशी लग्न जुळणे

माझ्या पालकांबरोबर शिक्षणासाठीची लढाई जिंकून सुद्धा शेवटी माझ्या पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात मी लग्न केले. शिक्षण संपण्याआधीच फक्त एका कारणामुळे मी लग्नाचे ते स्थळ स्वीकारले, कारण माझ्या भावी पतीच्या रुपात त्या व्यक्तीमध्ये मला माझ्यासाठी अगदी योग्य जोडीदार दिसला. त्यांनी आणि त्यांच्या पालकांनीसुद्धा मला लग्नानंतरही शिक्षण पुढे चालू ठेवण्यास प्रोत्साहन दिले. अशा प्रकारे, मी खरंच ठरवून लग्न करण्याच्या बाबतीत भाग्यशाली ठरले.

मी गरोदर असताना एम. टेक. चा अभ्यास करत होते

मला लहानपणापासूनच अभियंता व्हायचे होते. खरं तर, माझ्या संपूर्ण घराण्यातली मी एकमेव अभियंता आहे. मी शाळेपासूनच एक हुशार विद्यार्थी होते आणि भौतिक शास्त्र आणि गणित हे माझे आवडीचे विषय होते. एकदा माझ्या वडिलांच्या मित्राने सांगितले की मी एक चांगली अभियंता होऊ शकेन आणि तेंव्हापासून त्यांचे ते वक्तव्य माझ्या मनात खोलवर घर करून राहिले.

मी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे शिक्षण बी.एम.एस. विद्यालयातून पूर्ण केले. दोन वर्षांनी माझ्या मुलाचा जन्म झाला. माझ्या पतीने मला सतत संगणक शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहीत केले. त्यांचा माझ्या क्षमतेवर इतका अढळ विश्वास होता की जरी माझ्यावर आमच्या लहान बाळाची जबाबदारी होती, तरीसुद्धा मी एम.टेक. च्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करण्याचा निश्चय केला.

माझे पती शास्त्रज्ञ आहेत व संरक्षण मंत्रालयाच्या एका क्षेपणास्त्र प्रकल्पामध्ये काम करत आहेत आणि म्हणून आम्ही जवळ जवळ ५ वर्ष हैद्राबादमध्ये स्थायिक झालो होतो. मी तेथील आर्थिक बाजारासाठी काही उत्पादनं बनवत होते. माझे काम फार रोमांचक स्वरूपाचे नव्हते पण तरीसुद्धा मी ते तोपर्यंत करत राहिले, जोपर्यंत आम्ही परत बंगळूरूला परतण्याचा निर्णय घेतला नव्हता.

विप्रोमध्ये प्रवेश

बंगलोरला आल्यावर, मी दीड वर्ष अशोक लेलँडमध्ये काम केले. मी तेथे ओरॅकल डेव्हलपर होते. नंतर मी विप्रोमध्ये नोकरी साठी रुजू झाले. आज २३ वर्षांच्या माझ्या कारकीर्दीकडे वळून बघताना, मला एकही कंटाळवाणा क्षण सापडत नाही. माझ्या कुटुंबाने मला भक्कम पाठिंबा दिला आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यभर माझे पतीच मला मार्गदर्शक म्हणून लाभले आणि त्यांनी मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले.

विप्रो येथे रुजू झाल्यावर, मी भारतात आणि जगभर प्रवास केला पण माझ्या पती किंवा मुलाने घरातील माझ्या अनुपस्थितीबद्दल कधीही तक्रार केली नाही. विप्रोमध्ये मला प्रकल्प व्यवस्थापक आणि उत्पादन व्यवस्थापक अशा पदांवर काम करण्याची संधी मिळाली. मी फार जिज्ञासू स्वभावाची आहे. मला नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे आणि विप्रोने मला स्वतःला विकसित करण्याच्या उत्कृष्ट संधी प्राप्त करून दिल्या. मी विप्रोत काम करताना माझ्या कारकीर्दीत खूप चढ–उतार आले, पण त्या अनुभवांनी माझे भावविश्व समृद्ध झाले.

कारकीर्दीत आलेल्या आव्हानांना सामोरे जाणे

जेंव्हा ३ वर्षांपूर्वी २ ०११ ला विप्रोमध्ये संगठनात्मक सुधारणा होत होत्या, तेंव्हा बऱ्याचशा विभागांमध्ये खूप अंतर्गत बदल झाले. मी तेंव्हा ई-सक्षमीकरण (E-enabling) विभागाची प्रमुख होते. त्यावेळेस माझ्या विभागाला दुसऱ्या एका विभागामध्ये विलीन केले गेले. तेंव्हा जवळ जवळ २ महिने संस्थेमधील माझ्या पदाबद्दल आणि कामाच्या स्वरूपाबद्दल खूप संदिग्धता होती. तो माझ्यासाठी अतिशय आव्हानात्मक आणि माझी कसोटी पाहणारा काळ होता. कारण, मला त्यावेळेस असा एक पदभार सांभाळायला दिला होता, ज्याने मला माझ्या व्यावसायिक कारकीर्दीत १० वर्ष मागे नेऊन ठेवले होते. पण अर्थात माझी क्षमता त्यापेक्षा अधिक मोठं काहीतरी करण्याची आहे, याची सगळ्यांनाच पुरेपूर जाणिव होती. त्या दरम्यान, आमच्या संस्थेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष संगीता सिंह वितरण व्यवस्थापकीय प्रमुखाच्या शोधात होत्या आणि अशा प्रकारे माझी त्यांच्या विभागात बदली करण्यात आली. आता मी तेथे गेले ३ वर्ष काम करत आहे आणि त्या प्रवासातील प्रत्येक क्षणाची मौज अनुभवत आहे. विप्रोने मला आतापर्यंत खूप वेगवेगळ्या पदांवर विविधांगी भूमिका पार पाडण्याची संधी दिली आहे आणि अशा प्रत्येक हुद्द्याने मला शिकण्याचा नवीन अनुभव दिला आहे.

व्यावसायिक जीवनातील अत्युच्च शिखर

माझ्या आजवरच्या व्यावसायिक जीवनातील सगळ्यात मोठ्या यशाबद्दल जर सांगायचे झाले तर मी विप्रोमध्ये असताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगेन. विप्रोमध्ये असताना उत्तर प्रदेश येथील एका तेल आणि गॅस कंपनीबरोबर काम करताना मी त्यांच्या एका टीमची प्रमुख होते, जी बाजारात उतरवण्याकरिता उत्पादनासाठी एका अतिशय नवीन संकल्पनेवर काम करत होती. त्या कंपनीने त्या वर्षीचे नवीन यशस्वी उपक्रमासाठी सरकारतर्फे दिले जाणारे पारितोषिक जिंकले. माझ्यासाठी तो खूप समाधान देणारा क्षण होता कारण आम्ही खूप कमी कालावधीमध्ये एक अशक्य वाटणारे उत्पादन बनवले होते.

मोठी स्वप्न पाहण्याचा गुण मी माझ्या मुलाकडून शिकले

मला एकच मुलगा आहे, पण माझी भाची मला मुलीसारखी आहे. ते दोघं एकत्र लहानाचे मोठे झाले आहेत. जेंव्हा माझा मुलगा गुगलसाठी काम करायला लागला आणि माझ्या भाचीने एम.बी.बी.एस. चे शिक्षण पूर्ण केले, ते माझ्या जीवनातले अभिमानाचे क्षण होते.

गुगल कंपनी भारतातील बंगळूरूसारख्या स्थानिक विद्यालयातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना कधीच नोकरी देत नाही. माझा मुलगा पी.इ.एस.आय.टी. येथून संगणक शास्त्राचे शिक्षण घेत होता. तो शाळेत असल्यापासून फारच समर्पित स्वभावाचा मुलगा होता. जेंव्हा तो अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता, तेंव्हाच तो मला सांगत असे की एक दिवस तो गुगलसाठी काम करेल. त्याच्या अभ्यासाच्या टेबलवर सॅन फ्रँन्सिस्कोच्या केबल कारची प्रतिकृती होती. दररोज तो त्या केबल कार कडे बघून मला सांगत असे की मी सॅन फ्रँन्सिस्कोच्या गुगलच्या ऑफिसमध्ये काम करेन. मी मात्र त्याला बोलत असे की तो फक्त दिवास्वप्न बघतो आहे. पण तो त्याच्या ध्येयावर ठाम होता. त्याच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला असताना जी.एस.ओ.सी. (गुगल समर ऑफ कोड) मध्ये त्याची निवड झाली. त्यात त्याने क्रोम उत्पादनासाठी अतिशय चांगली कामगिरी केली. गुगलची निवड प्रक्रिया अतिशय कठोर आणि कठीण असते. अशा निवडीच्या ७ फेऱ्या त्याने पार केल्या आणि अखेरीस त्याला अंतिम मुलखतीसाठी कॅलिफोर्नियाला बोलावण्यात आले आणि त्यात त्याची निवड झाली. त्याचे यश माझ्यासाठी खूप अभिमानास्पद होते कारण, खरतरं, मला असा मुळीच विश्वास नव्हता की तो अंतिमतः उत्तीर्ण होईल. मला माझ्या मुलाकडून शिकायला मिळाले की तुम्ही सतत आणि निरंतर भव्य स्वप्ने बघत राहिलं पाहिजे.

तुमची व्यावसायिक प्रगती ही सर्वस्वी तुमच्यावरच अवलंबून असते

तुम्ही नेहमीच नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकले पाहिजे. जर तुम्हाला नेतृत्व करायचं असेल, तर तुमच्या व्यावसायिक विकासाचे आरेखन आणि नियंत्रण तुम्ही स्वतःच केले पाहिजे. माझ्या आयुष्यातल्या दोन व्यक्तींमुळे मी खूप प्रेरित झाले आहे, एक माझी आई आणि दुसरी व्यक्ती म्हणजे माझी बॉस संगीता सिंह. माझ्या आईने, तिचे मर्यादित शिक्षण असून सुद्धा, माझ्या वडिलांचा व्यवसाय उत्कृष्ट पद्धतीने सांभाळला. ती आज हयात नाही. दुसरी व्यक्ती म्हणजे माझ्या बॉस संगीता, ते केवळ त्या माझ्या बॉस आहेत म्हणून नाही तर, ज्या प्रकारे त्या त्यांचे काम चिकाटीने आणि निष्ठेने करतात, तो गुण खरोखर वाखाणण्यासारखा आहे. आणि म्हणूच त्या माझ्या प्रेरणास्थान आहेत.

लेखक : वर्षा अडुसुमिल्ली

अनुवाद : ज्योतिबाला भास्कर गांगुर्डे

    Share on
    close