सेंद्रीय शेतीच्या अनोख्या प्रयोगातून ग्रामीण महिलांची कृषीक्षेत्रातही भरारी! 

कमी खर्चात विक्रमी दर्जदार उत्पादन घेतल्याने भरघोस उत्पन्न!!

0

आज शेतीच्या व्यवसायात देखील महिला पुरुषांपेक्षा काकणभर सरस ठरल्या आहेत. हे दाखवून दिले आहे खेडी गावच्या एक महिला पारुबाई यांनी. त्यांनी कलिंगडाच्या शेतीसाठी संपूर्ण सेंद्रीय पध्दतीने खत म्हणून गोमूत्र आणि ताक वापरले जे वरदान असल्याचे सिध्द झाले आहे. दीड एकरात पाच पट उत्पन्न मिळाले असून सेंद्रीय पध्दतीमुळे कृषीमालाचा दर्जाही उच्च प्रतिचा आहे.

पारुबाईंचे पती रामजी यांनी सांगितले की, पालापाचोळा सडवून केलेल्या कंपोस्ट खताचा आणि ठिबक पध्दतीने पाणी देण्याचा खर्च ७५हजार रुपये झाला, ५५दिवसांत पिक हाती आले. त्यातून ६३ टन कलिंगड हाती आले आणि ३.५० लाखांचे उत्पन्नदेखील! आतापर्यंत त्यांच्या निमाड परिसरात इतक्या कमी क्षेत्रात आणि कमी खर्चात इतके विक्रमी उत्पादन पहिल्यांदाच झाले आहे.

पारुबाई म्हणाल्या की, पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेतीच्या तंत्राचा अवलंब करण्यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या ग्रामीण विस्तार अधिका-यांची मदत घेतली. त्यांच्याकडूनच खते आणि पाणी वेळेवर देण्याची प्रक्रिया समजावून घेतली. पारुबाईंच्या मते साधारणपणे शेतकरी अवेळी खते आणि पाणी देतात त्यामुळे उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. ठिबक सिंचन आणि टाकाऊ पालापाचोळा शेतात पसरुन केलेल्या कंपोस्ट खतामुळे तसेच रासायनिक खतांऐवजी गोमुत्र आणि ताक यांचा खते म्हणून वापर केल्यानेच ठिबकच्या माध्यमातून नेमकेपणाने रोपांपर्यंत पोषणमुल्य पोचविण्यात आले. त्यामुळे कमी उत्पादन सामुग्री वापरूनही ती नेमकी मुळांपर्यंत पोहोचल्याने भरघोस उत्पादन झाले. त्यात १.५०एकरात ६३ टन उत्पादन झाले. ज्यासाठी २५ हजारांचे बियाणे, ५० हजारांची पालापाचोळा आणि ठिबक सिंचनाची सामुग्री यांचा खर्च आला. तर पाच हजार रुपये शेण गोमुत्र आणि ताक यांचे मिश्रण करण्यासाठी लागले. त्यातून केवळ ५५ दिवसांत ६३ टन उत्पादन आले आणि ३.५० लाखांचे विक्रमी उत्पन्न देखील!