कॉस्मेटोलॉजीच्या क्षेत्रात ʻसिडक्शन लास वेगासʼच्या मोनिशा यांची गरुडभरारी

0

कुटुंबाचे सहकार्य, स्टार्टअप सुरू करण्याची इच्छा आणि कॉस्मेटोलॉजी (सौंदर्यप्रसाधन) विषयी आवड या तीन कारणांमुळे मोनिशा गिडवानी यांनी ʻसिडक्शन लास वेगासʼ सुरू केले. लंडनमध्ये एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोनिशा यांना एका फार्मा कंपनीमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळाली होती. तसेच त्या कंपनीत काम करण्याची संधीदेखील चांगली होती. थोडक्यात म्हणजे नव्या पदवीधर विद्यार्थ्याला जशा नोकरीची आवश्यकता असते, तशाच नोकरीची नामी संधी मोनिशा यांच्याकरिता चालुन आली होती. मोनिशा सांगतात की, ʻआयुष्यात काहीतरी सुटते आहे, असे मला सारखे वाटत राहायचे. तसेच त्या कंपनीत काम करण्यात मला काहीच फायदा दिसत नव्हता. त्यामुळे मी एकेदिवशी निर्णय घेतला आणि नोकरी सोडून मुंबईत परतले.ʼ

आपल्या जुन्या आठवणींबद्दल बोलताना त्या सांगतात की, ʻनोकरी करत असताना एका रात्री मी माझ्या वडिलांना फोन करुन सांगितले की, लंडनमध्ये सर्वकाही सोडून मी उद्योजकतेच्या मार्गावर जाण्याचे ठरविले आहे.ʼ माझ्या निर्णयाला वडिलांनी लगेचच समर्थन दिले, त्यामुळे माझ्या आनंदाला पारावाराच उरला नाही. मोनिशा सांगतात की, ʻकॉस्मेटोलॉजी माझा आवडीचा विषय होता. अशा परिस्थितीत फार्मसी आणि औषधांमध्ये काम करण्यास माझे मन लागत नव्हते. त्यामुळे एके दिवशी मी निर्णय घेतला की, मला स्वतःला कॉस्मेटीकच्या क्षेत्रात काहीतरी काम सुरू करायला हवे. अशी सौंदर्य़ उत्पादने तयार करायला हवीत, जी फक्त स्वस्तच नसतील तर त्यांची गुणवत्तादेखील चांगली असेल, अशी माझी इच्छा होती.ʼ मोनिशा सांगतात की, ʻग्राहकाव्यतिरिक्त कोणीही कोणत्या संस्थेवर परिणाम करू शकत नाही. ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा चांगलेच उत्पादन त्यांना द्यायला हवे, असा माझा समज आहे.ʼ व्यवसायामध्ये भावनांना कोणतेही स्थान नसते, असे माझे मत आहे. मात्र याचा अर्थ असा होत नाही की, या क्षेत्रात भावनात्मक लोकांची गरजच नाही, असे त्या सांगतात. त्या पुढे सांगतात की, ʻजेव्हा लोक म्हणतात की, तुम्ही हे काम करू शकत नाही, तेव्हा निराश व्हायची गरज नसते. अशा लोकांच्या प्रश्नांचा अर्थ समजून घ्यायचा असतो, की ते असे का म्हणत आहेत. तुमच्या आसपास राहणारे हे तुमचे सर्वात चांगले समीक्षक असतात.ʼ

मोनिशा यांच्या मते, अशा लोकांची कधीच नियुक्ती करू नये, जे कर्मचारी म्हणून काम करतील. अशा लोकांना आपल्याशी जोडून ठेवा, जे कंपनीला एका कुटुंबाप्रमाणे मानतील आणि आपुलकीने तिची काळजी घेतील. अशा प्रकारचे लोक एक तर संस्था बनवू शकतात. याशिवाय बोलण्यापेक्षा जास्त ऐकून घेण्याची सवय करुन घ्यायला हवी. आपल्या या यशाचे श्रेय मोनिशा आपल्या आईवडिलांना देतात, ज्यांनी आपल्या बचतीचा सर्वाधिक हिस्सा मोनिशा यांच्या व्यवसायाकरिता दिला. या प्रकारे मोनिशा यांनी पहिल्यांदाच नेलपॉलिशच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि आपला स्वतःचा एक ब्रॅंड तयार केला. आपल्या सुरुवातीच्या दिवसांबाबत बोलताना त्या सांगतात की, ʻया ठिकाणी पोहोचण्यासाठी मला अथक परिश्रम करावे लागले. आम्ही अनेक पार्लर आणि रिटेल आऊटलेटमध्ये जाऊन त्यांना आमच्या उत्पादने दाखवत असू. त्यानंतर ग्राहक म्हणून अनेक पार्लरने केवळ आमच्या उत्पादनांची गुणवत्ताच समजून घेतली नाही तर त्यांचे कौतुकदेखील केले.ʼ भारतात रिटेल व्यवसायात उधारीदेखील द्यावी लागते, मोनिशा यांनी हा धोकादेखील पत्करला. मोनिशा यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात एका खास जागेवरुन केली होती. आज त्यांची ओळख मुंबईतील ३०० पेक्षा अधिक ब्युटीपार्लरमध्ये झाली आहे.

मोनिशा सांगतात की, ʻनेलपॉलिशपासून काम सुरू करण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकांमध्ये हे एक ब्रॅंड म्हणून प्रस्थापित व्हावे. त्यानंतर आम्ही लिपस्टिकदेखील सहा वेगवेगळ्या छटांमध्ये लॉंच केली. लोकांमध्ये ती फारच प्रसिद्ध झाली. त्यानंतर आम्ही वॉटरप्रूफ काजळदेखील बाजारात उतरवण्याचे ठरविले, त्या उत्पादनालादेखील लोकांमध्ये फारच पसंती मिळाली. आम्हाला माहित आहे की, ग्राहकांना आमच्या कंपनीचे लिपस्टिकचे उत्पादन पसंत आहे. त्यामुळे आम्ही १२ विविध छटांमधील लिपस्टिक बाजारात आणल्या आहेत. मुंबई आणि आसपासच्या परिसरात त्यांची विक्री चांगली होत आहे.ʼ मोनिशा यांना सुरुवातीपासूनच माहित होते की, त्यांचे उत्पादन चांगले होत आहे. ग्राहकांनी जर ते वारंवार वापरले, तर ते त्यांच्या पसंतीस उतरेल. मोनिशा सांगतात की, ʻआम्ही ब्लॉगर आणि फॅशनची आवड असलेल्या लोकांच्या कायम संपर्कात असतो. त्यांना सातत्याने आम्ही सॅंम्पल देत असतो. त्यांना आमची उत्पादने आवडली, की आम्हाला समाधान वाटते. एका पद्धतीने आम्ही सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांशी जास्तीत जास्त जोडण्याचा प्रयत्न करतो. या प्रकारे आमची प्रसिद्धीपण होत असते.ʼ या वर्षभरात गुजरातमध्ये आपले उत्पादन सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. तसेच मुंबईतील विक्री दुप्पट करण्याचे त्यांचे ध्येय आहे. २०१६च्या अखेरपर्यंत ʻसिडक्शन लास वेगासʼला आपली उत्पादनांची संख्या तीनवरुन सहा करण्याची योजना आहे. मोनिशा या वयाने लहान आहेत. मात्र महिला उद्योजकांना भारतात गांभीर्याने घेतले जात नाही, याची त्यांना खंत वाटते. देशात चूल आणि मूल, हिच महिलांची कामे असल्याची मानसिकता आहे. मोनिशा सांगतात की, ʻभारतीय समाजात आजही हेच मानले जाते की, लग्नानंतर महिलांचे करियर संपुष्टात येते. मात्र मला आनंद वाटतो की, माझे आई-वडिल अशा विचारसरणीचे नाहीत. त्यांनी सुरुवातीपासूनच माझ्या व्यवसायाला समर्थन दिले आहे.ʼ

मैरी के यांना मोनिशा आपला आदर्श मानतात. त्यांच्याच तत्वावर चालण्याचा मोनिशा प्रयत्न करत असतात. ʻआयुष्यात जे काही तुम्हाला हवे आहे, ते तुम्हाला मिळू शकते. फक्त त्याकरिता तुम्ही जीव तोडून मेहनत करायला हवी. त्यासाठीची किंमत मोजायची तुमची तयारी हवी.ʼ मोनिशा यांना आपल्या वडिलांपासून प्रेरणा मिळते. त्यांनी आपल्या कुटुंबांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बरीच मेहनत केली. मोनिशा सांगतात की, ʻव्यवसायासाठी पैसे देण्याकरिता माझ्या वडिलांनी फक्त बिझनेस प्रपोजल चांगल्या पद्धतीने पाहिले होते. माझ्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी किती समर्पण आहे, हेदेखील त्यांनी पाहिले नव्हते.ʼ तर दुसरीकडे मोनिशा यांची आई त्यांना प्रोत्साहित करत होती. ʻवाईट काळ गेल्यानंतर चांगली वेळदेखील येते. त्यासाठी आपल्याला उगाचच चिंता करण्याची गरज नसतेʼ, असे मोनिशा यांच्या आईचे म्हणणे होते.

लेखक - सास्वती मुखर्जी

अनुवाद - रंजिता परब

Related Stories

Stories by Team YS Marathi