योगाभ्यासात विश्वगुरू होण्याची भारतीयांना सुवर्णसंधी ! पूर्वजांच्या वैश्विक ठेव्याला गतवैभव देणारा जागतिक योगदिवस!

योगाभ्यासात विश्वगुरू होण्याची भारतीयांना सुवर्णसंधी ! पूर्वजांच्या वैश्विक ठेव्याला गतवैभव देणारा जागतिक योगदिवस!

Tuesday June 21, 2016,

4 min Read

भगवान श्रीकृष्णांना योगेश्वर म्हटले जाते. आज ज्या काही भारतीय वैदीक किंवा सनातन धर्मातील महत्वाच्या गोष्टी जगभरात मान्यता पावल्या आहेत त्यात योगेश्वर भगवान यांनी अर्जुनाला रणांगणावर सांगितलेले ज्ञान भगवतगीता हा ग्रंथ सर्वमान्यता पावला आहे. हे इथे का बरे सांगता आहत? असा प्रश्न जर कुणी केला तर तो वावगा ठरणार नाही. जगाला सर्वात प्रथम योगविद्या, योगाभ्यास आणि योगसाधना म्हणजे काय? योगी कुणाला म्हणायचे? त्या योगाचे प्रमुख प्रकार कोणते याचे सविस्तर वर्णन सांगितले आहे. भगवद्गिता हा पाचवा वेद त्यासाठीच मानला गेला आहे. योगाभ्यास ही प्राचीन विद्या असून यात औषधविरहित स्वस्थ जीवनाचे रहस्य सांगितले आहे. कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या तीन प्रमुख प्रकारच्या योगांची माहिती गीतेने वर्णिली आहे.

योगाचा प्रभाव मानवाच्या मन, बुध्दी, आणि शरीर या तीनही अंगावर होतो. त्यामुळे विविध रोगांवर, आजारांवर योगसाधना अतिशय प्रभावशाली असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतात प्राचीन काळापासून ऋषीमुनीच्या विद्याज्ञानाच्या माध्यमातून योगाचा विस्तार झाला. पतंजली यांच्या सारख्या ऋषींनी तर योगसंहिता मांडल्या आहेत. त्यावर संशोधन करून शास्त्रीय पध्दतीने योगविद्येचे भांडार विनामुल्य उपलब्ध करून दिले आहे. आज योगाची जागतिक बाजारपेठ अक्षरश: लाखो कोटी डॉलर्सच्या घरात गेली आहे. प्राचीन काळात योगाचा प्रसार जगात झाला तो बौध्द भिक्खूंच्या विहाराच्या माध्यमातुन! शाक्यमुनी म्हणजे भगवान गौतमबुध्द यांनी दैनंदिन जीवनात आपल्या अनुयायींना योगाचा मार्ग अनुसरुन जीवनात शांती, सुख आणि समाधान कसे प्राप्त करून घेता येईल याचा अनेक प्रकारांनी ऊहापोह केला आहे. प्रामुख्याने चीन ब्रम्हदेश, जपान, श्रीलंका यासारख्या देशात योगाचा प्रसार फार वर्षांपूर्वीच झाला तो बौध्द धम्म दीक्षा घेतल्यानेच! विपश्यना, योगसमाधी आणि ध्यानधारणा या आध्यात्मिक मार्गाचा वापर भारतात आत्मिक उन्नतीसाठी हजारोवर्षापासून केला जात आहे. माणसाला मोक्ष मिळवण्याचा मार्ग म्हणजे ध्यान असल्याचे सांगण्यात आले. तपाचरण करताना योगी होऊन सर्वभवबंधातून सुटका करुन घेण्याचा मार्ग योग असल्याचे आमच्या पूर्वासुरीना अथक संशोधनातून त्याकाळात माहिती झाले होते.

image


आज दिवसेंदिवस योगसाधनेबद्दलची जागरूकता वाढते आहे. त्याचा प्रचार प्रसार होतो आहे. बाबा रामदेव, श्री रविशंकर, माता निर्मलादेवी अशा अनेकानेक योग गुरूंनी व्यावसायिक पध्दतीने योगाचा प्रसार अलिकडच्या काळात केला आहे. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर योगाचा प्रभाव असल्याने त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर योगाला स्विकारण्यात यावे यासाठी व्यक्तिश: प्रयत्न केले. वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून ओळखल्या जाणा-या २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगात साजरा केला जात आहे. देश आणि धर्म यांच्या सीमा ओलांडून योगविद्येचे झालेले जागतिकीकरण आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अमेरिका कॅनडा, चीनसहित एकशे पंचाहत्तर देश आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहेत.

आज जगभरात सर्वत्र योगाभ्यास पोचला असला तरी योगा सुपर पॉवर म्हणून अमेरिका आणि चीन या दोन देशांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. वर्ष १८९३मध्ये स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकी विद्यापीठात योगा या विषयावर आपले विचार मांडले होते. त्यानंतर अनेक पाश्चिमात्य देशांनी योगसाधना स्वीकारली. अमेरिकेत योगविद्येचे मूळ रोवण्याचे श्रेय स्वामी विवेकानंदांचे. त्यांनी युरोप आणि अमेरिकेचा दौरा केला. त्यावेळच्या त्यांच्या प्रवचनांनी या दोन्ही खंडात भारतीय तत्त्वज्ञानाबरोबरच योगाभ्यासाबद्दलही उत्सुकता निर्माण केली.

एका पाहणीनुसार अमेरिकेत अठरा वर्षावरील दोन कोटीपेक्षा जास्त नागरिक नियमित योगाभ्यास करतात. यापैकी ४५ टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न ७५ हजार डॉलरहून अधिक आहे. या पाहणी अहवालानंतर योगाशी संबंधित व्यावसायिक बाबींवर अनेक कंपन्यांचे लक्ष केंद्रित झाले. योगासनांसाठी लागणारे कपडे, चटया, संगीताच्या सीडीज आदि साहित्याची बाजारपेठ अमेरिकेत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपल्या देशातील एखाद्या गोष्टीला जेंव्हा परदेशात वाहवा केली जाते तेंव्हाच आपण त्याच्या बद्दलच्या उपयुक्ततेला वाखाणतो!, असे का आहे माहिती नाही? कदाचित घर की मुर्गी. . . म्हणतात तसे असेल पण योगा बाबतही तसेच झाले आहे. जगभरात योगाला मान्यता, गौरव प्राप्त होत असल्याने भारतातील योगाभ्यास शिकवणा-या गुरूंना मोठी मागणी येत आहे. मानवी संसाधनाची कमतरता नसलेल्या या प्रचंड लोकसंख्येच्या देशातील तरुणांमध्ये आता योगाशिक्षक होण्याच्या नव्या व्यावसायिक दालनाची भर पडली आहे.

आरोग्याप्रती अत्यंत जागरूक असलेल्या अमेरिकेत गेल्या आठवड्यापासूनच आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यासाठी तयारी सुरु आहे. संपूर्ण अमेरिकेत या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अमेरिकेची राजधानी कॅपिटल हिल पासून ते न्यूयार्कच्या संयुक्त राष्ट्र मुख्यालयापर्यंत अनेक शहरांमध्ये योगादिवस साजरा केला जात आहे. अमेरिकेचे नागरिक आरोग्य स्वस्थ राखण्याप्रती अत्यंत जागरूक झाले आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग प्रभावशाली असल्याचे ते मानतात.

आशिया खंडातील विभिन्न देशात खास करून चीनमध्ये योगशास्त्राचा प्रचार मोठ्या प्रमाणात होत आहे. चीनमध्ये ज्या वेगाने योगाभ्यासाचा प्रचार-प्रसार होतो आहे, ते पाहता हा देश अमेरिकेलाही येत्या काही वर्षात मागे टाकेल असे दिसते. योगाच्या यानिमित्ताने व्यवसायाच्या मोठ्या संधी चीन मध्ये उपलब्ध होत आहे. चीनमधली या क्षेत्रातली वार्षिक उलाढाल आत्ताच सहा बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या घरात पोचली आहे. भारतात देखील त्यादृष्टीने योगाचे महत्व लक्षात घेऊन स्थानिक बाजारपेठ मोठ्या प्रमाणात काबीज करता येऊ शकते. मात्र त्यासाठी योगाच्या व्यावसायिकरणात सहजता यायला हवी. आजही आपल्या देशात योगाचे महत्व सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आरोग्य आणि समृध्दी कशी आणु शकते याचा प्रचार करण्यास मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्यातून लाखो कोटी जनतेच्या रोजच्या जीवनात आनंद नांदेलच शिवाय योगाच्या क्षेत्रात जगात भारताला आपल्या मुळ प्रकृतीचे ज्ञान म्हणून सन्मानाने मिरवता येणार आहे.

चीन मध्ये जवळपास ५७ शहरं आणि १७ राज्यांमध्ये वेगवेगळ्या संस्थाच्या माध्यमातून योग शिकवला जात आहे. प्रत्येक देशात योगसाधना वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. जसे कि इंग्रजी भाषेचा उच्चार प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. चीनी लोक चाइनीस पद्धतीने योगा करतात. जसे कि कुंग फु, जुडो किवा मार्शल आर्ट शिकवले जाते. योग एक फॅशन म्हणूनही चीन मध्ये प्रचलित आहे. लोकांच्या दिनचर्येचा महत्वाचा भाग बनलेला आहे. अनेक चीनी लोकं योगसाधना शिकण्यासाठी भारतात येत आहेत.