३४ रुपये रोज कमवणारे अग्रवाल आज २० कोटींच्या कंपनीचे मालक

0

अल्केश अग्रवाल यांच्यासाठी काहीतरी कामधंदा करणे ही विपरित परिस्थितीतून उद्भवलेली गरज होती. निकड होती. महत्त्वाकांक्षा वगैरे असा काहीही प्रकार नव्हता. अल्केश सोळा वर्षांचेच असताना त्यांचे मातृ-पितृ छत्र हरपले. एकवेळ तर अशी आली, की खायला दाणा नव्हता. सकाळी चुकून खायला मिळाले तर संध्याकाळी ते मिळेलच याची खात्री नव्हती.

‘‘अगदी काहीही घडले तरी मी शिक्षण सोडायचे नाही, असे माझी आई मला नेहमी सांगायची. माझ्या शिक्षणावर तिचा भारी भर. ती म्हणे, अगदी अशी वेळ ओढवली समजा, की तुला कामधंदा करावा लागला तरीही त्यातनं सवड काढून शिक्षण सुरू ठेवायचे. आताही मी रोजच रात्री अकरापर्यंत काम करतो.’’ हे सांगताना अल्केश अग्रवाल यांचा आवाज जड झालेला असतो.

अल्केश यांच्याबाबतीत जे काही घडले ते अर्थातच कुणासोबतही घडू नये. पण जगण्याची लढाई तर लढावीच लागते. कुणालाही ती चुकत नाही. अल्केश लढले. किंबहुना संकटांनी त्यांना पोलादी बनवून सोडले. परिस्थिती एकुणात नकारात्मक होती आणि मग त्यांनी सकारात्मकतेसाठी स्वत:च्या खोल आत पाहिले. सकारात्मकता रुजवण्यासाठी हीच एक जागा म्हणून तिथे, स्वत:च्या खोल आत ती रुजवली. जगवली. जागवत ठेवली. ध्येय ठरवले आणि ध्येयप्राप्तीसाठीची दिशाही ठरवली. कठोर परिश्रमांसाठी स्वत:ला नेहमी तयार ठेवले. अत्यंत वाईट आणि खुप मोठ्या अशा जगाशी त्यांची गाठ इतरांच्या तुलनेत पाच वर्षांआधीच पडली होती. त्यांनी जगाला पुरते ओळखलेले होते. तरीही त्यांनी जे काही केले ते आपल्या आगळ्या शैलीत केले.

अल्केश म्हणतात, ‘‘अर्थात तेव्हाही मी जे काही करण्याचा विचार केला, ते मी आपल्या आगळ्या पद्धतीनेच केले.’’

वेळ पुढे सरकत गेली, तसे अल्केश यांच्या कष्टांनाही फळ येत गेले. उत्साह वाढला आणि मग अल्केश यांनी जास्ती जास्त कष्ट उपसायला सुरवात केली. ‘एनआयआयटी’मध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे प्राथमिक धडे ते देत. आठवड्याला त्याबद्दल २४० रुपये मोबदला त्यांना मिळत असे. कॉलेजची १२४० रुपये फीही त्यांनी यातूनच भरली. थोड्या दिवसांनी त्यांनी कॉम्प्युटर दुरुस्तीचे एक दुकान थाटले. काम चालले. त्यांच्या बँक खात्यात आता महिन्याला दहा हजार रुपये जमा होऊ लागले.

काही वर्षे सरली. कॉम्प्युटरचा आता कंटाळा आलेला होता. अल्केश यांनी याचदरम्यान एकतर आता काहीतरी भव्यदिव्य करायचे नाहीतर बोऱ्याबिस्तर बांधून आपल्या घरी परतायचे, असा निर्वाणीचा निर्णय घेतलेला होता. बालमित्र आणि आगामी काळातील व्यवसायातला भागीदार अमित बरमेचा याच्यावर भरवसा ठेवत अल्केश यांनी आपले कॉम्प्युटर दुरुस्तीचे दुकान त्याच्या हवाली केले. आणि निघाले अशा क्लिष्ट कोड्यांच्या शोधात, जे ते सहज सोडवू शकत होते…

आपल्या या शोध मोहिमेदरम्यान त्यांनी बाजाराला पडलेले एक कोडे शोधून काढलेच. प्रिंटरमधली शाई संपल्यानंतर त्याचे कार्टरेज बदलणे हे ते कोडे होते, जे सोडवण्यासाठी लोकांना खुप खर्च पडतो. शिवाय प्लास्टिकचे हे कार्टरेज टाकायचे कुठे हाही एक ताण असेच. फूटबॉलची १७ मैदानं भरतील एवढ्या जागेत जवळपास ३५ कोटी टन प्लास्टिक वर्षाला दाबून भरला जात होताच. पर्यावरणाला ते मारक होते. अल्केश यांच्या दृष्टीने त्यावर एक उपाय होता आणि तो म्हणजे कार्टरेजचा पुनर्वापर. जेणेकरून नव्या कार्टरेजला पैसाही कमी लागेल आणि प्रत्येक कार्बन प्रिंटची किंमतही कमी करता येईल.

अल्केश म्हणतात, ‘‘मी भाग्यवान आहे. मला चार चांगले मित्र मिळाले. एरवी चांगले मित्र फक्त कथा-कादंबऱ्यांतूनच मिळतात.’’

राजेश अग्रवाल, समित लखोटिया आणि अमित यांनी त्यांना संपूर्ण सहकार्य केले. अल्केश यांची कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी या सर्वांनी आपली आयुष्यभराची बचत त्यांच्या स्वाधीन केली. आपल्या या मित्रांसोबत आणि २ लाख रुपयांच्या किरकोळ भांडवलासह अल्केशने आणखी काही प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेण्यासाठी दौरे काढले. तो काळ आठवताना अल्केश सांगतात, ‘‘मी जवळपास अडीच महिने चंदिगड, लुधियाना, अमृतसर आणि दिल्लीच्या अध्ये-मध्ये फिरत राहिलो. माझ्या कामा संदर्भात मी ज्याचे डोके खाल्ले नाही, असा एकही दुकानदार या शहरांतल्या अगदी छोट्या-छोट्या गल्ल्यांतूनही सुटलेला नाही.’’ ही फिरस्ती त्यांना थेट चीनपर्यंत घेऊन गेली. तिथे त्यांच्या चिजवस्तू हरवल्या. एकाने त्यांना लुबाडलेही. खाण्यापुरते पैसेही त्यांच्याकडे उरले नाहीत. घरून नेलेली काजूकतली उपयोगात आली.

जुन्या कार्टरेजच्या निपटाऱ्याचे काम अगदीच प्राथमिक अवस्थेत आहे आणि सपशेल अव्यवस्थित आहे. आणि अशा परिस्थितीत ‘कार्टरेज वर्ल्ड’ आपले अधिराज्य गाजवते आहे. कार्टरेज वर्ल्डशीच मग नाते जोडण्याचा विचार अल्केश यांनी केला. कार्टरेज वर्ल्डकडून त्यांना कोरडेठाक उत्तर मिळाले… ‘एका फ्रेंचायझीसाठी एक कोटी रुपये.’

एकुणात या चारही जणांकडे दोन लाख रुपये होते आणि आपण जणू एखाद्या अंधारलेल्या विहिरीत चाचपडत आहोत, अशी या चौघांची परिस्थिती होती. अशात आशेचा एक किरण चकाकला…

‘‘चला आम्ही आपलाच एक ब्रँड सुरू करू. कुणाशी स्पर्धा करण्यापेक्षा गुणवत्तेवर लक्ष पुरवू.’’

योजना तयार झाली. चौघांनी मिळून एक नाव ठरवले… ‘री-फिल!’ (Re-Feel) उगाचच खर्च नको म्हणून लोगोही आपणच तयार करू असे अल्केश यांनी ठरवले. ३० दिवसांत फोटोशॉप शिकले.

नंतर ९ फेब्रुवारी २००७ मध्ये तो दिवस उजाडला, ज्याने खुप तरसवलेले होते. एका अत्यंत साधारण कार्यालयातून री-फिलचा श्रीगणेशा झाला. आताच चौघांना भव्य शोरूमची स्वप्नेही पडू लागलेली होती. त्यासाठी किमान २५ लाख रुपये लागणार होते. आणि या क्षणाला तरी दिल्ली फार दूर होती. अल्केश यांनी दूरदृष्टीतून आपल्या ब्रँडची फ्रेंचायझी देण्याचे ठरवले. आणि तीदेखिल फक्त एक लाख रुपयात.

‘‘प्रत्येक कामाची ते मार्गी लागण्याची एक वेळ आणि एक पद्धत ठरलेली असते.’’ तत्वज्ञाच्या शैलीत अल्केश सांगतात, ‘‘ईश्वर आमच्याकडे खुप दयेने बघत होता. काम सुरू करून मोजून दहा-पंधरा दिवस उलटलेले होते आणि आमच्याकडे एन. एम. बोथरा एखाद्या देवदुताप्रमाणे आले… फ्रेंचायझी घ्यायला! आमचे दुसरे देवदूतही बोथराच होते. दुसऱ्या फ्रेंचायझीसाठी त्यांच्याकडून प्रस्ताव आला.’’

वास्तविक पाहता सुरवात अपेक्षेपेक्षाही छान झालेली होती, पण वाढत्या खर्चामुळे बँक खाते दिवसेंदिवस रिकामे होत चाललेले होते. शेवटचे सव्वा लाख रुपये उरलेले होते आणि अल्केश यांनी आणखी एक सट्टा खेळण्याचे ठरवले. मुंबईत ‘फ्रेंचायझी इंडिया’च्या वतीने आयोजित मेळाव्यात सहभागी व्हायचेच. हा मेळावा फ्रेंचायझी देणारे आणि ती घेणारे यांच्यातील संवादाचे एक चांगले माध्यम होता.

आयोजकांसमवेत बोलणी केली. निम्म्यावर भाडे कमी करण्यातही अल्केश यशस्वी ठरले. अल्केश सांगतात, ‘‘मला इतर कंपन्यांप्रमाणे आपल्या काउंटरवर सुंदर तरुणींना दाण्याप्रमाणे वापरायचे नव्हते. रंगीबेरंगी लाइट तसेच आकर्षक बॅनर लावण्याच्या बाजूचाही मी नव्हतो. मला काय पाहिजे होते तर माझ्या कंपनीचे काम बोलायला पाहिजे आणि लोकांनी ते ऐकायला पाहिजे.’’

योजना सफल झाली. मोजक्या कालावधीत तिन जणांनी फ्रेंचायझीसाठी संपर्क केला. कंपनीच्या खात्यात आता दहा लाख रुपये होते. लवकरच आमची वेळ आली. दोनच वर्षांत बाजारातले तगडे खेळाडू म्हणून आम्ही नावारूपाला आलो. आम्हाला एकेकाळी फ्रेंचायझीसाठी अडून पाहणाऱ्या आमच्या सर्वांत मोठ्या प्रतिस्पर्ध्याला म्हणजे ‘कार्टरेज वर्ल्ड’ला आम्ही मागे टाकलेले होते. भारतीय बाजारात आमच्या क्षेत्रात आता आम्ही सर्वश्रेष्ठ होतो.

‘‘जेव्हा र्काटरेज वर्ल्डे ३० स्टोअरचे होते तेव्हा आमचे केवळ ३ होते. जेव्हा ते ५० च्या आकड्यांपर्यंत भिडले आम्ही हा आकडा गाठलेला होता. २००९ मध्ये दर पाचव्या दिवशी आम्ही देशात नवा स्टोअर सुरू करत गेलो. माध्यमांनी साथ दिली. १८ ते २० महिन्यांतच १०० हून अधिक लेख छापून आले. २००९ मध्ये देशात नव्याने नावारूपाला आलेली कंपनी म्हणून आमचा गौरव झाला. २००९, २०१०, २०११ मध्ये लागोपाठ पहिल्या शंभरांतील फ्रेंचाइजर्स आणि २०१० मध्ये सर्वश्रेष्ठ ग्राहक सहायक कंपनी म्हणून आम्हाला गौरवले गेले. पुरस्कारांच्या राशी उभ्या राहिल्या. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने पूर्व भारतातील दहा अव्वल उदयोन्मुख उद्योजकांमध्ये अल्केश यांना स्थान दिले.

२०१० उजाडता-उजाडता री-फिल एक ब्रँड म्हणून स्थिरस्थावर झालेला होता. टाइम्स ऑफ इंडियासमवेत री-फिलने १५ कोटी रुपयांच्या एका करारावर स्वाक्षरी केलेली होती. पुढे वर्षभरानंतर अल्केश यांनी ते करून दाखवले, जे उद्योग आणि ‘स्टार्टअप’ क्षेत्रातील भल्या-भल्यांनाही बहुदा जमलेले नाही. विस्तारत चाललेल्या स्टार्टअपने आपली इक्विटी कंपनीकडून पूर्ववत खरेदी केली.

नंतर लगेचच टीएलजी कॅपिटल या ब्रिटिश कंपनीने दहा कोटी रुपयांच्या री-फिल कार्टरेज इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची किंमत ५३ कोटी रुपये लावली. कंपनीची ३६ टक्के भागीदारी खरेदी केली. नंतर अल्केश यांनी पूर्णत: आपल्या मालकीची क्लबलॅपटॉप ही सहायक कंपनी सुरू केली. दरम्यान त्यांची मूळ कंपनी देशातल्या इतर भागांतून वाढतच चाललेली होती. ८३ ठिकाणे मिळून १०० हून अधिक स्टोअर छान चाललेले होते.

यश असे ओसंडून वाहात असताना अल्केश जुने दिवस विसरलेले नाहीत. आईचा ‘शिकत रहा’ मंत्र तर ते अजूनही जपताहेत. अल्केश सांगतात, ‘‘कर्तव्यदक्ष टीम उभारण्यात मला यश आलेच. शिवाय टीममधल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक विकासातही मी लक्ष घातले. कुणाला काही अपुरे पडू दिले नाही, त्याचे मोठे समाधान आहे. एकेकाळी १६ जणांचा समावेश असलेली री-फिलची टीम आता १०० सहकाऱ्यांची झालेली आहे. शिवाय ८०० हून अधिक लोक त्यांच्या फ्रेंचायझीसोबत जुळलेले आहेत.

अल्केश पुढे सांगतात, ‘‘मी नवशिक्यांना सोबतीला घेऊन टीम तयार केली. गेल्या ६ वर्षांत कितीतरी लोक आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिले. विकासात त्यांचा वाटा होताच. कंपनीनेही या सर्वांच्या विकासात लक्ष घातले. सुरवातीला माझ्या हाताखाली व्यवस्था बघणारे माझे तेव्हाचे नवशिके सहकारी आज कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक आहेत आणि त्यांच्या हाताखाली दहा एमबीए युवक काम करताहेत.’’ लवकरच अल्केश स्वत:साठी घर विकत घेणार आहेत. धकाधकीत हे राहूनच गेलेले होते.

अल्केश यांची ही गोष्ट अविश्वसनीय वाटते ना… कथा-कादंबरीतील वाटते ना… पण ती खरी आहे… आणि… कुठल्याही उद्योजकासाठी सर्वांत मोठी संपत्ती कुठली असेल तर ती त्याची कल्पनाशक्तीच… त्याचे विचार… विचारांची दिशा… कृतीची जोड… आणि हे सगळे असले म्हणजे खिशात पावाणा नसतानाही खराखुरा उद्योजक यशाच्या अशा कितीतरी इमारती उभारू शकतो… गगनाला गवसणी घालू शकतोल हेच अल्केश यांच्या या गोष्टीतून सिद्ध होत नाही काय?