‘शौर्य’ चे तव दीप उजळू दे!

1

भारतीय सैनिकांच्या कारगिल येथील शौर्याची गाथा खरं तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरली जायला हवी अशी आहे. अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर एकीकडे अपुरा शस्त्रसाठा, प्रतिकूल निसर्ग आणि दुसरीकडे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता ‘छोडो मत उनको!’ असं म्हणत शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सैन्याचे वीर जवान! पण कित्येकांना या तेजाच्या लढ्याचा विसर पडला आहे. आजच्या तरूणाईच्या मनात या हुतात्म्यांचे शौर्याचे दीप कायम उजळून ठेवता यावे यासाठी पुण्यातील आसीम फाऊंडेशनने ‘शौर्य’ हा अॅण्ड्रॉईड अॅप सुरू केला आहे. ‘शौर्य’ हे अॅप सुरू करण्यासाठीचा आतापर्यंतचा आसीम फाऊंडेशचा हा प्रवास...

आजच्या तरुण रक्ताला योग्य दिशा नाही, आदर्श नाहीत म्हणून ओरड होताना ऐकू येत आहे. आजच्या तरुणाईपुढे कारगिलच्या शूरवीर जवानांच्या अपार शौर्याची कहाणी मांडताना सर्वसामान्य माणसामध्ये व सैनिकांमध्ये एक सुंदर भावबंध निर्माण करण्याच्या कामी वाहून घेतलेल्या ‘असीम फाऊंडेशन’द्वारा सैनिकांप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची त्या समाजाला जाणीव तर करून देत आहेतच, शिवाय आपल्या मायेचा हात या लढवय्या सैनिकांच्या पाठीवर ठेवून त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध निर्माण करत आहेत. असीम फाऊंडेशनचे सारंग गोसावी, संस्कृती बापट, साई बर्वे. निरूता किल्लेदार, दिप बांदिवडेकर, संदिप तांबे, तेजश्री कर्वे, तेजस्विनी कुलकर्णी व अद्वैत शेंडे आदि तरूण अगदी सैनिकांप्रमाणे यासाठी कार्य करीत आहेत.

वर्तमानपत्रांमध्ये कारगिल युद्धाच्या बातम्या, त्यांचे मथळे वाचले किंवा इतर चर्चासत्रांमध्ये कारगिल युद्धामध्ये वीरमरण पत्कारलेल्या शहीदांची वीरकथा समोर आली की प्रत्येकाच्या अंगावर शहारे उठतातच. पण जबरी प्राणहानी सोसून भारताच्या सुरक्षेसाठी प्राण अर्पण करणार्‍या शहीदांची शौर्यगाथा तरूणांपर्यंत अजुनही नीट पोहोचल्याच नाहीत हे आसीम फाऊंडेशनने जाणले होते. तरूणांचे व्यक्त होण्याचे व ज्ञान प्राप्त करण्याचे माध्यम काळानुसार बदलले आहे. म्हणूनच असीम फाऊंडेशनतर्फे नव्या टेक्नॉलीजीनेच म्हणजे अॅपच्या माध्यमातून शहीदांच्या शौर्यगाथा पोहचविण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवले.

असीम फाउंडेशन ही पुणे येथील संस्था भारताच्या सीमावर्ती भागांत, मुख्यतः जम्मू-काश्मीरमध्ये काम करते. गेली १४ वर्षे सामान्य लोकांबरोबर तळागाळापर्यंत असलेल्या संबंधांतून लक्षात आलेल्या समस्यांवर उपाय म्हणून असीम फाऊंडेशन तर्फे अनेक मुलभूत प्रकल्प आणि संकल्पना राबवण्यात येत आहेत. या प्रकल्पांद्वारे सीमावर्ती भागांतील दुर्लक्षित समाजाकडे असीम भारतीयांचे लक्ष वेधू इच्छिते. तसेच त्या लोकांना मदतीचा आधार देते. परंतु ही समस्यांकडे पाहण्याची एकच बाजू झाली असेही असीमला वाटते. एकीकडे उपेक्षित राहिल्यामुळे बळावलेला असंतोष तरुणांना गैरमार्गी नेत असताना आपण उर्वरीत भारतातील लोक राष्ट्रीय प्रश्नांकडे अनिच्छेनेच पाहतो. भारतीय समाजाला मुख्यतः तरुणांना राष्ट्रीय प्रश्नांना तोंड देण्याची उर्मी आणि जिद्द देण्याची गरज असीम फाऊंडेशनने जाणून घेतली.

असीमला जाणवणार्‍या या राष्ट्रवादाची जागृती करण्याच्या गरजेला मूर्तिमंत रूप मिळाले. पुण्याजवळच्या चांदिवली येथे असीमच्या प्रयत्नांतून राष्ट्रीय एकात्मता उद्यान साकारण्यात आले. राष्ट्रीय एकात्मता उद्यान हा तरुणांना एकत्र येऊन राष्ट्रीय प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी तयार केलेला एक मंच आहे. या असीमच्या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळावी आणि तरुणांना असे राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून समकालीन नायकांची गरज आहे हे असीमने जाणले आणि म्हणूनच असीमने भारताच्या २१ परम वीर चक्र विजेत्यांची माहिती देणारे अॅण्ड्रॉईड अॅप विकसित करायचे ठरवले.

भारताचे सर्वोच्च शौर्य पदक, परम वीर चक्र, मिळालेल्या २१ शूर सैनिकांच्या मराठी आणि इंग्रजीमधील कथा ‘शौर्य’ या अॅपद्वारे नुकत्याच प्रकाशित केल्या आहेत. त्यामूळे इतिहास प्रेमी तरूणांना आपल्या शुरवीरांची माहिती काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ग्रंथालय गाठून तासनतास पुस्तके न चाळता एका क्लिकवर ही माहिती उपलब्ध झाली आहे. ज्याप्रमाणे आजच्या तरूण पिढींमध्ये सोशल साईट्स लोकप्रिय झाले आहेत, त्याचप्रमाणे आपल्या जवानांच्या संघर्षकथा वाचण्यासाठी ‘शौर्य’ हे अॅप दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालले आहे. आपल्या शुरवीरांनी भारत देशासाठी कशा प्रकारे व कोणत्या परिस्थितीत लढा दिला हे जाणून घेण्याची उत्सुकता तरूणांमध्ये वाढून पुणे व इतर शहरातील अनेक तरूणांच्या मोबाईलमध्ये हा अॅप दिसून येत आहे. या २१ परम वीर चक्र विजेत्या शुरवीरांची कथा वाचल्यानंतर प्रत्येक तरूणांमध्ये राष्ट्राच्या अनेक समस्या सोडविण्यासाठीची नवी शक्ती व सकारात्मक दृष्टीकोन प्राप्त होते. शौर्य या अॅपमधून प्रेरीत होऊन प्रत्येक तरूणांच्या डोळ्यासमोर आदर्श निर्माण होऊन प्रत्येक तरूणाने स्थानिक पातळीवरच्या समस्या सोडविण्यास सुरवात केली तर भविष्यात भारत देश विकासाच्या डोंगरावरील उंची गाठू शकतो.

‘शौर्य’ हे अॅण्ड्रॉईड अॅप मराठी आणि इंग्रजी अशा दोन आवृत्तींमध्ये गुगल प्ले स्टोअरमार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे. कॅ. विक्रम बात्रा, कॅ. मनोज कुमार पांडे, मे. सोमनाथ शर्मा यासारख्या वीरांच्या या कहाण्यांना स्वप्रेरणेने पुढे आलेल्या प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, चंद्रकांत काळे इ. दिग्गजांनी आवाज दिला आहे. त्यांच्या आवाजात या ‘शौर्या’च्या कहाण्या ऐकताना अंगावर जणू काटा येतो. दिव्याच्या ज्योतीप्रमाणे शौर्य या अॅपचा प्रकाश किर्तीरुपाने पसरून प्रत्येकाचे आयुष्य अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धाराने उजळून टाकत आहे.

  • या अतुलनीय ‘शौर्य’ आणि धैर्याच्या गोष्टी ऐकण्यासाठी आणि आपल्या देशाच्या या सच्च्या नायकांची ओळख करून घेण्यासाठी, त्यांच्या सर्वोच्च त्यागाच्या चित्तथरारक कहाण्या ऐकण्यासाठी हे अॅप जरूर डाऊनलोड करा.
  • मराठी आवृत्ती-https://play.google.com/store/apps/details?id=com.nip.shaurya
  • इंग्रजी आवृत्ती - https://play.google.com/store/apps/details?id=com.nip.shaurya_en
  • असीमच्या इतर योजनांबद्दल माहिती घेण्यासाठी तुम्ही असीमच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता: www.aseemfoundation.org
  • Twitter (@aseemfoundation)Facebook च्या द्वारे संपर्कात राहू शकता.


समाजावर, तरुणाईवर फक्त टीका करत बसण्यापेक्षा जर त्यांच्यासाठी काही सकारात्मक करता आलं, त्यांच्या पुढे या वीरजवानांचे आदर्श ठेवता आले, त्यांच्या मनात आपल्या देशाविषयी आणि आपल्या देशाचे रक्षण करणार्‍या शूर सैनिकांविषयी प्रेमाची व आदराची, सन्मानाची भावना निर्माण करता आली तर त्यातून नक्कीच एक चांगला, सशक्त समाज घडायला मदत होईल, याचा आसीम फाऊंडेशनला विश्‍वास वाटतो. आणि संस्था म्हटली की समाजातील इतरही अनेक व्यक्ती सोबत जोडल्या जातात, त्या कार्याला एक भरीवपणा येतो, एक चौकट मिळते. ‘आसीम फाऊंडेशन’च्या माध्यमातून अशी मोलाची माणसे आम्हांला मिळत गेली आणि त्या प्रत्येकाच्या योगदानातून आज आमचे जे काही काम आहे ते पुढे चालले आहे.
- सारंग गोसावी, अध्यक्ष, आसीम फाऊंडेशन, पुणे.
जीवनात यश मिळविण्यासाठी माणसाने सतत धडपडणे गरजेचे आहे. जो माणूस जीवनात जेवढा मोठा संघर्ष करतो त्याला तेवढे मोठे यश मिळते.

Related Stories

Stories by Pramila Pawar