ʻमोहिनीʼ चहाचे रमेश चांद अग्रवाल

 ʻमोहिनीʼ चहाचे रमेश चांद अग्रवाल

Sunday November 01, 2015,

3 min Read

आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर दार्जिलिंग येथे फिरायला गेलेल्या रमेश चांद अग्रवाल यांना ही यात्रा आपल्या भविष्याची दिशा ठरविणार आहे, याची पुसटशी कल्पनादेखील नव्हती. उत्तर बंगालमध्ये चहाचे मळे पाहिल्यानंतर तसेच बाजारपेठेत चहाचा लिलाव होत असल्याचे पाहिल्यानंतर रमेश यांनी याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. रमेश यांनी तात्काळ चहा विक्रीच्या व्यवसायात नशीब आजमविण्याचे ठरविले. तेव्हापासून आतापर्य़ंत त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सुरुवातीला रमेश फक्त घाऊक व्यापाराच्या संचलनात सहभागी व्हायचे. मात्र तेव्हा घडलेल्या एका घटनेने त्यांचा व्यापारासंबंधीचा दृष्टीकोनच बदलून टाकला. रमेश आपल्या अनुभवाबाबत सांगतात की, ʻएकदा मी एका चहा विक्रेत्याकडे बसलो होतो. तेव्हा तिथे एक ग्राहक आला आणि त्याने काही दिवसांपूर्वी विकत घेतलेल्या चहाबाबत तक्रार करण्यास सुरुवात केली. तसेच चहा परत घेण्यास त्या विक्रेत्याला सांगितले. हा मला विचार करण्यासाठी भाग पाडणारा क्षण होता. या घटनेमुळे माझ्या मनात चांगली गुणवत्ता असणारी पॅकेटबंद चहा कमी किंमतीत विकण्याचा विचार आला. कारण अनेक गावांमध्ये ब्रुक-बॉण्ड आणि टाटा यांसारखे मोठे ब्रॅंड पोहोचले नव्हते.ʼ

रमेश चांद अग्रवाल

रमेश चांद अग्रवाल


आपल्या तिघा भावांच्या मदतीने रमेश यांनी आपल्या चहाचे ʻमोहिनी टीʼ नावाने उत्पादन सुरू केले. ब्रॅंड चहा न पोहोचलेल्या दूरवर राहणाऱ्या लोकांच्या समस्यांवरचा हा उपाय होता. भले, चहा हे एक हंगामी उत्पादन जरी असले तरी त्याचा वापर वर्षभर केला जातो. आसाम, उत्तर बंगाल, तामिळनाडू आणि केरळसहित अनेक अन्य राज्यांमधून नमूने गोळा करण्यापासून ते अंतिम उत्पादन खरेदी करण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत कठीण आहे. वेगवेगळ्या लोकांकडून नमूने खरेदी केल्यानंतर उत्पादनाला एक मानक आणि संमिश्रण तपासणीतून जावे लागते. या तपासणीनंतरच उत्पादन खरेदी करण्याचे आदेश दिले जातात. त्यानंतर विविध लोकांकडून उत्पादन गोळा करुन ते कानपूर येथील कारखान्यात आणले जाते. तेथे पुर्नतपासणीनंतर त्यावर प्रक्रिया केली जाते. या कामासाठी तज्ज्ञांची टीम असून, ती या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून असते. तसेच सदर टीम दर तीन महिन्यांच्या आत उत्पादनाचे वितरण निश्चित करते, असे रमेश सांगतात.

दुसऱ्या अनेक ग्राहक आधारित उत्पादनाप्रमाणे रमेश यांना देखील वितरण विभागात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. ग्रामीण लोकसंख्येपर्यंत पोहोचणे, हे यांच्यासाठीदेखील मोठे आव्हान होते. रमेश सांगतात की, ʻजेव्हा आम्ही कानपूरमध्ये पॅकेटबंद चहाचे उत्पादन सुरू केले. तेव्हा उत्तरप्रदेशच्या कानाकोपऱ्यातील परिसरात पोहोचणे कठीण असणार आहे, याची कल्पनादेखील त्यांना नव्हती. एक नवा ब्रॅंड असल्याने वितरकदेखील मिळत नव्हते. कारण सुरुवातीला विक्रीदेखील कमी होत असल्याने विक्रेत्यांना उत्पादनावर जास्त विश्वास नव्हता. त्यामुळे सर्वांना उधारीवर माल घ्यायचा होता. मात्र सततच्या आणि अथक परिश्रमाचे फळ आम्हाला मिळाले. लहान शहरांमधील ग्राहकांच्या पसंतीस ʻमोहिनी टीʼ उतरू लागली होती.ʼ त्यामुळे अन्य स्थानिक प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवण्यात त्यांना यश मिळाले. रमेश सांगतात की, ʻआमचे अनेक प्रतिस्पर्धी आहेत, जे काही विशेष परिसरात किंवा काही जिल्ह्यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करून आहेत. चहाचे सामान्य दर आणि योजना यांबाबत आमची त्यांच्याशी स्पर्धा असते. आम्ही आमचे लक्ष गाव, लहान शहरे आणि उपनगरे यांच्यावर केंद्रीत केले आहे. त्यामुळे आमची थेट स्पर्धा ब्रुक-बॉण्ड आणि टाटा यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांशी नसते. मात्र स्थानिक स्पर्धादेखील अत्यंत कठीण आहे.ʼ असे रमेश सांगतात.

या गोष्टींमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण येत नाही. मात्र या गोष्टीचे यश प्राथमिकस्वरुपी उत्पादनाच्या मजबूत वितरणावर, ब्रॅंडिंगवर, ग्राहकांच्या विश्वासावर आणि पुरवठा शृंखलेवर आधारित आहे. सद्यस्थितीला रमेश अग्रवाल दावा करतात की, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, जम्मू आणि काश्मिर, बिहार, झारखंड यांच्यासह उत्तर भारतातील जवळपास ५ टक्के चहा बाजारावर रमेश यांचा ताबा आहे. तसेच ʻमोहिनी टीʼची ३०० कोटींची एकूण विक्री येत्या ५ वर्षात १००० कोटींवर न्यायचे, रमेश यांचे स्वप्न आहे.