भिमगीतांचा ‘रॉकस्टार’ कबीर

0

१४ एप्रिल आला की सगळीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक भिमगीतांनी प्रत्येक गल्लोगल्ली फुलून निघालेली आपण पाहतो. पण ही गीते सुगम, कव्वाली संगीताच्या स्वरूपात अनेक वर्षानुवर्षे आपल्याला ऐकायला मिळतात. पण या सुगम आंबेडकरी गीतांची जागा जर रॉकींग म्यूझीकने घेतली तर? हा प्रश्‍न आजवर कुठल्याच आंबेडकरी गायकाला पडला नाही तो नवी मुंबईतील एका तरूण गायकाला पडला. तसेच भिमगीतांच्या विश्वात रॉकींग ही संकल्पना रूजवून तो गेली अनेक वर्षे आपल्या रॉकींग गीतांच्या माध्यमातून आबेंडकरी जनतेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तेच जगण्याचं बळ आणि ऊर्जा देण्याचे कार्य करीत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर! भारतीय घटनेचे शिल्पकार! महामानव! दलित, वंचित समाजाला गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांनी प्राप्त करून दिला. ‘एक शाम भीमजी के नाम’, ‘एका घरात या रे’, ‘लाल दिव्याच्या गाडीला, ‘योगदान भीमाचं’..... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर आणि विचारांवर बेतलेली ही भीमगीतं आजही तेवढ्याच रसरशीतपणं पुढं येताना दिसतात. या भीमगीतांची टायटल्स त्याचीच साक्ष देतात. शाहीर वामनदादा कर्डक यांच्यापासून सुरू झालेली ही भिमगीतांची परंपरा आजच्या तरुणाईनंही कायम ठेवलीय. आंबेडकरी जलसा यशस्वीपणं पुढं चालवण्याचं आव्हानं तरुणाईनं पेललंय. काळानुरूप भीमगीतांच्या रचनेत आणि संगीतात बदल झाला असला तरी समतेच्या विचारांचा अंगार मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतं. आजवर १४ एप्रिलच्या दिवशी सर्व ठिकाणी वाजविण्यात येणार्‍या भिमगीतांमध्ये रॉकींग गाणे कधीही ऐकायला मिळाल्या नसतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या संघर्षाला वाहिलेले अनेक डीजे सॉंग लागले की तरूणाई त्या तालावर थिरकताना आपण पाहतो. अशा संगीतामधून अन्यायाच्या विरोधात लढण्याची शक्ती निर्माण होते. परंतू याच सुगम व डीजे भिमगीतांना रॉकींगचा ठसका देऊन भिमगीतांच्या विश्वात एक वेगळीच छाप उमटविणार्‍या नवी मुंबईतील गायक कबीर शाक्य याची कहाणीच अनोखी....

भारतात सांस्कृतिक चळवळीला प्राचीन इतिहास आहे. कधीकाळी राजे-रजवाड्यांच्या मनोरंजनाचे साधन म्हणून ओळखली जाणारी कला आज प्रबोधनाचे एक प्रमुख माध्यम झाले आहे. भारताला लाभलेला हा प्रबोधनाचा वारसा नवी पिढी पुढे नेत असून महाराष्ट्रात अनेक शाहीर, कलावंत आपल्या कलेतून प्रबोधन करताना दिसतात. त्यापैकीच एक भीमगीतांच्या विश्वातील गायक. पण काळ जसा बदलला, तसा या भीम इंडस्ट्रीतील गायकांनी स्वतःला मोल्ड करणे गरजेचे समजले नाही आणि हे संगीतक्षेत्र उपेक्षितच राहिले. रटाळ वाटणार्‍या कव्वाली, शेरो-शायरी, उचलेगिरीमुळे आंबेडकरी संगीत क्षेत्राकडे बहुसंख्य प्रेक्षक वर्गाने पाठ फिरवली. पण हीच चौकट मोडण्याचा प्रयत्न एका तरुणाने यशस्वीपणे केला. तो म्हणजे तरूण गायक कबीर शाक्य. भीम इंडस्ट्रीत स्तुतीसुमने उधाळणारी गाणी व्हायची. पण कबीरने आपल्या गाण्यातून प्रश्न उपस्थित केले आणि त्यावर समर्पक उत्तरेही दिली, जे यापूर्वी बहुदा कमी वेळाच झाले असावे.

कबीर शाक्य हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला कलाकार होय. नवी मुंबईत स्थिरावलेला; कम्प्युटर सायन्समधून पदवी मिळवणारा...पण संगीताची रुची असल्यामुळे संगीत क्षेत्रात स्वतःला झोकून देण्यापूर्वी संगीताचा गाढा अभ्यास केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘माझे दहा भाषणे तेव्हा शाहिराचा एक पोवाडा’, हा धागा पकडीत कबीरने संगीत क्षेत्रातून समाजप्रबोधन करण्याचे ठरवले. पण हे करण्यापूर्वी त्याने स्वतः धम्म जवळून पाहण्यासाठी बिहारमधील बुध्दगया येथे भिक्षुचे जीवन जगले. त्यावेळी त्याने धम्म अगदी जवळून जाणला, विपश्यना केली आणि नंतर साधनेतून जे ज्ञान प्राप्त झाले ते त्याने आपल्या गीतांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा अवरीत प्रयत्न सुरु ठेवला आहे. एवढेच काय तर संगीत क्षेत्रामध्ये करीयर करु इच्छिणार्‍यांसाठी त्याने नालंदा कल्चरल ऍकॅडमीही स्थापित केली आहे. आज या अकादमीमधून अनेक नवोदित गायक जन्माला येत आहेत. २० वर्षीय कबीरने त्याच्या या प्रवासाला सुरवात केली आणि अवघ्या काही वर्षांमध्ये त्याने त्याच्या आवडीप्रमाणे करिअरमधील एक वेगळेच समाधान मिळवले आहे. रमाई मातेच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून २०११ मध्ये त्याने पहिला स्टेज शो केला. मराठी-हिंदी-इंग्रजी भिमगीतांमधली गाणी वेस्टर्न वाद्यांसह आणि तालासह गाणे हा एक भन्नाट अनुभव होता, असे कबीर सांगतो. वाद्यांच्या मुळ नादात वेस्टर्न आणि रॉक म्यूझीक एकत्र करून नवीन नाद निर्माण करण्याची जिद्द कबीरमध्ये होती.

दुसर्‍याच्या दावणीला बांधण्यापेक्षा स्वतःचे विश्व निर्माण करण्याची उमेद असणारा हा असा तरुण. बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर रॉक पध्दतीने गाणी बनू शकतात हे त्याने स्वतः कृतीतून करुन दाखविले. भीम इंडस्ट्रीला त्याने प्रथम रॉक संगीताची ओळख करुन दिली. त्याच्या ‘धम्मा विंग्ज’ बँडने आणि फॉरेनची पाटलीन चित्रपटाची निर्मिती केलेल्या एस-४ एंटरटेनमेंट या कंपनीच्या माध्यमातून त्याने ‘‘पीस फुल इज युअर वे....आय डू फॉलॉ इट एव्हरी डे...’ असे म्हणत त्याचा पहिला-वहिला रॉक अल्बम ‘द लेजंड ऑफ बोधीसत्वा’ लॉंच केला.

आपल्या पहिल्या वहिल्या अल्बमच्या क्वालिटीला कुठेही ठेच पोहचू द्यायची नाही, यासाठी कबीरने एक संगीत दिग्दर्शक म्हणून किल्ला लढविण्याची जबाबदारी हाती घेतली. ‘द लेजंड ऑफ बोधीसत्वा’ या अल्बमध्ये कबीरने त्याच्या रॉकींग आवाजात पार्श्वगायन करून समस्त आंबेडकरी जनतेमध्ये तोच उत्साह भरविला. तसेच त्याच्या अनोख्या संकल्पनेत बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक शान, प्रसेनजीत कोसंबी, अनिरुद भोला यासारख्या दिग्गज गायकांनाही सामील करीत त्याने त्याची विविध गाणे त्यांच्याकडून गाऊन घेतले. विशेष म्हणजे गायक शानला कबीरची गाणी इतकी आवडली की त्याने स्वतःचा स्टुडीओ रेकॉर्डींगसाठी कबीराला दिला आणि ही गाणी शानच्या बांद्रा येथील स्टुडीयोत रेकॉर्ड झाली. या संगीत अल्बमला फक्त भारतातूनच नव्हे तर श्रीलंका, कॅनडा, थायलंड आदी देशांमधूनही मोठ्या प्रमाणात मागणी प्राप्त होत असून त्याच्या रॉंकीग भिमगीतांच्या सुरांनी भारत देशाच्या सीमाही ओलांडल्या आहेत. नुकत्याच घडलेल्या रोहिम वेमुला आत्महत्या प्रकरणानंतर पुन्हा एका दलितावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये यासाठी ‘‘ संघर्ष करनेसे अभी में डरूंगा नहीं, बाबासाहेब आप की प्रतिमा हात में लेके अब में मरूंगा नही...’’ असा संदेश देणारे एक गीत कबीर लवकरच युट्यूबवर लॉंच करणार आहे. कबीर शाक्य याने भीम इंडस्ट्रीत रॉक संगीताचा नवा अध्याय घालून दिला आहे. बुध्दांवर रॉक गीते होऊ शकतात, अशी कल्पनाही यापूर्वी कोणी केली नसावी बहुदा, पण त्याने हे करुन दाखवले. आज त्याने स्वतःचा असा एक ब्रॅण्ड तयार केला आहे. ‘धम्मा विंग्ज’ बँडच्या माध्यमातून तो देश-परदेशात विविध शो परफॉर्मन्स करतो. देशातील आंबेडकरी गायकांनी कधीही राज्यांची सीमा ओलांडली नव्हती. महाराष्ट्रातील आंबेडकरी गायक दुसर्‍या राज्यात जाऊन स्टेज शो करतोय, हे कधी पहायलाही मिळाले नव्हते. पण कबीरने हे साध्य केले. तो आणि ‘धम्मा विंग्स’ चे ड्रमर स्वप्निल मोरे, बेस गिटारीस्ट राहुल कांबळे, लिड गिटारीस्ट रोहल झोडगे, कि-बोर्डीस्ट श्रीजीत बॅनर्जी या टीमने दिल्ली, बंगळुरु, बिहार, मैसूर, मुंबई अशा शहरांमध्ये रॉक शो केले आहेत. या कार्यक्रमांना लाखोंच्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली. संपुर्ण भारत देशात रॉकींग भिमगीतांच्या मैैफीलींचा प्रवाह रूजविण्यात कबीरचा मोठा वाटा आहे. ऑलंम्पिक स्पर्धा जेथे भरविल्या जातात, त्या तालकठोरा स्टेडियमवर देखील त्याचा रॉकींग भिमगीतांचा कार्यक्रम झाला आहे. तसेच कबीरने तरूणांसाठी रॉकींगची संकल्पना कायम ठेवत जेष्ठांच्या आवडीनुसार बुद्धांवर अभंग असलेला ‘बुद्ध प्रभात’ हा अल्बम लॉंच केला. त्याने तयार केलेल्या बुद्धांवरील अभंगामधून भजनसम्राट अजित कडकडे, ‘बाजीराव मस्तानी’ फिल्मच्या लीड सिंगर वैशाली माने, गायक अभिजीत कोसंबी यांच्या सुमधूर आवाजाने आज अनेक ज्येष्ठांची या अल्बमला पसंती मिळत आहे. कबीरच्या या नव्या कोर्‍या संकल्पनेमुळे १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सुगम भिमगीतांची जागा ऱॉकींग भिमगीते घेण्यासाठी जास्त काळ लागणार नाही, हे मात्र नक्की.

जीवनात यश मिळविण्यासाठी माणसाने सतत धडपडणे गरजेचे आहे. जो माणूस जीवनात जेवढा मोठा संघर्ष करतो त्याला तेवढे मोठे यश मिळते.

Related Stories