एकट्यानेच तयार केली सरकारी अधिकाऱ्यांची ‘युवा’ फौज 

0


छत्तीसगढची राजधानी रायपूरच्या सेंट्रल एक्साइज विभागात कार्यरत असणारे एम. राजीव हे मुळत: झारखंडमधील रहिवासी. छत्तीसगढ मधील विद्यार्थी हे अभ्यासात हुशार होते पण स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांच्या यशाचा टक्का नेहमी कमी असायचा. याच विचारांनी चिंतीत झाल्यामुळे त्यांनी १५ वर्षापूर्वी ‘युवा’ नामक संस्था स्थापन करून तरुण प्रतीभावंतांसाठी नि:शुल्क प्रशिक्षण वर्ग(कोचिंग) सुरु केला. या १५ वर्षात त्यांच्या संस्थेने तरुण अधिका-यांची पूर्ण फौजच तयार केली आहे.

सेंट्रल एक्साइजमध्ये कार्यरत एम.राजीव यांची २२ वर्षापूर्वी रायपुर मध्ये नेमणूक झाली. तेथील रहिवासानंतर वाढलेल्या परिचयामुळे त्यांना कळले की, या राज्यातील मुले-मुली अभ्यासासाठी खूप मेहनत घेतात पण त्यांची ही तयारी स्पर्धा परीक्षेसाठी अपुरी पडते. राजीव यांनी खूप विचार केला पण मार्ग सापडत नव्हता. पण त्यांनी निश्चय केला की या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे त्यांच्या विचारांचाच परिणाम की त्यांनी १५ वर्षापूर्वी ‘युवा’ नामक संस्थेचा पाया रचला. या संस्थेने उमेदवारांसाठी मोफत प्रशिक्षण सुरु केले. याची विशेष गोष्ट म्हणजे हे प्रशिक्षण १५ वर्षापूर्वी ही मोफत होते आणि आजपण मोफत आहे. १५ वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी, १२ जानेवारी २००१ ला त्यांनी ‘युवा’ ची स्थापना केली, ‘युवा’ म्हणजे युथ युनिटी फॉर वॉलेंटरी अॅक्शन ‘.

राजीव यांनी युवर स्टोरीला सांगितले की,’’ मी सुरवात स्वतःच्या घरातून चार उमेदवारांच्या मोफत प्रशिक्षणाने केली. हळूहळू नाव प्रचलित झाले कारण इथून निघालेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी ठरले. विद्यार्थ्यांची संख्या जेव्हा ५० पर्यंत गेली तेव्हा संस्थेसाठी एक घर भाड्याने घेतले.’’

राजीव यांच्या संस्थेची चर्चा जेव्हा सुरु झाली तेव्हा रायपूरच्या बंगाली समाजाने त्यांच्याशी संपर्क साधला व कालीबाडी मंदिराच्या परिसरातील शाळेतील एक खोली भाड्याने दिली. तिथेच राजीव रोज संध्याकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत नि:शुल्क कोचिंग देतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कोचिंगला कोणताही सुट्टीचा वार नसतो. आठवड्यातील सातही दिवस वर्ग चालतात व फी चा खर्च कुठेही नाही.

युवाचे संस्थापक राजीव सांगतात की,’’१५ वर्षात आम्ही प्रशिक्षित केलेले तरुण, डेप्युटी कलेक्टर व डीएसपी पासून तहसीलदार ते फूड इन्स्पेक्टर इ. बनले आहे. बँक, रेल्वे, केंद्र सरकारच्या अनेक विभागात इथे शिकलेले विद्यार्थी कार्यरत आहेत. यातील काही आमच्या बरोबरच कोचिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. ज्यासाठी ते कोणतेही वेतन घेत नाही. मला या गोष्टीचे वाईट वाटते की आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे काही मुले शिक्षणापासून वंचित राहतात.’’

राजीव यांच्या कोचिंग मध्ये रायपुर व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून सुद्धा विद्यार्थी येत आहेत. स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या आकर्षणाला बघून ‘युवा’ ला रायपूरच्या बस स्थानकाजवळ एका व्यावसायिक परिसरात जागा मिळाली. आता इथे ६० पेक्षा जास्त स्पर्धक विद्यार्थी आहेत. इथे कोणतेही वेळेचे बंधन नाही, जोपर्यंत अभ्यास करायचा तो पर्यंत करू शकतात.

या शिवाय ‘युवा’ने इतर कार्याची सुरवात केली आहे ज्यात वृक्षारोपण तसेच तत्काळ व अहोरात्र अत्यावश्यक बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांना फळं, बिस्कीटं, पाणी देण्याबरोबरच त्यांना डायरी व पेनाचे वितरण करतात.

‘युवा’ च्या कार्याला अनेक संस्थासहित छत्तीसगढच्या राज्यपालांनी सुद्धा सन्मानित केले आहे. 

लेखक : रवी वर्मा
अनुवाद : किरण ठाकरे