कॉल सेंटर ते एक यशस्वी ब्लॉगर, हर्ष अग्रवालचा सुरेख प्रवास !

0

स्टार्टअप सुरू करुन लाखो रुपये कमावणाऱ्यांच्या कथा आपण वाचतो आणि ऐकतो...पण ब्लॉग लिहूनही भरपूर पैसा कमावता येऊ शकतो यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. पण हे सत्य आहे आणि हे सिद्ध करुन दाखवलं आहे हर्ष अग्रवाल यांनी...अनेक कंपन्यांना ऑनलाईन राहण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ब्लॉग्जची आवश्यकता असते. यातूनच अनेक उद्योजकांना ब्लॉग लिहून उत्पन्न मिळतं. हर्ष यांनी २००८ मध्ये शारदा विद्यापीठातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि त्यांना लगेचच ऍक्सेंच्युअर कंपनीत नोकरीही लागली. काम सुरू करण्याआधी त्यांनी गुडगावमधील एका कॉलसेंटरमध्ये काम सुरू केलं. संगणक आणि तंत्रज्ञान विषयात त्यांना रुची होती. कॉन्व्हर्जेसमध्ये काम करत असताना त्यांनी ब्लॉगस्पॉटवर एक ब्लॉग लिहिला. महिन्याभरात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. दोन महिन्यांनंतर डिसेंबर २००८ मध्ये त्यांनी त्यांचा ब्लॉग सेल्फ होस्टेड (वेबसाईट) वर्डप्रेसमध्ये रुपांतरीत केला. होस्ट आणि डॉमेन खरेदी करण्यासाठी त्यांनी मित्रांकडून पैसे घेतले. त्यातूनच मग ‘ShoutMeloud’ ची स्थापना झाली. पण तोपर्यंत यातून पैसा मिळू शकतो हेच त्यांना माहिती नव्हतं.


ऑनलाईन पैसा मिळवणं म्हणजं नक्की काहीतरी घोटाळा असतो, ऑनलाईन पैसे मिळवण्याच्या योजना बनावट असतात असं हर्ष यांना वाटायचं. पण एका SEOशी संबंधित गूगल वेबमास्टर टूल बनवून दिल्याबद्दल त्यांना एकाने १० डॉलर्स पाठवले आणि हर्ष यांचा गैरसमज दूर झाला. त्यानंतर मग त्यांनी त्यांचं पेपॅल(paypal) अकाऊंट उघडलं. त्यांच्यासाठी ती अभिमानाची गोष्ट होती, त्यामुळे आपण ऑनलाईन पैसे मिळवल्याचं त्यांनी त्यांच्या सर्व मित्रांना फोन करून आवर्जून सांगितलं. मग हर्ष यांनी एडसेन्स वितरणाशी जोडून घेतलं आणि थेट ब्लॉग्जमधून पैसे मिळवायला सुरुवात केली.

त्यानंतर केवळ काही महिन्यांतच त्यांना ब्लॉगिंगमधील ताकद लक्षात आली, त्याचं महत्त्व समजलं आणि मग पैसेही मिळायला लागले. हर्ष यांना दर महिना ३५ हजार रुपये मिळत होते, जे त्यांच्या कॉन्व्हर्जेसमधल्या त्यावेळच्या पगारापेक्षा दुप्पट होते.

जून२००९ मध्ये ते एक्सेंच्युअरमध्येच काम सुरु ठेवावं की पूर्णवेळ फक्त ब्लॉग्ज लिहावेत अशा द्विधा मन:स्थितीत होते. त्यांनी आपल्या मनाची हाक ऐकली आणि ब्लॉग्ज लिहायचं ठरवलं आणि हाच त्यांच्या करिअरला वळण देणारा टप्पा ठरला. हर्ष त्यानंतर पूर्णवेळ व्यावसायिक ब्लॉगर म्हणून काम करायला लागले.

त्यांनी अनेक फ्रीलान्सर्ससोबत काम केलं. ऑफिसमधून काम करण्याचा हर्ष यांचा फारसा आग्रह नसतो. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी मनासारखं मोकळेपणानं काम करता येणं महत्त्वाचं असं ते मानतात. येत्या काही वर्षांत जगभरात कामाची हीच संस्कृती रुळेल, असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच त्यांच्या टीममध्ये पूर्णवेळ कर्मचारी नाहीत. सध्या त्यांच्यासोबत फक्त एक पूर्णवेळ कर्मचारी आहे आणि उर्वरित सगळेच जगभरातून मुक्तपणे काम करणारे आहेत. सध्या त्यांचे ShoutMeLoud या नेटवर्कअंतर्गत आठ लाईव्ह ब्लॉग्ज आहेत. हा ब्लॉग अत्यंत लोकप्रिय आहे. ShoutMeTech आणि WPfreesetup हेही त्यांचे लोकप्रिय ब्लॉग्ज आहेत.

ब्लॉग्ज लिहून मिळालेल्या पैशांमधून त्यांनी नुकताच गुडगावमध्ये फ्लॅट घेतला आहे. तसंच ब्लॉगच्या या वाढत्या व्यवसायात त्यांना आता इतर लोकांनाही सोबत घ्यायचं आहे. त्याचबरोबर ShoutMeLoud.com/pro,साठी मजकूर मिळवण्याच्या दृष्टीने ऑनलाईन ब्लॉग लिहिण्याचा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. नवीन काहीतरी सुरू करण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहू नका तुम्ही सुरू कराल ती योग्य वेळ असते, असा सल्ला ते ब्लॉग लिहिण्याची इच्छा असलेल्या लोकांना देतात.

शिकणं ही एक निरंतर प्रक्रिया आहे पण जास्तीत जास्त लोकांनी तुमचा ब्लॉग वाचावा यासाठी २-३ महिने SEO , सोशल मीडिया, विपणन आणि ब्रँडिंग या प्रक्रिया समजून घ्या. सध्याच्या वेगवान जगात माहिती एका क्षणात बदलत असते. त्यामुळे ब्लॉग लिहिणाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील घडामोडींची अद्ययावत माहिती असणं आवश्यक आहे, असा सल्लाही हर्ष देतात.

@denharsh या ट्विटर अकाऊंटवर किंवा Facebook@ShoutHarshवर आपण हर्ष यांच्याशी संपर्क साधू शकतात.

लेखक - प्रदीप गोयल

अनुवाद- सचिन जोशी