'मेक ईन महाराष्ट्राचा' तरुणांनी लाभ घ्यावा 

0

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सुरु केलेल्या मेक इन इंडिया व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या मेक इन महाराष्ट्र हा उपक्रमांतर्गत तरुणांनी उद्योग, व्यवसायाकडे वळले पाहिजे. यासाठी आज अत्यंत अनुकूल वातावरण असून त्याचा लाभ तरुणांनी घेतला पाहिजे. नोकरीमुळे फक्त स्वत:लाच रोजगार मिळतो तर उद्योग, व्यवसायामुळे अनेक जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. देशांतर्गत उत्पादन वाढले की, परदेशी कंपन्यांचे प्राबल्य कमी होत जाईल आणि देशातील पैसा देशातच राहून देश समृद्धीकडे वेगाने झेपावेल असे मनोगत सांगली येथील उद्योजक संजय वजरिणकर यांनी नेटभेटमध्ये व्यक्त केले.

संजय वजरिणकर हे मुळ सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील. त्यांचा जन्म दि. 16 ऑगस्ट 1964 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक, शालेय शिक्षण तासगावला तर बीएससी (केमिस्ट्री) ची पदवी त्यांनी सांगलीतून मिळविली. पुढे कोल्हापूर येथून एमबीएची पदवी प्राप्त केली. वजरिणकर यांचे वडील तासगावमध्ये रस्त्यावर धान्य विकायचे. पण आई वडिल दोघेही जुने मॅट्रिक झालेले होते. त्यामुळे त्यांचा शिक्षणावर खूप भर होता. त्यामुळेच आज वजरिणकरांचे मोठे भाऊ मुख्याध्यापक आहे तर धाकटे भाऊ खासगी कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. वजरिणकर नोकरी सोडून व्यवसाय करणार म्हणून सर्व कुटुंबियांचा, नातेवाईकांचा प्रारंभी प्रचंड विरोध होता. पण पत्नी सुरेखा यांनी पूर्ण साथ दिली. वजरिणकर यांना 2 मुले असून मोठा मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे तर दुसरा अकरावीत आहे.

एमबीए झाल्यावर एका खाजगी कंपनीत त्यांनी सेल्स ऑफिसर म्हणून 4 वर्ष नोकरी केली. पण पहिल्यापासूनच त्यांना व्यवसाय करण्याची इच्छा होती. त्यामुळे नोकरीत मन रमत नव्हते. शेवटी हिंमत करुन नोकरी सोडली. या नोकरीमुळे शेतीचे मुलभूत ज्ञान मिळाले तर व्यावसायिक संबंधामुळे व्यवसायाचे ज्ञान मिळाले.

तासगावमध्ये प्रथम शेती औषधाचे दुकान टाकले. दुकानामुळे शेतकऱ्यांशी संबंध येऊ लागला. त्यांच्या गरजा, समस्या समजून येऊ लागल्या आणि त्यातून त्यांना कोणत्या उत्पादनांची, औषधांची गरज आहे हे कळू लागले. या प्रत्यक्ष अनुभवातून आणि विविध उत्पादनांच्या अभ्यासातून, संशोधनातून प्रत्यक्ष उत्पादनाच्या निर्मितीकडे 2001 साली वजरिणकर वळले.

सुरुवातीला भाड्याने छोटा प्लॉट घेतला. तिथे उत्पादन सुरु केले. पण अनुभवी कर्मचारी, कामगार नव्हते. त्यामुळे सर्व कामे स्वत: करावी लागत आणि ती इतरांना दाखवून शिकवावी लागत. सुरुवात झाली ती दोन कामगारांपासून. त्यापैकी एक स्वत: वजरिणकर होते. तर दुसरा प्रत्यक्ष कामगार होता. स्वत:च उत्पादन करायचे आणि ते दुकानांमध्ये जाऊन स्वत:च विकायचे ! पुढे काम वाढू लागले आणि 2010 साली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरु केली. या कंपनीमार्फत किटक नाशके, संजीवके, द्राक्षाशी संबंधित रसायने यांचे उत्पादन केले जाते. ही उत्पादने महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशात जातात. थोडक्यात जिथे जिथे द्राक्षाचे उत्पादन होते, तिथे तिथे ही औषधे जातात.

आज कंपनीत अधिकारी, कर्मचारी, कामगार, लॅब तंत्रज्ञ, मार्केटिंग टिम असे जवळपास शंभर जणं कार्यरत आहेत. एप्रिलमध्ये उत्पादन सुरु होते, ते नोव्हेंबरपर्यंत चालते. मधल्या काळामध्ये पुढील हंगामाची कामे करुन घेतली जातात. कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे किमान वेतन कायद्यापेक्षाही कामगारांना अधिक वेतन येथे दिले जाते. कामगारांची सुरक्षा, आरोग्य याकडे विशेष लक्ष दिले जाते.

पहिल्या वर्षी कंपनीची अडीच कोटी रुपये एवढी उलाढाल होती. तर यावर्षी 2016 अखेर ती वीस कोटीपर्यंत गेली आहे. कंपनी केंद्र, राज्य सरकारचे कर वेळच्या वेळी भरत असते. उत्पादनांच्या डिलीव्हरीसाठी 5 वाहने आहेत. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष उत्पादन कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिक दाखविणारे, माहितीपट दाखविणारे आकर्षक वाहन स्वत: वजरिणकर यांनी विकसित केले आहे.

कंपनीने भारतभर आठशे वितरकांचे मजबूत जाळे निर्माण केले आहे. या साखळीमुळे, उत्पादनांच्या दर्जेदारपणामुळे विक्री व्यवस्थेची घडी उत्तमपणे बसली आहे. वजरिणकर वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्स, रेडिओ, माहितीपट यावरुन सातत्याने त्यांच्या उत्पादनांची प्रसिद्धी करीत असतात. पण स्वत: मात्र व्यक्तीगत प्रसिद्धीपासून ते कटाक्षाने अलिप्त राहीले आहेत. चीन, मॉरिशस, दुबई, व्हिएतनाम, श्रीलंका, आर्मेनिया, मलेशिया, सिंगापूर, थायलँड या देशांना भेटी देऊन तेथील उत्पादने, बाजारपेठा यांचा अभ्यास ते करुन आले आहेत. संजीव कोलार हे त्यांचे 2004 पासून भागीदार आहेत. ते स्वत: कृषी पदवीधर आहेत. 

यापुढचे वजरिणकर यांचे पाऊल म्हणजे 15 कोटी रुपये गुंतवणूक असणारा अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करणे हे होय. पुढच्या वर्षीच्या प्रारंभी या उद्योगाला प्रारंभ होणार आहे. या उद्योगामुळे पुढे कमीत कमी 150 जणांना रोजगार मिळेल. या उत्पादनापैकी 80 टक्के निर्यात होईल तर 20 टक्के देशांतर्गत विक्री होईल. 5 एकर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारला जातोय.                                              (सौजन्य - महा न्यूज)