चाय पॉईंटची ग्रीन टी-ब्रिगेड, डिलिव्हरीसाठी इलेक्ट्रीक बाईक्सचा वापर

0

संध्याकाळचे चार वाजलेत... अचानक तुमची गरम चहा आणि समोस्याची तल्लफ उफाळून येतेय. तुम्हांला तुमच्या आवडीचा चहा पटकन मिळू शकतो. काय करायचं त्या साठी बरं? चाय पॉईंटमध्ये फोन करा आणि काही मिनिटांतच तुमचा चहा तुमच्याजवळ हजर!

खानपान आणि घरपोच सेवांच्या स्टार्टअपस् सध्या ग्राहकांना खूप सोयी देत आहेत. पण ह्या स्टार्टअपस् एक पाऊल पुढे टाकत पर्यावरण संवर्धनाचं कामही करत आहेत. रोडरनर आणि स्विगी नंतर आता चाय पॉईंटने बँडवॅगन सोबत संधान बांधलय. त्यांनी घरपोच सेवेकरता ६० इलेक्ट्रीक स्कूटर्स घेतल्या आहेत. चाय पॉईंटला या उपक्रमात अम्पेएर वेहिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि हिरो इलेक्ट्रीकची साथ मिळाली.

कंपनी आपल्या या सेवेला ‘ग्रीन टी-ब्रिगेड’ असं म्हणते. बेंगळूरू, एनसीआर आणि हैद्राबादमध्ये सध्या ते आपली सेवा पुरवत आहेत. कंपनीचा कारभार वाढवण्याच्या हेतूने चाय पॉईंट आता मुंबई आणि चेन्नईमध्येही सेवा सुरू करणार आहेत.

चाय पॉईंटचे सीईओ अामुलीक सिंग बिज्राल सांगतात की, इलेक्ट्रीक स्कूटरने सेवा पोचवण्यामुळे पर्यावरण संवर्धनाचं काम तर होतच शिवाय काम करायलाही सोप जातं. यामुळे इंधनावरच्या खर्चात बचत होते आणि किती इंधन वापरलं याची वेगळी नोंदणी करायची गरज नाही भासत. शाश्वत ऊर्जेवर आधारित परिवहन वाहनांवर सरकार आता अनुदान देत असल्यामुळे कंपनीला आता दुचाक्या कमी किंमतीत मिळत आहेत.

ग्रीन टी-ब्रिगेड, सौजन्य – प्रेसवायर
ग्रीन टी-ब्रिगेड, सौजन्य – प्रेसवायर

चाय पॉईंटचे डिलिव्हरी आणि चॅनेलचे प्रमुख यांगचेन सांगतात की, ग्रीन टी-ब्रिगेड सेवा फारशी खर्चिक नसल्यामुळे लहान ऑर्डर असली तरी आम्हाला परवडते.

ग्रीन टी-ब्रिगेड ला विक्रीनंतर कुठेही आणि कधीही सेवा द्यायला हिरो इलेक्ट्रीकने आधीच सुरूवात केली आहे.

अम्पेएर वेहिकल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सीईओ हेमलता अन्नामलाई सांगतात की, येत्या काळात वस्तू दारोदार पोहचवण्याची सेवा देणाऱ्या क्षेत्रात (डिलिव्हरी सेगमेंट) इलेक्ट्रीक वाहन लोकप्रिय होणार आहेत. चाय पॉईंटच्या या प्रयत्नात सहभागी होण्यात अम्पेएरला खूप आनंद होत आहे.

युअरस्टोरीचं मत

डिलिव्हरी आणि लॉजिस्टिक्स सेवा देणारे स्टार्टअपस् हरितक्रांतीचा विचार करतात हे खूप चांगलं आहे. बऱ्याच ई-कॉमर्स आणि डिलिव्हरी कंपन्या त्यांच्या कामगारांच्याच दुचाक्या वापरतात. चाय पॉईंटचा कित्ता गिरवत इतर कंपन्याही इलेक्ट्रीक वाहन घेऊन त्यांचा वापर करतील अशी आशा आहे.

आमुलीकनी सांगितल्याप्रमाणे, इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरामुळे इंधन आणि ऑपरेशनल खर्चात बचत होते. अहवालानुसार इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा ६५ टक्क्यांनी कमी आहे.

बेंगळुरूमध्ये एक लीटर पेट्रोल ६० रुपयाला मिळतं आणि सरासरी ५०-६० किमी अंतर गाडी चालवता येते. सहा तास बॅटरी चार्ज करून हीच सरासरी इलेक्ट्रीक वाहनांतूनही मिळते, केवळ पाच रुपये खर्चात.

लेखिका – सिंधू कश्यप

अनुवाद – साधना तिप्पनाकजे