गोष्ट जादुई घड्याळाची

गोष्ट जादुई घड्याळाची

Tuesday October 13, 2015,

5 min Read

भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी स्वप्नांबाबत म्हटले आहे – “ रात्री झोपल्यानंतर पडतात त्यांना स्वप्ने म्हणत नाहीत, तर जी रात्री झोपू देत नाहीत ती स्वप्ने असतात.”

अशाच प्रकारची स्वप्ने पाहणा-या व्यक्तीचे नाव आहे सिद्धांत वत्स. बिहारची राजधानी पटणा इथे राहणारे सिद्धांत वत्स यांचे वय १९ वर्षे इतके आहे. परंतु त्यांनी एक असा शोध लावला ज्यामुळे त्यांची ख्याती जगभर पसरली आहे.

सिद्धांतनी आपल्या तीन मित्रांच्या मदतीने मोबाईल फोन, कॉम्प्यूटर आणि जीपीएस प्रणाली असलेल्या अँड्रॉई घड्याळाचा शोध लावला. हे घड्याळ साधारण घड्याळ नाही. हे जादुई घड्याळ असून अशा प्रकारचे हे पहिलेच घड्याळ आहे. या घड्याळामुळे जगभरात एक नवी क्रांतीच झाली आहे. लोकांना आणखी एक अदभूत सुविधा मिळाली आहे. हे मनगटी घड्याळ खूपच लाभदायक आहे आणि त्यापासून मिळणारे फायदेही भरपूर आहेत.

झोप उडवणारी स्वप्ने पाहणारे सिद्धांत वत्स

झोप उडवणारी स्वप्ने पाहणारे सिद्धांत वत्स


हे घड्याळ म्हणजे एक प्रकारचा मोबाईल फोनही आहे आणि कॉम्प्यूटर सिस्टम सुद्धा. ईमेल, डॉक्युमेन्टस, मोबाईल फोन मध्ये सेव करतो तसे कॉन्टॅक्ट्स असे सारे फिचर्स एकत्रितपणे या घड्याळात सामावलेले आहेत. ही सर्वप्रकारची कामे अगदी सहजपणे केली जाऊ शकतात. या घड्याळ्याच्या माध्यमातून एक प्रकारे मोबाईल फोन आणि कॉम्प्यूटर माणसाच्या मनगटावर बांधले गेले आहेत. ‘स्मार्ट वॉच’ या नावाने हे घड्याळ प्रसिद्ध झालेले आहे. या घड्याळामुळे लोक चालता-फिरता, उठता-बसता मोबाईल फोन आणि कॉम्प्यूटरवर केली जाणारी सर्वप्रकारची कामे करू शकतात.

मनगटावर बांधलेल्या या ‘स्मार्ट वॉच’वर बोटे फिरवून कुणीही ईमेल पाठवू शकतो, फोन करू शकतो. या घड्याळात मॅप आणि जीपीएसची सुविधा देखील उपलब्ध आहे. म्हणजेच फोन करण्यापासून ते इंटरनेटचा वापर आणि कॅमेरासुद्धा मनगटाच्या या घड्याळावर उपलब्ध आहे. ‘स्मार्ट वॉच’च्या या शोधाने गॅजेट्स आणि स्मार्ट फोनच्या दुनियेत नवी क्रांतीच केली आहे. आणि आता या घड्याळाचा वापर जगातील अर्ध्याहून अधिक देशांमध्ये होतो आहे.

महत्त्वाचे म्हणजे या शोधाचा जनक कुणी पाश्चिमात्य शास्त्रज्ञ नाही. किंवा ऑक्सफर्ड, कँम्ब्रिजसारख्या विद्यापीठात शिकणारा कुणी विद्वानही नाही. जो रात्री स्वप्ने पाहत नाही, तर झोपू न देता स्वप्नांनी ज्याची झोप उडवली आहे अशी स्पप्ने पाहणारी व्यक्ती या शोधाची जनक आहे

एका शोधाने पटण्याच्या एका तरूणाला काही दिवसांमध्ये जगभर प्रसिद्ध करून टाकले. याच शोधाने सिद्धांतना ‘यूथ आयकॉन’ बनवले. जगभरातल्या वेगवेगळ्या संस्थांनी त्यांना सन्मान आणि पुरस्कार दिले. सिद्धांतना जगातील विविध शहरांमध्ये होणा-या व्यापार परिषदांमध्ये आणि इतरही कार्यक्रमांमध्ये व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले जाऊ लागले. सिद्धांतनी जगातील अनेक ठिकाणी जगप्रसिद्द बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या महारथींसमोर आपला देश आणि जगाच्या विकासाबाबत आपली स्वप्ने आणि विचार मांडले.

त्यांची कामगिरी आणि विचारांना अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर गौरवण्यात आले. सिद्धांतच्या या शोधाची वर्तमान काळातील सर्वात प्रभावी आणि श्रेष्ठ शोधांमध्ये गणना होऊ लागली.

या शोधासाठी सिद्धांतनी प्रचंड परिश्रम घेतले ही सुद्धा एक विशेष बाब आहे. त्यासाठी त्यांना कितीतरी त्याग करावे लागले.

सिद्धांतना लहानपणापासूनच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये रूची होती. त्यामुळे लहानपणापासूनच त्याचे मन नवा शोध लावण्यात किंवा मग नवे संशोधन करण्यामध्ये गुंतले होते.

सिद्धांत एखादा मोठा शोध लावण्याचे स्वप्न पाहत असत. त्यांच्या स्वप्नांमध्ये नव्या शोधाशिवाय इतर काहीही नसायचे.

आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी सिद्धांतने मधूनच शाळा सोडली. सुरूवातीला त्यांच्या आई-वडिलांना त्यांच्या या निर्णयाचे आश्चर्य वाटले, परंतु नंतर मात्र त्यांनी सिद्धांतला पाठिंबा दिला. सिद्धांतमध्ये मोठी प्रतिभा आहे आणि काही नवे आणि भव्य असे करण्याची क्षमताही असल्याचे त्यांना लवकरच जाणवले. त्यांच्या आई-वडिलांनी सिद्धांतना कधीही निराश केले नाही. नेहमीच त्यांनी त्यांच्या निर्णयाचे समर्थन करत त्यांना प्रोत्साहीत केले.

सतराव्या वर्षीच सिद्धांतनी ‘अँड्रॉईडली सिस्टम’ ही कंपनी सुरू केली. आपल्या तीन सहका-यांच्या मदतीने त्यांनी जगातल्या पहिल्या अँड्रॉईड स्मार्टचा शोध लावला.

आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी दिवस रात्र परिश्रम केल्यामुळेच सिद्धांतना हे मोठे यश प्राप्त झाले. स्पप्न पाहणे ही त्यांची सवय असल्याचे ते स्वत: सांगतात. आणि जो पर्यंत त्यांचे स्वप्न साकार होत नाही, तो पर्यंत त्यांना शांतपणे झोप येत नाही. स्वप्नांनीच त्यांना उद्योगी बनवले. स्वप्नांनीच त्यांना परिश्रम करायला आणि आयुष्यात धोके पत्करायला शिकवले.

नियमांच्या परिघात राहून काम न करणे हे तरूण उद्योजक असेलल्या सिद्धांतचे आणखी एक वैशिष्टय आहे. जर आपल्याला काही वेगळे आणि भव्य असे करायचे असेल तर साधारण नियमांच्या परिघात अडकून न पडता त्यापासून दूरच झाले पाहिजे.

प्रत्येक गोष्टीचा शेवट हा बॉलिवुडच्या चित्रपटात होणा-या शेवटासारखाच गोड असायला हवा असे चित्रपट पाहण्याचा छंद असलेल्या सिद्धांतना वाटते. शेवट चांगला असेल तर सर्वच चांगले होते. जर शेवट चांगला आणि सुखद नसेल तर मग चित्रपटाचा शेवटच होत नाही असे सिद्धांतचे मत आहे. आपल्या जीवनाकडे पाहण्याचा सिद्धांतचा हाच दृष्टीकोन आहे. जो पर्यंत आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे यश मिळत नाही तो पर्यंत ते आपला संघर्ष सुरूच ठेवतात.

सिद्धांत म्हणतात की त्यांना दीर्घकाळ एकाच प्रकारचे काम करणे आवडत नाही. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्यात आणि नवे नवे प्रयोग करण्यात आनंद मिळतो. जे त्यांच्या मनात येते तेच करण्याचा त्यांचा मानस असतो. त्यांची ही इच्छाच अनेकदा स्वप्नाचे रूप घेते आणि मग सिद्धांत आपल्या या स्वप्नांमागे धावायला सुरू करतात. आपल्या या स्वप्नांच्या मागे धावता धावता मग सिद्धांत यशाच्या मार्गावर चालू लागतात.

आपल्या यशाबाबत माहिती देता देता सिद्धांत आणखी एक मनोरंजक गोष्ट सांगतात. भारतात सर्वात मोठ्या समस्या या शेजारी आणि मित्रांकडूनच होत असतात असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना तुम्ही कोणताही नवा विचार वा योजनेबाबत सांगा, ते तुम्हाला अशा-अशा गोष्टी सांगतील ज्या ऐकून तुम्ही निराश व्हाल. आपला विचार चुकीचा आहे आणि आपली योजना काही सफल होणार नाही असेच तुम्हाला वाटेल. इतकेच नाही, तर जो सल्ला तुम्हाला तुमचे शेजारी आणि मित्र देतील त्याने तुम्ही पुरते गोंधळून जाल.

सिद्धांतनी आता सुद्धा स्वप्ने पाहणे बंद केलेले नाही. ते आता ‘स्मार्ट वॉच’ पेक्षा अधिक मोठ्या अशा शोधाच्या तयारीला लागलेले आहेत.

बाजारात वेगवेगळी उत्पादने आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. १९ व्या वर्षी ते केवळ यशस्वी शास्त्रज्ञच नाही, तर एक व्यावसायिक आणि उद्योजकाच्या स्वरूपातही त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे.

सिद्धांतनी समाजसेवा सुद्धा सुरू केली आहे. गैर-सरकारी संस्था असलेल्या ‘फलक’ या स्वयंसेवी संस्थेचे ते संस्थापक सुद्धा आहेत. त्यांनी आपल्या आईच्या मदतीने ही संस्था ( एनजीओ) सुरू केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सिद्धांत देशाची आणि मानवतेची सेवा करत आहेत. त्यांनी आपली उद्योजकता आणि शोधांच्या माध्यामातून मानवतेची सेवा करण्याचा संकल्प सोडला आहे. भारतातील सामाजिक दरी आणि विषमता दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गरीब वस्त्यांमध्ये राहणारी मुले तसेच अनाथ मुलांनी देखील देशाच्या प्रगतीत हातभार लावावा यासाठी त्यांना चांगले शिक्षण मिळायला हवे असे त्यांना वाटते.