अमरावतीच्या अभियंता सभागृहात शेतीविषयक जागृतीचे फलक लावण्यात आले होते, हे फलक तेथील उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी चळवळीचे नेते चंद्रकांत वानखेड़े होते. या सोहळ्यात शहरातील अनेक नामवंत विचारवंत उपस्थित होते...मित्रानो... त्या सभागृहात एखादा शेतकरी मेळावा असेल असेच तुम्हाला वाटले ना ? पण नाही त्या ठिकाणी एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एक आदर्श आणि अनोखा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झाला.

अमरावती येथील अभय देवरे आणि प्रीती कुंभारे या दोघांनी अगदी साधेपणाने हा विवाह केला. अभय या युवकाने गेल्या वर्षीच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा पास केली. तो सध्या नागपूर येथे सहायक आयकर आयुक्त म्हणून कार्यरत आहे तर प्रीती कुंभारे यवतमाळची आयडीबीआय बँकेत सहायक प्रबंधक म्हणून काम करते. दोन्ही परिवाराची आर्थिक स्थिती उत्तम आहे. विवाह थाटामाटात करणे दोन्ही परिवारांना शक्य होते. मात्र सामाजिक जाणीवेपोटी या दोघांनी लग्न अगदी साधेपणाने करून हा खर्च यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त १० शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत म्हणून देऊ केला. प्रत्येक विद्यार्थ्याला २० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. एवढंच नाही तर या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च करण्याची जबादारी या दाम्पत्यांनी घेतली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या ५ ग्रंथालयांना पुस्तके व कपाट देणगी म्हणून देण्यात आली. या विवाह सोहळ्याला नातेवाईक, २० च्या वर IRS, IAS अधिकारी आणि शेतकरी नेते उपस्थित होते.

शेतकरी आत्महत्या हा सर्वात चिंतेचा विषय बनला आहे. नापिकी सोबतच लग्न हा सुद्धा शेतकरी आत्महत्येसाठी कारणीभूत विषय आहे. शेतकरी वर्ग हा लग्न समारंभावर मोठ्या प्रमाणात खर्च करतो. स्वतःची जमीन विकुन मुलींचे लग्न थाटामाटात लावून दिले जाते. आणि त्यानंतर कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली जाते, अशी समाजमध्ये अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे एका आयआरएस अधिकाऱ्यांने जर साध्या पद्धतिने लग्न केले तर याला समाज नक्कीच स्विकारेल आणि एक चांगला संदेश समाजापुढे जाईल असे मत अभय यांच्या वडिलांनी व्यक्त केले.

आयआरएसच्या प्रशिक्षणादरम्यान राष्ट्रपतींना भेटण्याचा अभय यांना योग्य आला. तेव्हा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सर्व आयएएस, आयआरएस, आयपीएस प्रशिक्षणार्थींना तुम्ही समाजासाठी थोडा वेळ खर्च करून सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले होते. हाच विचार मनात ठेवून आपण लग्नाचा वायफळ खर्च टाळून शेतकऱ्यांच्या गरजू मुलांना शिक्षणासाठी मदती करावी असे वाटले. अनेक शेतकऱ्यांनी मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढून लग्ने केली, तर अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केली. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अगदी साधेपणाने केलेला आमचा विवाहसोहळा पाहून इतर तरुणांनीही विवाहवर होणारा वायफळ खर्च टाळावा आणि गरजूंना मदतीचा हात पुढे करावा, असे मत अभय याने व्यक्त केले.

सौजन्य : थिंक चेंज इंडिया